घरताज्या घडामोडीसुखाच्या परिघावर

सुखाच्या परिघावर

Subscribe

माझी शोधक नजर त्याला गवसतेय. पण ठोस असे काही हाती येत नाहीय. त्याच्याकडे मी पुन्हा पुन्हा निरखून पाहिले. एव्हाना मी मित्रांच्या गर्दीत असूनही तिथे मनाने नव्हतोच..कोण हा? त्याचे मळके कपडे, रापलेला, मलूल, गरीब चेहरा, धारदार नाक आणि काळ्या रंगात चमकणारे त्याचे पांढरे, लालसर डोळे. त्याच्या सर्वांगावरून अभावग्रस्त जीवन उतरलेले. काही विचारानंतर मनाच्या अवकाशात त्याच्या ओळखीची लखलखीत वीज चमकून गेली. अर्थाचा आणि स्मृतींचा एक लखलखीत उजेड माझ्या पुढ्यात साक्षात झाला. अरे! हा तर आपला वर्गमित्र!

आज अचानक शाळेतील काही मित्रांची आठवण फेसबुकने करून दिली आणि ही आठवण गडद झाली. एखाद्या अत्तराच्या कुपीचे बूच उघडावे आणि तिचा गंध मनात भरून यावा तशी. हायस्कूलचे ते दिवस. तेव्हा पाहिलेले कितीतरी चेहरे आज स्पष्ट आठवतही नाहीत. धुक्यात हरवलेल्या गावाप्रमाणेच मनातून आता ते पुसट होत गेलेले. त्यातील काहीसे कवडसे अजूनही मनाच्या क्षितिजावर डोकावून जातातच. हे दिवस खरोखरच सर्वांग सुंदर असतात. म्हणूनच अजूनही गावी गेलो की शाळेच्या भिंती पुन्हा पाहून येतो. आता ते वैभव ओसरलेले दिसते. तेव्हा फार भौतिक सुविधा नव्हत्या; पण माणसांच्या मनाची श्रीमंती, माणूसपण शाबूत होते. आता सर्वच गतिमान. कोणालाच वेळ नाही. काळाची गतीच एवढी तीव्र आहे की माणूस त्यात भेलकांडून जातोय. त्यामुळेच असे होत असेल का? नाही तर माणसांची ओळख कशी बरे विसरली जाईल? हे लिहिण्याचे कारण म्हणजे, ते शाळेचे दिवस सरून आता तीसेक वर्षाचा काळ सरलाय. पण तेव्हा पाहिलेला एक चेहरा अचानक समोर आला. इतक्या वर्षानंतर आणि पाहिलेल्या स्थळापासून दोनशे किमी दूर. अन तेही चक्क माझ्या कॉलेजात. कसे शक्य आहे हे? मी वाचतोय तो चेहरा. मी माझ्या मेंदूला अधिकच ताण देऊन आठवतोय. याला कुठे तरी पाहिल्यासारखे वाटतेय? कुठे…? काही वेळ तसाच सुन्न अस्वस्थेतच गेला. मी त्या चेहर्‍याकडे तसाच एकटक, आठवणीची पाने चाळत शोधत बसलो. पण काही थांग लागेना. काही चेहरे पाहिल्यावर उगीचच ते कुठे तरी पाहिल्यासारखे वाटते. तसेच असेल हे. जाऊद्या. असे म्हणून मी चहाचा घोट घेतला; पण माझे मन त्याला दुजोरा देत नव्हते. एक मन खात्रीने म्हणत होते. हा आभास नाहीय. हा चेहरा आपण पाहिलाय कुठेतरी ? पण कुठे ?

माझे सकाळचे कॉलेज. साडेसातलाच तास सुरु होतात. दर दोनेक तासांनी मधली सुटी असते. असाच कॉलेजात सकाळचे दोन तास घेऊन कॅन्टीनमध्ये सुट्टीत आम्ही काही मित्र चहा पीत बसलेलो. आमची कॅन्टीन तेव्हा मुक्त होती. म्हणजे गेटवर वॉचमन नव्हते. त्यामुळे बाहेरचे लोकही कधी येऊन गेलेले कळत नसत. अर्थात हे खूपच तुरळक आणि अपवादात्मक असे. या कॉलेजात शिकून काही मुली लग्नानंतर, कॉलेज, हे गाव सोडून सासरी गेलेल्या. कालांतराने त्या माहेरी येत. तेव्हा बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या या मुलींना कॉलेजची कॅन्टीन आठवत असे आणि त्यांना डोहाळे लागत कॅन्टीनचा पाववडा खाण्याचे. त्यांची ती इच्छा पूर्ण करण्याचे कर्तव्य त्यांच्या भावाकडे, कधी पालकांकडे येई, त्यासाठी असे लोक कॅन्टीनमध्ये आपल्या लाडक्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी येत. हे सारे कॅन्टीनच्या चालकानेच गमंतीने आम्हाला सांगितलेले. माणसाच्या आनंदाच्या जागा किती छोट्या असतात. अशा बारीकसारीक गोष्टीमध्येही भारी मौज असते. रोडवर कॉलेज असल्याने हा अनुषंग नेहमीचाच. त्यामुळे नवू-दहाच्या वेळेस कॅन्टीनमध्ये बरीच गर्दी झालेली. आजूबाजूला तरुणाईचा चैतन्यदायी वावर. विविध रंगाने बहरलेले नि भारलेले वातावरण. काही गुलहौशीही यात सामील झालेले. या उत्साही वातावरणात हा मलूल आणि कॉलेजच्या वातावरणाशी विसंगत चेहरा समोर आलेला. तो विद्यार्थी तर खास नव्हताच. कुणाचा पालक, भाऊ, पार्सल न्यायला आलाय असेही त्याच्याकडे पाहून वाटत नव्हते. तो समोरच बाजूला नाश्ता करत बसलेला. त्याचे कुणाकडे फारसे लक्षही नाही. तो आपल्याच नादात, एकतानतेने वडा रस्सा खातोय. पण मला स्मरणाच्या नादात अडकून गेलेला.

- Advertisement -

माझी शोधक नजर त्याला गवसतेय. पण ठोस असे काही हाती येत नाहीय. त्याच्याकडे मी पुन्हा पुन्हा निरखून पाहिले. एव्हाना मी मित्रांच्या गर्दीत असूनही तिथे मनाने नव्हतोच..कोण हा? त्याचे मळके कपडे, रापलेला, मलूल, गरीब चेहरा, धारदार नाक आणि काळ्या रंगात चमकणारे त्याचे पांढरे, लालसर डोळे. त्याच्या सर्वांगावरून अभावग्रस्त जीवन उतरलेले. काही विचारानंतर मनाच्या अवकाशात त्याच्या ओळखीची लखलखीत वीज चमकून गेली. अर्थाचा आणि स्मृतींचा एक लखलखीत उजेड माझ्या पुढ्यात साक्षात झाला. अरे! हा तर आपला वर्गमित्र! हा इतक्या दूर कसा आला? चक्क आपल्या कॉलेजात. झेडपीच्या शाळेत तो आणि मी चार वर्षे सोबत होतो. दहावी झाली आणि ते आठवणींचे पक्षी विविध दिशांना उडून गेले. त्यातील दोन पक्षी किती तरी वर्षांनी असे अकल्पित समोर आलेले. मी त्याच्या जवळ गेलो आणि विचारले…‘तू उद्धव का?’ तो माझ्याकडे केविलवाण्या; पण आश्चर्ययुक्त नजरने पाहत थोडासा बिचकत म्हणाला, हो! तुम्ही कसे काय ओळखले.. ‘अरे मी असा असा.’ मी आठवण सांगितली. त्याला ओळख पटली. ओळखीचे स्मित त्याच्या चेहर्‍यावर उमटले. आम्ही त्या शाळेच्या आठवणीत हरवून गेलो. तरी त्याच्या मनात काहीसा संकोच माझ्या नजरेतून सुटला नाही. कारण आम्ही समोर असलो तरी परिस्थिती आता खूप बदललेली. तो मला अहो काहो करतोय. आदराने बोलतोय. पैसा, प्रतिष्ठा, पद या बाबी मानवी नात्यांमध्ये किती अंतर पाडतात? यातूनच विषमता निर्माण झालेली. माझ्या डोक्यात विचारांचे मोहोळ उठलेले.
आम्ही बाहेरगावाहून त्या शाळेत येणारे परगावची मुले. दुपारच्या सुट्टीत आम्ही एकत्रच जेवत असू. रोज सात-आठ किलोमीटरची पायपीट झालेली, त्यामुळे सपाटून भूक लागायची. वाढते वय आणी पोटात भूकही तशीच. पण आता हा माझ्यासमोर कॅन्टीनमध्ये एकटाच क्षुधाकांत, पोटाची भूक भागवण्यासाठी आलेला. बाहेरच्या तुलनेत इथे थोडे स्वस्त आणि जास्त मिळते. हे त्याला कळले असेल का? म्हणून तो इकडे आला? तो म्हणाला, ‘मी इकडे कारखान्यावर ऊस तोडायला आलोय. आता तीन-चार महिने कारखान्याचा पट्टा पडेपर्यंत हाहे इथच. तू काय करतूस पण हितं ’ मी माझा वृतांत थोडक्यात त्याला सांगितला. त्याने त्याची कर्मकहाणी सांगितली. दहावीनंतर पुढे शिकलोच नाही. लग्न झालंय. लहान मुले आहेत. काहीतरी काम करायला पायजे ना. मोप उद्येग केले; पण त्यात काय जमलं नाही. आता हाच आपला उद्योग. चार-पाच महिन्यांसाठी चाळीस-पन्नास हजारांची उचल मिळते. गावाकडे शेती आहे कोरडवाहू. आपल्या कोरडवाहू शेतीत कुठं एवढ उत्पन्न मिळतं. त्याने आमच्या प्रदेशाचा सातबाराच समोर मांडला. मी मनातून उसवलो खरा. पण त्याच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. ते कोणत्याच पुस्तकात मला सापडले नाही. एकाच वर्गातले आम्ही, एकच पुस्तक शिकलो; पण आमचा क्लास मात्र आता बदललेला. हे अंतर मिटणारे नव्हते. अजूनही तो सुखाच्या परिघावरच होता, जगण्यासाठी गाव सोडून काबाडकष्ट करणारा..

बीड जिल्हा म्हणजे उसतोड कामगारांचा जिल्हा अशी त्याची ठळक ओळख. पश्चिम महाराष्ट्रात सहकार वाढला, पाटपाणी आले, मोठ्या शहराचे नजीकचे सानिध्य, त्यामुळे हा प्रदेश सुजलाम-सुफलाम झालेला. मराठवाड्याचे तसे चित्र नाही. इथे अजूनही सर्वच पातळीवर भीषण दुष्काळ. शाळेत जाणारी मुले थोडी मोठी झाली की त्यांना शाळेतून काढून उसतोडणीला जुंपायचे. पिढीजात ही ढोर मेहनत त्यांच्या वाट्याला आलेली. अशा अनेक कोवळ्या मुलांच्या पुढील आयुष्याचे पाचरट होऊन गेलेले. चरख्यातील उसाच्या चोथ्याप्रमाणे नीरस भोग त्यांच्या वाट्याला आलेले. उद्धवही त्यातलाच एक. दिवसभर मित्राचा तो केविलवाणा चेहरा त्यादिवशी मनातून जात नव्हता. माझ्याकडे पाहून त्याला काय वाटले असेल? या विचाराने मी व्याकुळ झालो. असे हजारो उद्धव असतील पाटी-पेन्सिल सोडून हातात कोयता आलेले. ही भेट अजूनही, मनातून पुसली जात नाहीय. मनाच्या पानात कायमचीच ती कोरली गेलेली.

  • डॉ.अशोक लिंबेकर(लेखक संगमनेर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख आहेत)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -