दिवाळी अंकांची ऑनलाईन भरारी

आजपासून वीस एकवीस वर्षापूर्वी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की, इंटरनेटच्या आणि समाज माध्यमांच्या या युगात आपण पुस्तके आपल्या हातातील मोबाईलवर वाचू शकू. पण प्रत्येक दशक आपल्या बदललेल्या काळाची भाषा बोलत असतं. ज्याप्रमाणे आपण सोशल मीडिया वापरापूर्वी सण-उत्सव वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेटून देत असू. त्यात आता बदल होऊन व्हिडिओ कॉल अथवा संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या जातात. अगदी त्याचप्रमाणे आज छापील पुस्तक आणि दिवाळी अंक शोधत बसण्यापेक्षा, युवक ऑनलाईन डिजिटल स्वरूपात आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये दिवाळी अंक आणि इतर पुस्तके वाचत आहेत.

तंत्रज्ञानाच्या युगात रोज नवनवीन बदल होत आहेत. अनेक गोष्टीत थोड्याबहुत प्रमाणात ते बदल अनुभवता येत आहेत. असाच बदल डिजिटल जगात होतोय. तो म्हणजे पुस्तके, मासिके, पाक्षिक नियतकालिके यामध्ये. तसेच प्रकाशित होणार्‍या आजच्या दिवाळी अंकांमध्ये सुद्धा ई-जगातला बदल पाहायला मिळतोय. दिवाळी आली की वाचक मोठ्या उत्सुकतेने दारावर येणार्‍या कुरियर/टपालाची वाट पाहत असत. कारण आपण मागवलेले दिवाळी अंक आपल्याला वाचायला मिळणार. याचा वेगळा आनंद असे. लेखक/ कवीने पाठवलेला लेख, कविता एखाद्या दिवाळी अंकात छापायला दिली असेल, तर त्या अंकाची वाट पाहण्यात वेगळी मजा होती.

एवढेच नाही तर जवळच्या ग्रंथालयात जाऊन चार-पाच वेळा तरी विचारपूस होत असे. एकदा का अंक हाती आला की, गावातील पारावर बसून वाचताना इतरही मंडळी त्यावर बोलत असत किंवा अभिवाचन वाचन होत असे. आजही दिवाळी अंकाची वाट पाहिली जाते. पण कुरिअर किंवा टपालसेवेद्वारे नाही. तर मोबाईलमध्ये वापरात असलेल्या सोशल अ‍ॅपद्वारे, संकेतस्थळाद्वारे. तंत्रज्ञानाने आपल्याला छपाईच्या प्रतींपासून डिजिटल युगात आणले व मोठ्या संख्येने वाचावीत अशी पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे एका क्लिकवर उपलब्ध करून दिली. ई-जगतात वावरताना दिवाळी अंक यातून कसे बरे सुटतील. याचीच चर्चा आजच्या लेखात आपण करणार आहोत.

या आठवड्यात भारतभर आणि ज्या ठिकाणी भारतीय आहेत, त्या ठिकाणी दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात दिव्यांच्या तेजोमय प्रकाशात आपण साजरा केला. आजही काही मित्र-मैत्रिणींचे फोन, मेसेज शुभेच्छा आणि फराळाच्या आमंत्रणासह येत आहेत. पण यात एका मित्राचा व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला मेसेज अतिशय महत्त्वाचा वाटला. त्याने दिवाळीच्या शुभेच्छा व फराळासाठी निमंत्रित केलेच. पण समोर असे लिहिले की, घरी येताना तुझ्या जवळ असणारे दिवाळी अंक घेऊन ये व ऑनलाइन बुक स्वरूपात असणार्‍या दिवाळी अंकांची लिंक किंवा पीडीएफ व्हॉट्सअ‍ॅपवर पाठव. मला हा मेसेज वाचून आश्चर्य वाटले. त्याचे कारणही तसेच आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात विशेषत: सोशल मीडियाच्या जलदगतीच्या काळात युवकांवर आरोप होत असतो की, आजचे तरुण वाचन करत नाहीत. वाचण्याची परंपरा खंडित होतेय. चोवीस तास फक्त यु ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप आणि ओटीटीद्वारे आलेले चित्रपट व वेब सीरीज पाहण्यात आजचा युवक आपला वेळ वाया घालवत आहे. असे आरोप सरसकट होत असताना (अर्थात काही तरुण अपवाद आहेत) मला माझ्या मित्राचा हा मेसेज अतिशय महत्त्वाचा वाटला. त्यानंतर मीसुद्धा तो मेसेज इतर मित्रांना पाठवला आणि दिवाळी अंक मिळवण्याचा प्रयत्न केला.

आजपासून दहा-पंधरा वर्षांपूर्वी आपण ज्यावेळी भेटायचो त्यावेळी बाजारात आलेले नवीन पुस्तक कोणते, कोणत्या लेखकाने नवीन कथासंग्रह कादंबरी प्रकाशित केली, किंवा कोणत्या कवीचा कवितासंग्रह सध्या उपलब्ध आहे. कोणते नियतकालिक, मासिक जास्तीत जास्त वाचले जातेय. यावर चर्चा होत असे. दिवाळीच्या वेळी तर दिवाळी अंकांवर आवर्जून चर्चा होत असे. मला आजही आठवतं मी इयत्ता चौथीत होतो. त्यावेळी माझ्या हातात ‘आवाज’ आणि ‘भन्नाट’ हे दोन दिवाळी अंक आले होते. त्यातील वेगवेगळ्या व्यंगचित्रांमुळे म्हणा किंवा विनोदी कथांमुळे म्हणा तो अंक मला वाचण्यात अतिशय आनंद वाटला होता. त्यातील इतर लेखसुद्धा एवढे आवडले की, मी अशाच प्रकारचे दुसरे दिवाळी अंक आहेत का..? याची विचारपूस आमच्या शिक्षकांकडे केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत दिवाळी आणि दिवाळी अंक हे समीकरण माझ्यासाठी खास आहे. लहान मुलांसाठी निघणारे आणि काही विनोदी दिवाळी अंक तर दोन ते तीन वेळा आम्ही मित्र वाचत असू.

महाराष्ट्रात साहित्यिकांची मोठी परंपरा आहे आणि त्याच परंपरेला किंबहुना लेखक, कवी, चित्रकार, व्यंगचित्रकार, प्रकाशक जाहिरातदार या सर्वांसोबत वाचकांना जपण्याचं काम गेल्या एकशे अकरा वर्षांच्या सातत्यशील दिवाळी अंकांच्या निर्मितीने सिद्ध करून दाखवलं. जत्रा, आक्रोश, हास्यआनंद, धमाल धमाका अशा विनोदी दिवाळी अंकांनीसुद्धा वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आरोग्यदर्पण, मार्मिक, साधना, सत्याग्रही, ग्रहसंकेत, देशदूत अक्षरधारा आणि वेगवेगळ्या महत्त्वाच्या दैनिकांचे प्रकाशित होणारे दिवाळी अंक विषयाच्या विविधतेसह दर्जेदार लिखाणामुळे वाचकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत. लहान मुलांसाठीसुद्धा विशेष दिवाळी अंक आहेत. दिवाळी अंकांच्या या गौरवशाली परंपरेमुळे महाराष्ट्रात आजही वाचन संस्कृती जपली जाते. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सद्य:स्थितीचा विचार केला असता आणि या वर्षीच्या दिवाळी अंकांची छापील संख्या पाहता असे दिसून येते की, या सर्वच गोष्टींवर कोविड -19 चे सावट आहे. कारण आपण सध्या आफ्टर कोरोना काळाच्या उंबरठ्यावर आहोत. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे सर्वच पुस्तकांची व नियतकालिकांची छपाई बंद होती. प्रकाशकांच्या अडचणी आणि इतर समस्यांमुळे जो पुस्तकांचा खप आहे तो मंदावला असे म्हणता येईल. याचाच परिणाम या वर्षीच्या दिवाळी अंकांवर मोठ्या प्रमाणावर दिसून आला. दरवर्षी प्रकाशित होणारे दिवाळी अंक या वर्षी छापील स्वरूपात कमी संख्येने उपलब्ध झालेले पहावयास मिळाले. याचे कारण अनेक अंकांना जाहिराती मिळाल्या नाहीत.

ज्यांना जाहिराती मिळाल्या त्यांनी कमी पृष्ठसंख्या असणारे दिवाळी अंक वाचकांना उपलब्ध करून दिले. दरवर्षी प्रकाशित होणारे अक्षर, मोहिनी, ऋतुरंग, अंतर्नाद यासारखे अनेक दिवाळी अंक वाचायला मिळाले. परंतु शतायुषी आणि सत्याग्रही सारख्या दिवाळी अंकांनी यावर्षी अंक प्रकाशित केला नाही. याचे कारण सध्याची परिस्थिती आहे. टाळेबंदीमुळे शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ग्रंथालये आजही बंद आहेत. यामुळे काही प्रकाशकांनी छापील स्वरूपात दिवाळी अंक प्रकाशित केले नाहीत. पण या सर्व अडचणींवर मात करीत वाचकांची आवड लक्षात घेता. जवळपास 30 ते 40 टक्क्यांच्यावर दिवाळी अंक ऑनलाइन (डिजिटल, ई -बुक) किंवा पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्याचं अतिशय महत्त्वाचं काम प्रकाशकांनी केलं आहे.

आजपासून वीस एकवीस वर्षापूर्वी कोणी कल्पनासुद्धा केली नसेल की, इंटरनेटच्या आणि समाज माध्यमांच्या या युगात आपण पुस्तके आपल्या हातातील मोबाईलवर वाचू शकू. पण प्रत्येक दशक आपल्या बदललेल्या काळाची भाषा बोलत असतं. ज्याप्रमाणे आपण सोशल मीडिया वापरापूर्वी सण-उत्सव वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष भेटून देत असू. त्यात आता बदल होऊन व्हिडिओ कॉल अथवा संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या जातात. अगदी त्याचप्रमाणे आज छापील पुस्तक आणि दिवाळी अंक शोधत बसण्यापेक्षा, युवक ऑनलाईन डिजिटल स्वरूपात आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये दिवाळी अंक आणि इतर पुस्तके वाचत आहेत. जवळपास सर्वच क्षेत्राला वाहिलेले दिवाळी अंक हे ई-बुक स्वरूपात वाचकांना ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. ज्याचा आस्वाद दिवाळीच्या फराळासोबत आजचा युवा वाचक वर्ग घेत आहे. जुन्या दिवाळी अंकांची परंपरा समोर नेण्याचे काम युवा वर्गातून ज्याप्रमाणे होत आहे, त्याचप्रमाणे नवीन युवा प्रकाशकांनी युवकांसाठी खास करून दिवाळी अंक प्रकाशित केले आहेत. यामध्ये ‘शब्दशिवार’ , ‘चीरांगण वर्‍हाडी’, ‘गझल अमृत’, ‘अक्षरधन’या सारखे अंक सध्या सोशल मीडियावर पीडीएफ स्वरूपात युवा वाचकांच्या जवळ उपलब्ध आहेत. आणि तेवढ्याच प्रमाणात सोशल मीडियावर त्यातील लेख कविता व्हायरल होतायत.

अलीकडच्या काळात युवकांची क्रिएटिव्हिटी अधिकाधिक प्रमाणात पाहायला मिळतेय. संपूर्ण जग ऑनलाइन गोष्टींचा आनंद घेत आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करून अनेक युवक साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, पर्यावरण, इतिहास, शिक्षण, संस्कृती इत्यादी सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्या-त्या विषयाला वाहिलेले मासिक अथवा पाक्षिक सुरू करत आहेत. जेणेकरून युवकांपर्यंत डिजिटल अंक पोहोचवता येईल आणि ते या सर्व विषयांवर आपली मते नोंदवतील. सध्या ‘शिवस्फूर्ती वाचन कट्टा ई-दिवाळी अंक’ सोशल मीडियावर चर्चेत आहे. आजूबाजूच्या सर्वच क्षेत्रातील युवकांशी संपर्क साधून संपादक आशुतोष पाटील या 22 वर्षीय तरुणाने कोणतीही जाहिरात न छापता हा दिवाळी अंक वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून दिला आहे. विशेष क्षेत्रात काम करणार्‍या आणि त्यासंबंधित दर्जेदार लेख वाचकांना पर्वणीच म्हणावी लागेल. स्वखर्चाने या युवकाने हा अंक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करून युवकांसाठी एक आदर्श घालून दिला आहे.

या आणि अशा प्रकारे युवक माहितीचा डिजिटल स्त्रोत शोधताहेत. वाचकांपर्यंत पोहोचवत आहेत. बिफोर कोरोना काळात आपण ऑनलाईन राहणार्‍यांची आणि सोशल मीडिया वापरणारांची संख्या पाहिली असता, त्याचे प्रमाण आफ्टर कोरोना काळात जास्तीत जास्त वाढले आहे. नेमका हाच ग्राहकवर्ग इ-बुक किंवा डिजिटल पुस्तकांसाठी शोधला गेला. आणि प्रकाशक मंडळींनी यांच्यापर्यंत अद्ययावत माहिती ई-पुस्तकांद्वारे पोचवली. एकूणच भारतातील ग्रंथसंपदा ही जागतिक स्तरावर संदर्भ म्हणून वापरली जाते. म्हणूनच या सर्वांना अग्रस्थानी ठेवून भारतातील वेगवेगळ्या राज्यातील भाषा व सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे ज्ञानाचा हा खजिना ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे काम सुरळीतपणे सुरू आहे.

रोजच्या रोज हजारोंच्या संख्येने वाचक वर्ग हव्या त्या संकेतस्थळांवर जाऊन ई-बुक वाचत आहेत. स्वतः विकत घेत आहेत. मासिक व नियतकालिकांना विशेष मागणी पाहायला मिळते. कारण त्यामध्ये आलेले लेख कविता किंवा इतर माहिती तत्कालिन घडामोडींचा आणि संदर्भ देणारा दस्तावेज असतो. म्हणून आजही डिजिटल युगात महाराष्ट्रातील दिवाळी अंकांना मोठ्या संख्येने मागणी आहे. ज्याचा पुरवठा ई-बुकद्वारे होतोय. युवक सोशल मीडियाद्वारे फॉरवर्ड करून वाचत आहेत. चर्चा करून आपल्या वाचन संस्कृतीशी पुन्हा नव्याने नातं जोडत आहेत. युवकांवर सरसकट ऑनलाइन निष्क्रियतेचा आरोप होऊ शकत नाही. काही प्रमाणात झालेला बदल हा वेगळ्या दिशेची चाहूल असतो. त्या बदलाचे यानिमित्ताने सोशल मीडिया जगात स्वागत करूया. याप्रसंगी मला गुलाम मोहम्मद यांचा शेर महत्त्वाचा वाटतो. ते म्हणतात..

बारूद के बदले हाथों में आ जाए किताब तो अच्छा हो
ऐ काश हमारी आँखों का इक्कीसवाँ ख़्वाब तो अच्छा हो

शेवटी काय वाचन महत्वाचे आहे. हातात छापील पुस्तक घेऊन असो किंवा मोबाईलमध्ये ई-बुक असो….. चला तर मग तूर्तास आपण सर्व मिळून दिवाळीच्या फराळासोबत दिवाळी अंकांचा फराळही वाचायला घेऊयात.