घरफिचर्ससारांशतुमने दिलीप को देखा था...

तुमने दिलीप को देखा था…

Subscribe

दिलीप कुमार म्हणजे कोण? याचं उत्तर दिलीप कुमारांच्या निधनानंतर केलेल्या अक्षयकुमारच्या एका ट्वीटमध्ये मला मिळालं. त्याने लिहिलं होतं, आमच्यासारखे अनेकजण लोकांसाठी हिरो असतील पण दिलीप कुमार साहेब आमचे हिरो होते. दिलीप कुमार साहेबांचे जे सिनेमे मी पाहिले त्यातील ‘नया दौर’ आणि ‘मुघल-ए-आझम’ वगळता सर्व सिनेमे ऐंशी नव्वदीच्या काळातले होते, मशाल, क्रांती, कर्मा, सौदागर, शक्ती असे केवळ 6 सिनेमे मी पाहिलेत, म्हणून त्यांच्या सिनेकारकिर्दीचा फार आढावा घेता येईल असं माझ्याकडे काहीच नाहीये, पण ज्यांचे आम्ही फॅन्स आहोत ते ज्यांचे फॅन होते तो व्यक्ती कसा असावा? या कुतुहलापोटी लिहिण्याचा हा प्रयत्न.

2001 सालची गोष्ट आहे, झी सिनेअवॉर्डचा समारंभ पार पडत होता. ज्याचे संचलन नुकताच सुपरस्टार बनलेला शाहरुख खान करत होता. स्टेजवर दिलीप कुमारांना बोलाविण्याची वेळ येते आणि त्याच्या आधी सुमारे 5 मिनिटं शाहरुख त्याच्या दिलीप साहेबांसोबतच्या आठवणी सांगतो, नवीनच झीसिनेअवॉर्ड्स सुरू झाल्याने हल्लीच्या अवॉर्ड्स फंक्शनप्रमाणे नाटकं आणि स्क्रिप्टिंग असण्याची शक्यता थोडी कमीच होती. शाहरुख किस्सा सांगतो आणि दिलीप कुमारांना स्टेजवर आमंत्रित करताना स्वतःच्या हाताने रेड कार्पेट अंथरत त्यांचं स्टेजवर स्वागत करतो. आता तो शाहरुखचा मोठेपणा म्हणा किंवा शोऑफ करणं म्हणा, पण ज्यांना आमची पिढी स्टार्स मानते, हिरो मानते त्याचं असं वागणं मला आश्चर्यचकित करणारं होतं. माझ्यासारख्या नव्वदीच्या उत्तरार्धात जन्मलेल्या पिढीला ज्यांना आता शाहरुख सलमान म्हातारा वाटतो, त्यांच्यासाठी दिलीप कुमार म्हणजे कोणीतरी सिनियर अ‍ॅक्टर, ज्याचा सगळेजण सन्मान करतात. पण दिलीप कुमार म्हणजे कोण ? याचं उत्तर दिलीप कुमारांच्या निधनानंतर केलेल्या अक्षयकुमारच्या एका ट्वीटमध्ये मला मिळालं. त्याने लिहिलं होतं आमच्यासारखे अनेकजण लोकांसाठी हिरो असतील पण दिलीप कुमार साहेब आमचे हिरो होते. दिलीप कुमार साहेबांचे जे सिनेमे मी पाहिले त्यातील ‘नया दौर’ आणि ‘मुघल-ए-आझम’ वगळता सर्व सिनेमे ऐंशी नव्वदीच्या काळातले होते, मशाल, क्रांती, कर्मा, सौदागर, शक्ती असे केवळ 6 सिनेमे मी पाहिलेत, म्हणून त्यांच्या सिनेकारकिर्दीचा फार आढावा घेता येईल असं माझ्याकडे काहीच नाहीये, पण ज्यांचे आम्ही फॅन्स आहोत ते ज्यांचे फॅन होते तो व्यक्ती कसा असावा ? या कुतुहलापोटी लिहिण्याचा हा प्रयत्न.

माणूस गेला की, तो मोठाच असतो, गेलेल्या माणसाबद्दल चांगलं बोलण्याची आपल्याकडे मोठी परंपरा आहे, म्हणून अनेकवेळा श्रद्धांजली अर्पण करताना केलेली खोटी स्तुती लपविण्याचा प्रयत्न केला तरी उघडी पडतेच. आपण एका अशाकाळात जगतोय जिथं माणूस मरण्याच्या अवस्थेत येण्याअगोदरच त्याच्याबद्दल श्रद्धांजलीपर कार्यक्रमाची यादी तयार केली जाते, दिलीप साहेब नुकतेच आपल्यातून निघून गेले. वाईट या गोष्टीचं वाटतं की, ज्या पिढीला हे नाव माहीत नव्हतं, त्यांना हे नावं त्यांच्या सिनेमांतून कळण्याआधी अनेकवेळा त्यांच्या खोट्या निधनाच्या बातम्यांमधून समजले. दिलीप कुमार साहेबांच्या निधनानंतर अनेक मान्यवरांनी त्यांच्या आठवणीतील कुमार साहेबांचे किस्से, कहाण्या, प्रसंग अधोरेखित केले. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, सलमान, अक्षय, अनिल कपूर, आमिर खान, अजय देवगण या आणि अशा कितीतरी नायकांसाठी दिलीपसाहेब हिरो होते, मला तेव्हाच प्रश्न पडला की, या सगळ्या कलाकारांचा कालखंड पाहिला तर त्यात फार मोठं अंतर आहे.

- Advertisement -

अमिताभच्या बालपणापासून ते शाहरुख आणि अजय देवगनच्या बालपणापर्यंत एकच नायक यांचा आयडॉल कसा होऊ शकतो? याचं उत्तर दिलीप कुमार साहेबांची सिनेकारकीर्द पाहिली की, मिळून जातं. दिलीप कुमार हे 60 वर्षांची कारकीर्द असलेले अभिनेते होते. सहा दशकाच्या सिनेमांच्या या प्रवासात त्यांनी केवळ 63 सिनेमांत काम केले, पण त्यांचा एक एक सिनेमा सिनेसृष्टीत होऊन गेलेल्या, असलेल्या आणि येऊ घातलेल्या अनेक पिढ्यांसाठी अभ्यासक्रमासारखा आहे. माझ्या पिढीतील बहुतांश लोकांनी त्यांचा केवळ कर्मा सिनेमा पाहिला असेल असा माझा अंदाज आहे, फार रसिक असेल तर मशाल, सौदागर, मुघल-ए-आझम, शक्ती पाहिलेला असू शकतो. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा दिलीप साहेबांना पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ते वय झालेले सिनियर कलाकार अशीच प्रतिमा तयार झाली, पण त्या वयात इतका सुंदर दिसणारा, शांत, पॉज घेऊन बोलणारा कलाकार तरुणपणात कसा असेल ? याचीही उत्सुकता होती म्हणून मुघल-ए-आझम पाहिला आणि जावेद अख्तर यांनी त्यांचा उल्लेख सिनेमातील पहिला मेथड अ‍ॅक्टर मार्लन ब्रँडो नव्हे तर दिलीप कुमार आहे असा का केला याच उत्तर मिळालं.

एक चांगला अभिनेता डोळ्यातून फार काही बोलून जातो, ज्याला अभिनयासाठी शब्दांची कमीत कमी गरज पडते तो एक उत्तम नट असं म्हणतात. ज्या काळात दिलीप साहेबांनी कारकीर्द सुरू केली त्या काळात फार तंत्रज्ञान आलेलं नव्हतं, नाटकातले लोक सिनेमात यायचे, मोठ्या आवाजात गायचे आणि बोलायचेसुद्धा, पण दिलीप कुमारांच्या बाबतीत हे कधी घडलं नाही. आक्रस्ताळेपणा आणि सो कॉल्ड चमकोगिरी मला त्यांच्या कोणत्याही सिनेमात आढळली नाही, कारणही तसंच मुघल-ए-आझमचा सलीम बघा आणि कर्मामधला राणाविश्वप्रताप इतक्या काळात चेहर्‍यावर सुरकुत्या आल्या असल्या तरी डोळ्यात आणि अभिनयात कुठेही बदल झाला नाही. पाणीदार डोळे फार कमी लोकांना मिळतात, ज्यांच्या डोळ्यात कायम पाणी दिसते अशा व्यक्तीची एक खासियत आहे, त्यांच्याकडे लोकांना कन्व्हिन्स करण्याची एक अजब कला असते. कदाचित मी चुकीचाही असू शकतो, पण मला तरी हाच अनुभव आलाय, दिलीप कुमार साहेब असो किंवा इरफान यांच्या डोळ्यांत एक वेगळीच जादू आहे, ज्यामुळे आपण त्यांच्यात सामावून जातो आणि त्यापासून नजर हटत नाही. मुघल-ए-आझममध्ये एक सिन आहे, जिथे अकबर(पृथ्वीराज कपूर )आपला मुलगा शहजादा सलीमला (दिलीप कुमार) समजावीत असतो की, अनारकली तुझ्यासाठी नाहीये, तेव्हा सलीम म्हणतो ‘तकदीरे बदल जाती है, ज़माना बदल जाता है, मुल्कों की तारीख बदल जाती है, शहंशाह बदल जाते है, मगर इस बदलती दुनिया में मोहब्बत जिस इंसान का दामन थाम लेती है, वो इंसान कभी नहीं बदलता,’ युट्युबवर हा संवाद उपलब्ध आहे, एकदा वेळ काढून नक्की हा संवाद बघा, यात दिलीप कुमारांचे डोळे आणि संवाद बोलताना असलेले पॉज बघा, आवाज न वाढवता आक्रस्ताळी न होताही आक्रमक संवाद बोलता येऊ शकतात, याचं जिवंत उदाहरण म्हणजे तो सीन आहे. इथे सलीमच्या डोळ्यात दिसणारं पाणी अकबराच्या पुत्रप्रेमापेक्षा अधिक खरे वाटते.

- Advertisement -

असे एक ना अनेक सीन तुम्हाला केवळ एकट्या मुघल-ए-आझममध्ये पाहायला मिळतील. इंडस्ट्रीत दिलीपकुमारांना अभिनयाचं विद्यापीठ का म्हटलं जायचं याचं उत्तर तुम्हाला सिनेमा पाहिला की, कळेल. त्यांच्याकडे आवाजाची नैसर्गिक देण नव्हती. ना त्यांना आधीपासूनच अभिनेता बनायचं स्वप्न पडलं म्हणून त्यांनी याच तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं, दिलीप कुमारांच्या आयुष्यात अनेक गोष्टी जुळून आल्या खर्‍या, पण त्यांची ही कला त्यांनी स्वतः सिनेमांची पारायणं करून आत्मसात केली होती. त्यांचा अभिनय, हावभाव इतके स्पष्ट असायचे की, कोणी त्याचे ठरवून अनुकरणसुद्धा करू शकत नव्हतं, त्यांच्याकडून शिकण्याची प्रेरणा घेणार्‍यांनासुद्धा कधीच ती गोष्ट पूर्णपणे जमली नाही.

दिलीप कुमारांना ट्रेजडी किंग म्हटलं जायचं, त्यांनी साकारलेला देवदास कुणीच विसरू शकत नाही. त्यांनी अनेकवेळा प्रेक्षकांना रडवलं आहे, मशाल सिनेमात त्यांनी साकारलेला विनोद आणि त्याच सिनेमातला ए भाई …. गाडी रोको ए भाई वाला सीन आठवा, विनोद आणि सुधा (वहिदा रहमान ) दोघे रस्त्यावरून जात असतात आणि अचानक सुधाला त्रास सुरू होतो. सुमसान रस्त्यावर पत्नीच्या मदतीसाठी आक्रोश करणारा विनोद दिलीप कुमारांनी अतिशय उत्तमरित्या साकारलाय, रस्त्यावर फिरणं, दरवाजे वाजविणे आणि तरीही कोणीच हाक न ऐकल्यानंतर शेवटी हताश होऊन काळ्या चॅनेल गेटला हाताने धक्के देणं, तो सीन इतका रियल आणि अप्रतिम जमून आलाय की, आजही लक्षात राहतो. कर्मामधला अनुपम खेर आणि त्यांच्यातला जेलमधील सीन असो किंवा मजदूरमधला मिलच्या जनरल मिटिंगमधला सीन, प्रत्येक सिनेमा आणि तयारी प्रत्येक सीन त्यांनी उत्तमच केला आहे.

त्यांनी केवळ प्रेक्षकांना भावनिक नाही केलं तर आपल्या ह्यूमरने अनेकवेळा हसविलंसुद्धा, कानून अपना अपना सिनेमात त्यांची संजय दत्त सोबतची केमिस्ट्री त्याचंच उदाहरण. त्यांच्यासोबत सिनेमात काम करणं हीच त्या काळातील कलाकारांसाठी पर्वणी असायची. फर्स्ट इनिंग नंतर जेव्हा त्यांनी सेकण्ड इनिंगला सुरुवात केली तेव्हा त्यांनी चरित्र अभिनेत्याची भूमिका साकारली. जसा सिनेमा बदलला तसा त्यांचा अंदाजही बदलला, ब्लॅक व्हाईट सिनेमाला रंग आल्यांनतर, रंग भरलेल्या सिनेमात अ‍ॅक्शन वाढल्यानंतर आणि अ‍ॅक्शन वाढलेल्या सिनेमात ग्लॅमर आल्यानंतरही दिलीप कुमार इंडस्ट्रीत कायम होते. म्हणून दिलीप कुमारसाहेब केवळ पिढ्यांचे नायक नव्हते तर ते त्या त्या पिढीतल्या नायकांचे नायक होते, शेवटी जावेद अख्तर यांनी दिलीप साहेबांचं वर्णन करताना रघुपती सहाय फिराक यांच्या एका शेरमध्ये बदल करून लिहिलंय, आनेवाली नस्लें तुम पर नाज करेंगी ए लोगों , जब उनको ये ध्यान आएगा तुमने दिलीप को देखा था.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -