Maharashtra Assembly Election 2024
घरफिचर्ससारांशDiwali Special Food : दिवाळी फराळाच्या नाना कळा!

Diwali Special Food : दिवाळी फराळाच्या नाना कळा!

Subscribe

दिवाळीतल्या आनंदाचा एक भाग म्हणजे एकाच वेळी खाण्यासाठी उपलब्ध असलेले आठ नऊ प्रकारचे खमंग, तिखट आणि गोड असे पदार्थ बनवणे किंवा विकत आणणे. त्या पदार्थ समूहालाच आपण दिवाळीचा फराळ असे म्हणतो. खरे तर मला प्रत्यक्ष फराळ खाण्यापेक्षा फराळाच्या पदार्थांनी ओसंडून वाहणारी दुकाने आणि दिवाळीपूर्वी घरोघरी येणारे भाजणी आणि तळणीचे वास अधिक आवडतात, पण हा लेख लिहिताना अनेक ठिकाणी खाल्लेले, आवडलेले आणि निरनिराळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ माझ्या डोळ्यासमोर तरळतात. त्यांच्या नाना कळा जाणवतात.

-मंजूषा देशपांडे

दिवाळी फराळातील काही पदार्थ तर फारच तीव्रतेने आठवतात. त्यातला पहिलाच पदार्थ म्हणजे आमच्या घरच्या किंवा विदर्भातल्या चकल्या. आमच्या घरी दिवाळीसाठी म्हणून चिवडा, दोन तीन प्रकारचे लाडू, शंकरपाळी, करंज्या वगैरे अगोदर करून ठेवतात, पण चकल्या मात्र नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ताज्या करतात.

- Advertisement -

त्यासाठी भाजणीच्या पीठात मोहनाबरोबर लसूण, मिरची आणि कोथिंबीरीचे वाटण आणि दही घातलेले असते. त्या गरमागरम चकल्या भरपूर लोण्याबरोबर खातात. (वाटलं किनी वाँव..) अर्थातच आमच्या घरच्या दिवाळी फराळाच्या पदार्थांतल्या मला चकल्याच अधिक आवडतात. बाकी कोणतेच पदार्थ मला तेवढे भूलवत नाहीत.

एका वर्षी दिवाळीत मी नागपूरात होते. आमच्या कोल्हापूरच्या घरी आणि गल्लीतही दिवाळीच्या तयारीची अगदी दसर्‍यापासूनच फारच धामधूम असते. त्यामानाने तिथे थोडा निवांतपणा होता, पण त्यावेळी तिथे मी एका घरी दिवाळी पाडव्याला भरपूर ताजी आणि हिरवीगार कोथिंबीर घातलेल्या अगदी खुसखुशीत भल्या मोठ्या लांबट पुडाच्या वड्या आणि खव्याच्या करंज्या खाल्ल्या होत्या. त्या काळात विदर्भात दिवाळीतही ताजे पदार्थ करण्यावरच अधिक भर असायचा. त्याचवेळी आमच्या एका मित्राच्या घरी वाटलेल्या चारोळ्याचे सारण घातलेल्या छोट्या छोट्या करंज्याही खाल्ल्या होत्या. त्यांची चव तर अजूनही मनात आणि अर्थातच जीभेवरही आहे.

- Advertisement -

दरवर्षी नरक चतुर्दशीच्या दिवशी आमच्या घरचा फराळ खाऊन मी, ओळखीच्या काही मोठ्या लोकांना नमस्कार करण्यासाठी म्हणून नवीन कपडे घालून घराबाहेर पडते. पहिल्यांदा बाबांच्या एका स्नेह्यांकडे जाते. ते कुटुंब बेळगावचे असल्यामुळे त्यांच्या घरचा फराळ अर्थातच आमच्या घरच्या फराळापेक्षा थोडा वेगळा असतो. त्यांच्या घरातले गुळाच्या पाकात केलेले कडक बुंदीचे लाडू आणि तांदळाच्या पीठात, फेसलेले लोणी घालून केलेली कडबोळी खाणे म्हणजे मला एकदम मेजवानीच वाटते.

आमच्या बाबांच्या मारवाडी मित्रांकडे फराळ म्हणजे, पाक ओसंडून वाहणारी बालुशाही, गुलाबाच्या पाकळ्या पखरलेले आणि मलई घातलेले जाळीदार गीव्हर आणि बारीक मोतीचूराचे चांदीचा वर्ख लावलेले लाडू, साधारण कडबोळ्याच्या चवीची पण आकारात भिन्नता असलेली चंपाकळी आणि विविध प्रकारचे शेव..आणि बरेच पदार्थ असतात.

त्यांचा फराळ मला पहायला अधिक आवडतो. कारण तेवढे तुपाळ पदार्थ जास्त खाता येत नाहीत. चवीसाठी म्हणून फार तर एखादा तुकडा खाल्ला तरी पुरे होते. त्या मानाने मला कोकण किनारपट्टी आणि गोवा इथले मूळ स्थान असलेल्या लोकांच्या घरात दिवाळीच्या दिवशी बनणारे सात आठ प्रकारचे पोहे, विशेषत: नारळाच्या दुधातले चिंचेचा कोळ घातलेले कोळाचे पोहे अधिक प्रमाणात आवडतात.

कोकणात तांदळाच्या पीठाची आंबट गोड आणि तिखट बोरे करतात. ती बोरे येता जाता चघळायला मजा येते. गोव्यातले कणकेच्या पीठात भरपूर तूप घालून पीठाचे लाडू आणि ओले खोबरे परतून कोरडे करतात. त्या खोबर्‍यात काजूची पूड आणि साखर घालून सारण बनवतात. ते सारण घालून बनवलेल्या करंज्या आणि पीठाचे लाडू एकदम मस्त. गोव्यातल्या अनेक घरात घरीच दुधाचे पेढे बनवतात. ते पेढे फार म्हणजे फारच छान लागतात. झारखंड आणि ओरिसामध्ये खव्याचे सारण घालून, मुरड घालून गोल आकाराच्या करंज्या तळल्यानंतर लगेच पाकातून काढतात. त्याही करंज्या मला फारच आवडतात. त्या करंज्यांना चंद्रकला म्हणतात.

सीकेपींकडच्या खाज्याच्या करंज्याही भारीच असतात. आमच्या इथे काही घरांमध्ये साठाच्या करंज्या बनवतात. त्या करंज्या गरम गरम खायला अधिक छान लागतात. माझ्या एका मैत्रिणीची आई सप्तरंगी करंज्या करायची. त्या कुकींग क्लासेसही घ्यायच्या. विशेषत: दिवाळी फराळाच्या त्यांच्या क्लासेसना बायका गर्दी करायच्या. त्यांच्या इंद्रधनुषी रंगाच्या करंज्या देखण्या दिसत, पण चवीला एरवीच्या करंज्यांसारख्याच लागत. चिरोटे मात्र त्या अफलातून करायच्या. पांढरे शुभ्र, केशरी आणि पिवळे, हिरवे अशा विविध रंगांचे गोल गोल, अनेक पदर सुटलेले आणि टम्म फुगलेले त्यांच्या घरचे चिरोटे पहायला मजा यायची.

रंगीबेरंगी चिरोटे आणि पालक शेवेची त्या अतिशय सुंदर रांगोळी काढत. आमच्या कॉलेजमध्ये जळगावच्या मुली होत्या, त्या दिवाळीची सुट्टी संपवून घरी येताना, साखर खोबर्‍याचे सारण भरलेल्या मोठाल्या पण न फुकलेल्या पुर्‍या आणि दराब्याचे लाडू आणत. त्यांच्याकडच्या चकल्या आणि करंज्या पण मोठ्या आकाराच्या असायच्या. त्यांच्या डब्यांमध्ये लसूण, टोमॅटो, पालक, कांदा असे शेवेचे खूप प्रकार असायचे. हॉस्टेलवर त्यांचे फराळाचे अर्थातच सर्वात लवकर डबे लवकर फस्त होत.

खानदेशातले दराब्याचे लाडू फार सुंदर लागतात, पण तो लाडू बनवणे फार जिकिरीचे असते, असे त्या सांगायच्या. दिवाळीच्या लाडवात मला आमच्या घरी क्वचित होणारे वाटल्या हरभर्‍याच्या किंवा मुगाच्या डाळीचे लाडूही खूप आवडायचे. साधी शेव तळून ती बारीक करून साखरेच्या पाकात केलेले शेवेचे लाडू पण फारच छान लागतात, पण ते लाडू एक तर फार खाता येत नाहीत आणि एकदा खाल्ले की दुसरे काही खाण्याची इच्छाच उरत नाही.

आमच्या आईची एक मैत्रीण खवा घालून रव्याचे इतके सुंदर लाडू करतात की बस! मला प्रत्येक वेळी ते लाडू खाल्ले की त्यांना काहीतरी बक्षीस द्यावेसे वाटते. हल्ली तयार बुंदी मिळत असल्याने घरातही थोडक्या प्रमाणात का होईना बुंदीचे लाडू करता येतात. बुंदीचे गुळाच्या पाकातले मऊ लाडू तर विशेष भारी लागतात. हल्ली लोक दिवाळीला भरपूर सुका मेवा घालून डिंकाचे आणि डायबिटीससाठी मेथ्यांचे, जवसाचे वगैरे लाडू करतात. दिवाळीच्या पदार्थात ते लाडू बिचारे हिरमुसून बसले आहेत असे आपले मला वाटतं.

खरे तर ‘चिवडा’ हा प्रकार मला फारसा आवडत नाही, असे आपले मला वाटायचे. पण शाळेतली एक मैत्रीण जवळ रहायला आली आहे. ती इतका सुंदर चिवडा करते की बस! तिला चिवडा करताना पाहणे हाच मूळात एक ‘सांगितिक प्रवास’ असतो. दहा दुकाने फिरून ती विशिष्ट प्रकारचे पोहे आणते, मग ते अलवारपणे भाजणे, मग त्यात अचूक रंगावर तळलेले शेंगदाणे, डाळी, कढीपत्ता, खोबर्‍याचे तुकडे, मनूका, काजू घालणे.

मग त्या चिवड्याला फोडणी घालून मंद आचेवर भाजणे..तिच्या त्या सर्व प्रक्रिया अगदी एका तालात चालतात. सर्वात शेवटी ती त्या चिवड्यात तळलेला कांदा आणि बटाट्याचा किस घालते.. आणि मग तो चिवडा पूर्ण होतो. त्याचबरोबर ती त्या चिवड्यात पीठी साखर आणि सायट्रिक अ‍ॅसिडही घालते. त्यामुळे तिचा चिवडा चवीला फारच छान असतो. गंमत म्हणजे तो चिवडा कितीही जुना झाला तरी तेवढाच चुरचुरीत असतो.

आमच्याकडे फुलवलेल्या पोह्यांचा चिवडा कधी बनवत नसत, पण त्या चिवड्यातही एरवीच्या सगळ्या सामुग्रीबरोबर आल्याचा किस तळून घातला आणि बारीक शेव घातली तर तो चिवडाही लाजवाब लागतो, याचा शोध मला अलिकडेच लागलेला आहे. तळलेल्या पोह्यांचा तिखट गोड चिवडाही फार छान लागतो, पण त्यासाठी सिध्दहस्त सुगरणीची गरज आहे. नाहीतर तो चिवडा हमखास बिघडतो.

अर्थातच बिघडलेल्या फराळाच्या पदार्थांमधून बरेच नवनवीन पदार्थ करता येतात. प्रस्तुत लेखिका त्यामध्ये बरीच प्रवीण आहे, हे मी नम्रपणे नमूद करते. माझे काही प्रयोग म्हणजे, खुसखुशीत शंकरपाळ्यावर गरम असतानाच पीठी साखर घातली की त्याची चव अधिक निखरते. तोच परिणाम साधण्यासाठी तिखट मीठाच्या गरम शंकरपाळ्यांवर थोडा चाट आणि पेरी मसाला भुरभुरायचा. तसे केलेले शंकरपाळे अक्षरशः पाहता पाहता फस्त होतात.

सर्वात शेवटी म्हणजे अनारसे, खरे तर हा पदार्थ आधिरस या नावाने दक्षिण भारतात बनवतात आणि तो चवीला अतिशय चांगला असतो. त्यात केळं किंवा खवाही घालतात. साखरेचे अनारसे जाळीदार आणि देखणे असतात, पण चवीला गुळाचेच अनारसे भारी असतात. याबद्दल कुणाचे दुमत नसेल. मी कॉलेजमध्ये असताना घराघरातून फराळाचे पदार्थ गोळा करून आमच्या जवळ असलेल्या झोपडपट्टीतल्या घरी पोचवायचे.

त्या लोकांनाही आम्हाला काही द्यावेसे वाटायचे. साध्या चुरमुर्‍याचा चिवडा, खुळखुळ्यासारखे वाजणारे मोठ्या आकाराचे कानवले आणि गुळाच्या पाकातली कणकेचे जाड जाड शेवखंड असा त्यांच्या घरी केलेला फराळ असायचा. सुंठ आणि बडीशेप घातलेले ते गुळातले शेवखंडही मला फार आवडतात.

खरे तर प्रत्येकाच्या घरचा फराळ वेगळा, प्रत्येक सुगरणीची वेगळी खासियत. दिवाळीचा फराळ दृष्टी, गंध आणि जिव्हा सौख्य देणारा असतो. त्यामुळेच दिवाळीचा फराळ कितीही नकोसा वाटला तरी आनंद देणारा आहे. त्यामुळे नाही नाही म्हणतही, दिवाळी आली की आपण फराळाच्या तयारीला लागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -