Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeफिचर्ससारांशPhodile Bhandar Book : तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध

Phodile Bhandar Book : तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध

Subscribe

प्राचार्य दिलीप धोंडगे सरांचे तुकोबांच्या अभंगाची शैली मीमांसा हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने डिसेंबर 2014 मध्ये प्रसिद्ध केले आहे. सरांनी शैली विज्ञान या महत्त्वपूर्ण आधुनिक ज्ञानशाखेच्या निकषांवर तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध घेतला. शैलीलक्ष्यी अभ्यास पद्धतीची तत्त्वे केवळ युरोपीय ग्रंथातच मिळतात असे नव्हे, तर काही तत्त्वे आपल्या भारतीय साहित्यशास्त्रातही आहेत. अशा सार्वत्रिक तत्त्वांचाही समुचित वापर करून तुकोबांच्या अभंगांच्या अभ्यासासाठी या शैलीलक्ष्यी अभ्यास पद्धतीची उपयोजना केली. या आगळ्यावेगळ्या ग्रंथावर शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख नंदकुमार मोरे यांनी संत तुकोबारायांच्या साहित्यावर अभ्यास असणार्‍या दर्जेदार अभ्यासकांकडून साहित्य विषय चिंतन मांडणारे लेख मागविले आणि या लेखांवर आधारित ‘फोडिले भांडार’ हा संपादित ग्रंथ नुकताच वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

– तुषार चांदवडकर

फोडिले भांडार हा अंतर्बाह्य नितांत सुंदर ग्रंथ अतिशय वाचनीय झाला आहे. प्राचार्य दिलीप धोंडगे सरांचे तुकोबांच्या अभंगाची शैली मीमांसा हे पुस्तक डिसेंबर 2014 मध्ये राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. सरांनी शैली विज्ञान या महत्त्वपूर्ण आधुनिक ज्ञानशाखेच्या निकषांवर तुकोबांच्या अभंगांचा अनोखा शोध घेतला. या ग्रंथाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना देऊन त्याचे चार भाग करण्यात आले आहेत. (1) तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा या पहिल्या भागात सदानंद मोरे, एकनाथ पगार, सतीश बडवे, अविनाश सप्रे, प्रवीण बांदेकर, नितीन रिंढे, प्रमोद मुनघाटे, रमेश धोंगडे आणि स्वत: नंदकुमार मोरे या मान्यवरांचे लेख आहेत.

अशोक कामत आणि रमेश धोंगडे यांची दोन टिपणे शेवटी दिली आहेत. (2) दैनिक गांवकरीमध्ये जागरण या सदरात 2004 ते 2007 या काळात ‘तुका म्हणे’ या शीर्षकांतर्गत प्रसिद्ध झालेल्या लेखांना दोन खंडात शब्दालय प्रकाशनने प्रसिद्ध केले. या ग्रंथावर समीर चव्हाण, गोविंद काजरेकर, रणधीर शिंदे आणि उल्हास पाटील यांनी लेख लिहिलेले आहेत. (3) यानंतर धोंडगे सरांनी 272 अभंग आणि 13 संतकवी यांचे चिंतन केलेला ‘चिंतनासी न लगे वेळ’ या ग्रंथावर एकनाथ पगार सरांचा लेख आहे. (4) आणि शेवटी ‘नव्हे माझा शब्द एकदेशी’ या भागात स्वत: धोंडगे सरांचे चार महत्त्वाचे लेख आहेत. एकंदरीत धोंडगे सरांनी केलेले वारकरी संप्रदायाच्या साहित्याचे सखोल चिंतन आणि त्या चिंतनावर अभ्यासकांनी केलेली चर्चा एकत्रित करण्याचा अतिशय दर्जेदार प्रयत्न या ग्रंथात नंदकुमार मोरे सरांनी केला आहे. एका व्यक्तीने घेतलेला वर्ण विषयाचा ध्यासपूर्वक शोध आणि विविध अभ्यासकांनी त्याची केलेली चर्चा, अशा दर्जेदार चर्चेचे केलेले संपादन ही गोष्ट मराठी साहित्यात फार अपवादाने असू शकते.

प्रस्तुत संपादनातील बहुतांश चर्चा ही डॉ. दिलीप धोंडगे यांच्या तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा या ग्रंथावर बेतलेली आहे. यात डॉ. धोंडगे यांच्या वारकरी संप्रदायासंदर्भातील समग्र चिंतनाचा आढावा घ्यावा असा विचार पुढे आला आणि या संपादनाचे स्वरूप बदलत गेले. त्या दृष्टीने त्यांच्या इतर कामांचाही विचार करणारे विविध लेख लिहून घेऊन या ग्रंथाचे चर्चाविश्व विस्तारण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथाचे संपादक आणि शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे आपल्या प्रस्तावनेत लिहितात त्याप्रमाणे डॉ. धोंडगे यांच्या वाटचालीत ‘तुकोबांच्या अभंगांची शैलीमीमांसा’ हा ग्रंथ अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला आहे. शैलीमीमांसेसारख्या पाश्चात्य समीक्षाव्यूहाचा आधार घेऊन या ग्रंथात तुकोबांच्या अभंगांची चर्चा करण्यात आली आहे. ही चर्चा त्या अभ्यासपद्धतीतील संकल्पनांना नवे परिमाण देण्याबरोबर तुकोबांची कवी म्हणून असलेली क्षमता अधोरेखित करते. वर म्हटल्याप्रमाणे डॉ. धोंडगे यांनी समग्र संतसाहित्याला नजरेसमोर ठेवून कल्पिलेली ‘वारकरी शैली’सारखी संकल्पना या संप्रदायाच्या रचनांचे स्वरूप समजून घेण्यासाठी वैशिष्ठ्यपूर्ण ठरली आहे.

साहित्याभ्यासातील युगशैलीचा संदर्भ या संकल्पनेला आहे. शैलीविज्ञानात वापरल्या जाणार्‍या या संकल्पनेचा समान चलघटकांच्या आधारे कालिक विस्तार करून कल्पिली आहे. त्यातूनच वारकरी शैली ही वारकरी साहित्याची शैली असे बिंबवण्यात डॉ. धोंडगे यशस्वी झाले आहेत आणि हीच प्रेरणा या ग्रंथाच्या निर्मितीसाठी महत्त्वाची वाटते. तुकोबांच्या अभंगांच्या शैलीमीमांसेचे स्पष्ट प्रतिमान या लेखात सदानंद मोरे सरांनी शैली वैज्ञानिक अभ्यासाला प्राचार्य धोंडगे यांनी प्राधान्य का दिले याची नेमकी कारणमीमांसा केली आहे. मुळात धोंडगे हे संशोधनासाठी अशा प्रकारच्या अनवट विषयाकडे आकृष्ट झाले याचे कारण तुकोबांसारख्या वारकरी परंपरेतील संतांचे साहित्य बहुआयामी असल्याची जाणीव त्यांना झाली हे होय. त्यामुळे सहाजिक त्याचा अभ्यासही वेगवेगळ्या ज्ञानशाखांद्वारे व्हायला हवा. शैलीविज्ञान ही त्यांच्यापैकी एक महत्त्वाची आधुनिक ज्ञानशाखा असल्याचेही त्यांच्या लक्षात आले.

शैली वैज्ञानिक अभ्यासाला प्राधान्य देण्याची गरज धोंडगे यांना वाटण्याचेही कारण आहे. संत साहित्याचा अनेक अंगांनी अभ्यास होत असला तरी या सर्व अभ्यासात आशयांग अधिक घुसळले गेले आहे. त्यामानाने आविष्कारांग चर्चिले गेले नाही हे धोंडगेंच्या ध्यानात आले. याचा अर्थ साहित्याच्या आशयात आणि त्याच्यातून व्यक्त होणार्‍या जीवनार्थाला महत्त्व नाही असे नाही, मात्र त्यामुळे साहित्याच्या रूपाकडे म्हणजे फॉर्मकडे दुर्लक्ष झाले तर साहित्य समीक्षा अपूर्ण राहते. कलाकृती आशयसंपन्नच असते, पण त्या आशयाची अभिव्यक्ती कलेच्या मुखाने होत असते. या अभिव्यक्तीमध्येशैलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून धोंडगे यांनी तुकारामांच्या अभ्यासासाठी शैली अभ्यास पद्धतीची निवड केली.

शैली विज्ञान ही तशी पाश्चात्य व्यवस्था असली तरी तिची काही तत्त्वे आपल्या भारतीय साहित्य शास्त्रातही आहेत. त्यांचाही प्रस्तुत अभ्यासात समुचित वापर केला आहे. या नितांत सुंदर अशा ग्रंथाची पाठराखण मराठीतील ज्येष्ठ समीक्षक आणि व्यासंगी अभ्यासक रमेश वरखेडे यांनी केली आहे. ते लिहितात की, संत वाङ्मयाच्या सामाजिक फलश्रुतीविषयी मराठीत बराच विचारविमर्श झाला आहे, परंतु काही थोडे अपवाद वगळले तर त्यांच्या अभंगांची काव्यकेंद्री समीक्षा फारशी झालेली नाही. दिलीप धोंडगे यांनी तुकोबारायांच्या अभंगवाणीची विस्ताराने शैलीमीमांसा करून ही तूट भरून काढली आहे. डॉ. नंदकुमार मोरे यांनी या शैलीमीमांसेविषयी समकालीन समीक्षकांचे चिकित्सक अभिप्राय मागवून ‘फोडिले भांडार’ या शीर्षकाने संपादन केले आहे. या विविध अभिप्रायांतून तुकोबांच्या अभंगवाणीच्या अनुषंगाने 200 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या विचारविश्वात जे बौद्धिक दोहन सुरू होते, त्या बौद्धिक परंपरेचे सम्यक दर्शन घडते. या ग्रंथाची ही सर्वात मोठी फलश्रुती आहे.