घरफिचर्ससारांशज्योत से ज्योत जगाते चलो...

ज्योत से ज्योत जगाते चलो…

Subscribe

आज एकीकडे आर्यन खान जेलमधून बाहेर पडला किंवा नाही. तपास अधिकारी वानखेडे यांची पत्नी आणि मीडियातली नको असलेली जुगलबंदी, तसेच विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुमार कामगिरी व त्यांना दुषणे देणारे सोशल मीडियावरील युद्ध. आणि हा सर्व प्रकार पाहणारी तरुणाई आम्ही पाहतो. तर एकीकडे तुषार नावाच्या तरुणाचा हा मेसेज खूप काही सांगून जातो. आभासी जगात वावरत असताना आपण खूप काही हरवून बसलो आहोत, याची जाणीवही आपल्याला होत नाही. ही शोकांतिका आहे.

1 नोव्हेंबरपासून वसुबारस पूजनाने दिवाळीची सुरुवात झाली. कोरोनाच्या सावटाखाली मागच्या वर्षीची दिवाळी साजरी करण्याचा आनंद ओसरला होता. दिवाळीच नव्हे तर अनेक सण यामुळे आपण साजरे करू शकलो नाही. आजही सण उत्सव साजरे करत असताना सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करूनच आपण ते साजरे करत आहोत. या सगळ्यांमधून मार्ग काढत यावर्षीची परिस्थिती थोडी सुधारली आहे. रस्त्याने जात असताना प्रत्येकांच्या दारात रांगोळी, आकाश कंदील, एकूणच घरासमोर दिव्यांची रोषणाई पाहायला मिळते.

बाजारात दागिने, कपडे, फराळ, फटाके, मातीचे दिवे, मेणबत्त्या, तसेच घर सजावटीचे सामान खरेदी करणार्‍यांची गर्दी पाहून सगळीकडे प्रसन्नता दिसत आहे. व्हॉट्सअ‍ॅप फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम या आणि अशा विविध समाज माध्यमांद्वारे दीपावलीच्या शुभेच्छा दिलखुलासपणे पाठवल्या जात आहेत. भारतीयांचा सर्वात मोठा सण म्हणून आपण ज्यावेळी दिवाळी या सणाकडे पाहतो. त्यावेळी प्रत्येकांच्या चेहर्‍यावरचा आनंद खूप काही सांगून जातो. मुळात भारतीय माणूसच उत्सवप्रिय आहे. आणि त्यात उत्सुकतेनं वाट पाहणार्‍यांसाठी, सुट्ट्यांच्या आनंदासाठी दिवाळी म्हणजे पर्वणीच….

- Advertisement -

दिवाळीच्या शुभेच्छांचे सोशल मीडियावर खूप मेसेज येत आहेत. असाच लक्ष वेधून घेणारा एक संदेश तुषार शिल्लक नावाच्या माझ्या मित्राने पाठवला. इतर सर्व शुभेच्छांच्या मेसेजपेक्षा हा मेसेज मला अतिशय महत्वपूर्ण वाटला. तो संदेश असा होता की, त्या अनाथांच्या उशाला दीप लावून झोपताना… आपली दिवाळी कशी नवनवीन कपडे, फराळ, फटाके उटण्याचं अभ्यंगस्नान यांनी परिपूर्ण होते… मस्त आनंदात आपण हा दीपोत्सव साजरा करतो. पण आपल्या आसपास काही अशी मुलं, परिवार आहेत, ज्यांना दिवाळीला यापैकी काहीच मिळत नाही. फक्त केविलवाणी तोंड घेऊन इकडे तिकडे दिव्यांची रोषणाई पहात फिरतात. तेसुद्धा कोणी काही देईल का याच आशेने… मला वाटतं जर आपण त्यांच्यासाठी थोडी मदत केली तर त्यांची दिवाळी साजरी होऊ शकते. निदान नवीन कपडे, फटाके ज्यांचा मोह या लेकरांना असतो, ते तर आपण घेऊन देऊ शकतो. फक्त आपली थोडीशी मदत अशा अनेक लेकरांच्या स्वप्नांचा दिवा तेवत ठेवू शकते. या दिवाळीच्या निमित्ताने हा मेसेज वाचून जर आपली संवेदना जागी झाली तर खाली दिलेल्या नंबरवर आपल्या परीने छोटीशी मदत पाठवा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. माझ्या मित्राने पाठवलेला हा संदेश खरंच विचार करण्यासारखा आहे.

आज एकीकडे आर्यन खान जेलमधून बाहेर पडला किंवा नाही. तपास अधिकारी वानखेडे यांची पत्नी आणि मीडियातली नको असलेली जुगलबंदी, तसेच विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सुमार कामगिरी व त्यांना दुषणे देणारे सोशल मीडियावरील युद्ध. आणि हा सर्व प्रकार पाहणारी तरुणाई आम्ही पाहतो. तर एकीकडे तुषार नावाच्या तरुणाचा हा मेसेज खूप काही सांगून जातो. आभासी जगात वावरत असताना आपण खूप काही हरवून बसलो आहोत, याची जाणीवही आपल्याला होत नाही. ही शोकांतिका आहे.

- Advertisement -

आपण बघतोय की, एकीकडं दिव्यांची रोषणाई तर दुसरीकडं अनेकांच्या आयुष्यात अंधार आहे. जवळपास दोन वर्षांपासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत. या काळात अनेकांचे रोजगार गेले. ज्यांचे पोट हातावर होते त्यांना तर फार मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकतीच घडी पूर्वपदावर येईल असे वाटत होते. पण ती आशा, एक मृगजळ ठरत आहे. दिवाळीच्या काळात वाढणारी महागाई, हातात पैसा नसणे या सगळ्या गोष्टी ज्यावेळी मध्यमवर्गीय किंवा गरिबांच्या समोर उभ्या राहतात. त्यावेळी त्यांच्या समोर कर्ज घेण्यावाचून पर्याय नसतो. परिवाराला सण उत्सवात आपण ज्याप्रमाणे पाहिजे त्या वस्तू घेत असतो. तसे मात्र त्यांच्या वाट्याला येत नाही. मग खरा प्रश्न पडतो खरंच आपण दिवाळी साजरी करायला हवी का…? याचे उत्तर जर हो असेल. तर मग आपण ज्यांच्याकडे काहीच नाही,जे आपलेच बांधव आहेत. त्यांना मदत करणं आपलं आद्यकर्तव्य समजलं पाहिजे.

आपण इतरांच्या समाधानासाठी केलेली छोटीशी कृती आपल्या जीवनातही आनंद देत असते. याचेच एक उदाहरण मला याठिकाणी द्यावेसे वाटते. ते म्हणजे उस्मानाबादच्या सफल केसकर नावाच्या एका चिमुकलीचे. फेसबुकवर तिचा एक छोटासा व्हिडीओ माझ्या पाहण्यात आला. त्यामध्ये तिने सुंदर असा संदेश दिला आहे. ती म्हणते की, झेंडूची फुले, पणत्या, रांगोळी, मेणबत्या आणि आपल्याला लागणारं सजावटीचं साहित्य हे आपल्या जवळच्या दुकानातून, गोरगरिबांकडून, ग्रामीण भागातून व छोट्या कारागिरांकडून घेऊयात. जेणेकरून आपल्यामुळे त्यांच्या खिशात दोन पैसे येतील आणि त्यांची दिवाळी यामुळे आनंदात साजरी होईल. यावर्षी आपण फटाके घ्यायचे नाहीत. कारण ओझोनच्या थराला तडा जाऊन पर्यावरण प्रदूषित होत आहे. एवढेच नाही तर यामुळं आपलं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. यासाठी आपण इको फ्रेंडली दिवाळीचा संकल्प करूयात.

वरील दोन्ही उदाहरणं आणि संदेश मला आजच्या घडीला अत्यंत महत्वाचे वाटतात. वेगवेगळ्या सणउत्सवांमधून आपली भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम आपण करत असतो. अलीकडच्या काळात मात्र सण उत्सवांचं स्वरूप बदलत चाललं आहे. प्रत्येक गोष्टीत वेगळेपण पाहायला मिळतं. नेमके दीपावलीच्या काळात वेगवेगळ्या कंपनीच्या ब्रँड असलेल्या घरगुती वस्तू मोठ्या मोठ्या मॉलमधून विकत घेत असताना आपले हजारो रुपये खर्च होतात. पण आपण हा विचार करत नाही की, त्याच वस्तू आपण आपल्या परिसरातील गरजू लोकांकडून विकत घेतल्या तर आपले पैसे तर वाचतील सोबतच एक वेगळा अनुभवदेखील मिळेल. सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे काम केले तर सर्वांपर्यंत एक नवा संदेश जाईल. लहान मुलांना संस्कारमय धडे देत असताना आपण सफल केसकरचा संदेश जाणीवपूर्वक लक्षात आणून दिला तर उत्तमच.
दीपावलीच्या निमित्ताने मला कवी निलेश चव्हाण यांची एक अतिशय महत्वपूर्ण कविता आठवली. त्यातील काही ओळी मुद्दामहुन याठिकाणी मी देत आहे. तो लिहितो….

आपलं घर, आपली दिवाळी सण एवढाच राहिला आहे,
इकडे दिवा लागला की मी तिकडे विझताना पाहिला आहे.

लक्ष्मीला लक्ष्मीने पुजून लक्ष्मी प्रसन्न होत नाही,
नुसतं उटणं लावल्याने जीवनात सुगंध येत नाही.

दिवाळीला दिव्यासारखं आतून उजळून यायचं असतं,
दिवा नसला हरकत नाही आपण दिवा व्हायचं असतं.

कुणासाठी अशी असते कुणासाठी तशी असते,
ज्यांच्या अंगणात दिवे नाहीत त्यांच्या अंगणात,
दिवे लावणं म्हणजे खरी दिवाळी असते.

म्हणून दिवाळीला सप्तरंग उधळून दिले पाहिजे,
दिवे लागता अंत:करण उजळून आले पाहिजे…

अगदी या कवितेप्रमाणेच इतरांच्या आयुष्यामध्ये जर आपण प्रकाशमय आणि तेजोमय आनंदाचा दीप लावत असू तर दीपावली विशेष अर्थाने साजरी होईल. शेवटी काय गीतकार भरत व्यास यांनीसुद्धा लिहिलं आहे ना… ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -