घरफिचर्ससारांशरंगावकाशातील अस्वस्थता!

रंगावकाशातील अस्वस्थता!

Subscribe

कोरोना काळात प्रत्यक्ष रंगभूमीवर जी अभूतपूर्व शांतता पसरली आहे, त्यामुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली. नाटकाविषयीचा मजकूर वाचण्यासाठी दीर्घ मुदत आपसुकच मिळाली. त्या अर्थाने कोरोना काळ ही एक इष्टापत्ती म्हणायला काही हरकत नाही. पण ती तेवढ्यापुरतीच मर्यादित राहो, हीच रंगदेवते चरणी प्रार्थना ! कारण या आपत्तीचा कालावधी जितका वाढत जाईल तितकी अस्वस्थता आपल्या एकूणच रंगावकाशात साचून राहील. ती आता आहे त्यापेक्षा अधिक न साचो अशीच प्रार्थना प्रत्येकजण मनोमन करत असेल याबद्दल दुमत नाही. पण त्या अस्वस्थतेची निरगत लावण्यात वाचनाचा खूप मोठा हातभार लागू शकतो हे मी स्वानुभवाने सांगतो. गेल्या काही महिन्यात माझे मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक रंगभूमी संदर्भात लिहिल्या जाणार्‍या काही नियतकालिकांचे वाचन झाले. त्यातून जाणवले ते हे की, हिंदी रंगभूमीवर अशा नियतकालिकांची मोठी आणि सशक्त परंपरा आहे. ‘दैनिक महानगर’च्या वाचकांना त्या परंपरेचा थोडक्यात परिचय या लेखातून करून द्यावासा वाटतो.

खरं तर हिंदी रंगभूमीच्या वाटचालीत या नाट्यविषयक नियतकालिकांचे आपले असे महत्व आहे. नाटक या विषयाला वाहून घेतलेल्या नियतकालिकांची सुरूवात शोधायला गेल्यास आपण विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत जाऊन पोहोचतो. त्या आधीच्या काळात साहित्याविषयक नियतकालिकांमध्ये अधून मधून नाटकाविषयीही काहीतरी लिहून येत होते. पण स्वतंत्रपणे नाटकाला केंद्रस्थानी ठेवून निघणार्‍या नियतकालिकांची वानवा होती. सुरुवातीच्या काळात पंडित नारायण प्रसाद द्वारा संपादित ‘शेक्सपियर’ (1906) आणि नरोत्तम व्यास द्वारा संपादित ‘रंगमंच’(1931) ही दोन नाट्यविषयक नियतकालिके प्रकाशित होत असत. पण कुठलाही नाट्यविषयक दृष्टिकोन विकसित करण्यात ते आपले योगदान देऊ शकले नाही. वैचारिक बांधिलकी आणि विकासाच्या अनुषंगाने पाहिल्यास पन्नाशीचे दशक हा या नियतकालिकांच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा आहे. साहजिकच, त्याआधीचा काळ हा त्यांच्या बाल्यावस्थेचा काळ मानला जायला हवा. 1943 साली स्थापन झालेल्या ‘इप्टा’ने पन्नाशीच्या दशकात भारतीय रंगभूमीच्या परिप्रेक्ष्यात राजकीय आणि सामाजिक संदेश देण्यासाठी नाटकांचे प्रयोग करायला सुरूवात केली. या नाटकांच्या प्रचार आणि प्रसारासाठी एक इंग्रजी बुलेटिन आणि ‘भित्तीपत्रिका’ नावाचे एक प्रकाशन चालवले. या दोन्ही माध्यमांतून त्यांना एका नव्या रंगचेतनेचा साक्षात्कार झाला आणि त्यातून प्रेरणा घेत, ‘इप्टा’च्या आग्रा येशील शाखेतून राधेलाल यांच्या संपादनाखाली ‘रंगमंच’ (1953) आणि वृंदावन लाल वर्मा, श्यामु संन्यासी यांच्या नेतृत्वाखाली ‘अभिनय’ (1956) या दोन नियतकालिकांचे प्रकाशन सुरू झाले. या दोन्ही प्रकाशनांनी समस्त हिंदी पट्ट्यात घडणार्‍या रंगकार्याचा लेखाजोखा ‘इप्टा’च्या विविध शाखांमधून सादर होणार्‍या कार्यक्रमांत मांडला. पण पुढे ‘रंगमंच’चे फक्त आठच अंक प्रकाशित होऊ शकले आणि ‘अभिनय’ सुद्धा चार वर्षांत बंद पडले.

स्वातंत्र्योत्तर काळात सांस्कृतिक कलांचे रक्षण करण्यासाठी तसेच त्याच्या प्रसारासाठी देशभरात विविध कला अकादमींची स्थापना करण्यात आली. सबंध भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत स्थापन झालेल्या या अकादमींनी तसेच हौशी नाटक मंडळींनी सुद्धा आपापली नियतकालिके असावीत यादृष्टीने पावले टाकायला सुरूवात केली. पाटण्यातील ‘बिहार संगीत, नृत्य आणि नाटक अकादमी’ (1951) द्वारा, जगदीशचंद्र माथुर यांच्या संपादनाखाली ‘बिहार थिएटर’ या नावाने इंग्रजी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत नियतकालिके प्रकाशित होत होती. उदयपुरच्या ‘भारतीय लोककला मंडळ’ या संस्थेतर्फे, देवीलाल सामर आणि महेंद्र भानावत यांच्या संयुक्त संपादनाखाली प्रकाशित होणारे ‘लोककला’ हे नियतकालिक सुद्धा एक महत्वाचा प्रयत्न म्हणून गणले गेले होते. भारतीय कलांच्या विविध रूपांचा परिचय वाचक तसेच प्रेक्षकांना व्हावा, हा या प्रकाशनांमागचा मुख्य हेतू होता. याचा सकारात्मक परिणाम झाला तो असा की, प्रेक्षकाभिमुख कला आणि परंपरागत नाटकाच्या विविध रूपांविषयी रंगकर्मी आणि प्रेक्षकांच्या ठायी नवे विचार आकार घेऊ लागले. या नियतकालिकांमधील बहुतांश मजकूर जरी अकादमिक स्वरुपाचा आणि तथ्याधारित असला, तरी नाट्य अभ्यासकांच्या भारतीय नाटकाच्या अनेकविध रूपांविषयी असलेल्या ज्ञानात मोलाची भर घालेल असाच होता.

- Advertisement -

नियतकालिकांच्या या साखळीत अलाहाबादहून प्रकाशित होणार्‍या ‘सूत्रधार’ (1956) या प्रकाशनाचा उल्लेख विशेषत्वाने करण्यासारखा आहे. धर्मेंद्रगुप्त यांच्या संपादनाखाली प्रकाशित होणारे हे प्रस्तावित नियतकालिक म्हणजे आधुनिक काळात वैयक्तिक पातळीवर केला गेलेला पहिला प्रयत्न होता. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी रंगभूमीला भेडसावणार्‍या समस्यांचा परिचय वाचकांना करून देणे हा या नियतकालिकाच्या अनेक हेतूंपैकी एक हेतू होता. पण हौशी रंगकर्माला उत्तेजन देणे हे त्याचे मुख्य प्रयोजन होते. लक्ष्मीकांत वर्मा, डॉ. धर्मवीर भारती, विजयदेव नारायण साही आणि स्वत: धर्मेंद्रगुप्त यांनी वेगवेगळ्या स्तरावर हौशी रंगभूमीच्या समस्या आणि मर्यादांचे विश्लेषण या प्रस्तावित नियतकालिकातील आपल्या लेखांमधून केले आहे. पण दुर्दैवाने पहिल्या अंकानंतर याचा एकही अंक प्रकाशित होऊ शकला नाही.

सत्तरीचे दशक मात्र हिंदी रंगभूमीच्या दृष्टीने विकासाचे दशक मानले जाते. वैयक्तिक पातळीवर केल्या गेलेल्या प्रयत्नांमध्ये नेमिचंद जैन यांनी संपादन केलेले ‘नटरंग’ (1965) नियतकालिकांच्या या प्रवासातला मैलाचा दगड ठरले. खरं तर ‘नटरंग’पासूनच आधुनिक हिंदी रंगभूमीचा काळ सुरू झाला असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यापासून प्रेरणा घेत अनेक लहान मोठी प्रकाशने त्या कालखंडात प्रकाशित होऊ लागली होती. हिंदी रंगभूमीच्या मूलभूत प्रश्नांचे विश्लेषण आणि नाटकाच्या प्रयोगांच्या अनुषंगाने एका नव्या रंगचिंतनाचा प्रारंभही ‘नटरंग’च्या निमित्ताने झाला. हिंदी रंगभूमीला तिच्या समग्रतेसकट समजून घेण्याचा प्रयत्न ‘नटरंग’ने अविरत केला. त्यातील लेख आणि नाट्यवृत्तांच्या आधारे रंगभूमीला वेगवेगळ्या स्तरांवर अधोरेखित केले गेले. त्याचे संपादकीय हे कुठल्याही लेखापेक्षा कमअस्सल नव्हते. या नियतकालिकाच्या आतापर्यंत प्रकाशित झालेल्या अंकांना समकालीन रंगसंवादाच्या दृष्टीने संदर्भकोषाचे मूल्य आणि महत्व आहे.

- Advertisement -

सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अशी अनेक प्रकाशनं प्रकाशित होत राहिली. काहींना अल्पकाळातच धाप लागली तर काहींनी खूप लांबवरचा पल्ला गाठला. लखनौहून शरद नागर यांचे संपादन असलेलं ‘रंगभारती’ हे नियतकालिक त्या मानाने खूपच चांगली कामगिरी करत होते. चांगली या अर्थाने की, ते सलग बारा वर्षे सुरू होते. शिवाय, उत्तर प्रदेशातील रंगभूमीला प्राधान्य देत हिंदी बोलल्या जाणार्‍या एका मोठ्या भूभागाच्या रंगकार्याचा परिचय ते उर्वरीत देशातील रंगकर्मींना सातत्याने करून देत होते. आगा हश्र कश्मिरींच्या कार्याला केंद्रस्थानी ठेवून प्रकाशित केलेला त्यांचा अंक म्हणजे ऐतिहासिक दस्तावेजच आहे.

नव्वदच्या दशकात दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाकडून प्रकाशित होणारे ‘रंगप्रसंग’ हे एक नियतकालिक आवर्जून दखल घेण्याजोगे आहे. खरं तर आधी उल्लेख केलेल्या ‘नटरंग’ने जे सुरू केलं होतं, त्याला पुढे नेण्याचं काम आजच्या घडीला ‘रंगप्रसंग’ करते आहे. प्रयाग शुक्ल यांच्या कुशल संपादनाखाली गेली कित्येक वर्षे रंगप्रसंगचे अंक प्रकाशित होत होते. त्यांच्या निधनानंतर मध्यंतरी त्यात थोडा खंड जरूर पडला होता. पण आता नीलाभ यांच्या नेतृत्वाखाली त्याचे नवे अंक प्रकाशित होत आहेत. रंगप्रसंगचे सांगण्यासारखे वैशिष्ठ्य म्हणजे रंगभूमीच्या सगळ्याच पूरक घटकांना स्पर्श करत सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या प्रकाशनांतून केला आहे. रंगभूमीशिवाय चित्र, शिल्प, नृत्य, वाद्य आणि सिनेमा आदी प्रेक्षकाभिमुख कलांच्या संबंधाने विपुल सामुग्री या अंकांतून वाचकांना उपलब्ध होते.

स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी रंगभूमीवरील चैतन्य सळसळते ठेवण्यात या लेखात नमूद केलेल्या सगळ्याच नियतकालिकांचा लहान मोठा वाटा आहे. यातील काही नियतकालिके ती ज्या प्रदेशातून प्रकाशित होत होती, तिथल्या स्थानिक रंगभूमीची मुखपत्रे असली तरी क्षेत्रीय रंगभूमीच्या प्रवाहाला राष्ट्रीय रंगभूमीच्या प्रवाहात विलीन करून घेणे हेच या सगळ्या नियतकालिकांचे उद्दिष्ट होते आणि आहे. हिंदी रंगभूमीला जोडून असलेल्या संस्कृत रंगमंच, पारंपरिक रंगमंच, बालरंगभूमी, पथनाट्य आदींना आपल्या विश्लेषणाच्या आवाक्यात घेऊन प्रकाशित झालेली ही नियतकालिके कुठल्याही ऐतिहासिक दस्तावेजापेक्षा कमी नाहीत. त्याही पुढे जाऊन म्हणायचे झाले तर तीच त्यांची उपयोगिता आहे आणि तेच त्यांचे योगदानही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -