तुमच्यासाठी दिवाळी पाच दिवसांची.. राधिकासाठी?

‘वागले की दुनिया’ सिरियल आठवते का? सर्वसामान्य कुटुंबांची त्रेधातिरपीट या सिरियलमध्ये अगदी चपखलपणे मांडली होती. प्रत्येक कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सर्वसामान्य माणूस करत असतो आणि या प्रयत्नात त्याला खंबीरपणे साथ देते ती त्याची पत्नी, हा या मालिकेचा गाभा होता. वागळेची बायको राधिकाचे पात्रही मालिकेत कमालीचे गाजले होते. त्याचे कारणच हे होते की, प्रत्येक गृहिणी आपल्यात राधिका बघत होती. हीच राधिका सध्या दिवाळीनिमित्त घरोघरी राबताना दिसतेय.

दिवाळी जवळ आली आणि राधिकाने ‘इनबिल्ट प्रोग्राम फिड’ असल्यागत साफसफाईला सुरुवात केली. नवरा कामावर गेलेला. मुलं काम ऐकेना. म्हणून राधिकाने स्वत:च झाडपूस करुन जाळी-जळमटे काढायला सुरुवात केली. एका विशिष्ट उंचीपर्यंत हात पोहचला. पण त्यापुढे राधिकाची झेप काही जाईना. नेमकीच गॅसच्या ज्वालेने तयार झालेली छतावरची काजळी तिला परेशान करत होती. सारखं लक्ष वेधत होती. झाडू हातात घेत जरा काय टाचा उचलल्या तर घोटे दुखायला लागले. हात वर केला पाठीत लचक भरली. खांद्यांनाही झाडूचं वजन पेलवेना. पण या अयशस्वी प्रयत्नानंतर राधिका थांबणार का? तिने ओट्यावर छोटा स्टुल ठेवला आणि अपेक्षित लक्ष्य गाठले. ते गाठताना ती पुरती घामाघुम झाली. तिची पुसपास सुरू असताना तिचे मुलगा नुसताच स्वयंपाक घरात डोकावून गेला. पण राधिकाला हातभार मात्र लावला नाही. तिनेही त्याला फार आग्रह धरला नाही.. ‘बाईच्या जातीला मेला हा शापच आहे.

पुढचा जन्म बाईचा देऊ नको रे देऊ देवा’, असं पुटपुटत तिनं काम पूर्ण केलं.. घामाघूम अवस्थेत काही क्षण ती टीव्हीसमोर जाऊन बसली. टीव्हीत रंगाची जाहिरात सुरू झाली. त्यात एक उंचपुर्‍या गोर्‍यागोमट्या बाईला नऊवारी साडी नेसवून काम करताना दाखवलं होतं. त्यात तिला घाम आलेला नव्हता की लिपस्टिक पुसलेली नव्हती.. केस तर इतके सिल्की की, हवेची झुळूक आली तरी ते भुरभुर उडतील. मेकअप जागच्या जागीच.. चेहर्‍यावरही कुठं थकवा दिसत नव्हता.. तरीही ती बाई घराघरातील कष्टकरी महिलांचं प्रतिनिधित्व करीत होती. राधिका तडक उठली आणि आरशासमोर गेली. निथरत्या घामाचा चेहरा तिलाच बघवला नाही. केसांंची तर अशी अवस्था झाली होती की, त्यातून जणू उंदिर खेळून गेले असतील. तिने फार वेळ आरशाकडे न बघताच बाथरुमचा रस्ता धरला आणि सगळा राग दिवाळी म्हणून धुण्यासाठी काढलेल्या कपड्यांवर काढला. या रागात बेडशिट, चादरी स्वच्छ धुतल्या गेल्या. ते वाळत टाकताना मात्र शेजारच्यांच्या टेरेसकडे बघत ‘मेरेे कर्टन्स उसके कर्टनसे चमकदार कैसे’ असा भाव मनी आणत राधिकाने स्मितहास्य केले.

राधिकाच्या नियोजनाप्रमाणे दुसरा दिवस भांडी घासण्याचा होता. त्यासाठी पहाटे उठून तिने माळ्यावरची पितळाची मोठी आणि जडबदक पातली बाहेर काढली. ठेवणीतली वेगळी अशी सगळीच भांडी तिने घासायला काढली. दिवसभर भांडी घासण्याचा कार्यक्रम सुरू होता. पातेले घासताना जो आवाज यायचा तेच ‘आवडते म्युझिक’ असल्याचे भासवत राधिका त्यावर थोडीफार मान डोलवत होती. ही भांडी घासताना चक्क तीन घासण्या झिजल्या, पण राधिकाने काही हार मानली नाही. हा सगळा कार्यक्रम झाल्यावर घासण्यांपेक्षा राधिकाच जास्त झिजलेली होती. परंतु उन्हात वाळवत घातलेल्या भांंड्यांची चमक जेव्हा तिच्या डोळ्यावर चमकली तेव्हाचे राधिकाच्या चेहर्‍यावरचे तेज त्या भांड्यांपेक्षाही अधिक चकचकीत दिसत होते. तिसरा दिवस खरेदीचा होता. पण सकाळीच तिला भलतंच टेंशन आलं.

महागाई वाढली मात्र नवर्‍याचा पगार मात्र वाढला नाही. कोरोनामुळे बोनसचंही काही खरं नाही. मग आता दिवाळीला खर्च करावा की नाही. खर्च नाही करायचा म्हटलं तर सणाची मजा किरकिरी होईल आणि खर्च करायचा म्हटला तर पैसे कुठून आणायचे असा यक्ष प्रश्न होता. अखेर अलमारी उघडली. त्यात दोन-तीन वर्षापूर्वी नातेवाईकाच्या लग्नात मिळालेल्या कांजीवरमच्या साडीकडे तिचे लक्ष गेले. तिने अलवारपणे ती अलमारीतून बाहेर काढली. साडीला जिथं पदर जोडलेला होता तिथल्या नागमोडी आकाराच्या सूक्ष्म नक्षीवर तिने आपले बोट नाजूकपणे फिरवले. साडीचे बुट्टेही थोडे ताणून बघितले आणि ‘अरेच्चा या साडीला तर आपण विसरलोच होतो’, असे खोटेखोटे म्हणत तिने दिवाळीला हिच साडी नेसायची हे फायनल केले. म्हणजे साडीचा खर्च वाचला. नवर्‍याला आणि मुलाला मात्र नवीन कपडे तसेच सासूबाईंनाही एक छान नऊवारी साडी घेण्याइतपत हिशोब तिने जुळवला. वरुन नव्या कपड्यांशिवाय सण कसा साजरा होणार? असा उलटप्रश्नही तिनं केला.

ठरल्यानुसार कपड्यांची खरेदीदेखील झाली. खरेदीसाठी सहकुटुंब गेलेली मंडळी रात्री उशिरा घरी परतली. राधिका पुरती दमली होती. ‘स्वयंपाक कुणी बनवून दिला असता तर बरं झालं असतं’ असं मनातल्या मनात म्हणत ती निमूटपणे स्वयंपाकाला लागली. त्यानंतरच्या दिवशी किराणाची खरेदी करायला राधिका पहाटेच उठली. सकाळी स्वयंपाक उरकत ती घराबाहेर पडली. पण घराबाहेर पडताना तिच्याकडे मोजकेच पैसे होते. किराणा भरुन झाला आणि यादीच्या बिलानुसार जेव्हा पैसे द्यायची वेळ आली तेव्हा तिला लक्षात आले आपण फारच कमी पैसे आणले आहेत. यादीवर नजर फिरवली तर तेलाच्या किमती अपेक्षेपेक्षा वाढलेल्या होत्या. त्याहीपेक्षा महाग खसखस झाली होती. गेल्यावर्षी 700 रुपये किलो या भावाप्रमाणे छटाकभर घेतलेली खसखस तिला यंदा 2400 रुपये किलोभावाने मिळत होती. ही साडेचार पट भाववाढ तिच्या नियोजनावर पाणी फिरवत होती. मग तिने खसखस परत दिली आणि त्याजागेवर राजगीरे घेतले.

यासोबत आणखी काही वस्तू तिने कमी केल्या. निघताना राधिकाच्या हातात चार पिशव्या होत्या. त्या अ‍ॅडजेस्ट करताना आणि पेलवताना तिची पुरती दमछाक होत होती. तेव्हढ्यात तिचे लक्ष दुकानातल्या देव्हार्‍याकडे गेले. त्यात सरस्वती देवीच्या दोन हातात दोन कमळे, एका हातात सोन्याची नाणी दिसली. एका हातानी देवी आर्शीवाद देत होती. या चित्राकडे बघून तिचा आत्मविश्वास कमालीचा वाढला. दोन पिशव्या दोन्ही खांद्यांवर, दोन पिशव्या दोन्ही हातात आणि त्यात पर्सचीही अ‍ॅडजेस्टमेंट करीत ती बस स्टॉपकडे निघाली. दुकानापासून स्टॉपपर्यंत जाईपर्यंत एकदा नवर्‍याने ऑफिसमधून, एकदा मुलाने तर एकदा सासुबाईंनी घरुन मोबाईल करीत ‘तू कधी येतेस, किती उशिर केला. तुला तर शॉपिंगच्या नावाने हिंदडायचे असते..’ वगैरे वगैरेसारखे डॉयलाग सुनावले. पण फार त्रागा करुन चालणार नव्हता. राधिका चार पिशव्या आणि हातातील पर्स घेऊन बसमध्ये चढली. नेमकी बसमध्येही बसण्यासाठी जागा नव्हती. अखेर बसच्या खांबाचा टेकू घेत तिने घरापर्यंतचा प्रवास कसाबसा पूर्ण केला.

घरी आल्यावर स्वयंपाक केला. त्यानंतर हस्तकौशल्याची करामत सुरू झाली. अनारसे तळून झाल्यावर त्यांना चक्क मघाशी आणलेल्या राजगिर्‍यात मनसोक्त लोळवले. म्हणतात ना, दुधाची तहान ताकावर.. तसे ‘खसखसची तहान राजगीर्‍यावर’ या नवीन म्हणीला तिने तळता-तळता जन्म दिला. काही वेळात चकल्या तळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. चकल्या तळताना कष्ट दिसत नाही. पण सोर्‍या पिळताना जी ताकद लागते ती राधिकात नव्हतीच. मग मुलाला आवाज दिला. मुलानेही दोन तीन वेळा सोर्‍या पिळला. पण गॅससह कढईची उब त्याला काही सहन होईना. दररोज डंबेल्सचे 200 सेट मारणारा हा ‘अर्नाल्ड’ सोर्‍या पिळताना काही क्षणात घामाघूम झाला. तेव्हढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. हेच निमित्त काढत तो हातचे काम सोडून निघून गेला. मुलगा फोनमध्ये रंगला. इकडे तेलाचा रंग बदलायला लागला. अखेर राधिकाने गॅसची शेगडी ओट्याखाली उतरवली. त्यावर कढई ठेवली. साडीचा पदर खोचला. आणि उभे राहून पूर्ण ताकद पणाला लावून चकल्या काढल्या.

वेदामध्ये नारीला यज्ञीय का म्हणतात हे तिला एव्हाना समजले होते. चकल्या तळताना तिला तहान लागली. हात पिठाचे म्हणून पाण्यासाठी तिने मुलाला हाकही मारली. पण तो मोबाईलमध्ये इतका गुंग होता की, त्याला आईची हाक ऐकूच गेली नाही. मग राधिकाने तहानेची समजूत काढत चकल्यांचे काम उरकून घेतले. त्यानंतर निवांत होत घशाची तहान माठातल्या पाण्याने भागवली. दोन-तीन दिवस सलग हा फराळाचे पदार्थ बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता. रॅक घासता घासता कापलेली बोटं चिवडा मिस्क करताना आग मारत होती. पण बोटांना दोष देत राधिकाने चिवड्याची सरमिसळ केली. जर्मलच्या डब्यांच्या झाकणांना आतल्या बाजूने पेपर लावत त्यात फराळाचा मेवा टाकण्याचे काम राधिकाने बखुबी पेलले. त्यासाठी रोज ओव्हरटाईम होत होता. पण त्याचा मोबदला मात्र ती कुणाकडून मागू शकत नव्हती. या फराळा व्यतिरिक्त रोजची पाचवीला पुजलेली कामे तिच्या पुढ्यात होतीच. ती कामेही ती कर्तव्य म्हणून करत होती.

फराळ तयार झाल्यावर मुलाने, नवर्‍याने त्याची टेस्ट घेतली. चकली फार खरपूस नाही झाली. शेवीत मीठ थोडे कमी झाले. चिवडा खारटच झाला.. सांजोर्‍या नरम लागतायत.. असे रिमार्क देत या दोघांनीही हातातले ताट मिनिटांत फस्त केले. हे सगळे रिमार्क डोक्यात साठवत पुढच्या वर्षी त्यात काय सुधारणा करता येईल याची खूणगाठ तिने मारुन घेतली. अशा रितीने दहा बारा दिवस निघून गेली. दिवाळी जवळ आली. तिच्या मुलाने कॅलेंडर उघडून नोव्हेंबर महिना तपासला. ‘आई यंदा दिवाळी पाचच दिवसाची गं’ म्हणत त्याने तोंड काहीसे वाकडं केलं. पण राधिका काहीशी बावरली. दिवाळीच्या तयारीसाठी गेलेल्या दहा-बारा दिवसांचे मोजमाप दिवाळीच्या दिवसांत झालेलेच नव्हते याची तिला जाणीव झाली. पण तिला त्याची फिकीर नव्हती. आपले कर्तव्य पार पाडल्याचे समाधान तिच्या चेहर्‍यावर होते.

दिवाळी आली. राधिकाने पहाटे फुलमाळा करुन तयार ठेवल्या. पण दाराला लावायच्या आधीच मुलाचा मित्र घरात येऊन बसला. त्याला फराळ देताना माळा बाजूला राहिल्या. मग राधिकानेच दारासमोर स्टुल ठेवत माळा बांधून घेतल्या. मग छानशी संस्कार भारतीची रांगोळी काढली. सायंकाळी ती दिवाळीतला सगळा थकवा विसरुन सजून-धजून तयार झाली. पतीने मग दोघांचा सेल्फी काढण्याचा आग्रह धरला. मग तिने मुलाचा हात ओढत त्यालाही सेल्फी कॅमेर्‍याच्या फ्रेममध्ये बसवले. तिला तिचा एकटीचाही एक फोटो काढायचा होता, जो व्हॉट्सअ‍ॅपच्या डीपीला लावता आला असता. पण तितक्यात शेजारचे-पाजारचे दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घरात येऊन बसले. त्यांचे चहापाणी करताना राधिका सेल्फी काढायला विसरुन गेली.

पाहुणे गेल्यावर काही वेळ घरातली सगळी मंडळी बिल्डींग खाली फटाक्यांची मजा घ्यायला गेली. पुरुष मंडळी एकत्र आल्यावर काहींनी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले बायकांवरील जोक ऐकवून दाखवले. बायका कशा नटण्याथटण्यात वेळ घालवतात अशा स्वरुपाच्या विनोदांवर खसखस पिकत होती. त्यांच्या लेटलतीफीवरही मंडळी लोटपोट होत होती. या हसणार्‍यांच्या गलक्यात राधिकाही पोट धरुन हसत होती.. अचानक काहीतरी आठवल्याने ती लगबगीत घरात गेली. पाहुण्यांचे उष्टे ग्लास, ताटं धुत लागलीच स्वयंपाकालाही लागली… या नादात सेल्फीही काढणं राहून गेलं.. रात्रीचे बारा वाजले. पडल्या-पडल्या राधिकाने ‘व्हॉट्सअ‍ॅप’ ओपन केलं. तेव्हा लक्षात आलं अरेच्चा स्वत:चा फोटो काढणं तर राहूनच गेलं. मग पुढच्या दिवाळीला नक्की स्वतंत्र फोटो काढेन असं मनोमन ठरवत ती निद्रादेवीच्या अधीन झाली. अशी ही ‘वागले की दुनिया’तील राधिकाची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण..!

–मनीषा घाडगे