घरफिचर्ससारांशवर पाहायला लावणारा... डोन्ट लूक अप

वर पाहायला लावणारा… डोन्ट लूक अप

Subscribe

‘डोन्ट लूक अप’ हा केवळ कॉमेडी सिनेमा असता तर इतका चर्चेत आला नसता, जर हा फक्त सायन्स फिक्शन सिनेमा असता तरी याची इतकी चर्चा झाली नसती, डोन्ट लूक अपला विशेष बनविले आहे, ते यात सायन्स फिक्शनसोबत असलेल्या सोशल पोलिटिकल सटायर्सने, सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या ऍडम मिकी आणि पत्रकार डेव्हिड सिरोटा यांनी लिहिलेल्या कथानकात सद्य:स्थितीतील प्रत्येक महत्वाच्या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कुठेही आपल्या उद्देशापासून न भरकटता अनेक वर्षांनी समाजाला आरसा दाखविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या सिनेमाने केला आहे.

कुठलीही कला असो किंवा साहित्य सत्ताधार्‍यांना ते तोवरच चांगले वाटत असते, जोवर ते त्यांच्याविरोधात काहीही लिहीत नाही किंवा बोलत नाही. केवळ सत्ताधारीच नव्हे तर एकंदर मानवी स्वभावातच हा गुण आपल्याला आढळतो, जोपर्यंत एखादी व्यक्ती आपल्यातील उणिवा दाखवत नाही तोपर्यंतच ती व्यक्ती आपल्याला आपली वाटत असते, पण एकदा का तिने आपल्याला आरसा दाखवला की, आपण तिच्यापासून चार हात दूर राहणे पसंत करतो. नुकताच एक सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय, ज्यापासून चार हात दूर राहण्याचं अनेकांनी पसंत केलंय, तर काहींनी हे सत्य स्वीकारत हसत हसत हा सिनेमा एन्जॉय केला. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची सवय असलेला देशाचा प्रमुख, लोकांच्या प्राणापेक्षा स्वतःच्या इमेजची अधिक काळजी असणारा हा प्रमुख, त्याच्या इशार्‍यावर नाचणारी आणि आपल्या कामातून मनोरंजनप्रिय बनविलेली माध्यमं, आपल्या नेत्याच्या डोळ्यात अश्रू पाहून भावनिक होणारी आणि चिकित्सा करण्याची इच्छा नसलेली जनता. हे चित्र आपल्या देशाचं नाहिये, हे चित्र आहे ‘डोन्ट लूक अप’ सिनेमात दाखविण्यात आलेल्या अमेरिकेचे…

जगातील प्रगत राष्ट्र्रात अग्रस्थानी असलेल्या अमेरिकेची अशी अवस्था दाखविणार्‍या सिनेमावर टीकेची झोड उठणे साहजिक होतेच, पण तरीही कुठेही आपल्या उद्देशापासून न भरकटता अनेक वर्षांनी समाजाला आरसा दाखविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या सिनेमाने केला आहे. काल्पनिक असलेलं हे कथानक व्यंगाचा वापर करत अनेक वास्तवातील मुद्यांना स्पर्श करते आणि म्हणूनच 2021 यावर्षातील ओटीटी माध्यमावर प्रदर्शित झालेला सर्वोत्तम सिनेमा म्हणून या सिनेमाचं नाव समोर यायला लागतं. लिओनार्दो डी कॅप्रिओ, जेनिफर लॉरेन्स, जोनाह हिल आणि मेरील स्ट्रिप्ससारखी तगडी स्टारकास्ट असल्याने या सिनेमाकडून अपेक्षा होत्याच आणि त्या सगळ्या अपेक्षांची पूर्तता बर्‍याच अंशी झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही.

- Advertisement -

डोन्ट लूक अप हा केवळ कॉमेडी सिनेमा असता तर इतका चर्चेत आला नसता, जर हा फक्त सायन्स फिक्शन सिनेमा असता तरी याची इतकी चर्चा झाली नसती, डोन्ट लूक अपला विशेष बनविले आहे, ते यात सायन्स फिक्शनसोबत असलेल्या सोशल पोलिटिकल सटायर्सने, सिनेमाचे दिग्दर्शक असलेल्या ऍडम मिकी आणि पत्रकार डेव्हिड सिरोटा यांनी लिहिलेल्या कथानकात सद्य:स्थितीतील प्रत्येक महत्वाच्या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केट डीबीयास्की (जेनिफर लॉरेन्स) एक संशोधक विद्यार्थिनी आहे, जी प्रोफेसर मींडीच्या (लिओनार्दो) मार्गदर्शनाखाली खगोलशास्त्रीय संशोधन करतेय. एक दिवस तिला एक कॉमेट (धूमकेतू) सापडतो. तिच्या नावावरूनच त्या धूमकेतूला कॉमेट डीबीयास्की नाव दिलं जातं, पण कॅल्क्युलेशन केल्यानंतर तिला आणि प्रोफेसर मींडीला कळते की, हा कॉमेट 6 महिने 14 दिवसांनी पृथ्वीवर धडकणार आहे. 10 किलोमीटर व्यासाचा हा कॉमेट पृथ्वीवर धडकला तर संपूर्ण पृथ्वीच नष्ट होईल, ही गोष्ट जेव्हा त्यांना कळते तेव्हा त्यांनाही धक्का बसतो.

पृथ्वीला वाचविण्याचे मिशन घेऊन ते गाठतात व्हाईटहाऊस आणि बराच वेळ वाट पाहिल्यांनंतर त्यांची भेट होते, राष्ट्राध्यक्ष जेनी ऑर्लीन (मेरील स्ट्रीप) आणि चीफ ऑफ स्टाफ जेसन ऑर्लीन ( जोनाह हिल) सोबत, पण स्वतःच्या इमेजची अधिक चिंता असलेली राष्ट्राध्यक्ष त्यांच्या या बातमीला तितके महत्व देत नाहीत आणि ही बातमी मग मीडियाद्वारे लीक केली जाते. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी शेवटी राष्ट्राध्यक्ष एक मिशन लॉन्च करते, राष्ट्रहित म्हणत भावनिक भाषणाने लोकांना स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न करते, पण ते मिशन एका व्यक्तीमुळे बंद करण्यात येते. थोडा थोडा स्टीव्ह जॉब्ससारखा वाटणारा हा व्यक्ती आहे पीटर जो अमेरिकेतील सर्वात मोठा उद्योजक आहे. जेव्हा त्याला कळत की, त्या कॉमेटमध्ये लाखो कोटींची खनिजे दडलेली आहेत, तेव्हा कॉमेट नष्ट करण्याचे मिशन बंद करून त्यातील खनिजे बाहेर काढण्याचं मिशन तयार केलं जातं. देशातील नागरिकांनादेखील त्या खनिजांचे फायदे, पैसा, रोजगार आणि चीनला धडा शिकविण्यासारखी प्रलोभने दिली जातात. पुढे काय घडतं यासाठी सिनेमा पाहावा लागेल.

- Advertisement -

डोन्ट लूक अपच्या पोस्टरवर लिहिलेलं “Based on truly possible events” (भविष्यात होऊ शकणार्‍या सत्य घटनांवर आधारित) हे वाक्य सिनेमाचे एकंदर सार सांगण्याचा प्रयत्न करते, एकाच वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून ते मीडिया आणि पोलिटिक्ससारख्या विषयांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. व्हाईट हाऊसमध्ये फुकट उपलब्ध असणार्‍या नाश्त्याचे पैसे घेणारा कर्नल, मीडियावर कुठल्याही सिरीयस विषयाला लाइटली प्रेजेंट करण्याच्या हेतूने त्याचं गांभीर्य हरवून रिपोर्टींग करणारे पत्रकार, जग संपतंय म्हणून ओरडून सांगणार्‍या सायंटिस्टचे मिम टेम्प्लेट बनवून सोशल मीडियावर ट्रेंड चालविणारी युवा पिढी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पैशाच्या जोरावर संपूर्ण देशाला आपल्या बोटावर नाचविणारा उद्योजक आणि नाचणारा राष्ट्राचा प्रमुख, लायकी नसताना केवळ मुलगा आहे म्हणून चीफ ऑफ स्टाफ बनलेला राष्ट्राध्यक्षाचा मुलगा, अशा एक ना अनेक घटना संपूर्ण सिनेमात पाहायला मिळतील. जग संपतंय यापेक्षा एखाद्या कलाकाराचं पुन्हा पॅचअप होतंय ही बातमी मोठी वाटणार्‍या समाजापुढे संकट डोक्यावर स्पष्ट दिसत असताना वैज्ञानिक आणि बुद्धिजीवींची ‘जस्ट लूक अप’ मोहीम अपयशी ठरते, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय ?…. तर त्याच समाजाला धूमकेतूमधून मिळणार्‍या खनिजांचे फायदे मोजून त्यांना डोन्ट लूक अप म्हणायला भाग पाडणारे मूठभर लोक तिथं यशस्वी होतात.

भविष्यात अशी घटना होईल का ? माहीत नाही …. पण एक समाज म्हणून आपली होणारी वाटचाल नक्कीच त्या लोकांप्रमाणे होत चालली आहे, ज्यांना केवळ कुणाचा तरी आदेश महत्वाचा वाटतो, ज्यांना चिकित्सा करायची नाहीये, ज्यांना प्रश्न विचारायचे नाहीयेत. म्हणून हा सिनेमा अनेकांना टोचतो आणि टोचत राहणार, या सिनेमातही त्रुटी आहेतच, जास्तच सटायर देण्याच्या प्रयत्नात कथेवरील पकड थोडी सुटते, थोडं एडिटिंग अजून जमलं असतं, पण यात काम करणार्‍या सर्व कलाकारांमुळे आणि त्यांच्या कामामुळे या त्रुटी तितक्या स्पष्ट जाणवत नाहीत. सिनेमात एक संवाद आहे जो जग संकटात असताना लोकांना त्या संकटाबद्दल जागरूक करण्याचं काम करणार्‍या प्रोफेसर मिंडीचा आहे, ज्यात तो म्हणतो, “We really did have everything didnt we? when you think about it ” माणसाकडे सगळं काही असताना, ओरबाडून घेण्याची त्याची सवय त्याच्या अंताला कारणीभूत असेल, या वाक्याची सत्यता सांगणारा हा संवाद आहे. डोंट लूक अप आपल्याला समाज म्हणून आपलीच प्रतिमा दाखविण्याचा प्रयत्न करतो. एक सिनेमा म्हणून त्याच्या यशस्वितेची परिमाणं वेगळी असली तरी त्याचा मुख्य उद्देश साध्य करण्यात दिग्दर्शकाला यश मिळालंय असं म्हणायला हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -