घरफिचर्ससारांशदेशी गाय वाचवायला हवी...

देशी गाय वाचवायला हवी…

Subscribe

आज देशी गाय नावालासुद्धा उरली नाही अशी परिस्थिती आहे. एकेकाळी गोवंशाने समृद्ध असलेल्या भारत देशात १ टक्कासुद्धा देशी गोवंश शिल्लक नाही ही नुसती खेदाची नाही तर उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अतिशय चिंतेची बाब आहे. घनघोर अंधारातही कुठेतरी प्रकाशाचे किरण दिसतात, त्याप्रमाणे आजही काही बोटावर मोजता येतील इतके गोपालक देशी गोवंश वाचवण्यासाठी झटत आहेत. लोकांना शुद्ध, सात्विक आणि आरोग्यवर्धक उत्पादने निर्माण करून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

-सायली दिवाकर

गोशाळेतील प्रत्येक छोटे-मोठे काम करणारा सदस्य खूप मोठे ‘सत्कर्म’ करत आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. गोशाळेतील काम करणारे सहकारी, गाईची वेळच्या वेळी धार काढणारा मदतनीस, गाईला चारा-पाणी खाऊ घालणारा कामगार असो किंवा गाईचे दूध, दही, तूप घराघरातून पोहचवणारा दूधवाला असेल, प्रत्येक जण खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत याची दखल घ्यायला हवी. याशिवाय पंचगव्य उत्पादन करणारे उद्योजक आणि त्याची विक्री करणारे व्यावसायिक असोत हे सर्व फक्त देशी गोवंशाचे संवर्धन करत नाहीत तर हे गोसेवक राष्ट्र कल्याणासाठी झटत आहेत.

- Advertisement -

त्यामुळे हे सर्व ‘देशभक्त’ आहेत. देशी गाय ही पर्यावरण संतुलन करण्याचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. त्यामुळे गोपालक हे ‘पर्यावरण संरक्षक’ आहेत. तसेच देशी गाईचे शेण व गोमूत्र यासारखे माती संवर्धनासाठी सर्वोत्तम टॉनिक आहे. त्यामुळे सर्व गोपालक ‘माती रक्षक’ आहेत. इतकेच नाही तर आयुर्वेद शास्त्रात कोणत्याही चिकित्सावर औषध-उपचार करायचा असेल तर त्यासाठी देशी गाईचे पंचगव्य हे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे देशी गोवंशाचे काम करणारे सर्व गोपालक हे कित्येक वेदनेने पीडित रोग्यांचे ‘प्राणदाता’ आहेत. त्यामुळे आजच्या कलियुगातही देशी गोवंशाचे काम करणारे प्रत्येक गोपालक हे ‘देवदूता’चे काम करत आहेत.

ह्या सर्व गोपालकांना आपण गोमातेची सेवा करत आहोत ह्या भावनेतून देशी गोवंशाचे काम करून चालणार नाही तर देशी गोवंश संवर्धनामागे जे विज्ञान आहे ते जनसमुदायापर्यंत पोहचवायला हवे. कारण बहुतांश गोपालकांना वाटत असते की आम्ही ‘गाईची सेवा करून खूप मोठे पुण्याचे काम करत आहोत’, परंतु सृष्टीवरील कोणत्याही प्राण्याला सांभाळून मानवप्राणी इतर प्राणिजातीवर उपकार करत नसतात तर मनुष्य स्वतःच्या फायद्यासाठीच कोणत्या ना कोणत्या गरजेपोटी पशू-पक्ष्यांना सांभाळत आला आहे. गाईंनादेखील याच भावनेतून मनुष्य आपल्याबरोबर बाळगू लागला होता.

- Advertisement -

खरंतर गाईंनाही मनुष्याच्या सेवेची गरज नसते तर तिची उत्पत्तीच समस्त सृष्टीचे कल्याण करण्याकरिता झाली आहे हे विसरून चालणार नाही. फक्त गाईच नाही तर सृष्टीवरील कोणतीही गोष्ट मग ती सजीव असो की निर्जीव सृष्टीचे संतुलन राखण्यासाठीच निर्माण झाली आहे हे लक्षात घ्यावयास हवे. उंच उंच डोंगर, खळखळ वाहणार्‍या नद्या असोत की महाकाय विशाल समुद्र असो हे समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी ह्या पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत. मनुष्यप्राण्याची जबाबदारी इतकीच की सृष्टीच्या समस्त वैभवाचे शोषण न करता आपल्याला जे लागेल तेवढेच उपयोगात आणून बाकी समस्त निसर्गातील वैभवाचे जतन करावे. इतका साधा सोपा जीवनाचा नियम आहे तो समजून घ्यायला हवा.

त्याचप्रमाणे देशी गाईंची उत्पत्तीदेखील समस्त सृष्टीच्या उद्धारासाठी झाली आहे यात शंका नाही. भारताची अतिशय वैभवशाली संस्कृती आहे, ज्या संस्कृतीला जगभरात कोठेही तोड नाही. जी जी गोष्ट समस्त सृष्टीसाठी कल्याणकारी आहे त्या प्रत्येक गोष्टीला पावित्र्याशी जोडले गेले. पाप-पुण्याच्या तराजूमध्ये तोलून प्रत्येक गोष्ट कशी मानवाच्या कल्याणासाठी आहे याचे दाखले दिले. ऋतुचक्रानुसार प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगून त्या दिवशी मनुष्याचा कसा नित्यक्रम असावा याप्रमाणे प्रथा-परंपरा सुरू केल्या. त्याचमुळे पुराणिक काळापासून प्रत्येक कार्यात गोमातेचे महत्त्वाचे स्थान आहे हे दिसून येते. याउलट सध्याच्या यांत्रिक युगात देशी गाईचा कुठेही दूर दूर संबंध नाही. अनेकांना हेही माहीत नसते की आपल्या घरी जे दूध येते ते नक्की गाईचे आहे की म्हशीचे. त्यांना इतकेच माहीत असते की आम्ही गोकुळ, ऊर्जा, कोयना, चितळे किंवा इतर कंपन्याचे दूध पीत आहोत.

जे देशी गोवंश सांभाळत आहेत, त्यांना नक्कीच माहीत आहे की आपण किती महत्त्वाचे काम करत आहोत. ह्या सर्व गोसेवकांचे काम निरंतर सुरू राहावे आणि त्यांच्या कामाला गती मिळावी यासाठी आनंदाची बाब म्हणजे नुकताच महाराष्ट्र सरकारने गो-सेवा आयोगाला मान्यता दिली आहे. गोवंश संवर्धनातून खत निर्मिती, विद्युत निर्मिती, बायोगॅस निर्मिती यांसारख्या अनेक योजनांना चालना मिळाल्यास बेरोजगारीची समस्या काही अंशी सुटण्यास मदत होईल. कारण आज बेकारीचा खूप मोठा प्रश्न सगळीकडे उद्भवलेला दिसतो. बहुतांश युवावर्ग नोकरी किंवा कामधंद्याच्या खटपटीत आहेत.

त्यात कित्येक तरुण युवकांची लग्न केवळ चांगली नोकरी नाही किंवा चांगले उत्पन्न नाही म्हणून रखडली आहेत. यासाठी देशी गोवंश पालन आणि त्याच्याशी निगडित मोठ्या प्रमाणात रोजगार आज उपलब्ध आहेत, परंतु आजचा युवावर्गच काय पण संपूर्ण समाज गोवंश व्यवसायाकडे कानाडोळा करत आहेत. सध्याच्या काळात अनेक मोठमोठ्या उद्योजकांचे लक्ष देशी गोपालनाकडे वळले आहे. कारण भविष्यकाळात माणसाचे निरोगी आरोग्य आणि सहीसलामत आयुष्य जगणे ह्या दोनच मुख्य गरजा उरणार आहेत. निरोगी निरामय आयुष्यासाठी निसर्गाकडे वळणे हाच एकमेव उपाय निसर्गाने सांगितला आहे हे लक्षात घ्यायला हवे.

हवा, पाणी, अन्न हे इतके प्रदूषित झाले आहे की घरोघरी अनेक प्रकरच्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि ह्या सर्व समस्यांचे उत्तर म्हणजे निसर्गाकडे पुन्हा परतणे हा एकमेव उपाय आहे. त्यातच देशी गोवंश वाचवणे हे खूप मोठे काम सध्या समोर उभे आहे. या कामासाठी अनेकजण दिवसरात्र मेहनत घेत आहेत. लोकांना शुद्ध, सात्विक आणि आरोग्यवर्धक उत्पादने निर्माण करून लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने देशी गोवंशापासून निर्मित सर्व उत्पादने आणि सेंद्रिय शेतीतून पिकवलेले धान्य, फळे व भाजीपाला अत्यंत महाग असतो. ‘महाग उत्पादने’ असा टॅग लावून शुद्ध, आरोग्यवर्धक पदार्थ घेण्याचे लोक टाळतात.

पण ही सगळी उत्पादने का महाग असतात? ह्याचा विचार समाजाने करायला हवा असे वाटते. लक्षात घ्यायला हवं की देशी गाई कमी दूध देतात ह्या मानसिकतेत खूप कमी गोपालक देशी गाईंचे पालन करतात. फक्त १ टक्का देशी गाई देशात उरल्या आहेत. देशी गाय ही मातृत्वाचे प्रतीक आहे, तिला भावना आहेत, स्मृती आहेत. त्यामुळे इतर प्राण्यांप्रमाणे यांत्रिकपणे ह्या गाईंचे पालनपोषण करता येत नाही. अगदी गोठ्यातील एखादी जरी गाय आजारी असेल किंवा एखादी गाय अचानक मृत्यू पावली असेल तरी दु:खामुळे गाई दूध कमी देऊ लागतात आणि याचा फटका गोपालकांचे आर्थिक गणित फिस्कटण्यास पुरेसे आहे. याचबरोबर इतर प्राण्यांपेक्षा देशी गाईंची चारा-पाण्याचीदेखील काळजी घ्यावी लागते. कारण देशी गाईंच्या पंचगव्याचा वापर मनुष्याच्या अत्यंत गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

त्यामुळे खाण्याची अगदी व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. मिक्स डाळींचा भरडा, बीट, गाजर, ऊस, कोणत्याही पालेभाज्या, ओवा, हळद, काळीमिरी, हिंग, गूळ अशा अनेक सकस आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आरोग्यवर्धक पदार्थांचा आहार देशी गाईंना दिला जातो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशी गाईच्या पाठीच्या कण्यामध्ये सूर्य-केतू नावाची नाडी असते, जी इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये आढळत नाही. सकाळी सूर्योदयाच्या वेळी ही नाडी जागृत होते आणि सूर्याच्या पहिल्या किरणांना आपल्या शरीरात शोषून घेते. त्या किरणांमधून सुवर्ण क्षारयुक्त सत्त्वगुण प्रधान प्राणतत्त्वांना ती आपल्या शरीरामध्ये साठवते, ज्याला केरोटीनदेखील म्हटले जाते म्हणूनच गाईचे दूध, दही, तूप पिवळे असते व गाईच्या प्रत्येक घटकात प्राणऊर्जा भरपूर असते. याचा उपयोग मानवाच्या आरोग्यासाठी होतो.

सूर्य-केतू नाडी तेव्हाच जागृत होते जेव्हा ह्या गाई रानात, शेतात किंवा मोकळ्या हवेत असतात. त्यामुळे ह्या गाईंना मोकळे सोडावे लागते. त्यांना बाहेर रानात घेऊन जावे लागते आणि सर्वांना ठाऊकच असेल की आजकाल शेतीच्या कामासाठी आणि गोपालनाच्या कामासाठी कामगार मिळणे किती मुश्कील आहे. गाईंना बाहेर रानात घेऊन जायचा अजून असा फायदा होतो की गाईला आवश्यक औषधी रानचारा ती खाते. त्यामुळे तेही औषधी गुणधर्म गाईच्या दुधात आढळतात. याचाही मानवाच्या आरोग्यासाठी फायदा होतो, परंतु इतर दूध देणार्‍या प्राण्यांना बंदिस्त शेडमध्ये बांधून ठेवले जाते.

त्यामुळे कोणतेही औषधीय गुणधर्म ह्या प्राण्यांमध्ये आढळत नाहीत. त्यामुळे देशी गोवंश सांभाळणे म्हणजे ऐर्‍यागैर्‍याचे काम नाही. त्यासाठी मानव कल्याण, समस्त सृष्टी संवर्धनाची तळमळ हवी. तेच हे काम करू शकतात आणि राहिला महाग वस्तूंचा मुद्दा तर प्रत्येकाने आपल्या घरात अवश्य नजर फिरवावी आणि हिशेब करावा की घरातल्या सर्व वस्तू अतिशय स्वस्त आहेत का? पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की महाग गोष्टी घरोघरी पोहचू शकतात पण ‘शुद्धता, सात्त्विकता आणि पवित्रता’ सगळ्यांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामागे ‘पुण्याईची’ भूमिका खूप मोठी असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -