Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश गांधी, आंबेडकर देता का कुणी?

गांधी, आंबेडकर देता का कुणी?

नेतृत्व किंवा वारसा या बाबतीत भाजपावाले दिवाळखोर आहेत, त्याचवेळी विरोधकाकडे मात्र एकापेक्षा एक धुरंधर नेते, महापुरुष यांचा वारसा आहे ! जागतिक कीर्तीचे आणि सर्व क्षेत्रातील नेते आहेत..! तरीही यांचा पराभव का व्हावा? स्वतःच्या पराभवासाठी या सर्वांच्या अनुयायांनी विशिष्ट जात समूहाला पुन्हा पुन्हा टार्गेट का करावं? त्यांच्या तीन/चार टक्क्यांचा पुन्हा पुन्हा उद्धार का करावा? स्वातंत्र्यानंतर 74 वर्षांनीदेखील 85 टक्क्यांनी स्वतःचं अस्तित्व का निर्माण केलं नसावं ? हे करण्यासाठी पुन्हा गांधी, आंबेडकर कुणी देऊ शकेल का ?

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेश निवडणूक तोंडावर येवून ठेपली आहे. चार महिन्यापूर्वी प्रचंड शक्तिशाली वाटणारे स्वयम् घोषित योगी तथा भाजपचे स्टार प्रचारक आदित्यनाथ बिष्ट आपली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत आहेत. ते जातील किंवा राहतील, पण काही झाले तरी भाजपचे विसर्जन उत्तर प्रदेशातील मतदार केल्याशिवाय राहणार नाहीत, असं दिसते !

खरं तर भाजपा किंवा संघाची अवस्था कीव करावी अशीच आहे. एकीकडे त्यांच्या हातात अमर्याद सत्ता, प्रचंड काळा पैसा, देशभर आलिशान पक्ष कार्यालये, अनेक न्यायधीश, आयएएस अधिकारी, मोठमोठे उद्योगपती, आघाडीचे टीव्ही चॅनल्स, मोठी वृत्तपत्रे हे सारं अगदी खिशात आहे! एवढं असूनही पक्ष वाढवण्यासाठी मात्र तडीपार, बोगस योगी, आतंकवादी, बलात्कारी बाबा, भेसळ स्पेशालिस्ट योगाचार्य असल्या भंगार लोकांची मदत घ्यावी लागते. कधी कधी तर हे लोक कंगनासारख्या थिल्लर बुजगावण्याला झेड सिक्युरिटी देवून आपली असली नसली इज्जत घालवतात ! वाजपेयी किंवा प्रमोद महाजन सोडले इतरांनी नाव घ्यावं, असा एकही नेता या पक्षाकडे नाही. त्यांचे जे कुणी तथाकथित पूजनीय वगैरे आहेत त्यातलं एकही नाव घेऊन हे लोक जनतेच्या समोर जाऊ शकत नाहीत. मतं मागू शकत नाहीत. म्हणूनच याचे त्याचे बाप उधार घेवून आपला वाढदिवस साजरा करत असतात.

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी यांच्या लबाड्या खपून गेल्या. पण आता सोशल मीडियामुळे हे पार नागडे पडतात. तरीही यांची विकृती कमी होताना दिसत नाही. डाकुंनीदेखील आत्मसमर्पण केल्याची अनेक उदाहरणं ताजी आहेत. वाल्या कोळी तर मोठा डाकू होता. त्याचंही हृदयपरिवर्तन झालं. वाल्याचा वाल्मिकी झाला. पण भाजपा नेत्यांचं हृदयपरिवर्तन होईल अशी आशा बाळगणं म्हणजे प्रचंड धाडस आहे..!

ज्या नेत्यांचे विचार किंवा विकृतीवर हा पक्ष चालतो, त्यांची नावं जाहीरपणे हे लोक का घेत नसावेत ? आणि तरीही ओबीसी, मागासवर्गीय, आदिवासी..किंवा मोजके का होईना पण मुस्लीमदेखील त्यांच्या कळपात का सामील होत असावेत? त्यांच्यासाठी आपल्याच समाजाशी गद्दारी का करत असावेत? आठवलेंचं सोडा, पण पासवानसारखे यांच्या नादी कसे लागले असतील? त्याहीपेक्षा नितीश कुमार किंवा जॉर्ज फर्नांडिस यांना असल्या लोकांच्या पंक्तीत बसून खरकट्यावर ताव मारण्यात कसला पराक्रम वाटत असावा ? हे लोक माणुसकी कसे काय विसरून गेले असावेत? याला बहुजनवादी किंवा समतावादी विचाराचा पराभव म्हणावा का? गांधीवाद, मार्क्सवाद, समाजवाद किंवा आंबेडकरवाद हे सर्व वाद यांच्या विकृती पुढे हतबल झाले असावेत का ?

- Advertisement -

नेतृत्व किंवा वारसा या बाबतीत भाजपावाले दिवाळखोर आहेत, त्याचवेळी विरोधकाकडे मात्र एकापेक्षा एक धुरंधर नेते, महापुरुष यांचा वारसा आहे ! जागतिक कीर्तीचे आणि सर्व क्षेत्रातील नेते आहेत..! तरीही यांचा पराभव का व्हावा? स्वतःच्या पराभवासाठी या सर्वांच्या अनुयायांनी विशिष्ट जात समूहाला पुन्हा पुन्हा टार्गेट का करावं? त्यांच्या तीन/चार टक्क्यांचा पुन्हा पुन्हा उद्धार का करावा? स्वातंत्र्यानंतर 74 वर्षांनीदेखील 85 टक्क्यांनी स्वतःचं अस्तित्व का निर्माण केलं नसावं ?

काहीही झालं तरी लोकशाहीमध्ये 4 लोक 85 लोकांच्या छातीवर हजारो वर्षे बसून आहेत, याचा अर्थ नेमका कसा घ्यायचा? ती चार माणसं खरंच पराक्रमी असावीत किंवा हे 85 निकम्मे असावेत, असं मानायचं का ?

बरं, तुमच्याकडे बुद्ध आहे, गांधी आहे, सुभाषचंद्र बोस आहेत ! तुमच्याकडे आंबेडकर आहेत, मार्क्स आहेत, शिवाजी आहेत, फुले आहेत, शाहू आहेत, कबीर आहेत, तुकाराम आहेत, विवेकानंद आहेत. खूप सारं भांडार आहे, महापुरुषांची खाण आहे ! वाजपेयी, महाजन यांच्यापेक्षा वरचढ असलेले तर असंख्य आहेत. नेहरू, इंदिरा गांधी यांच्या तुलनेत ही दोन नावं आसपास तरी पोचू शकतात का ?

असं असूनही भंगाराच्या दुकानाला सोन्याचांदीच्या दुकानापेक्षा जास्त प्रतिष्ठा का मिळत असावी ? जास्त मागणी का असावी ? याचाच अर्थ असा, की समाज कोणत्याही नेत्याचे फोटो लावत असला, कुणाच्याही नावानं मिरवणुका काढत असला, कुणाचाही जयजयकार करत असला, तरी त्या महापुरुषांची शिकवण मात्र विसरला आहे ! ‘दिवसा गजर, अन् रात्री कोठ्यावर हजर’ अशी अवस्था झालेली आहे ! सामाजिक बांधिलकी, निष्ठा, प्रामाणिकपणा, समर्पण हे शब्द इतरांना दोष देण्यासाठीच फक्त आमच्या शब्दकोशात शिल्लक आहेत. ‘त्यांनी आम्हाला लुटलं, यांनी आम्हाला मूर्ख बनवलं’ हे तुणतुणं वाजवणं.. ह्यालाच आम्ही चळवळ म्हणतो. तोच आमचा धर्म झाला आहे ! चार टक्क्यावाल्यांनी सज्जन व्हावं आणि आम्हाला आयतं आणून द्यावं.. आणि वरून पुन्हा आमचंच लेक्चर मुकाट्यानं ऐकून घ्यावं, ही आमची लोकशाहीची कल्पना आहे ! हा आमचा आदर्शवाद आहे !

बरं, कुणाला एखादा महापुरुष नको असेल, व्हीलन वाटत असेल, तर ओके..! जो महापुरुष महान वाटतो, त्याची शिकवण लक्षात घ्या. त्यांच्यासारखे प्रामाणिक व्हा. समाजाशी प्रामाणिक रहा. देशाशी प्रामाणिक रहा..! त्यात कुणी अडवलं ? घडवा नवा इतिहास ! पण आम्हाला ते नको आहे !

एकशे चाळीस कोटींचा हा देश आहे. त्यातले चार टक्के म्हणजे सुमारे सहा कोटी सोडले तर एकशे चौतीस कोटी बाकी राहतात ? पंधरा टक्के वजा केले तर एकशे वीस कोटी बाकी राहतात ! त्यात काय तुमच्याकडे कुणीही लायक माणूस नाही? कुणीही प्रामाणिक नाही? लोकसभेसाठी साडेपाचशे लोक लागतात, तेवढे पण तुमच्याकडे नाहीत? की तुमच्यातली माणसं कितीही हुशार असली तरी ती तुमच्यातली आहेत, म्हणून तुम्हाला चिल्लर वाटतात? की घरकी मुर्गी दाल बराबर.. हीच तुमची मानसिकता आहे? मी करू शकत नाही ना, म्हणून मग माझ्या बाजूचा कुणीही पुढं जाता कामा नये, कुणीही मोठं होता कामा नये, हीच तुमची मानसिकता बनली आहे. ही मानसिक बिमारी आहे. तुम्ही वैफल्यग्रस्त आहात! तुम्ही निराशावादी आहात! तुम्हाला आत्मचिंतन करण्याची भीती वाटते. तुम्ही काही करू शकत नाही, अशी तुमची खात्री झाली आहे. त्यागाची, समर्पणाची तुम्हाला भीती वाटते! आणि म्हणून आपल्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी तुम्हाला एक समंध हवा असतो. लांडगा आला रे आला.. अशी बोंब मारायला एक लांडगा हवा असतो..!

याचा अर्थ, मी लांडग्याचं अस्तित्व नाकारत नाही ! पण लांडगा दूर जंगलात राहतो, हेही वास्तव विसरू शकत नाही. आणि मला हेही माहीत आहे, की जंगलातल्या लांडग्यांनी जेवढ्या बकर्‍या मारल्या असतील, त्याच्या कितीतरी पटीनं जास्त बोकड आमच्याच पोटात गेलेले आहेत !

तात्पर्य, आमचे बहुतेक कांगावे फसवे आहेत ! आमच्या बहुतेक लढाया नाटकी आहेत ! कारण.. आम्हाला स्वतःपासून सुरुवात.. हे सूत्रच मुळात मान्य नाही ! आणि म्हणून आम्हाला दरवेळी लढाईसाठी नवे गांधी हवे असतात, नवे आंबेडकर हवे असतात!

आहेत का कुणाकडे आम्हाला परवडणारे गांधी, परवडणारे आंबेडकर ?

- Advertisement -