-प्रा. डॉ. शंकर बोर्हाडे
ललित कलेचे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी एक गोष्ट सांगितली होती. ती अशी, एका मोठ्या हॉलमध्ये अनेक गाढवं ठेवलेली होती. त्यात एकच घोडा होता. तो शोधून आणून देणार्यास बक्षीस दिले जाणार होते. त्यासाठी स्पर्धाही घेण्यात आली. एका नगरसेवकाने या स्पर्धेत भाग घेतला. त्याने हॉलमध्ये सगळीकडे पाहिले. त्याला घोडा काही सापडलाच नाही. नंतर एका सरपंचाने या परीक्षेत भाग घेतला. त्याला सगळीकडे गाढवच दिसली. त्यानंतर एका शिक्षकाने त्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्याने घोडा शोधून आणला.
याबाबत त्याला विचारले, तुम्ही नेमका घोडा कसा शोधला? तर ते शिक्षक म्हणाले, मी हॉलमध्ये गेलो. अच्छे दिन आने वाले है, असा पुकारा केला. तेव्हा सगळी गाढवं नाचायला लागली. घोडा तेवढा उभा होता. मी घोड्याला हाताशी धरले आणि बाहेर आलो. आपल्याकडे ‘अच्छे दिन आनेवाले है’ या घोषणेने सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. या घोषणेने सत्तेतही परिवर्तन घडवून आणले. आपण गाढव आहोत हे नंतर लोकांच्या लक्षात आले.
गाढव हा तसा माझा आवडता प्राणी आहे. लहानपणी माझा आवडता प्राणी विषयावर निबंध लिहायला सांगितला होता. मी गाढव हा माझा आवडता प्राणी असल्याचा निबंध लिहिला होता. त्यावेळी वर्गातल्या मुली, मुलं आणि शाळेतल्या बाई फिदीफिदी हसल्या होत्या. अच्छे दिनच्या लाटेत माझ्या त्या वर्गमित्रांनी आणि शाळेतल्या सेवानिवृत्त झालेल्या बाईंनी मतदान करून परिवर्तन घडवून आणले होते. मला ते माझ्या आवडत्या प्राण्यापेक्षा वेगळे वाटले नाही. गाढव हा गाय, बैल यांच्या इतकाच उपयुक्त पशू आहे, पण ते आपल्या लोकांना लक्षातच येत नाही.
कितीतरी लोकांकडे गाढवं असतात. त्यावर त्यांची रोजीरोटी चाललेली असते. आपल्याकडे मुलीला पहिल्यांदा सासरी घ्यायला जाताना स्वतःची गाडी घेऊन जातात. काही वर्षांपूर्वी लोक बैलगाडी घेऊन जात, तर ज्यांच्याकडे गाढवं आहेत अशी माणसं गाढवावर बसून नवरीला आणत असत. नवपरिणीत जोडपे गाढवावर बसून आपल्या घरी चालले आहे किंवा नवरी- नवरा गाढवावर बसून सासरी निघाली आहे हे चित्र वाहन उद्योगामुळे दुर्मीळ झाले आहे, पण आमच्या बापाने नवरी गाढवावर बसवून सासरी आली होती हे खरे आहे.
गाढव हा अनेक बाबतीत उपयुक्त आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही. गाढवाचा उपयोग दादू इंदुरीकर यांनी नाटकात करून घेतला. त्यातून ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य जन्माला आले. नंतर सिनेमावाल्यांच्याही गाढवाचे महत्त्व लक्षात आले. त्यावर त्यांनी चित्रपट केला. गाढवाचं लग्न अजरामर झालं. शंकर पाटलांनाही गाढवाचं महत्त्व कळलं होतं. त्यांनी धिंड कथेत गाढवाचा उपयोग करून घेतला आणि ही कथा मैलाचा दगड ठरली. शंकर पाटील यांना ही कथा आमच्याकडच्या जावयाच्या गाढव वरातीवरून सुचली असावी असा माझा दावा आहे. शंकर पाटील आज असते तर त्यांच्यावर मी कॉपी-पेस्टचा दावा ठोकला असता.
आमच्याकडे एका गावात जावयाची वरात गाढवावरून काढण्याची पद्धत आहे. गावात पाऊस पडावा यासाठी जावयाचा शोध घेतला जातो. त्याची वाजतगाजत वरात काढली जाते. ही लोकपरंपरा म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या सासरी गाढवावर बसून मिरवतात म्हणून अनेक जावई त्या गावातच जायला नाखूश असतात. गावातले लोक अतिशय चाणाक्षपणे जावयाचा शोध घेतात आणि वाजतगाजत जावयाला गावातून मिरवून आणतात. त्याचा सन्मान म्हणून नवीन पोशाख त्याला दिला जातो. गाढव कुंभार, वडार या समाजाचे रोजीरोटीचे साधन आहे. पूर्वीच्या काळात ज्या कुंभाराकडे गाढवाची दावण असायची त्याच्याकडे मुलगी दिली जात असे. त्यालाच श्रीमंत समजले जात होते.
गाढवामुळे बँकेचे कर्ज बुडाले असे जर मी म्हटले तर कोणालाही ते खरे वाटणार नाही. घडले असे की आमच्या एका मावशीने पोरीचे लग्न करण्यासाठी बँकेकडून गाढवं घेण्यासाठी कर्ज घेतले. पारंपरिक व्यवसाय करणार्या कुंभार मावशीला बँकेने कर्ज दिले. मावशीने पोरीचे लग्न जोरात करून टाकले. पुढे हप्ते थकले. बँकवाले हप्ता वसुलीसाठी मावशीकडे आले. आपल्याकडे हप्ते थकले तर ज्या वस्तूसाठी कर्ज घेतले ती जप्त करतात. अनेक बँकांनी दुचाकी, चारचाकी गाड्या, फ्लॅट कर्जाच्या वसुलीसाठी जप्त केले आहेत. आता बँकेने गाढवं जप्त करून त्याचा लिलाव करायचा निर्णय घेतला आणि बँकवाले कर्जदार मावशीच्या घरी हजर झाले. तिच्याकडे गाढवं नव्हती.
वसुली अधिकार्याने विचारले, गाढवं कुठे आहेत? आमची मावशी म्हणाली, गाढवं मेली. मावशीच्या या गाढव प्रकरणाने बँक बुडाली असे नंतर लोक सांगत होते. बँक बुडवण्यासाठी मल्ल्याचीच गरज असते असे नाही. गाढवंसुद्धा बँक बुडवत असतात. कितीतरी गाढवांनी बँका बुडवल्या आहेत, पण हे लोकांच्या लक्षातच आले नाही. आपण गाढव आहोत असे जर कोणी आपल्याला म्हटले तर ते आपल्याला आवडत नाही, पण त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसते. माणसं गाढवासारखे वागतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. एकदा आमचे नाईक सर आम्हाला रागाने म्हणाले, तुम्ही गाढव आहात. आमचे कानडी सर हुशार. त्यांनी लगेच उत्तर दिले, बरोबर आहे. कारण आम्ही तुमच्याबरोबर राहतो. आम्हाला नाव ठेवणारे नाईक सर स्वतः गाढव ठरले आणि तरातरा घराकडे निघून गेले.
आपल्या निवडणूक आयोगाने गाढव हे चिन्ह द्यायला काही हरकत नाही, पण निवडणूक आयोगातील लोक अभिजन वर्गातील असल्यामुळे त्यांची निवडणूक चिन्ह गाय, बैल या स्वरूपाची होती. अगदी घोड्याचेसुद्धा निवडणूक चिन्ह वापरले आहे, पण त्या यादीत गाढवाला काही स्थान मिळाले नाही. मला निवडणूक आयोगाने गाढवावर केलेला हा मोठा अन्याय असल्याचे लक्षात येते. आमच्या कवी कैलास पगारेने गाढवांनी पक्ष काढावा, गाढवांनीच निवडणूक लढवावी आणि आपल्यातल्या हुशार गाढवाला दिल्लीच्या गादीवर बसवावे, अशी कल्पना कवितेतून केली होती. ही कल्पना अच्छे दिनच्या भुलभुलैय्यात खरी झाली की काय अशी शंका येते. लस देता का लस, असं म्हणत लोक रस्त्याने गाढवासारखे फिरत होते आणि तख्तावरची गाढवं प्रजेची गंमत पाहताना दिसत आहेत.