-पुष्पा गोटखिंडीकर
दिवाळी म्हणजे आनंदी आनंद. दिवाळीचा सण अश्विन वद्य त्रयोदशीपासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत पाच दिवस साजरा करतात. त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा वेगवेगळ्या सणांचा समावेश होतो.
अश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आले आहेत. गाईच्या ठिकाणी ३३ कोटी देव असतात असे मानले जाते. तिला आपण गोमाता म्हणतो. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. श्रीकृष्णाने तर स्वत:ला गोपाल म्हणवून घेतले.
शेतीकामात मदत करणार्या सर्वच जनावरांविषयी भारतीय संस्कृतीत आदराचे स्थान आहे. गाय तर कुटुंबातीलच एक सदस्य असते. तिच्या दुधावर पोरसोरं मोठी झालेली असतात. घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय. आईसारखीच मायाळू, सोशिक तसेच वासराला गोंजारून बोलणारं तिचं हंबरणं ऐकलं की कोणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं.
शेतावर इतके दिवस शेतीच्या राखणासाठी गेलेली गाय आपल्या बछड्यासह वसुबारसेला संध्याकाळी परत येणार असते. अशा गोमातेचे स्वागत करून तिच्या वासरासह या दिवशी तिचे पूजन करायचे असते. गायीच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती असते. गाईचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र यांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. गाईपासून मिळणार्या प्रत्येक तत्त्वात भरपूर कृमिनाशक शक्ती असते.
‘पंचगव्य प्राशनम् महापातक नाशनम्’
अश्विन शुद्ध त्रयोदशी या दिवसाला धनतेरस किंवा धनत्रयोदशी असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधांची पूजा करतात. आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजे मानव जीवनाचे ज्ञान असा आहे. भारतातील आयुर्विज्ञान हे सर्व जगात पसरले. निरोगी माणसाच्या स्वास्थ्याचे व रोगी माणसास रोगमुक्त करणार्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांताचे चिंतन आणि प्रसार होणे आवश्यक आहे.
धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. तिची पूजा केल्यामुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते. या दिवसाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे संध्याकाळी दक्षिणेकडे एक दिवा लावतात, त्याला ‘यमदीप’ म्हणतात. दक्षिण दिशा ही धर्माची मानली जाते. यम धर्मराज ही मृत्यूची देवता. या दिवशी त्यांची पूजा केल्याने अपमृत्यू टळला जातो असे मानतात.
व्यापारी लोक धनतेरस मोठ्या प्रमाणात साजरी करतात. धनत्रयोदशीच्या दुसर्या दिवशी नरक चतुर्दशी असते. या दिवशी सर्व लोक पहाटे उठून सुवासिक तेल, उटणे लावून स्नान करतात. या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समजूत आहे. नरकासूर नावाच्या राक्षसाने सर्व लोकांना खूप त्रास दिला होता. १६,००० स्त्रियांना त्याने तुरुंगात टाकले होते.
तेव्हा भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला अश्विन वद्य नरक चतुर्दशीला ठार केले आणि १६,००० स्त्रियांची बंदिवासातून मुक्तता केली. त्याप्रीत्यर्थ सगळीकडे आनंदोत्सव, दीपोत्सव साजरा केला जातो. नरक चतुर्दशीला उटणे लावून आपण आंघोळ करतो. उटणे या शब्दाचा अर्थ ‘उठणे’ म्हणजेच जागे व्हा, आपले मन, आत्मा, शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे.
अश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी लक्ष्मीपूजनाचा महत्त्वाचा समारंभ आपल्या हिंदू धर्मात साजरा केला जातो. देवीची जी अनेक रूपे आहेत, त्यात एक रूप महालक्ष्मीचे आहे. धन, संपत्ती, वैभव याचे लक्ष्मी हे प्रतीक आहे. बळीराजाच्या तुरुंगातून लक्ष्मीची सुटका विष्णूने केली म्हणून तिची पूजा करण्याची पद्धत आपल्याकडे पडली आहे.
प्रत्येक घरात पैसा, वैभव देवीच्या कृपेने यावे म्हणून अतिशय श्रद्धेने ही पूजा घरोघरी केली जाते. जैन धर्मामध्येही हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. कारण याच दिवशी रात्री १२ वाजता वर्धमान महावीर यांचे महानिर्वाण झाले. साधे दीप लावून त्यांची आठवण ठेवावी म्हणून हा दिवस जैन धर्मात पवित्र मानतात. महावीरांची पूजा करतात.
व्यापारी वर्षाचा शेवट करतात. नवीन वह्या घेऊन त्यांची पूजा करून नवे व्यापारी वर्ष सुरू करतात. व्यापारी वर्गात त्यामुळे लक्ष्मीपूजनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. राजस्थानी लोकांनी दिवाळीचा संबंध रामाच्या वनवासातून परतण्याशी जोडला आहे. या दिवशी ते लंकादहन करतात. आंध्र प्रदेशात घराबाहेर एक मचाण उभे करून त्यावर बसून स्त्रिया रात्री लक्ष्मीची गाणी म्हणतात. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन घरोघरी संध्याकाळी तिन्ही सांजेला केले जाते. स्त्रिया पूजेनंतर एकमेकींना हळद-कुंकू देतात. साळीच्या लाह्या, बत्तासे, धने प्रसाद म्हणून देतात.
या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला लक्ष्मी म्हणतात. कारण ती घरातील अलक्ष्मीला झाडून काढते. घरात व घराबाहेर सगळीकडे दिवे लावतात. सडा, रांगोळी घालून आनंदी प्रसन्न वातावरणामध्ये लक्ष्मीची पूजा साग्रसंगीत केली जाते. दिवाळीतील हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. विविधतेतून एकता यावेळी आपल्याला सर्वत्र आढळून येते आणि म्हणूनच फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. आपण तो आनंद नक्कीच घ्यावा. फक्त चायनीज फटाके घेणे टाळावे.
लक्ष्मीपूजनानंतरचा दुसरा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा यालाच पाडवा असे म्हणतात. हा दिवस दसर्याप्रमाणेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी विक्रम संवत्सर सुरू होते. दिवाळीतील हा प्रमुख दिवस मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. नवीन वस्त्रे, गोडाचे जेवण करून दिवस आनंदात घालवतात.
दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊबीजेचा होय. याला यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवशी मृत्युदेव यमाने आपली बहीण यमी हिच्याकडे जाऊन जेवण केले. तिला वस्त्रे, अलंकार भेट दिले, असे सांगितले जाते. या सणामागचा खरा विचार वेगळा आहे. बहीण-भाऊ यांचे प्रेमाचे, मायेचे नाते टिकून राहावे, लग्न होऊन बहीण सासरी गेली तरी भावाने तिच्या घरी जावे हा हेतू हा सण योजण्यामागे आहे. बहिणीने भावाला ओवाळावे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे भावाने बहिणीला भेट द्यावी अशी पद्धत आपल्याकडे रूढ आहे. अनेक वर्षे होऊनही आपल्या देशातील सांस्कृतिक जीवनात ही पद्धत चालू राहिली हे खरोखरंच या संस्कृतीचे वैशिष्ठ्य आहे.
भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते. एकमेकांना फराळाला बोलावले जाते. घरोघरी आकाश कंदील लावले जातात. लहान मुले किल्ले तयार करून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवतात. दिव्यांची आरास, फटाक्यांची आतषबाजी करून आनंद लुटतात. दिवाळी म्हणजे आपल्या संस्कृतीमधील एकमेकांशी संपर्क, सहवास, संवाद साधण्याचा सण आहे.
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा.