घरफिचर्ससारांशदिवाळी अंकांचे स्वागत...

दिवाळी अंकांचे स्वागत…

Subscribe

सामना

झलक एका स्वप्नपूर्तीची या मूलगामी विचार करणार्‍या भानू काळे यांच्या लेखाने साम ना दिवाळी अंकाची सुरुवात करण्यात आली आहे. इन्फोसिसच्या भव्यदिव्यतेचा पट मांडताना त्यांनी आधुनिक जगात भारताची व्यापकताही कशी प्रभावी ठरत आहे, याचा आढावा घेतला आहे. नव्या पिढीच्या मनात देशाविषयी सकारात्मक भावना निर्माण केली आहे. डॉ. भूषण केळकर यांनी नव्या युगाचे पडघम या लेखात अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजांसोबतच मोबाईल आणि डेटा या नव्या पिढीच्या कशा अत्यावश्यक गरजा बनल्या आहेत, यावर प्रकाश टाकला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि युट्युब याशिवाय जगणे अवघड बनले आहे, याचा उहापोह केला आहे. काका म्हणजेच राजेश खन्ना यांच्यावर शिरीष कणेकर यांनी लेख लिहून त्यांचे विविध पैलू वाचकांसमोर जिवंत करून त्यांच्या एव्हरग्रीनपणाचा पुन:प्रत्यय आणला आहे. प्रा. अनिल कवठेकर यांनी बसंती या लेखात शोलेतील हेमामालिनी आपल्यासमोर उभी केली आहे. समीर गायकवाड यांचा मराठी मनातील सल हा लेख मराठी माणसाला विचार करायला लावतो. जगन्नाथाची शेवटची धर्मपत्नी हा मुकुंद कुळे यांचा लेख वाचताना देव आणि मानव यांच्यातील नाते जिवंत होते. द्वारकानाथ संझगिरी यांनी ययाती रिलोडेडमधून पुन्हा तरुण होण्याची आस व्यक्त केली आहे. या अंकात काव्यस्पर्श, राशीभविष्य आहेच. संपादकीय लेखात संपादक उद्धव ठाकरे यांनी राजकीय फटकेबाजी केली आहे.
संपादक – उद्धव ठाकरे
पृष्ठे – १४४, किंमत – १२० रुपये

- Advertisement -

मैफल

संशोधन व उपयोजनांतील शैक्षणिक आव्हान या एच.व्ही.देशपांडे यांच्या अभ्यासपूर्ण लेखाने आपल्याकडील शैक्षणिक त्रुटीवर प्रकाश टाकला आहे. आपल्या देशातील पदव्या या अन्य विकसित देशांमधील उच्च शिक्षणासाठी पूरक नसतात. त्यामुळे इथून गेलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तिथे काही परीक्षा द्याव्या लागतात. नवीन शैक्षणिक धोरण जरी चांगले असले तरी त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न आहे. राजीव थत्ते यांचा ब्रेन डेड हा लेख एकूणच वैद्यकीय क्षेत्राचे अंतरंग घुसळून काढणारा असून त्यात काय धक्कादायक घडामोडी चालतात त्याची पोलखोल करणारा आहे. काशिनाथ माटल यांची जन्म ही कथा आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. कीर्ती पिंजरकर यांनी आधुनिक भारताचा भाग्यविधाता पंडित जवाहरलाल नेहरू या लेखात राष्ट्रउभारणीत नेहरूंच्या योगदानाचा सखोल आढावा घेतला आहे. टॉनिकचे मानकर काका, अणूऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या जीवनावरील लेक वाचनीय आहेत. आईचं गाणं ही जोसेफ तुस्कानो यांची कथा सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनकार्याचा वेध घेणारी आहे. मीना सरलष्कर यांनी संत कान्होपात्रा यांच्याविषयी उत्तम माहिती दिली आहे. विवेक पुणतांबेकर यांनी लतादीदींचे विविध पैलू अलगद उलगडले आहेत. अंकात कवितांची चांगली पेरणी करण्यात आलेली आहे.
संपादक – कुमार कदम
पृष्ठे – १४८, किंमत – १०० रुपये

- Advertisement -

हेमांगी

हे चित्र कधी बदलेल ? या संपादक प्रकाश कुलकर्णी यांच्या तडफदार संपादकीय लेखाने सुरू झालेला हेमांगी हा दिवाळी अंक अनेक दर्जेदार लेखांनी सजला आहे. मानवी संस्कृती आजवर कशी उत्क्रांत होत आली, याचा अभ्यास करण्यात पुरातत्वविद्येचे फार मोठे योगदान आहे. ब्रिटिशांनी स्थापन केलल्या या विभागाचा विविधांगी आढावा सुहास बहुळकर यांनी देदीप्यमान कलावारसा या लेखात घेतला आहे. मुंबईच्या पोटातून आव्हानांची रेलगाडी हा समीर कर्वे यांचा लेख सध्या सुरू असलेल्या भुयारी रेल्वेमार्गाची माहिती देताना आगामी काळात मुंबईच्या विकासाची दिशा कशी असेल यावर प्रकाश टाकतो. दत्तात्रय पाडेकर यांचा साथ संगत कलेची, नरेंद्र चपळगावकर यांचा न्यायाचा शोध हे लक्षवेधी लेख आहेत. शरद वर्दे यांनी आपल्या लेखातून अमेरिकेत फोफावलेल्या बंदुक संस्कृती आणि त्याचा तेथील समाजावर होणारा घातक परिणाम दाखवून दिला आहे. मनोज आचार्य यांनी संगीतकार नौशाद यांच्यावर अप्रतिम लेख लिहिला आहे. अखंड भारत, भारताची एकात्मता आणि इतिहासाचे पुनर्लेखन हा दत्तप्रसाद दाभोळकर यांचा लेख आवर्जुन वाजण्याजोगा आहे. अकांचे मुखपृष्ठ अतिशय कल्पक आहे.
संपादक – प्रकाश कुलकर्णी
पृष्ठे – २८०, किंमत – २५० रुपये

पु्ण्यभूषण

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे आणि मराठ्यांच्या सम्राज्याचा केंद्रबिंदू असलेल्या पुण्याचा इतिहास, भुगोल, वर्तमान आणि भविष्याच्या दिशेने प्रवास करताना बदलत जाणार्‍या शहराच्या चेहर्‍याचे प्रतिबिंब पुण्यभूषण या अंकात आपल्याला दिसते. या अंकाची सुरुवात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या लेखापासून होते. पुणे आणि तिथली आपली मित्रमंडळी यांनी आपल्या मनाचा एक कोपरा व्यापला आहे, असे ते म्हणतात. प्रवण पाटील यांनी पुण्याच्या ग्रामदेवता या लेखात मुठा नदीकाठच्या पुनवडी या लहानशा वाडीपासून पुण्याचा विस्तार महानगरापर्यंत येऊन पोहोचला आहे, याची मांडणी करताना अनेक ग्रामदेवतांबद्दल माहिती दिली आहे. पुणे शहरात फिरताना माणूस कुठल्या ना कुठल्या पुलावरून जातोच, पुण्यात जे विविध नावांचे पुल आहेत, त्याची माहिती ऐतिहासिक पुलांचं शहर या लेेखात अविनाश सोवनी यांनी दिली आहे. महानगर व्यापणारं टेल्को कुटुंब हा राजीव साबडे यांचा लेख टाटा ग्रुपच्या टेल्कोने पुण्यातील लोकांना केवळ रोजगार पुरवला नाही तर मालक-कामगार यांच्यातील नाते कसे असावे, त्याचा आदर्श घालून दिला, हे सांगताना टेल्कोच्या कारकिर्दीबद्दल सविस्तर माहिती देतो. पुण्याची अपूर्वाई, सिंहगड, सह्याद्रीच्या कुशीतलं निसर्गलेणं, इथे बहरलं वनस्पतीशास्त्र, असं होतं आमचं पुणं, विदेशात स्थायिक झालेल्या पुणेकरांनी जागवलेल्या आठवणी असे उत्तमोत्तम लेख वाचकासमोर तिन्ही काळातील पुणे उभे करतात.
संपादक – सुहास कुलकर्णी

पृष्ठे – २१६, किंमत – २५० रुपये

लय भारी
भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांमधील राजकारणाचे विविध पैलू अधोरेखित करणार्‍या अनेक उत्तमोत्तम लेखांचा समुच्चय असलेला लय भारी हा दिवाळी अंक आहे. संपादक तुषार खरात यांनी लिहिलेल्या संपादकीय लेखात अंकाचे हे पहिले वर्ष असून पुढे मोठी झेप घेण्याची आकांक्षा असल्याचे स्पष्ट केले आहे. राजधानीतील मराठी नेतृत्व या पहिल्याच लेखात विजय चोरमारे यांनी यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिल्लीतील राजकीय कारकिर्दीविषयी आढावा घेतला आहे. शरद पवारांना पंतप्रधानपदाने नेहमीच हुलकावणी दिली, यावर प्रफुल्ल फडके यांनी प्रकाश टाकला आहे. विशेष म्हणजे या अंकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या राजकारण विकासाचे, महाराष्ट्राच्या प्रगतीचे या लेखाचा समावेश आहे. पृथ्वीराज चव्हाण, आशिष शेलार, अब्दुल सत्तार, अतुल भातखळकर, मनीषा कायंदे अशा राजकीय नेत्यांसोबत काही ज्येष्ठ पत्रकारांचे उल्लेखनीय लेख आहेत. या लेखांमधून त्यांनी आपल्या राजकीय भूमिका मांडल्या आहेत. भाजप शिंदेंना धोका देणार, हा हर्षल प्रधान यांचा लेख वाचकांना जाता जाता धक्का देऊन जातो. संपूर्ण अंक अतिशय सुबक आहे.

संपादक – तुषार खरात
पृष्ठे – १३६, किंमत – २५० रुपये

नायक

सध्या देशात जे राजकारण सुरु आहे ते फार आशावादी नाही, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया ऐकायला मिळते. वाचायला मिळते. आपण लोकशाहीचे रक्षणकर्ते आहोत, असे सत्तेत असणारेच सांगत आहेत. मात्र विरोधकांना लोकशाहीची चिंता लागून आहे. अशा परिस्थितीत सामान्य वाचकांची मती निश्चितपणे गुंग होते. अशावेळी समाजातील विचारवंतांना, अभ्यासकांना नेमके काय वाटते हे ‘नायक’ या दिवाळी अंकातून जाणून घेत येईल. या अंकाच्या माध्यमातून अनेक नवोदितांना लिहिते होता आले आहे. भारतीय लोकशाहीचे भवितव्य याबाबत रामदास नेहूलकर, मकरंद मुळे, डॉ. श्रीनिवास भोंग, हिरालाल पगडाल यांनी मांडलेले विचार लक्षवेधी आहेत. अंकाचे वैशिष्ठ्य म्हणजे राजकीय विश्लेषणात्मक लेखांसोबत साहित्य आणि कविता या विषयावरील लेखांनाही स्थान देण्यात आले आहे. श्रीकृष्ण राऊत, स्वप्निल पोरे, विद्याधर शुक्ल, शशिकांत शिंदे, बाबासाहेब सौदागर, अर्चना शिरसाठ, सुजाता पुरी, डॉ. कैलास दौंड, सप्तर्शी माळी, रमेश मोरगावकर, अजित राक्षे, देविदास गोसावी, शंकर गाडेकर, अरविंद शिंगाडे, डॉ. सुनील शिंदे, प्रवीण शिरसाठ, अनुष्का वाकचौरे आदींचे लेख वाचनीय आहेत. अंकाच्या अतिथी संपादक पदाची जबाबदारी संदीप वाकचौरे यांनी बखुबी निभावली आहे.
संपादक – गोरक्षनाथ मदने
पृष्ठे – ९६ , किंमत – १७५ रुपये

गिरजा

साहित्य, कथा, कविता, मुलाखत, यशाची गाथा, महिलांचे कर्तृत्व अशा विविध अंगांना स्पर्श करणारा गिरजा हा दिवाळी अंक लक्षवेधी ठरला आहे. या अंकाचे यंदाचे २५ वे वर्ष आहे. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांचा ‘माणूस समजून घेण्यासाठी..’ हा लेख, तसेच ‘भावना पोहचविण्यासाठी चेहरा बोलका असावा’ हा स्मिता तांबे यांचा लेख, ‘समाजव्यवस्था बदलली हे दुर्दैव’ हा रघुवीर खेडकर यांचा लेख, ‘लक्ष मोठे असावे..’ हा ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शाह यांचा लेख, ‘भरत्या’ हा ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख, पोटशूळाची कथा हा संजय गोराडे यांचा लेख, मधुमालती हा निशा डांगे यांचा लेख विशेष वाचनीय आहे. शिवाय राखण, देवदूत आकाशीचे, शिकार, कल्हईवाला, तिची कथा, ऑल वाईन्स आर नॉट लाईव्ह, स्त्री जन्मा तुझी कहाणी, गावाकडची दिवाळी, शाळेच्या फीची गोष्ट, ग्रीन आर्मी कथा, चल सावित्री, भले ही वाट बिकट आहे, स्वाभिमान, आता तूर काय करणार, भरारी, चिंधी, पांघरुन, पर्यावरण विषयक लघुपट, दिसण्यापलीकडचं असणं हे लेखही वाचनीय. कार्यकारी संपादक म्हणून रवींद्र मालुंजकर तर सल्लागार संपादक म्हणून राजेंद्र उगले यांनी काम पाहिले आहे.
संपादक – सुरेश पवार
पृष्ठे – १०९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -