-हेमंत भोसले
मौन ‘व्रत’ धारण करणार्या नेत्यापेक्षा गोंधळ घालणार्या नेत्याचाच समाजावर अधिक प्रभाव असतो, हे अलीकडच्या काही नेत्यांच्या प्रसिद्धीकडे बघून लक्षात येते. कॉर्पोरेट कल्चरची झुल अंगावर पांघरत देशवासीयांसमोर केवळ भाषणे झोडणार्यांच्या कल्लोळात मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे पैलू दाबले जाऊ शकत नाहीत.
खरंतर भारताच्या राजकीय इतिहासात मनमोहन सिंग यांचे स्थान केवळ एका माजी पंतप्रधानांच्या भूमिकेपुरतेच मर्यादित नाही, तर त्यांचे योगदान हे एका दूरदृष्टी असलेल्या नेत्याचे आहे, ज्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला नवा मार्ग दिला. मनमोहन सिंग यांचे नाव घेतले की अनेकांच्या डोळ्यांसमोर त्यांचे ‘मौन’ हेच प्रमुखत्वाने येते. म्हणूनच त्यांचा काही व्यासपीठांवर ‘मौन मोहन’ असा उल्लेख केला गेला. त्यांच्या अशा मौनी स्वभावामुळेच पंतप्रधान कार्यालयातील एकेकाळचे माध्यम सल्लागार संजय बारू यांना ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर : द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ हे पुस्तक लिहिता आले.
संजय बारू यांच्यासह त्यांना ‘मौन मोहन’ म्हणणार्या टीकाकारांना लक्षात घ्यावे लागेल की, मौन हे कधी कधी शब्दांपेक्षा अधिक प्रभावी असते. म्हणूनच ‘मौनं सर्वार्थसाधनम्।’ असे म्हटले जाते. मौन हे एक महत्त्वाचे साधन आहे, ज्याच्या सहाय्याने अनेक गोष्टी साध्य होतात. मौनाने व्यक्ती शांत राहून आत्मचिंतन, संयम आणि शहाणपण याचा अभ्यास करू शकते, हे मनमोहन सिंह यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जेव्हा मनमोहन सिंग यांच्यावर कोळासा घोटाळ्याच्या आरोपांबाबत मौन राखल्यावरून प्रश्नांची बरसात केली, तेव्हा ते म्हणाले, हजारो जवाबों से अच्छी हैं मेरी खामोशी, न जाने कितने सवालों की आबरू रखी. त्यांची ही ‘खामोशी’ कधीही निष्क्रियतेचे द्योतक नव्हती, तर ती त्यांच्या चिंतनशीलतेचे प्रतीक होती. मौन ही कमजोरी नाही, तर एका उच्च पातळीवरील धैर्य आहे, जिथे फालतू वाद-विवादांपेक्षा कृतीतून उत्तर देण्यावर भर दिला जातो. जेव्हा ते बोलत असत तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये नेहमी अभ्यास आणि सखोल विचारांचे प्रतिबिंब असायचे.
मनमोहन सिंग यांचे मौन हे दुर्बलतेचे नव्हे, तर त्यांची बुद्धिमत्ता आणि शांत विचारसरणीचे प्रतीक होते. हे मान्य करावे लागेल की मनमोहन सिंग यांनी अनेकदा वादग्रस्त विषयांवर मौन राखले, ज्यामुळे त्यांच्यावर टीका झाली, मात्र या मौनामागे विचारशील नेतृत्व लपलेले होते. प्रत्येक विषयावर बोलण्याने किंवा प्रतिक्रिया देण्यानेच नेता प्रभावी ठरत नाही. काही वेळा मौन हे असामर्थ्याचे नव्हे तर परिपक्वतेचे लक्षण असते. त्यांनी फालतू आरोप-प्रत्यारोपात वेळ घालवण्यापेक्षा देशाच्या विकासासाठी अधिक वेळ दिला.
नेत्याचे कर्तृत्व हे कृतीतून दिसले पाहिजे. फालतू आरोपांना उत्तर देण्याऐवजी कामातून दाखवलेले उत्तर अधिक महत्त्वाचे असते. मनमोहन सिंग यांनी याच विचारधारेचे पालन केले. त्यांचे नेतृत्व हे ‘मीच योग्य’ म्हणणार्या अहंकारी नेत्यांपेक्षा खूप वेगळे होते. त्यांनी केवळ स्वतःला नव्हे, तर देशाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले. त्यांनी ओठ बंद ठेवले, पण त्यांचे काम बोलत राहिले. त्यांच्या नेतृत्वामुळे देशाला एक स्थैर्य आणि विश्वास मिळाला, ज्याचे महत्त्व आज अनेकांना जाणवते.
मनमोहन सिंग यांना केवळ राजकीय नेत्याच्या चौकटीत पाहणे ही बाब त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देणार नाही. ते एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे बुद्धिमान आणि कणखर व्यक्ती होते. त्यांनी ‘मौन’ हे एक साधन बनवून राजकीय वादळांचा सामना केला आणि एक यशस्वी शिल्पकार म्हणून उभे राहिले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा अर्थ ‘राजकारणापलीकडचे मनमोहन’ यामध्येच सामावलेला आहे. थोडक्यात मनमोहन सिंग यांचे जीवन चरित्र हे मौनाचे महत्त्व अधिक प्रभावीपणे अधोरेखित करते.
हे चरित्र अभ्यासता लक्षात येते की मौन म्हणजे फक्त शब्दांचा अभाव नव्हे, तर ती एक शक्तिशाली अवस्था आहे जी विचारांना, कृतीला आणि आत्मविवेकाला आकार देते. मौन ही केवळ नि:शब्दता नसून ती एक सखोल संदेशाची भाषा आहे. वादांच्या गदारोळात शांत राहून योग्य कृतीतून प्रतिसाद देणे हे मौनाचे खरे सौंदर्य आहे. मौन ही ताकद आहे जी परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करते, विचारांना दिशा देते आणि कृतीतून व्यक्त होते. नेत्यांची महानता त्यांच्या शब्दसंग्रहात नसते, तर त्यांच्या मौनातून उमटणार्या परिणामकारक कृतीत असते. त्यामुळेच मौन हे कधी कधी शब्दांपेक्षा अधिक परिणामकारक सिद्ध होते. मनमोहन सिंग हे त्याचे उदाहरण ठरावे.
मनमोहन सिंग यांना केवळ मौनीच नव्हे तर निष्क्रिय म्हणूनही हेटाळण्यात आले, पण त्यांना ‘निष्क्रिय’ म्हणणारे अनेकदा त्यांच्या क्रियेचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेत आले आहेत. त्यांनी केलेल्या कामगिरीकडे पाहिले तर निष्क्रियतेचा आरोप किती कुचकामी आहे हे लक्षात येते. १९९१ साली जेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठे संकट आले होते तेव्हा अर्थमंत्री म्हणून त्यांनी जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाचे धोरण आणून भारताला नवसंजीवनी दिली.
हा निर्णय घेताना त्यांनी प्रचारकी शैलीत भाषणबाजी न करता प्रत्यक्ष कृतीतून मार्ग दाखवला. अफाट गर्दीसमोर बेंबीच्या देठापासून ओरडून खोटे बोलून आपले म्हणणे रेटून बोलणार्या नेत्यांना त्यांनी चपराक दिली, परंतु ज्यांचे कान गोंगाटाने बहिरे झाले आहेत, त्यांच्यापर्यंत मनमोहन सिंग यांच्या सक्रियतेचा आवाज कसा पोहचणार?
पंतप्रधानपदाच्या काळात देशाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. ग्रामीण रोजगार हमी योजना, अणुकरार आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्रांती यांसारख्या धोरणात्मक कार्यक्रमांनी देशाला वेगाने प्रगतिपथावर नेले. निष्क्रिय नेता कधी असे निर्णय घेऊ शकतो का? १९९१ मध्ये अर्थव्यवस्थेची दारुण परिस्थिती असताना देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढणारे मनमोहन सिंग निष्क्रिय कसे ठरू शकतात? जागतिक स्तरावर भारताला सन्मान मिळवून देणारे अणुकरार घडवणार्या या नेत्याची मौनाशी आणि निष्क्रियतेशी तुलना करणे योग्य आहे का?
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला जागा मिळवून देणार्या या नेत्याला निष्क्रिय म्हणणे हे उथळ टीकेचे उदाहरण नाही का? ज्या नेत्यांना प्रत्येक विषयावर गडगडाटी आवाज करणे आवडते, त्यांची कामगिरी पाहिली तर ती अनेकदा निराशाजनक दिसते. फक्त बोलण्याने किंवा भाषणबाजीने देश चालत नाही. त्यासाठी अभ्यास, कृती आणि परिणामकारक निर्णयांची आवश्यकता असते. मनमोहन सिंग यांनी दाखवून दिले की नेतृत्व केवळ आवाजाच्या तीव्रतेने सिद्ध होत नाही, तर त्यासाठी धोरणात्मक दूरदृष्टी आणि अचूक निर्णयक्षमताच आवश्यक असते.
मनमोहन सिंग हे स्वत:चे श्रेय घेण्यात कधीच उत्सुक नव्हते. त्यांनी नेहमीच कामगिरीवर भर दिला, नाटकावर नाही. एका नेत्याकडून अपेक्षित असलेल्या ग्लॅमरला त्यांनी कधीच प्राधान्य दिले नाही. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कधी कधी इतर नेत्यांपेक्षा कमी वाटू शकते, पण त्यांच्या कामगिरीच्या मोजमापासाठी लोकप्रियतेचे प्रमाणक कधीच लागू होऊ शकत नाही.
कोणताही निर्णय घेताना त्यांनी कधीही घाईगडबड केली नाही. सतत विवेकी आणि तर्कसंगत दृष्टिकोन ठेवत ते विचारांती निर्णय घेत गेले. त्यांच्या शांत स्वभावाचा अर्थ त्यांच्या दुबळेपणाशी जोडला गेला, पण खरं पाहता त्यांच्या कार्यकाळात भारताने मोठ्या आर्थिक प्रगतीसह आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्यावर केलेली टीका त्या काळाच्या कसोटीवर खरी उतरली नाही.
राजकारण हा असा खेळ आहे जिथे नैतिकता आणि प्रामाणिकपणाचा विचार क्वचितच केला जातो. मनमोहन सिंग हे याला अपवाद ठरले. ‘माणूस म्हणून ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो,’ अशी ओळख त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत निर्माण केली. मनमोहन सिंग हे राजकीय भूमिका सांभाळताना कोणत्याही धार्मिक किंवा सांस्कृतिक मुद्यांचा चुकीचा उपयोग कधीच करीत नसत. त्यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुतेचे प्रतीक राहिले आहे.
त्यांनी राजकारण आणि धर्म यांचा समतोल राखत माणुसकीला नेहमी अग्रक्रम दिला. मनमोहन सिंग हे कधीही टीकाकारांना ‘ग्लॅमरस’ वाटले नाहीत. त्यांचे कौटुंबिक जीवनही साधे आणि सोज्वळ होते. त्यांच्या पत्नी गुरशरण कौर या त्यांच्या आयुष्याचा आधारस्तंभ. जरी मनमोहन सिंग हे पंतप्रधानपदी विराजमान होते तरीही त्यांच्या कुटुंबाने कधीही कोणताही विशेष अधिकार किंवा वेगळा फायदा घेतला नाही. त्यांच्या मुलीही प्रामाणिक आणि साधे जीवन जगतात.
मनमोहन सिंग यांची नम्रता हा त्यांचा सर्वांत उल्लेखनीय स्वभावगुण होता. उच्चशिक्षित असूनही त्यांच्यात कधीही अहंकार दिसला नाही. सत्ता आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही त्यांनी कधीही आपली नम्रता सोडली नाही. त्यांनी स्वत:ला कधीही ‘सर्वज्ञ’ म्हणून मांडले नाही, तर नेहमीच तज्ज्ञांशी सल्लामसलत केली आणि सहकार्यांच्या मतांचा आदर केला. ‘मी केले’ हे म्हणण्याऐवजी त्यांनी ‘आम्ही केले’ या विचाराने काम केले.
त्यांच्या नम्रतेमुळेच विरोधकांनाही त्यांच्याबद्दल आदर वाटतो. मनमोहन सिंग यांच्या स्वभावाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन. त्यांनी कधीच राजकीय वैर जपले नाही. ते विरोधकांशीही सौहार्दपूर्ण आणि आदरयुक्त वागणूक ठेवत. संसदेत वादग्रस्त मुद्यांवरही त्यांनी कधीही उग्र भाषा वापरली नाही, तर संयमित आणि तार्किक उत्तर देऊन संवाद साधला. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे त्यांना ‘सौम्य व्यक्तिमत्त्व’ म्हणून ओळखले जाते.
एकूणच मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे नम्रता, ज्ञान, संयम आणि दूरदृष्टी यांचा एक अद्वितीय संगम म्हणून बघावे. त्यांच्या या गुणांनीच त्यांना भारतीय राजकारणात एक वेगळे स्थान दिले. त्यांचे स्वभावगुण केवळ नेत्यांसाठीच नव्हे, तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठीही प्रेरणादायी आहेत. मौन, नम्रता आणि कर्तव्यनिष्ठा हे गुण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आधारस्तंभ होते, ज्यामुळे ते नेहमीच आदरणीय राहतील.