रंगबावरी
रंगबावरी या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक असून अंक उघडताच ‘तुमचं आमचं नातं प्रकाश आणि ज्योतीसारखं एकजीव झालेलं, जणू झाड आणि मातीसारखं’, या प्रसाद कुलकर्णी यांच्या भावस्पर्शी कवितेने स्वागत होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही आनंदाची बाब आहे, पण आता तिला ज्ञानभाषा, संपर्क भाषा बनवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन अंकाचे अतिथी संपादक सुधीर चित्ते यांनी केले आहे.
दै. ‘आपलं महानगर’चे संपादक संजय सावंत यांनी ‘राजकारण्यांना बूमची गरज नाही’, या लेखात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया हे एकमेकांना पूरक असे आहेत याची सविस्तर मांडणी केली आहे. दोघांमध्ये स्पर्धा हवी, पण ती गळेकापू नको, असे म्हणून सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘भक्ती हा चैतन्याचा रंग’ या लेखात दीप्ती भागवत आपण जसा श्वासोच्छवास करतो, इतक्या सहजतेने आणि तन्मयतेने भगवंताचे नाव घ्यावे असे सांगतात.
अशोक बागवे यांनी त्यांच्या ‘रंगप्रतिमा’ या लेखात मानवी जीवनाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणजे मानवनिर्मित कला आहे, असे म्हणताना मानवी मनाची जाणीव आणि नेणीव यातून झालेली कलेची उत्पत्ती याची सखोल उकल केली आहे. ‘अॅन इव्हनिंग इन पॅरिस’ या लेखातून प्रतिभा सराफ यांनी आपल्याला पॅरिसचे अंतरंग उलगडून दाखवले आहेत. या अंकात महेश केळुसकर, मुकेश माचकर, राजीव तांबे, मंगेश मोरे, नितीन तेंडुलकर, सतीश पाटणकर अशा मान्यवर लेखकांचे दर्जेदार लेख आहेत. नीलिमा प्रधान यांचे राशीभविष्य आहे. अंकाची बांधणी अतिशय आकर्षक आहे.
=संपादक – रजनीश राणे
=पृष्ठे – १२६, मूल्य – ५०० रुपये
नवाकाळ
नवाकाळच्या दिवाळी अंकाची सुरुवात दा. कृ. सोमण यांच्या ‘माझी नासा भेट आणि खग्रास सूर्यग्रहण’ या लेखाने झाली आहे. भारतातून खग्रास सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे ते अमेरिकेला गेले. तिथे नासाला भेट देता आली. अवकाशवीरांशी संवाद साधता आला. नासा म्युझियमला भेट देता आली. लेखात तेथील प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली आहे. ‘कहत कबीर’ हा धनश्री लेले यांचा लेख वाचताना संत कबीर उलगडत जातात. कबीर आपली दृष्टी स्थूलाकडून सूक्ष्माकडे, बाह्याकडून अंतरंगाकडे वळवतात हे सांगताना अनेक दोहेे उधृत करण्यात आले आहेत.
अंकिता वालावलकर हिने ‘कोकणची कन्या सांगतेय इन्फ्युएन्सर व्हायचे फंडे’ या मुलाखतीत इन्फ्युएन्सर बनण्यासाठी खूप मेहनत आणि चिकाटी लागते. हातात असलेली चांगली नोकरी सोडून मी युट्यूब चॅनेल काढेन, श्रीमंत होईन, असा विचार डोक्यात आला तर तशी रिस्क घेऊ नका, असा सल्ला दिला आहे. कौस्तुभ जोशी यांचा ‘म्युच्युअल फंड’ गुंतवणूक पर्याय, अॅड. प्रदीप घरत यांचा समुद्री चाचे यांच्याविषयीचा लेख आहे. ‘चाणक्य नीतीच्या नादाला लागलेले महाराष्ट्राचे राजकारण’ या लेखात जयश्री खाडिलकर-पांडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे बदलते रंग, वाढणारी विघातकता आणि घ्यावयाची काळजी याविषयी सखोल चिंतन मांडले आहे.
अनिता पाध्ये यांचा ‘रजनीगंधा’ आणि ‘शोले’ या चित्रपटांवरील लेख मुळातून वाचण्यासारखा आहे. डॉ. सुप्रिया देशमुख यांचा ‘टक्कल पुरुषांची वाढती चिंता’, दीपक करंजीकर यांचा ‘महाराष्ट्राची दशा आणि दिशा’, डॉ. रश्मी फडणवीस यांचा ‘फायब्रॉईड्सचा धोका’, डॉ. अंजली पाटील यांचा ‘महिलांनो, स्वत:ला कॅन्सरपासून जपा’, असे अनेक मान्यवरांचे लेख आहेत. क्यूआर कोड स्कॅन करून कथा, लेख ऐकताही येतील.
=संपादक – रोहित पांडे
=पृष्ठे – ८०, मूल्य – १०० रुपये
आरोग्य ज्ञानेश्वरी
नावाप्रमाणेच हा अंक आरोग्यविषयक विविध प्रकारच्या माहितीने संपन्न आहे. मुलांना आपल्या हाताने खाऊ द्या, असे सचित्र आवाहन अंकाच्या मुखपृष्ठावर करण्यात आले आहे. आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी विविध वैद्यकीय सल्ले वाचकांना अंक वाचताना मिळतात. त्याचा त्यांना उपयोग होऊ शकतो. अंकाचे हे २९ वे वर्ष आहे. मुलांकडून वाचून घ्यावयाच्या शूरवीरांच्या, संतांच्या स्फूर्तिदायक गोष्टी देण्यात आल्या आहेत.
‘वाचवा आपल्याला व आपल्या कुटुंबाला’, या लेखात पांडुरोग आणि त्याची कारणे, उपाय याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. बाल आहार हा अतिशय महत्त्वाचा लेख आहे. मोठ्या आजारांपासून लांब राहण्यासाठी तंबाखू, दारू, चहाची चव घ्यायला नाही म्हणा, त्यात मर्दपणा आहे, असे आवाहन करणारा महत्त्वाचा लेख आहे. डॉ. अर्चना जोशी आणि डॉ. हेमंत जोशी यांचा कृष्णकथा सांगा मुलं छान घडवा, हा मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी मार्गदर्शन करणारा लेख आहे.
वाघ आणि ब्राम्हण, कोल्हा आणि हरीण, मांजर, म्हातारे गिधाड आणि पक्ष्यांची मुले, कोल्हा व हत्ती, माकड आणि लाकूड, माकडभूत अशा अनेक गोष्टी मुलांसाठी सांगितलेल्या आहेत. मुलामुलींची शारीरिक वाढ आणि बौद्धिक विकास, आरोग्य आणि आजार, शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करा, जादू : कमी अभ्यासात जास्त गुण देणारी, विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान, अपर्णा व्रत करा, बारीक व्हा, बारीक होण्याची जादू, मस्त जगायला अमृतकथा, चक्रव्यूहात फसू नका, मी जाड होणार नाही, आनंदाने बाळंत व्हा, बसून वा उभ्याने, असे अनेक माहितीपूर्ण लेख अंकात आहेत.
=संपादक – डॉ. रेणुका हिंगणे, डॉ. अर्चना जोशी
=पृष्ठे – १६२, मूल्य – २५० रुपये
सृजन
अंकाची सुरुवात ‘फॅसीजमचे आव्हान’ या अमरनाथ सिंग यांच्या लेखाने होते. फॅसीजम नेमका काय आहे, तो समाजात व्यापला आहे, विस्तारला आहे, तो आपण समजून घेत नाही. पुरोगामी लोक भविष्याविषयी हताश होऊ लागले आहेत. आपला देश १०० वर्षे मागे गेला आहे. एकोपा आणि सलोखा विस्कटून गेलाय, अशा ज्वलंत मुद्यांची लेखात सडेतोड मांडणी केलेली आहे. सुधाकर गायकवाड यांनी ‘भाजपचे राजकीय तत्त्वज्ञान आणि भारतीय संविधान’ या लेखात संविधानावरून जी राजकीय चर्चा सुरू आहे, त्याची सविस्तर चिकित्सा केली आहे.
संविधान बदलाच्या चर्चेचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला हे दिसून आले आहे. ‘कलाकृतींवरील प्रस्थापित मध्यमवर्गाचा प्रभाव’ या लेखात गोपाळ नायडू यांनी म्हटले आहे की, प्रत्येक समाजव्यवस्थेला त्याच्या योग्यतेप्रमाणे कलेचा वारसा मिळत असतो. त्यांच्याशी कलेचे जसे संबंध असतात, त्याच प्रकारच्या सहसंबंधातून कलेची निर्मिती होत असते. गिरीश सामंत यांनी आपल्या ‘वंचितांचे शिक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता’ या लेखात गेल्या तीस-चाळीस वर्षात केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय आणि प्राधान्यक्रम चुकल्यामुळे शिक्षणाची पराकोटीची दुरवस्था झाली आहे.
त्यामुळे देशाचे नुकसान होते, असे म्हटले आहे. रामराव झुंजारे यांची ‘माणुसकी’ ही कथा वाचनीय आहे. डॉ. दीपक बोरगावे यांचा ‘मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्याचा आजचा अन्वय’ हा अतिशय अभ्यासपूर्ण लेख असून त्यात ९० वर्षांपूर्वी प्रेमचंद यांनी मांडलेले प्रश्न आज इतक्या वर्षांनंतरही सुटले आहेत का, प्रेमचंद यांचे प्रबोधनात्मक साहित्य आज कालबाह्य झाले आहे का, अशा अनेक गोष्टींचा धांडोळा घेण्यात आला आहे. अंकात लेखांसोबत विविध मान्यवरांच्या भरपूर कविताही आहेत.
=संपादक – विजय जाधव
=पृष्ठे – २४८, मूल्य – ३०० रुपये
अवतरण
सकाळ अवतरण अंकाचे मुखपृष्ठ आजची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आणि त्या अनुषंगाने सुरू असलेली जीवघेणी चढाओढ प्रतिबिंबित करणारे आहे. ‘शांतीची संस्कृती’ हा सद्गुरूंचा पहिला लेख असून त्यात जागतिक शांतता कशी स्थापन करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. आपल्याला शांतीची संस्कृती स्थापित करण्यासाठी दीर्घकालीन आणि भरीव काहीतरी करण्याची गरज आहे आणि ते शक्य आहे, असे सद्गुरू म्हणतात.
‘२०१४-२०२४ एक अस्वस्थ दशक’ या लेखात राहुल गडपाले यांनी या दशकातील राजकीय घडामोडींचा आढावा घेताना या कालावधीत असमानतेची दुखणी उफाळून वर आली. बंधुत्वाच्या ठिकर्या उडवण्यात आल्या. भांडवलशाही अर्थकारणामुळे समाजाचे दोन भाग झाले असे वास्तव मांडले आहे. ‘रामराम’ या लेखात अरविंद जगताप यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील दारूण वास्तव मांडले आहे. सगळ्यांना शहरांची ओढ लागली आहे. त्यामुळे गावे ओस पडत चालली आहेत. गावाकडे फक्त आता कुणाची तरी वाट पाहत वय झालेली माणसे उरली आहेत.
गावातून गुरे आणि तरुण पिढी एकाच वेगाने गायब झाली आहेत. ‘मुखे ते जन्मले होते, मुकाट्यानेच ते मेले’ या विवेक पंडित यांच्या लेखात ते म्हणतात की, आजच्या परिस्थितीविरोधात आदिम आदिवासींनी-कातकरींनी खरंतर बंड करून उठायला हवे, पण तसे होताना दिसत नाही. ‘बदलला काळ, पण बावरला पालक’ हा आरती बनसोडे यांचा लेख आजच्या पालकांची अवस्था उलगडून दाखवणारा आहे. प्रफुल्ल वानखेडे, डॉ. राजेंद्र सिंह, डॉ. मालिनी नायर, डॉ. संदीप वासलेकर, जेरी पिंटो, अॅड. उदय वारुंजीकर, डॉ. मनोज भाटवडेकर, ए. के. शेख अशा अनेक मान्यवर लेखकांचे लेख अंकात आहेत.
=संपादक – राहुल गडपाले
=पृष्ठे – २७२, मूल्य – २०० रुपये