दिवाळी अंकांची झलक!

अक्षर

अक्षर दिवाळी अंकाने आपली दर्जेदार लेखांची परंपरा कायम राखताना या दिवाळीनिमित्त रसिक आणि दर्दी वाचकांसाठी वैचारिक मेजवाणी आणलेली आहे. या दिवाळी अंकाचे संस्थापक निखिल वागळे आणि संपादक मीना कर्णिक यांच्या चिंतनशील आणि बहुस्पर्शी विचारांची छाप या अंकांतील मजकुराची निवड करताना पडलेली आहे. सतीश भावसार या प्रतिभावान व्यंगचित्रकारांनी अंकाचे मुखपृष्ठ काढताना पृथ्वी जिंकण्याचा हव्यास बाळगणार्‍या हिटलरची चिंतीत चेहर्‍याची छबी साकारली आहे. इटलीचा हुकुमशहा आणि अ‍ॅडॉल्फ हिटलचा मित्र बेनिटो मुसोलिनी याने स्थापन केलेल्या नॅशनॅलिस्ट फॅसिस्ट पार्टी या राजकीय पक्षाला नोव्हेंबरमध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली. मुसोलिनी आणि त्याचा पक्ष आता अस्तित्वात नसला तरी त्याच्याप्रमाणेच जगावर आपली सत्ता गाजवू पाहणारे नेते नव्याने उदयाला येत आहेत, त्यामुळे जतनेते जागे राहायला हवे, अशी जाणीव जागणारा लोकेश शेवडे यांचा ‘रोम, बर्लिन आणि हस्तिनापूर’ हा लेख हा मुळातूनच वाचायला हवा असा आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत जतिन देसाई यांचा ‘कहाणी दोन उद्योजकांची’, हा लेख भारतात राहून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍यांना बरेच काही सांगून जाणारा आहे. गौतम करजगी यांचा ‘शीतल नावाचं अशांत वादळ’ हा लेख आपल्या समोर एक वाचक आणि त्याचसोबत एक माणूस म्हणून अनेक प्रश्न उभे करतो. कोविडच्या काळात गंगा नदीत तरंगणारी प्रेते पाहून पारूल खक्कर यांनी लिहिलेली ‘शववाहिनी गंगा’ कविता विविध भाषांमध्ये प्रसिद्ध झाली, अशा विद्रोही कवितांचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे.

प्रतिबिंब

अंतरीचे प्रतिबिंब हा अंक विविध प्रकारच्या लेखांनी सजला आहे. कला, क्रीडा, कृषी अशा अनेक विषयांवरील लेखांचा यात समावेश करण्यात आला आहे. पत्रकार ते प्रकाशक असा प्रवास करणार्‍या संवेदनशील आणि डायनॅमिक व्यक्तिमत्व असलेल्या अंकाच्या संपादिका प्रज्ञा जांभेकर यांनी लिहिलेल्या संपादकीयात अंकाच्या अंतरंगाची मोजक्या शब्दात मांडणी केली आहे. यंदा या अंकाचे पाचवे वर्ष असून विषयांची विविधता आणि वेगळेपणा कायम ठेवत एक समान सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्याचे आता अमृतमहोत्सवी वर्ष सुरू असल्याचे औचित्य साधताना या अंकाची सुरुवात ‘स्वातंत्र्याची ७४ वर्षे’ या लेखाने केली आहे. भारतीय समाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना स्वातंत्र्य मिळून आपल्याला सात दशकं झाली, पण आपण जगातील सर्वात मुक्त लोकांमध्ये गणले जाऊ इतके मोठे झालो आहोत का, असा प्रश्न त्या उपस्थित करतात. शेतीमध्ये विविध प्रयोग करताना हवामानाचा इतिहास बघणे गरजेचे आहे. कारण एकाच हवामानातील पीकपद्धती दुसर्‍या हवामानात यशस्वी ठरेल असे नाही, याची जाणीव डॉ. रंजन केळकर यांचा ‘हवामानाशी सुसंगत शेती’ हा लेख करून देतो. जपान्यांच्या देशात त्याच्यासारख्याच जिद्दीने पाय रोवून हॉटेल व्यवसाय यशस्वी करून दाखवणार्‍या मराठमोळ्या वंजारीबंधूंची संघर्ष कथा संदीप चव्हाण यांनी त्यांच्या ‘बॉम्बे चिकन थेट हिरोशिमात’ या लेखात मांडली आहे. मधुरा कुलकर्णी, रामदास भटकळ, जयदेव डोळे, मृणालिनी नानिवडेकर, अशा अनेक लेखकांचे लेख अंकांची वाचनीयता वाढवत नेतात.

आश्लेषा

आश्लेषा हा अंक त्याच्या मुखपृष्ठाकडे पाहताच आपले लक्ष आकर्षित करून घेतो, आपल्या आईच्या गळ्यात आपले नाजूक हात घालून बिलगलेल्या लहानगीचे अतिशय गोंडस असे हे चित्र आहे. अंकाचे संपादक अशोक तावडे यांनी या अंकात चंद्रकांत भोंजाळ, इब्राहीम अफगाण, एकनाथ आव्हाड, रमेश सावंत, सविता दामले अशा अनेक दर्जेदार लिखाण करणार्‍या लेखकांच्या लेखांचा समावेश करताना अभिरुचीसंपन्न वाचकांसाठी चांगलीच मेजवाणी उपलब्ध करून दिली आहे. अशी घडले मी हा मूळ मेलिंडा गेट्स या जगातील पहिल्या क्रमांकाच्या बिल गेट्स या उद्योजकाच्या घटस्फोटीत पत्नीने लिहिलेली कथा सविता दामले यांनी मराठीत अनुवादित केली आहे. ती वाचताना मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे उलगडत जातात. पैसे म्हणजे सर्वकाही नाही, त्याच्या पलीकडेही काही गोष्टी असतात, याची आपल्याला हा लेख वाचताना जाणीव होते. वाचनीय लेखांसोबतच अनुराधा नेरुरकर, मंदाकिनी पाटील, डॉ. मिलिंद शेजवळ, अमृता नरसाळे, मोहन कुंभार, आदिती तावडे यांच्या अर्थवाही आणि मनस्पर्शी कविता या अंकाची शोभा अधिकच वाढवतात.

स्वातंत्र्यवीर

स्वातंत्र्यवीर या अंकामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनातील विविध घटना, प्रसंग, त्यांच्या आठवणी यांच्या आधारावर लिहिलेल्या अनेक लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. सावरकर यांच्यासारख्या आत्यंतिक बुद्धिवादी पंडिताचा चेहरा हा गंभीर असतो, पण या अंकाच्या मुखपृष्ठावरील सावरकरांचा चेहरा दिलखुलास हास्य व्यक्त करणारा आहे. अंकाचे संपादक शंकर दत्तात्रेय गोखले यांनी या अंकांची बांधणी करताना लेखकांना आपले विचार मांडण्याचे स्वांतत्र्य देताना त्यांच्या लेखांमधील विधानांची आणि मतांची जबाबदारी त्यांच्यावरच ठेवली आहे. डॉ. गिरीश दाबके यांच्या ‘मरणोन्मुख शय्येवर’ या लेखाने या अंकाची सुुरुवात होते. त्यानंतर ‘ऑपरेशन विजय आणि कारगिल युद्धाची वीरगाथा’ हा निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचा लेख आपल्याला २२ वर्षांपूर्वी कारगीलमध्ये आपल्या सैनिकांनी कसा संघर्ष करून पकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावले यांची संघर्षगाथा डोळ्यासमोर उभी करतो. नाटककार स्वांतत्र्यवीर सावरकर, महाकाव्याचे धीरोदात्त नायक, कर्मयोगी बाबाराव सावरकर, हिंदूंच्या सर्वेेतिहासांवर अधिष्ठित हिंदुत्व, २१ वे शतक, फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर असे सावरकरांच्या कार्याचे आणि त्यांच्या क्षमतांचे दर्शन घडवणारे सखोल लेख अंकात आहेत.

श्रीगजानन आशिष

श्रीगजानन महाराज (शेगांव) सांस्कृतिक मंडळ, मुंबई यांचे प्रकाशन असलेला ‘श्रीगजानन आशिष’ हा दिवाळी अंक दीपावलीच्या प्रसन्न वातावरणात भक्तीमय सुंगधांचा आध्यात्मिक अनुभव देतो. या अंकामध्ये गजानन महाराजांच्या जीवनातील अनेक अनुभव आणि त्यांनी संकटात सापडलेल्या भक्तांना केलेली मदत सांगणार्‍या अनेक कथा आहेत. त्या वाचताना आपण गजानन महाराजांच्या सहवासात असल्याचा भाव आपल्याही मनात निर्माण होतो. अंकाचे संपादक मनोहर फडणीस यांनी संपादकीयात कोरोना काळात सगळ्यांवरच कठीण परिस्थिती आली असली तरी हाही काळ निघून जाऊन गजानन महाराजांच्या कृपेने नवी दिशा सापडेल, असा आशावादी सूर व्यक्त केला आहे. ‘अनाथांचे नाथ श्रीगजानन महाराज’ या लेखामध्ये रमेश राणे यांनी गजानन महाराजांचे संक्षिप्त चरित्र दिले आहे. वाचताना महाराजांचा भक्तीमय जीवनपट उलगडत जातो. या अंकात साईबाबांविषयी शिरडीचे श्रीसाईबाबा, दत्तावतारी साईबाबा, अशा काही लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. मनाची ऊर्जा वाढवणारी अनेक वचने आणि विचार मांडणारे हे लेख आहे. गजानन महाराजांचा आशीर्वाद अशाच स्वरुपाचा हा अंक आहे.

सामना

सामनाच्या दिवाळी अंकाची सुरुवातच कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागणार्‍या संपादकीयाने केली आहे. सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यात जी जुंपलेली आहे, तोच सामना या अंकातदेखील वाचायला मिळतो. फसव्या हिंदुत्ववाद्यांपासून सावधान असा इशारा राऊत आपल्या लेखातून देतात. अंकाचे मुखपृष्ठ नटराज आणि दोन नर्तकींच्या मुद्रा असे कलात्मक असले तरी अंकाचा अंतरग जळजळीत आहे. पहिला लेख शिरीष कणेकर यांचा आहे, त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची दिलखुलास मुलाखत घेतली आहे, त्यावेळी सहज बोलताना अनेक हळवे कोपरे त्यांनी प्रकाशमान केले आहेत. सैन्यातील झाशीची राणी या लेखात ले. जनरल माधुरी कानिटकर यांच्या वाटचालीचे मेधा पालकर यांनी शब्दांकन केले आहे. देशातील प्रत्येक महिलेला प्रेरणा देणारे त्यांचे अनुभव आहेत. आरंभशूर युट्यूबर्सच्या देशा या लेखात माध्यमतज्ज्ञ विश्वनाथ गरुड यांनी सध्या आपल्याकडे जे काही उठसुठ युट्यूब चॅनेल सुरू करण्याचे फॅड आले आहे, याविषयी पोलखोल केली. अमित भंडारी, काशिनाथ माटल, अपर्णा देशपांडे अशा अनेकांच्या लेखांनी अंक सजला आहे.

मार्मिक

मार्मिकच्या दिवाळी अंकाचे मृखपृष्ठ कोरोनायोद्ध्यांना शुभेच्छा देणारे आहे. डॉक्टर, पोलीस आणि सफाई कर्मचारी यांनी हातात दिवाळी कंदील घेऊन तो प्रकाशमान करताना उभ्या महाराष्ट्रावरील कोरोना विषाणूचा अंध:कार दूर केला आहे. मार्मिकचे कार्यकारी संपादक म्हणून नव्याने जबाबदारी घेतलेले सिद्धहस्त लेखक आणि पत्रकार मुकेश माचकर यांनी अंकाची रचना अतिशय आकर्षक करताना अनेक नामवंताना लिहिते केले आहे. ज्ञानेश सोनार यांचा सहृदय बाळासाहेब, सचिन परब यांचा प्रबोधन आणि प्रबोधनकार : संघर्षाचा प्रवास, हे अतिशय अभ्यासपूर्ण असे लेख आहेत. मुकेश माचकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेऊन अनेक गोष्टींचा उलगडा गेला आहे. महाराष्ट्राच्या जन्मवेणा हा विश्वास पाटील यांचा लेख संयुक्त महाराष्ट्र कसा आकाराला आला याची संघर्षगाथा आपल्यासमोर उभा करतो. विशेष म्हणजे रसिक, धाडसी, निडर नेहरू हा लेख या अंकात आहे, सुरेश भटेवरा यांनी लिहिलेल्या या लेखात नेहरुंनी देशासाठी सुखासीन जीवनाचा कसा त्याग केला, याविषयी सांगताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडले आहेत.