– रियाज शेख
कोरोनानंतर भारतात दिवसेंदिवस ऑनलाईन व्यवहारांमध्ये वाढ होत असली तरी भारतात ऑनलाईन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. सायबर चोरटे नवनवीन लुटीचे फंडे शोधून काढत नागरिकांची फसवणूक करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे डिजिटल अरेस्ट आहे. हा फसवणुकीचा नवीन प्रकार असून, भारतातील सर्वात मोठा धोका आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात ११५ व्या एपिसोडमध्ये भारतातील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत काही टिप्ससुद्धा दिल्या आहेत. पोलीस, सरकारी अधिकार्यांचा वेश धारण करून लोकांना धमकावले जाते आणि त्यांच्याकडून पैसे लुटले जातात. त्यामुळेच डिजिटल अरेस्टपासून बचाव करण्यासाठी सतर्कता आणि जागरूकता हा फसवणुकीपासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.
जागतिकीकरणाच्या युगात, डिजिटल तंत्रज्ञानाने आपले जीवन सहज, प्रभावी आणि गतिशील केले आहे. परंतु, त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. यामध्ये व्यक्तिगत माहितीचा भंग, औद्योगिक गुप्तता चोरी आणि इतर प्रकारचे सायबर हल्ले समाविष्ट आहेत. यामुळे सायबर सुरक्षा आणि सायबर कायद्याची आवश्यकता अधिक महत्त्वाची बनली आहे. गृह मंत्रालयाच्या सायबर विंगने दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल अरेस्टद्वारे सायबर फसवणूक करणारे दररोज ६ कोटी रुपये लुटत आहेत.
२०१४ मध्ये १० महिन्यांमध्ये डिजिटल अरेस्टच्या ९२ हजार ३३४ प्रकरणांमध्ये तब्बल २ हजार १४० कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाली आहे. देशभरात प्रत्येक महिन्याला सुमारे २१४ कोटी रुपयांची सायबर फसवणूक होत आहे. समाजात बदनामी होईल किंवा आपले नाव खराब होईल या भीतीपोटी अनेकजण तक्रारी करत नाहीत. त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे समजून येत नाही. ज्यांच्या तक्रारी येतात त्यावरून डिजिटल अरेस्ट क्राईम किती मोठ्या प्रमाणात पसरत आहे, हे दिसून येत आहे.
जसे जसे सायबर गुन्हेगारी वाढते, तसे नागरिकांना त्यांच्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी अधिक सजग आणि तत्पर राहण्याची आवश्यकता आहे. डिजिटल अरेस्टच्या संकल्पनेवर आधारित, नागरिक स्वत:च्या संरक्षणाची पातळी वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. सायबर चोरटे नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा करतात. त्याआधारे ते पोलीस, क्राईम ब्रँच, सीबीआय, आरबीआय आणि अमली पदार्थ अशा तपास करणार्या विभागांचे अधिकारी असल्याचे भासवत व्हिडीओ करतात. ते पूर्ण समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन करण्यासाठी आत्मविश्वासाने बोलतात.
शिवाय, समोरील व्यक्तीला अटकेची भीती दाखवत घरातच थांबण्यास सांगतात. सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावे लष्कराचे अधिकारी, डॉक्टर, प्राध्यापक, मुख्याध्यापक, उद्योजकांसह देशभरातील नागरिकांना कॉल्स केले आहेत. सायबर भामटे सावज हेरतात. त्यानंतर जाळ्यात अडकवून लाखो रुपये बँक खात्यातून काढून घेतात. परिणामी, अनेकांनी आयुष्यभराची मिळवलेली कमाई गमावल्याचे आज देशभरात असंख्य उदाहरणे आहेत. गृहमंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, दूरसंचार विभाग, वित्तीय सेवा विभाग, आर्थिक व्यवहार विभाग (डीईए), महसूल विभाग (डीओआर), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि ट्राय अशा घटना रोखण्यासाठी सातत्याने काम करत आहेत.
थांबा, विचार करा आणि कृती करा अशा फसवणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अजिबात घाबरू नका. ‘शक्य असल्यास कॉलचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो रेकॉर्ड करा. कोणतीही एजन्सी धमकावत नाही, व्हिडीओ कॉलद्वारे चौकशी करत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही. जर तुम्ही पीडित असाल तर घाबरू नका. सर्वप्रथम १९३० हेल्पलाईन नंबर किंवा cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार नोंदवा, असे ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.
नाशिक शहरामध्ये २०२४ मध्ये वर्षभरात डिजिटल अरेस्टप्रकरणी १३ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ८ पुरुष व ३ महिलांची फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये महिला डॉक्टर, ३ इंजिनिअर, आर्मी अधिकारी, प्रतिष्ठीत व्यक्तींचा समावेश आहे. फसवणुकीसाठी सायबर चोरट्यांनी बनावट सिमकार्डद्वारे कॉल केल्याचे समोर आले आहे. १३ डिसेंबर २०२४ रोजी नाशिक शहरातील एका नामांकित शाळेतून निवृत्त झालेल्या वयोवृद्ध महिलेस अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला.
समोरील व्यक्तीने दिल्लीतील क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगत मनी लाँड्रिंगमधील कमिशन महिलेच्या बँक खात्यावर आल्याचे सांगितले. अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर महिलेने चेकद्वारे तब्बल २३ लाख रुपये पाठविले होते. पोलिसांनी ज्या बँक खात्यावर पैसे गेले होते, त्या खातेदाराला शोधून काढले असता ते उत्तर प्रदेशातील कनोजमधील बापलेक असल्याचे उघडकीस आले.
विशेष म्हणाजे, मदरशाच्या नावे सोशल मीडियावर फेकलिंक तयार करून देशभरातील नागरिकांना फसवत असल्याचे समोर आले आहे. पोलीस तपासात मुख्य संशयित आरोपी दिल्लीत मदरशामधील बापलेकांना भेटला. त्याने बापलेकांकडून बँक खात्याची गोपनीय माहिती घेत एकाच दिवशी २ कोटी रुपये जमा करून काढून घेतल्याचेही उघडकीस आले. संशयित मुख्य आरोपी जम्मूचा असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. सायबर चोरटे कुटुंबीयांना काहीतरी करतील, या भीतीने नाशिक शहरातील एका महिला डॉक्टरने स्वत:ला रूममध्ये बंदिस्त करून घेतले होते.
ती १५ हून अधिक दिवस रूमबाहेर आली नव्हती. शेवटी, पती डॉक्टरने पोलिसांशी संपर्क साधत आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा एक फंडा असल्याचे सांगत महिला डॉक्टरची भीती दूर केली. पोलिसांनी विश्वास दिल्यानंतर महिला डॉक्टर तणावमुक्त झाली. अशा अनेक घटना इतरत्र घडत आहेत. परिणामी, नागरिकांनी कोणालाही लगेच बँक खात्याची माहिती देऊ नये आणि घाबरून जाऊ नये. नागरिकांनी कोणताही गुन्हा केला नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही.
पोलीस कधीही कोणाला अटक करू शकत नाहीत. पोलीस आपली ओळख दाखवण्यासाठी कधीही व्हिडीओ कॉल करत नाहीत. कोणतेही अॅप्स डाऊनलोड करण्यास सांगत नाहीत. शिवाय, ओळखपत्र, एफआयआर कॉपी व अटक वॉरंट ऑनलाईन शेअर करत नाहीत. पोलीस एखाद्या व्यक्तीविरोधात पुरावे असल्यास संबंधित व्यक्तीला प्रथम चौकशीला बोलवतात. थेट अटक करून न्यायालयात हजर करत नाहीत.
शिवाय, कोणताही न्यायाधीश व क्राईम ब्रँच, तपासी एजन्सीज कोणाच्याही घराबाहेर पहारा देत नाहीत की कोणावरही वॉच ठेवत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या आमिष आणि भीतीला बळी पडू नये. अनोळखी कॉलवर अनोळखी व्यक्तीशी दीर्घकाळ बोलू नये. बँक डिटेल्स किंवा यूपीआय आयडी कोणालाही शेअर करू नये. सायबर भामट्यांनी धमकावले असेल तर तात्काळ मदतीसाठी सायबर पोलिसांशी संपर्क साधावा आणि स्वत:ची फसवणूक टाळावी.
-(लेखक नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत.)