पियानोच्या निमित्ताने

देव आनंदने पियानो शिकण्याचा नाद सोडून दिला आणि पियानो देव आनंदच्या घरातल्या एका कोपर्‍यात धूळ खात तसाच पडून राहिला. पण पियानोच्या ह्या तोडक्यामोडक्या साधनेत देव आनंदला पियानोबाबतची एक ज्ञानप्राप्ती झाली ती अशी की पियानोच्या ‘किज्’ ह्या हार्ड म्हणजे जड असतात आणि ते लक्षात घेऊन पियानो वाजवला जातो. पुढे ‘तीन देवियाँ’ नावाच्या सिनेमात ‘ख्वाब हो तुम या कोई हकिकत’ हे गाणं देव आनंद पडद्यावर गात असताना देव आनंदला पियानो वाजवायला लागला.

काही लोकांना जसा गप्पांचा फड जमवण्याचं वेड असतं तसं देव आनंदला एक वेड होतं. हे वेड होतं गाण्यांचा फड जमवायचं. त्यासाठी काही गायकांना, काही वादकांना तो बोलवायचा. त्यासाठी तो आपल्या व्यस्त वेळापत्रकातून खास वेळ काढायचा. गायकगायिकांनी गायलेली गाणी ऐकायचा, वादकांनी पेश केलेलं वाद्यसंगीत ऐकायचा. त्यात मनापासून रस घ्यायचा. असा फड जमवता जमवता देव आनंदला वाद्यं वाजवण्याबद्दल आकर्षण वाटू लागलं. खासकरून पियानोचं. वाद्य वाजवण्यासाठी पियानोचीच निवड करण्याबद्दल देव आनंदचं म्हणणं होतं, ‘सगळ्या वाद्यांमध्ये पियानो हे वाद्य सगळ्यात उठून दिसतं, तसं पाहिलं तर अकॉर्डियनसुध्दा वाजवणार्‍याच्या अंगाखांद्यावर खेळतं, त्याचंही आकर्षण वाटतं, तेही दिसायला भारदस्त दिसतं, पण पियानोची बात काही औरच…आणि हिंदी सिनेमातला गायक हा जास्तीत जास्त गाणी गातो ते पियानोची सोबत घेऊन. त्यामुळे पियानो कसा वाजवतात हे तरी मुळात मला अभिनेता म्हणून कळायला नको का!’

देव आनंद पियानोचा हा असा गुणगौरव करून थांबला नाही तर त्याने एका भल्या सकाळी पियानो शिकायचा निर्णय घेतला. त्यासाठी खास महागडा पियानो खरेदी करून घरी आणला. तो शिकवण्यासाठी एक पियानोगुरू ठेवला. काही दिवस देव आनंद ह्या शिकवणीची वेळ अजिबात चुकवायचा नाही. पण नंतर त्याच्यातला व्यस्त कलाकार त्याच्या ह्या शिकवणीच्या आड येऊ लागला. म्हणजे त्याचा पियानोगुरू येऊन घरी बसू लागला. पण शिष्य देव आनंद काही पियानो आणि पियानोगुरूंना वेळ देऊ शकला नाही. पुढे व्हायचं तेच झालं. देव आनंदने पियानो शिकण्याचा नाद सोडून दिला आणि पियानो देव आनंदच्या घरातल्या एका कोपर्‍यात धूळ खात तसाच पडून राहिला.

पण पियानोच्या ह्या तोडक्यामोडक्या साधनेत देव आनंदला पियानोबाबतची एक ज्ञानप्राप्ती झाली ती अशी की पियानोच्या ‘किज्’ ह्या हार्ड म्हणजे जड असतात आणि ते लक्षात घेऊन पियानो वाजवला जातो. पुढे ‘तीन देवियाँ’ नावाच्या सिनेमात ‘ख्वाब हो तुम या कोई हकिकत’ हे गाणं देव आनंद पडद्यावर गात असताना देव आनंदला पियानो वाजवायला लागला. पण इतर नायक-नायिका टाइपरायटर बडवतात तसा पडद्यावर जो पियानो बडवायचे तसं त्यावेळी देव आनंदने ह्या गाण्याच्या वेळी केलं नाही. त्याचं एकमेव कारण देव आनंदला पियानोच्या मूलभूत शिक्षणाचा लाभ काही काळ झाला होता.

‘ख्वाब हो तुम या कोई हकिकत’ ह्या गाण्याचा विषय निघाला म्हणून त्याचा एक किस्सा सांगायलाच हवा. त्या एका काळात देव आनंद, किशोरकुमार, एस.डी.बर्मन असं त्रिकुट बराच काळ जमून आलं नव्हतं. ते जमून न येण्यामागे तसंच काही कारणही नव्हतं. पण ‘नौ दो ग्यारह’नंतर किशोरकुमारना देव आनंदसाठी गाण्याचा योग आला नव्हता. अशाच एका काळात देव आनंदने किशोरकुमारना फोन केला आणि थेट एस.डी.बर्मनदांच्या घरी येण्याचा निरोप दिला. किशोरकुमार त्यावेळी एकतर मधुबालाच्या आजारपणाने त्रासलेले होते आणि स्वत:च्या एक सिनेमात गर्क होते. पण तरीही त्यांनी देव आनंदच्या ह्या निमंत्रणाला नाही म्हटलं नाही. किशोरकुमारनी एस.डी.बर्मनदांकडे येण्यासाठी खास वेळ काढला.

किशोरकुमार बर्मनदांच्या घरात जाताच बर्मनदांनी त्यांना आवेगाने मिठी मारली आणि म्हटलं, ‘अरे किशोर, कुठे होतास इतके दिवस? एकमेकांसोबत आपलं काम निघालं नाही म्हणून भेटायचंच नाही असंच थोडं आहे! बघ, आज तू येणार आहेस म्हणून मी जेवणात खास बंगाली पदार्थ बनवले आहेत.’

किशोरकुमारही खूश झाले. त्यांनी बर्मनदांचा हा पाहुणचार साग्रसंगीत झोडला. जेवणं वगैरे झाल्यानंतर बर्मनदांनी ज्यासाठी किशोरदांना देव आनंदमार्फत सांगावा धाडला त्या मूळ विषयाला हात घातला. ते म्हणाले, ‘बराच काळ लोटला, तू, मी आणि देव, आपल्या तिघांचं असं कोणतं गाणं झालं नाही, म्हणूनच तुझ्यासाठी मी एक गाणं करतो आहे. हे बघ, तू आता कसलीही सबब सांगायची नाही. कारण तू माझ्याकडे माझ्या हातचं जेवला आहेस, माझ्या घरचं मीठ खाल्लं आहेस. जमलं तर आताच रिहर्सलही कर!’

बर्मनदांनी लागलीच देव आनंद, आर.डी.बर्मन आणि किशोरकुमारना समोर बसवलं. पेटी काढली. सगळे शांत बसले. काही काळ कुणीच कुणाशी काही बोललं नाही. बर्मनदांची बोटं झरझर पेटीवरून फिरू लागली आणि झर्रकन एक गोड चाल तयार झाली. लगोलग त्या चालीवर मजरूह सुलतानपुरींकडूून शब्द लिहून घेतले गेले. ते शब्द होते –

ख्वाब हो तुम या
कोई हकिकत,
कौन हो तुम बतलाओ,
देर से कितनी
दूर खडी हो,
और करीब आ जाओ.

खास किशोरकुमार ढंगातलं हे गाणं होतं. किशोरकुमारनी बघता बघता ते गाणं आपल्यात भिनवलं. दुपारी बरोबर दोन वाजता त्या गाण्याची रिहर्सल सुरू झाली ती संपली कधी तर रात्री नऊ वाजता! गाण्यासाठी बर्‍याच दिवसांनी भेटलेल्या किशोरकुमारना बर्मनदांनी असंतसं जाऊ दिलं नाही…आणि बर्मनदांच्या त्या हसत्याखेळत्या गाण्यात किशोरकुमारनीही आपल्या अवखळ गळ्यातले असे काही रंग भरले की गाणं खळाळतं, झळाळतं झालं. गाण्याची रिहर्सल संपली तेव्हा बर्मनदा किशोरकुमारना म्हणाले, ‘चल, गाणं माझ्या मनासारखं झालं आहे, आता रात्रीच्या जेवणासाठी तू तुझ्या घरी जाऊ शकतोस.’

पुढे हे गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा बर्मनदांनी किशोरकुमारच्या कपाळाचं चुंबन घेतलं. ते नुसतं चुंबन नव्हतं तर आपल्या मनातलं गाणं सही सही प्रत्यक्षात उतरवल्याची बर्मनदांकडून किशोरकुमारना मिळालेली ती कचकचीत पोचपावती होती.