Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeफिचर्ससारांशDonald Trump : काचेच्या दुकानात घुसलेला बैल

Donald Trump : काचेच्या दुकानात घुसलेला बैल

Subscribe

एखादा माजलेला बैल उधळावा आणि काच सामानाच्या दुकानात घुसावा तसे झाले आहे. या बैलाचे नाव आहे डोनाल्ड ट्रम्प. समोर येईल त्याला शिंगे मारत आणि जिकडे तिकडे धडका देऊन चक्काचूर करीत तो चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन जेमतेम एक महिनाच झाला आहे, पण या काळात त्यांनी जे जे काही केले, त्यामुळे धर्म, न्याय, नीती हे शब्द तूर्त निरर्थक ठरले आहेत. लोक बोलण्याचे टाळत आहेत, पण ट्रम्प यांची अनेक लक्षणे हिटलरसारखीच आहेत.

-राजेंद्र साठे

जर्मनीला सर्वश्रेष्ठ करण्याची हाक देऊन हिटलर राज्यावर आला. हिटलरने ऑस्ट्रिया, पोलंड इतकेच काय बलाढ्य मानला गेलेला फ्रान्स यांच्यावर आक्रमणे केली व पाहता पाहता ते देश गिळंकृत केले. मेक अमेरिका ग्रेट अगेन असा नारा देऊन ट्रम्प राज्यावर आले आहेत. आल्या आल्या त्यांनी ग्रीनलँड विकत घेण्याचा प्रस्ताव दिला.

कॅनडा हा आकारमानाने भारताच्या तिप्पट मोठा देश आहे. पण, ५१ वे राज्य म्हणून त्याचा अमेरिकेत समावेश करून टाकण्याचा त्यांचा इरादा आहे. इतकी वर्षे कॅनडा व अमेरिकेचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आपसात प्रवासासाठी तिथे व्हिसा लागत नाही. शिवाय तो एक स्वतंत्र देश आहे. पण ट्रम्प यांना तो बळकवायचा आहे.

याच दरम्यान त्यांनी दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको, ग्वाटेमाला, पनामा, कोस्टारिका, होंडुरास इत्यादी देशांना धमकवायला सुरुवात केली. मग ट्रम्प यांना हवे तसे घडले. अमेरिकेला नको असलेले बेकायदा स्थलांतरीत तसेच अमेरिकतील कैदी आपल्या तुरुंगांमध्ये ठेवायला (म्हणजे सध्याच्या भाषेत आऊटसोर्स करायला) या देशांनी मान्यता दिली.

इंग्लंड व रशिया हेच हिटलरचे खरे शत्रू होते. तरीही आरंभी त्याने त्यांच्याशी मैत्री करार करण्याचे नाटक केले होते. तेच सध्या पुन्हा घडते आहे. रशिया हा आजवरचा अमेरिकेचा एक क्रमांकाचा शत्रू. पण ट्रम्प यांनी युक्रेन युध्दाच्या मुद्यावर पुतीनच्या रशियाची बाजू घेतली. थेट पुतीनशी बोलणी सुरू केली.

अर्धे राज्य बक्षीस
रशिया युध्दाच्या चक्रव्यूहात स्वत:च अडकला आहे. त्याची प्रचंड हानी झाली आहे. अशा वेळी ट्रम्प यांनी पुतीन यांना अक्षरशः पराभवाच्या नामुष्कीतून बाहेर काढले. त्यांनी आधी झेलेन्स्की यांना दमात घेतले. रशियाला युध्द करण्यास तुम्हीच प्रवृत्त केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवला. तीन वर्षांपूर्वी रशियाने कोणतेही सबळ कारण नसताना युक्रेनवर हल्ला केला आणि युध्दाला सुरुवात झाली. पण ट्रम्प यांनी झेलेन्स्कींनाच झापले. युक्रेनने युध्दात १५ टक्के भूभाग गमावला आहे. तो परत मिळण्याचे विसरा असेही परस्पर त्यांनी सांगून टाकले.

जुन्या गोष्टींमधील राजे लोक एखाद्यावर खूश झाले तर आपले अर्धे राज्य बक्षीस म्हणून देऊन टाकत. एकविसाव्या शतकात थोडे उलटे झाले आहे. ट्रम्प युक्रेनच्या झेलेन्स्कीवर नाराज झाले. अमेरिकेने आजवर केलेल्या मदतीबद्दल ५०० अब्ज डॉलरचे एक बिल पाठवून दिले. झेलेन्स्की हबकले. मग ट्रम्प म्हणाले तुमचे तेल, वायू, खनिजसंपत्ती इत्यादींपैकी निम्मे आम्हाला देऊन टाका. झेलेन्स्कींना झक मारत ते मान्य करावे लागले.

हे करताना त्यांनी सर्वात मोठा दणका युरोपला दिला. युक्रेन युध्द संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये त्यांनी युरोपच्या नेत्यांना विचारलेही नाही. या चर्चेमध्येदेखील त्यांना सामीलदेखील करून घेतले नाही. दुसर्‍या महायुध्दानंतर युरोपीय देशांचा हा जबरदस्त मानभंग व अपमान आहे. जगाच्या राजकारणाची समीकरणे यामुळे आरपार बदलू शकतात. युरोपच्या इतिहासात इंग्लंड व इतर देशांना इतके तुच्छ कोणीही लेखलेले नाही.

पूर्वापार, जगाचे राजकारण आपण करतो असा युरोपचा व त्यातही विशेष करून इंग्लंडचा टेंभा होता व असतो. एकेकाळी इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड, स्पेन, पोर्तुगाल यांच्या वसाहती जगभर पसरलेल्या होत्या. ती सत्ता अजूनही युरोपच्या डोक्यात असते. वास्तविक हे देश सुखवस्तू असले तरी अमेरिकेसारखी लष्करी ताकद, संपत्ती व तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाही. गुगल, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, अमेझॉन अशासारख्या कंपन्या त्यांच्यापाशी नाहीत. त्यांचे सर्व राजकारण अमेरिका आणि नाटोच्या पदराआडून चालते.

युरोपचा अपमान, गाझात हैदोस
इतकी वर्षे नाटोच्या लष्कराचा पुरेसा खर्च युरोपीय देश करीत नाहीत, अशी अमेरिकेची तक्रार होतीच. ट्रम्प यांनी एकदम तुकडाच पाडला. यात मेख अशी आहे की, रशिया हा युरोपचा शेजारी आहे. त्याच्या लष्करी ताकदीची युरोपला भीती वाटते. अमेरिका अटलांटिकच्या पलीकडे असल्याने तिला कसलेच भय नाही. इतकी वर्षे रशिया आणि त्याचा साम्यवाद यांचा बाऊ करून अमेरिका व युरोप एकत्र राहिले.

आता रशियाची ताकद कमी झाली. त्याचा साम्यवाद तर केव्हाच संपला. अशा स्थितीत अमेरिकेला रशियाचा मुकाबला करण्यासाठी युरोपची गरज उरलेली नाही. थोडेसे गमतीने सांगायचे तर, खिशातून चहासाठीदेखील पैसे न काढणार्‍या आणि नुसत्याच बड्या बड्या गप्पा मारणार्‍या पुणेरी वृत्तीच्या या युरोपीय मित्रांना आजवरच्या अध्यक्षांनी दुखावले नव्हते. ट्रम्प यांनी मात्र त्यांना थेट कटवण्याची भूमिका घेतली आहे.

पॅलेस्टिनी प्रश्नात एखाद्या बिल्डरने निर्लज्जपणे हस्तक्षेप केला आहे. इस्रायल हा अमेरिकेने पोसलेला देश आहे हे उघड गुपित आहे. हमाससोबतच्या युध्दातही बायडेन यांनी इस्रायलला टनावारी क्षेपणास्त्रे, विमाने इत्यादी दिली होती. तरीही आजवरच्या अमेरिकी सरकारांनी, पॅलेस्टिनींच्या हक्कांबाबत, तोंडदेखली का होईना, सहानुभूती दाखवली होती. असल्या देखाव्यांची आता काहीच गरज नाही, असे ट्रम्प यांना वाटते.

अध्यक्ष झाल्यावर त्यांनी इस्रायलच्या नेतान्याहूंना बोलावून घेतले. गाझाची किनारपट्टी साफ केल्याबद्दल त्यांनी त्यांची स्तुती केली. आता युध्द थांबले असले तरी गाझातल्या पॅलेस्टिनी लोकांनी तिथे परत येऊ नये असे जाहीर केले. इजिप्त, लेबनान यांनी या लोकांना आपल्याकडे आश्रय द्यावा, असे परस्पर जाहीर केले.

गाझा पट्टीमध्ये पंचतारांकित समुद्रकाठचे निवास व रिसॉर्ट उभी करण्याची त्यांची योजना आहे. ती ऐकून अमेरिकेतील पुराणमतवादी लोकदेखील हादरले आहेत. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील लोकांना हाकलून देऊन चीनने तिथे कब्जा करावा आणि पर्यटनस्थळ म्हणून त्याचा विकास करण्याचे जाहीर करावे तसाच काहीसा हा प्रकार आहे.

अमेरिकेतही वरवंटा
खुद्द अमेरिकेतही लोकशाही नीतीमत्ता धाब्यावर बसवून ट्रम्प यांचा वरवंटा फिरतो आहे. गेल्या महिन्याभरात त्यांनी ७४ अध्यक्षीय आदेश काढले. काँग्रेस म्हणजेच संसदेची मंजुरी न घेताच काढलेला फतवा म्हणजे हे आदेश. यापैकी अनेक आदेश चक्क बेकायदा आहेत. त्यांना न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. जसे की, परकीय नागरिकांच्या मुलांना जन्मत:च अमेरिकी नागरिकत्व देणे ट्रम्प यांनी बंद केले आहे.

पण न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. यूएसएड ही जगभरात विधायक कामांसाठी मदत करणारी संस्था आहे. तिची निर्मिती अमेरिकी संसदेने केली होती व तिला संसदेच्या संमतीनेच निधी मिळतो. ट्रम्प यांनी एका झटक्यात यूएसएड बंद करून टाकली. ट्रम्प यांचे सल्लागार एलॉन मस्क यांना कोणतेही अधिकार नसताना ते मंत्रिमंडळ बैठकीत बसले. सरकारची वाटेल ती कागदपत्रे ते मागतात.

सरकारी कर्मचार्‍यांनी गेल्या आठवड्यात आपण काय काम केले याचे अपडेट्स दिले पाहिजेत, असा फतवा त्यांनी काढला आहे. ते न करणार्‍यांना कामावरून काढून टाकण्याचा आदेश दिला. हे सर्व बेकायदा आहे. व्हाईट हाऊसमध्ये कोण्या पत्रकारांना प्रवेश द्यायचा हेदेखील ट्रम्प यांची माणसे आता ठरवणार आहेत. एखाद्या आफ्रिकेतील देशात शोभावी किंवा हिटलरची आठवण यावी, असा हा सर्व प्रकार आहे. जगातील सर्वात जुन्या लोकशाहीत हे घडते आहे.

एकूण, ट्रम्प यांनी विसाव्या शतकातले सर्व संकेत एका झटक्यात मोडून टाकले आहेत. युध्द थांबवण्याची भाषा ते करीत असले तरी ते शांततावादी नाहीत. उलट पुतीन व नेतान्याहू यांच्यासारख्या उलट्या काळजाच्या युध्दखोर हुकुमशहांना ते मदत करीत आहेत. गाझा किंवा युक्रेनमध्ये जी हजारो निरपराध माणसे मेली त्याविषयी त्यांना यत्किंचितही दु:ख वा दया नाही. एक लोकशाहीवादी व बलाढ्य देशाचा प्रमुख म्हणून आपण किमान सहानुभूतीने, समतोलपणे बोलले पाहिजे, अशी जबाबदारी त्यांना वाटत नाही.

 मानवी हक्क, देशांचे स्वातंत्र्य, न्याय या गोष्टींना यत्किंचितही किंमत ते देऊ इच्छित नाहीत.पूर्वीच्या हिंदी सिनेमातील व्हिलन उघडपणे बलात्कारी, खुनी असत, तशीच भाषा बोलत व त्याबद्दल अभिमान बाळगत. त्यांच्यात व ट्रम्प यांच्यात काहीही फरक नाही. दुर्दैवाने ट्रम्प हे पडद्यावरचे खोटे व्हिलन नाहीत. त्यांच्या हातात खरोखरीची प्रचंड सत्ता आहे, अण्वस्त्रे आहेत व जगाला ते निदान काही काळ तरी नाचवू शकतात.