घरफिचर्ससारांशफटाके पेटवा जपून, आग बसलीय टपून

फटाके पेटवा जपून, आग बसलीय टपून

Subscribe

दिवाळीत फटाके वाजवताना मुले सुरक्षा संदेशाचे पालन करतात का, हे कटाक्षाने बघण्याची जबाबदारी घरातील मोठ्या माणसांची आहे. मोठ्या माणसांनी मुलांना एकट्याने फटाके वाजवायची परवानगीच देऊ नये. स्वतः त्यांच्यासोबत उभे राहून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतल्यास भाजपल्यामुळे होणारे अपघात टळू शकतील. फटाक्यांची निवड करताना मुलांच्या वयाप्रमाणे फटाके निवडले पाहिजेत. आमचे मूल लहान असूनही एवढा मोठ्ठा फटाका पेटवू शकते, असा वृथा अभिमान बाळगण्यात काही अर्थ नाही. उलट मुलांना सावध रहायला सांगायला हवे, जेणेकरून ते योग्य ती काळजी घेतील. आग या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असे संस्कार मुलांवर होणे गरजेचे आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या खासदार रिता बहुगुणा जोशी यांची किया नावाची सहा सात वर्षाची नात, अतिशय गोड चिमुरडी. साल 2020 च्या दिवाळीचा पहिलाच दिवस आणि घरात अतिशय उत्साहाचे वातावरण. अतिशय आनंदात असलेली किया इतर मुलांसोबत छतावर फटाके वाजवण्यासाठी गेली. फटाके वाजवताना अचानक तिच्या फ्रॉकने पेट घेतला. अंगाला चटके बसून अतिशय जीवघेण्या वेदना होताना किया इकडे तिकडे पळत मदतीसाठी ओरडत होती. छतावर कुणीही प्रौढ व्यक्ती नव्हती त्यामुळे तिला मदत मिळू शकली नाही. खाली असलेल्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना तिचा आवाज आला मात्र मुले खेळताना आरडाओरडा करत असतील या कारणाने त्यांनी दुर्लक्ष केले असेल. परिणामी आग पेटतच गेली आणि किया जवळपास 60 टक्के भाजली. कुटुंबीयांनी सर्व प्रयत्न करूनसुद्धा कियाला वाचवता आले नाही. म्हणतात की मुले म्हणजे देवाघरची फुले आणि ऐन दिवाळीच्या दिवशीच देवाघरच्या फुलाला देवाघरी जावे लागले, काय हा दैवदुर्विलास. जगासाठी एक मूल मरण पावलं, पण त्या कुटुंबासाठी त्यांचे अवघे जग संपले.

भारतात साजर्‍या केल्या जाणार्‍या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी. भारतात सर्व धर्मीय लोक हा सण मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते की, दिवाळी रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. दिवाळीचा सण सर्वच धर्मीय अतिशय उल्हासात साजरा करतात. दिवाळीच्या अंधार्‍या रात्री जगमगत्या दिव्यांनी व आकाशकंदीलाच्या प्रकाशाने आसमंत न्हाऊन जातो. कुटुंबातील बाहेरील गावी कामाला असलेले सर्व नातेवाईक एकत्र येऊन नात्यांचा गोडवा अनुभवतात. स्वादिष्ट पक्वान्न बनवली जातात आणि मिठाईचे आप्तेष्ट, मित्रपरिवार यांच्यामध्ये आदानप्रदान केले जाते. सुगंधी उटण्यांच्या स्नानाने शरीरच नाही तर मनसुद्धा सुगंधित होते. अंधारावर प्रकाशाचा व वाईटावर चांगुलपणाचा विजय म्हणून हा सण हर्षोल्हासात आबालवृद्धांकडून साजरा केला जातो. आणि या आनंदात भर टाकण्यासाठी आसमंत प्रकाशमान करणारे फटाके पेटवले जातात. लहान मुलांना या फटाक्यांची खूपच गंमत वाटते व यासाठी अनेक मुलं दिवाळीची वर्षभर वाट पाहतात.

- Advertisement -

अनेक इतिहास तज्ञांनुसार फटाक्यांचा शोध चीन देशात लावला गेला, याबद्दल मतभिन्नता असू शकते. ख्रिस्तपूर्व साल 200 मध्ये फटाक्यांचा अपघाताने शोध लागला. हे अतिशय प्राथमिक स्वरूपाचे फटाके होते ज्यामध्ये बांबूने आग उडवून आनंद घेतला जायचा. पुढील एक हजार वर्षात फटाके विकसित होत गेले. ख्रिस्तोत्तर सन 800 मध्ये आजच्या सदृश्य फटाके जन्माला आले असे मानतात. इतिहास तज्ञ स्व. पी. के. गोडे यांच्या अनुसार ख्रिस्तोत्तर सन 1400 मध्ये भारतात फटाक्यांनी प्रवेश केला आणि आज तो भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. उत्सव असो वा कोणता सणसमारंभ, फटाक्याशिवाय साजरा झाला की आपल्याला चुकल्या चुकल्या सारखे वाटते. मात्र याच फटाक्यांमुळे होणार्‍या अपघातात कियासारखी कितीतरी निरागस मुलं दरवर्षी जीव गमावतात आणि त्यापेक्षा जास्त मुलं जखमी होतात. फुलबाज्या आणि फटाके 1000 डिग्री सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानावर जळतात.

केक भाजायला 176 डिग्री सेल्सियस तर सोने वितळायला 1093 डिग्री सेल्सियस एवढे तापमान लागते यावरून फटाक्यांच्या भयंकर उष्णतेचा अंदाज येऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आग लहान मोठे, श्रीमंत गरीब, पद प्रतिष्ठा किंवा जाती धर्माचा भेदभाव न करता सर्वांनाच भस्म करू शकते म्हणून सर्वांनीच सावध राहण्याची गरज आहे. व्हिकटोरीया हॉस्पिटल, बी. एम. सी. आर. आय. बंगलोर येथे तीन वर्षे केलेल्या पाहणीनुसार बर्न वार्ड मध्ये 900 मुले भरती झाली. तसेच सर्वात जास्त मुलांच्या भरती होण्याचे प्रमाण ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात आढळून आले ज्या काळात सर्वाधिक सण साजरे केले जातात. म्हणून पालकांनी या काळात अधिक सावध व सतर्क राहणे आवश्यक आहे. दिवाळी अपघातमुक्त व आनंदी साजरी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी मुलांचे व पालकांचे सुरक्षा प्रशिक्षण होणे ही काळाची गरज आहे.

- Advertisement -

मुलांनी सुरक्षा नियम समजून उमजून पाळले पाहिजे. मोठे व्यक्ती सोबत असल्याशिवाय फटाके पेटवणे अतिशय धोकादायक आहे. हातात फटाका पेटवण्याऐवजी लांब काठीने थोड्या अंतरावरून फटाके पेटवावे. उगाच शौर्य दाखवणे कधी कधी संकटात टाकू शकते, कारण काही फटाके अचानक पेटतात व भाजू शकते. घट्ट व सुती कपडे घातल्यास पेटण्याचा धोका कमी होतो. मुलींनी पदर अथवा ओढणी खोचून घेतल्यास व केस बांधून घेतल्यास आगीचा धोका संभवत नाही. एकदा न पेटलेला फटाका परत पेटवण्याचा प्रयत्न अंगाशी येऊ शकते. दरवर्षी दर्जेदार व नवीन फटाके घ्यावेत कारण साठवलेले फटाके कसे पेटतील हे सांगता येत नाही.

एक बादली पाणी व एक बादली रेती सोबत असू द्यावी जेणेकरून आग अथवा भाजण्याची घटना घडल्यास तिची तीव्रता कमी करता येईल व मोठी दुर्घटना टाळेल. घरापासून व वाहनांपासून दूर जागी मोकळ्या मैदानात फटाके पेटवणे सुरक्षित असते. या सुरक्षा संदेशाचे मुलांनी पालन केले पाहिजे हे कटाक्षाने बघण्याची जबाबदारी घरातील मोठ्या माणसांची आहे. मोठ्या माणसांनी मुलांना एकट्याने फटाके पेटवायची परवानगीच देऊ नये. स्वतः त्यांच्यासोबत उभे राहून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतल्यास अपघात टळू शकतील. फटाक्यांची निवड करताना मुलांच्या वयाप्रमाणे फटाके निवडले पाहिजेत. आमचे मूल लहान असूनही एवढा मोठ्ठा फटाका पेटवू शकते, असा अभिमान बाळगण्यात काही अर्थ नाही. उलट मुलांना सावध रहायला सांगायला हवे, जेणेकरून ते योग्य ती काळजी घेतील. आग या प्रकाराकडे गांभीर्याने पाहिले जाईल, असे संस्कार मुलांवर होणे गरजेचे आहे.

शाळेतील आजच्या धकाधकीच्या काळात कोणत्या क्षणाला काय होईल याचा भरवसा नाही. म्हणून उपचारांपेक्षा कधीही प्रतिबंध श्रेष्ठ याचे भान मुलांना सतत देत राहणे ही पालकांची जबाबदारी आहे. कपड्यांना जर आग लागली तर मुलेच काय मोठी माणसेसुद्धा इकडे तिकडे पळतात. विज्ञान सांगते की, आग वाढण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. म्हणजेच पळाल्याने हवेतील ऑक्सिजनमुळे आग अधिक वेग घेते आणि मग व्यक्ती गंभीर जखमी किंवा मृत्युमुखी पडू शकतो. याच कारणाने पालकांनी आजच मुलांना शिकवावे की कपड्यांना आग लागल्यास एका ठिकाणी थांबून, तोंडावर हात ठेवावा जेणेकरून विषारी धूर फुफ्फुसात जाणार नाही, नंतर जमिनीवर पडून आग विझेपर्यंत डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे लोळावे. अशा पध्द्तीने मुलांचे अग्निसुरक्षा प्रशिक्षण जर नियमित झाले तर नक्कीच मुलांचे प्राण वाचू शकतात. सर्व पालकांनी स्वतः जबाबदारी घेऊन मुलांचे अग्निसुरक्षा प्रशिक्षण केल्यास प्रत्येक घरातील मूल सुरक्षित होईल यात तीळमात्रही शंका नाही.

म्हणतात की,
सावधगिरी हाच मोठा गुण,
निष्काळजीपणा हेच वैगुण्य,
सुरक्षा निरागस बालकांची,
हेच सर्वात मोठे पुण्य

या दिवाळीच्या पवित्र सणाच्या निमित्ताने कुणाचे तरी प्राण वाचवण्याचे पुण्य मिळवायचे असेल तर आजच आपल्या आसपासच्या मुलांना फटाके सुरक्षा याबाबत जागरूक करावे व फटाके वाजवताना त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी असे विनम्र आवाहन या लेखाद्वारे मी आपणास करत आहे. या देवाघरच्या फुलांना, निरागस मुलांना जपून त्यांचे आग व भाजण्यापासून संरक्षण करत ही दिवाळी सुरक्षित व आनंदी वातावरणात साजरी करूया. आपणास व आपल्या परिवारास दिवाळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -