Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश डिजिटल दणका!

डिजिटल दणका!

Subscribe

डिजिटल साक्षरता नसल्यानं आज भारतासह जगभरात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालीय. भारतात सायबर कायदेदेखील तितके कठोर नसल्यानं गुन्हेगारांची हिंमत अधिक वाढलीय आणि त्याचा शिकार बनतोय सामान्य भारतीय नागरिक. आपल्या आयुष्यभराची कमाई एका क्लिकवर जेव्हा अकाऊंटमधून खाली होते, तेव्हा ती भावना कशी असेल याचा विचार आपण करूदेखील शकत नाही, पण हे आज सर्रास घडतंय. सायबर गुन्ह्यांचे हेच चित्रण करणारी एक वेबसीरिज २ वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती, जिचा दुसरा भाग ‘जमतारा सिझन २ : सबका नंबर आएगा’ नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय. पहिल्या सिझनप्रमाणेच या भागातही सायबर क्राईम कथेचा केंद्रबिंदू आहे, पण यावेळी हा खेळ आणि या गुन्ह्यांचे स्वरूप सगळंच बदललं आहे.

लहान मुलाच्या हातात एखादे नवीन खेळणे दिले की तो आधी त्याला खाण्याची वस्तू समजून तोंडात घालतो. त्याला ती खाण्याची गोष्ट नाही, गाडी आहे असं दाखवल्यावर मग त्याला लक्षात येतं की खेळणीला खायचं नाही, तर खेळायचं असतं. आपल्या देशात डिजिटल क्रांती फार कमी वेळात झाली हे मान्य करावंच लागेल. ज्या देशात सरकार आजवर काही शहरांत पूर्णवेळ वीज पोहचवू शकलं नाही, तिथं मोबाईल टॉवर पोहचले हे सत्य आहे. या क्रांतीत महत्त्वाची भूमिका एका टेलिकॉम कंपनीची होती, ज्यांनी आपल्या नागरिकांना सुरुवातीच्या काळात मोफत इंटरनेट डेटाची सवय लावली आणि आपले ग्राहक वाढविले.

आज इंटरनेट पोहचल्यानंतर अनेकांचं जीवन सुखी झालं आहे. जग जवळ आलंय आणि ज्यांनी कधी फोन पाहिला नव्हता त्यांच्या हातात स्क्रीनटच आलाय, पण जसं लहान मुलाच्या हातात फक्त खेळणी देऊन चालत नाही, त्याला ती खेळणी खायची की खेळायची हे शिकवावं लागतं, अगदी तसंच केवळ इंटरनेट मोबाईल हातात दिले म्हणजे आपण डिजिटल झालो असं नाही. आपल्याला एकाच वेळी यांच्या वापरासोबत यातून काय चुकीचं घडू शकतं याची माहितीदेखील सामान्यांना देणं आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता नसल्यानं आज भारतासह जगभरात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालीय. भारतात सायबर लॉदेखील तितका कठोर नसल्यानं गुन्हेगारांची हिंमत अधिक वाढलीय आणि त्याचा शिकार बनतोय सामान्य भारतीय नागरिक.

- Advertisement -

आपल्या आयुष्यभराची कमाई एका क्लिकवर जेव्हा अकाऊंटमधून खाली होते, तेव्हा ती भावना कशी असेल याचा विचार आपण करूदेखील शकत नाही, पण हे आज सर्रास घडतंय. सायबर गुन्ह्यांचे हेच चित्रण करणारी एक वेबसीरीज २ वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती, जिचा दुसरा भाग ‘जमतारा सिझन २ : सबका नंबर आएगा’ नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय. पहिल्या सिझनप्रमाणेच या भागातही सायबर क्राईम कथेचा केंद्रबिंदू आहे, पण यावेळी हा खेळ आणि या गुन्ह्यांचे स्वरूप सगळंच बदललं आहे. जुन्या पात्रांच्या सोबत झालेली काही नवीन पात्रांची एण्ट्री, बदललेली राजकीय परिस्थिती आणि गुन्ह्यांचे बदललेले स्वरूप यामुळे ही सीरिज आपली वेगळी छाप पाडण्यात यशस्वी होते.

जमतारा वेबसीरिजचा विषय तिला इतर कंटेंटपेक्षा काहीसा वेगळा बनवतो. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सायबर क्राईम म्हटल्यावर आपल्यासमोर येणारी काहीतरी पॉश, हायक्लास क्रिमिनलची प्रतिमा ही सीरिज पूर्णपणे मोडते. कारण यात सायबर गुन्हेगार एखाद्या आयआयटीमधून शिकलेला किंवा हॅकिंगचे संपूर्ण ज्ञान असलेला इंजिनिअर नाही. इथं गुन्हेगार वेगळे आहेत. ज्यांना फक्त आपण काय केलं तर पकडलं जाणार नाही हे स्पष्ट माहिती आहे. म्हणून ते बिनधास्त गुन्हे करतात आणि पैसे कमावतात. जिथं पहिल्या भागाचा शेवट झाला होता, त्याच्या काही अंतराने दुसर्‍या भागाला सुरुवात होते. ब्रिजेश भान (अमित सिआल) आमदार आहेत आणि जमतारामध्ये त्यांचा अजूनही तितकाच दबदबा बनलाय.

- Advertisement -

रॉकीला (अंशुमन पुष्कर) आता नेता बनण्याची इच्छा नाही. त्याला काहीही करून ब्रिजेश भानच्या तावडीतून सुटून लग्न करायचं आहे आणि जमतारा सोडायचंय. सनी (स्पर्श श्रीवास्तव) हॉस्पिटलच्या बेडवर पडलाय. कारण पायाला लागलेली गोळी त्याला अपंग करून टाकते. गुडिया मंडल (मोनिका पवार) एका गुन्ह्यात जेलमध्ये आहे आणि बुआजी (सीमा पाहवा) आता ब्रिजेशला निवडणुकीत हरविण्यासाठी गुडियाला मोहरा बनवू पाहतेय. एकीकडे आता जमतारामध्ये ओटीपी घेऊन पैसे मिळवणं कठीण झालंय, तर दुसरीकडं राजकारण मध्ये आलंय अशा परिस्थितीत जमतारामध्ये पुढे काय होतं? गुडिया आणि सनी आपला बदला घेतात की पुन्हा एकदा ब्रिजेश भान जिंकतो? यासाठी तुम्हाला सीरिज पाहावी लागेल. जमतारा सिझन २ची कथा आज रिलेट होते, याचं कारण आहे यात दाखविण्यात आलेले स्कॅम.

पहिल्या भागात जी ओटीपीवाली फिशिंग स्टाईल आपण पाहिली होती, ती आज कालबाह्य झालीय. म्हणून गुन्हेगारांनी केबीसीचे नाव वापरून केकेकेच्या नावाखाली नवीन स्कॅम आणलाय. आता हा स्कॅम फक्त सीरिजमध्ये नाही, तर भारतातदेखील ऑनलाईन फसवणुकीसाठी ही पद्धत वापरण्यात येत आहे. आजही अनेकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर केबीसीच्या नावाने मेसेज येतो. अमिताभच्या आवाजात कुणी बोलल्याचं सांगतं आणि मग व्हॉट्सअ‍ॅप कॉल येतो. लॉटरीची रक्कम पाहिजे असेल तर काही पैसे जमा करा, असं ते सांगतात आणि पैसे जमा झाले की कल्टी मारतात. जो स्कॅम सध्या घडतोय तोच सीरिजमध्ये पाहायला मिळाल्याने आपण त्या कथेशी अधिक रिलेट करतो आणि म्हणून ती कथा दमदार बनते, पण पहिल्या भागाच्या तुलनेत दुसर्‍या भागाच्या पटकथेत तितकी मजा येत नाही. इथं एपिसोड संपला की पुढच्या भागाची आतुरता तितकीच ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आलेलं नाही.

जमताराच्या पहिल्या भागातदेखील या सीरिजचे कलाकार ही जमेची बाजू होती. इंडस्ट्रीतील काही उत्तम अभिनेते या सीरिजमध्ये आहेत. अमित सीआल, दिब्येदयु भट्टाचार्य, सीमा पाहवा, अंशुमन पुष्कर, स्पर्श श्रीवास्तव आणि मोनिका पवार यांच्यासह या भागात काही नवीन कलाकारांची एण्ट्रीदेखील झालीय. ज्यापैकी रिंकू मंडलच्या भूमिकेत असणारा रवी चहर नावाचा अभिनेता सीरिज संपल्यानंतरही लक्षात राहतो. ब्रिजेश भानच्या भूमिकेत अमित सिआल यावेळीही भाव खाऊन जातोय. कारण नकारात्मक भूमिकेसाठी लागणारा माज आणि भाषा दोन्ही त्याच्याकडे दिसली. अंशुमन पुष्करचा अभिनय ग्रहण नावाच्या सीरिजमध्ये अनेकांनी पाहिला असेल, पण या सीरिजमधील त्याची भूमिका काहीशी वेगळी होती. जो रॉकी पहिल्या भागात नेता बनण्याची तयारी करीत होता, तोच आता ब्रिजेशच्या तावडीतून वाचण्याचा प्रयत्न करतोय.

सीमा पाहवा यांनी साकारलेली बुआजी पहिल्या भागात तितकी प्रभावी नव्हती, पण या भागात त्यांना पुरेपूर स्क्रीनटाईम दिलाय. त्यात त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिलीय. आपण ब्रिजेश भानची आत्या आहोत आणि त्याच्यापेक्षा अधिक हरामी आहोत हे आपल्या अभिनयातून दाखवून देण्याची एकही संधी त्या सोडत नाहीत. मोनिका पवारनेदेखील गुडिया मंडलच्या भूमिकेला न्याय दिलाय. दिब्येदयु हे बिस्वा पाठकच्या भूमिकेत याही सिझनमध्ये लक्षात राहतात. मनात केस सॉल्व्ह न करू शकल्याचं गिल्ट बाळगून संपूर्ण सीरिजमध्ये वावरणारा हा बिस्वा आपली छाप पाडतो. दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी दोन्ही प्रकारांत ही सीरिज उजवी ठरते. बॅकग्राऊंड

स्कोअरदेखील उत्तम आणि कथेला जोडणारा आहे. संवाद पहिल्या भागाच्या तुलनेत काहीसे कमकुवत वाटतात. काही संवाद दर्जेदार नक्की आहेत, पण त्यांचं प्रमाण पहिल्या भागाच्या तुलनेत कमी आहे. एकंदरीत पटकथेची थोडी समस्या सोडली तर जमतारा २ सबका नंबर आएगा एकवेळ नक्की पाहावी अशी आहे.

- Advertisment -