घरफिचर्ससारांशसंगीत गंमतजंमत!

संगीत गंमतजंमत!

Subscribe

‘देखा हैं पहली बार, साजन की आँखो में प्यार.’...हे गाणं गाणार्‍या नायिकेच्या तोंडचे हे शब्द ऐकताना कायम वाटतं की हा जो कुणी तिच्या पसंतीचा प्रियकर आहे त्याला आपला प्रियकर म्हणून पसंत करताना आणि त्याच्यावर इतका काळ प्रेमाची बरसात करताना या बाईला कधीच त्याच्या डोळ्यांत प्रेम दिसलं नाही जे आज पहिल्यांदाच तिला दिसत आहे?

‘देखा हैं पहली बार, साजन की आँखो में प्यार’ असे त्या गाण्याचे शब्द होते. सिनेमाचं नाव होतं ‘साजन’. हे गाणं त्या वेळी काही खूप खूप गाजलं नाही. पण बर्‍यापैकी वाजलं. लोकांनी लक्षात ठेवलं नाही. पण अधेमधे लक्षात येत राहिलं. तसंही ते खास लक्षात राहण्याजोगं नव्हतंच. पण जेव्हा ते गाणं समोर आलं तेव्हा त्या गाण्याच्या या मुखड्याची, म्हणजे मुखड्यातल्या त्या शब्दांची मोठी गंमत वाटत राहिली. गंमत अशासाठी की या गाण्याची नायिका आपला साजन म्हणजे आपल्या प्रियकराच्या व्यक्तिमत्वातलं, आणि तेही त्याच्या डोळ्यांबद्दलचं वैशिष्ठ्य सांगते आहे…आणि ते सांगताना म्हणते काय तर ‘देखा हैं पहली बार, साजन की आँखो में प्यार.’…हे गाणं गाणार्‍या या नायिकेच्या तोंडचे हे शब्द ऐकताना कायम वाटतं की हा जो कुणी तिच्या पसंतीचा प्रियकर आहे त्याला आपला प्रियकर म्हणून पसंत करताना आणि त्याच्यावर इतका काळ प्रेमाची बरसात करताना या बाईला कधीच त्याच्या डोळ्यांत प्रेम दिसलं नाही जे आज पहिल्यांदाच तिला दिसत आहे? मग जर ते प्रेम याच्या डोळ्यांत याआधी कधीच तिला दिसलं नाही तर ते प्रेम या अशा माणसावर जडलंच कसं? या नायिकेला तिच्या डोळ्यातलं प्रेम दिसायला इतका उशीर का झाला? की हे सगळं न कळायला हा जो कोणी साजन आहे त्याचे त्या काळात डोळे आले होते की काय? सर्वसाधारणपणे जगातल्या सर्वसामान्य मनुष्यप्राण्याचा दुसर्‍या मनुष्यप्राण्याशी प्रेमयोग जुळून येतो तेव्हा त्या प्रेमयोगाशी संबंधित जे कुणी असतात त्या दोघांच्याही डोळ्यांत प्रेमभाव ओसंडून वाहत असतात. मग प्रश्न पडतो की ‘साजन’ नावाच्या सिनेमातला हा साजन नावाचा प्रेमपक्षी जगभरातल्या या प्रेमाच्या नियमाला अपवाद आहे का?

…हा सिनेमा येऊन आणि त्याचं जे काही व्हायचं ते होऊन आज बरीच वर्षं लोटली तरी हा डोळ्यात याआधी कधीच प्रेम न दिसलेला, पण तरीही कुणाचा तरी प्रियकर होऊ शकलेला साजन आमच्यासारख्या बर्‍याच लोकांसाठी अनाकलनीयच राहिला. तो कुणाचा तरी साजन होऊ शकलाच कसा हा प्रश्न आमच्यासाठी कायम अनुत्तरीत राहिला.
आपल्याकडल्या गाण्याबजावण्यात या अशा गंमतीजमती अधुनमधून होत राहिल्या आहेत. संगीतकार सज्जाद हुसेन यांची अशीच एक गंमतीदार तक्रार त्यांचे समकालिन संगीतकार नौशाद यांच्या एका गाण्याबद्दल होती. ते गाणं होतं, ‘झुम झुम के नाचो आज, गाओ आज, गाओ खुशी के गीत रे.’ खरंतर नौशाद हे एक प्रतिभावंत संगीतकार म्हणून ओळखले जायचे. त्यांचं सिनेमा संगीतातलं योगदानही मोठं होतं. पण तरीही संगीतकार सज्जाद हुसेन त्यांच्या या गाण्याबद्दल म्हणायचे, ‘गाण्याचे शब्द गीतकाराने लिहिले आहेत ‘झुम झुम के नाचो आज, गाओ आज, गाओ खुशी के गीत रे’ म्हणजे आनंदाने नाचा, आनंदाचं गाणं गा, पण संगीतकाराने त्या शब्दांना चाल मात्र तद्दन रडकी लावली आहे, गाणं झुमण्याचा संदेश देतं आणि गाण्याच्या सुरांत मात्र नेमके उदास भाव!’

- Advertisement -

सज्जादजींच्या त्या म्हणण्यात खरंच काही तथ्य होतं का?…पण त्या गाण्याबद्दलचं सज्जादजींचं हे समीक्षण ऐकल्यानंतर ते गाणं जेव्हा जेव्हा ऐकलं तेव्हा सज्जादजींच्या म्हणण्यात तथ्य असल्याचं नाकारता आलं नाही. अशाच एका काळात एक गाणं आलं होतं, जे सिनेमात ऋषी कपूरवर चित्रित करण्यात आलं होतं आणि गाण्याचे शब्द फार फारच ‘हृदयद्रावक’ आणि ’ह्रदयस्पर्शी’ही होते – तुम को खुश देख कर, मैं बहुत खुश हो गया, ये आँखे भर आयी तो फिर क्या हुवा!…आनंद बक्षींनी हे गाणं लिहिलं होतं आणि राजेश रोशननी त्या गाण्याला संगीत दिलं होतं, पण त्या गाण्यात त्यांनी इतकं ओढूनताणून कारूण्य आणलं होतं की लहान पोराने खोटं खोटं रडावं तसं हे गाणं वाटलं होतं. सिनमातले नायक-नायिका म्हणे रडू येण्यासाठी ग्लिसरीनचा वापर करत असतील तर या गाण्यातल्या शब्दांतच हे ग्लिसरीन ओतलेलं होतं. खोटं खोटं रडणार्‍याचं हसू आल्यावाचून रहात नाही तसं या गाण्याचं अखेर झालं. वास्तविक सुमधूर संगीताचा ऐवज राजेश रोशननी संगीतरसिकांना बहाल केलेला आहे. पण या गाण्याच्या बाबतीत त्यांचं अति झालं आणि हसू आलं.

‘मेरे जीवन साथी’मधल्या ‘ओ मेरे दिल की चैन’ या गाण्याबाबतही अशीच एक गंमत कळण्यापलिकडची आहे. आर. डी. बर्मनच्या संगीतातलं हे गाणं खरोखरच सर्वांगाने अवीट गोडीचं आहे. गाण्यातल्या मुखड्याआधीचं वाजणारं संगीत, त्यातल्या दोन मुखड्याआधीचं वाजणारं संगीत, हे या गाण्यातलं सगळं काही निव्वळ अप्रतिम आहे. पण गाणं पुढे पुढे सरकतं आणि तिसरा अंतरा येतो, त्या अंतर्‍याचे शब्द येतात- युं ही अकेला भी अक्सर, गिर के सम्हल सकता हूं, तुम जो पकड लो हात मेरा, दुनिया बदल सकता हूं मैं…हे इथपर्यंत ठीक वाटतं, पण त्यानंतरचे शब्द येतात – मांगा है तुम्हे दुनिया के लिए…आता ही ओळ आधीच्या तीन ओळीच्या तुलनेत बरीच चमत्कारिक वाटते. दुनिया के लिए तुम्हें मांगा हैं ही काय भानगड आहे, हे पूर्णपणे कळण्यापलिकडचं आहे. खरंतर ती अख्खी ओळ एखाद्या लेखातल्या संदर्भहीन वाक्यासारखी वाटते. पण ती त्या वेळीही चालून गेली आणि म्हणून आता इतक्या वर्षांनंतरही ती ऐकली जाते आहे आणि आज तर कराओकेवर चक्क गायली जाते आहे!

- Advertisement -

ओ.पी. नय्यरनी संगीत दिलेल्या ‘हुजुरेवाला, जो हो इजाजत’ हे गाणं ऐका. हे गाणं खरोखरच कानाला सुखावणारं आहे. पण गाणं सुरू होण्याच्या आधीचं संगीत म्हणजे ज्याला इन्ट्रो-पीस म्हणतात तो इतका लांबलचक आहे की तोपर्यंत मुंबईच्या टेरिफिक ट्रॅफिकमधली अ‍ॅम्ब्युलन्स सुरळीतपणे हॉस्पिटलमध्ये पाहोचेल! ज्याला हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकायची इच्छा होते त्याला हा इन्ट्रो-पीस या गाण्यात सक्तीने ऐकावा लागतो. कॅसेटच्या जमान्यात हा इन्ट्रो-पीस अंदाजाने पुढे सरकवण्याची सोय उपलब्ध असायची, पण सीडी-पेनड्राइव्हच्या काळात ते शक्य होत नाही. सिनेमात त्या इंट्रो-पीसला महत्व असेलही, पण एरव्ही ते गाणं ऐकताना तो इतका मोठा इन्ट्रो-पीस बराचसा असह्य वाटतो. असो, संगीताच्या दुनियेत अशा गोष्टी घडतात, त्यातून गंमतीजमती निर्माण होतात, ज्या कधी कुणाच्या लक्षात येतात, कधी लक्षात येत नाहीत. पण लक्षात आल्या की गाण्यापेक्षा त्या गंमतीजमती मन रिझवून जातात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -