–स्मिता धामणे
आणि वायू, प्रेमळा हे, बंधमुक्ता, येऊनी
छेडिली आनंदवीणा माझीया प्राणातुनी..
गे निशे, आलीस तू आधारसिंधू घेऊनी
अन.. उषेची भव्य आशा तू दिली गर्भातुनी..
रात्र झाली म्हणजे अंधारात चालणे अवघड होईल असे वाटत असतानाच सर्वत्र दिव्यांची रोषणाई झाली. एका रांगेत लागलेले परंतु वळणा-वळणाच्या, गर्द हिरवाई, बर्फाच्छादित पर्वत मुकुटांवर अन विविधरंगी तंबुंच्या पार्श्वभूमीवर शांतशा सांजछटा.. अस्ताचली निघालेल्या रविकरांचा संधीप्रकाश अन.. या दिव्यांच्या प्रकाशाचे मिलन अतिशय मोहक असे भासत होते.. मोठे विहंगम दृश्य होते. तिन्ही सांजेची पवित्र केदारघाटीतील स्पंदने.. एक वेगळीच.. कधीही अनुभवली नाहीत अशी अनुभूती देत होते. देव आपल्यासोबतच आहे ही खात्री ते क्षण आम्हा उभयतांस देत होते.
खरोखरच खूप भाग्यशाली आहोत आपण म्हणून आपले गुरू आणि शिवशंभू ही चढाई आपल्याकडून करवून घेत आहेत. हा विचार क्षणभरही आम्ही विसरत नव्हतो. अधुनमधुन पाणी पिणे.. जवळील काही खाणे चालू होते. पाठीवर सॅक घेऊन चालणे अवघड होत असताना गढवाली बंधू पाठीवर माणसांचे ओझे कसे बरे वाहत असतील? घोडे.. खच्चरांकडून खूप जास्त श्रम करवून घेत होते. मुक्या जिवांची पाठीची सालही रक्ताळलेली दिसत होती. रस्त्यात अतिश्रमाने मृत्यू झाला म्हणजे त्याला तेथेच पडू देत होते. या सर्व कारणांमुळे आम्हास त्यावर बसावेसे वाटत नव्हते.
कातळ पर्वतरांग.. खोल दरीतून विशाल पात्रात खळखळाट करत वाहणारी पांढर्याशुभ्र स्फटिकासमान पवित्र जलाची गौरीकुंडापासून तर बेसकॅम्प पर्यंतची मंदाकिनीची अविरत सोबत होती. सुरक्षिततेसाठी एका बाजूने बॅरिकेड्स लावलेले. हिमाच्छादित पर्वतमुकुटांवर कृष्णमेघांचा पाठशिवणीचा खेळ चांगलाच रंगला होता. चढाई.. दमणं.. ताजेतवाने होणं.. पुन्हा चालणं.. निसर्गाचा हृदयस्थ आनंद घेणं.. माथा गाठणं.. हेंच ध्येय.. आता ६५ ते ८० अंशांची खडी चढाई.. पावलागणिक कस लागत होता.. मन आणि शरीर.. सकाळपासून अविरत चालत असलेल्या.. थकल्या.. भागल्या पायांना.. थोडंच राहिलंय म्हणून समजावत होते.
कितीही चाललो तरी दुसरी वळणाची वाट तयारच..शेवटी किती राहिले हे बघणेच सोडून दिले. यायचे तेव्हा येईल.. आपण फक्त चालायचे.. आता वर्दळ कमी होऊन थंडी वाढलेली.. बर्फवृष्टी सुरू झालेली.. ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने डोके गरगरायला लागलेले. दहा.. बारा पावलेच मी चालू शकत होते. थांबून घोटभर पाणी पिऊन कापूर हुंगायचा.. पुन्हा चालणे सुरू. रस्त्यात आम्ही दोघेच चालत होतो. अशी भरपूर कस पणाला लावणारी शारीरिक, मानसिक, बौद्धिक चढाई झाल्यानंतर बेस कॅम्पचा फलक दृष्टीस पडला. अतिशय थकल्याभागल्या जीवाला कोण आनंद झाला म्हणून सांगू???
आम्ही आमचे कुटुंब मित्र प्रकाश थोरात यांना फोन लावून आमच्या तंबूचे ठिकाण विचारले. रात्री १ वाजता.. त्यांनी आवश्यक ते मार्गदर्शन केल्यामुळे लवकर तंबू सापडला. समोरून एक बाई दर्शन करून येत होत्या. त्या म्हणाल्या, बेटी.. हम सुबह से कतार में खडे थे, अभी दर्शन हों सका, ‘तेरी तो राह देख रहा हैं शिवशंभो, जल्दी से जाकर दर्शन कर लो, अभी कोई नहीं हैं मंदिर में, आमची अवस्था फारच बिकट होती. सामान येथे ठेवून पाणी पिऊन जाण्याचा विचार मनात आला. पाठीवरील सॅक काढून थोडं पाणी पिऊन पाठ टेकताच केव्हा झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी बाहेर बोलण्याच्या आवाजाने एकदम जाग आली. तशीच उठून बाहेर आले… बघते.. तो.. काय??
वर्णनातीत.. नजारा समोर होता. खूप दिवसांपासून स्वतःच्या पायांनी चालून केदारनाथला येण्याचे स्वप्न पूर्ण झालेले मी उघड्या डोळ्यांनी बघत होते. उगवतीच्या दिनकराने त्याचे सहस्त्र बाहू कोवळ्या लोभस किरणांसोबत केदारनाथ शिखर आणि त्याच्या अफाट पसरलेल्या मांदियाळीवर अगदी मुक्तहस्ताने पसरले होते. जणू सोनेरी मुकुट घालून या सर्वांचा स्वागत.. सत्कार.. समारंभ चाललेला. या गडबडीत दाट धुकेही मागे हटण्यास तयार नव्हते. पांढर्या, निळ्या.. कृष्णवर्णी ढगांसोबत धुक्याची लगट पाहण्यासारखी होती. हे हिमालयीन निसर्ग कलेचं कोंदण अफाट अशा क्षितिजापर्यंत दाटीवाटीनं पसरलेलं.. बर्फाच्छादित हिमालयीन पर्वत रांगा अन नितळ निळे आकाश.. हा अलौकिक नजराणा अनुभवण्याचे.. डोळ्यात साठवण्याचे.. दर्शनापूर्वी अनुभवलेला निसर्गाविष्कार.. हा साक्षात्कार घेण्याचे सुख.. काय म्हणावे बरे याला? याचसाठी.. केला.. होता.. अट्टाहास..
दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. काल सकाळपासून केदारघाटी चढत असताना निसर्गाची अफाट, अद्भुत, किमयागारी रूपे जवळून न्याहाळता आली होती. ३५८१ मीटर..२२००० फूट मंदाकिनीच्या तटावर अभिमन्यूचा नातू जनमेजयाने इंटरलॉकिंग टेक्निक वापरून इतक्या उंचावर किमती दगड आणून मंदिर कसे उभारले असेल? मध्ये गेलेल्या हिमयुगात ४०० वर्षे ही मंदिरे बर्फाखाली गाडली गेली होती. आदी शंकराचार्य आठव्या शतकात सनातन हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी हिमालयात गेले असता ती मुक्त केलीत. मंदिराच्या शिळावर कोणतेही ओरखडे, खुणा दिसत नाहीत. स्कंध, वायू, केदारकल्प, केदार खंडात वर्णन आले आहे. बाराशे वर्षांपासून ही यात्रा सुरू आहे. नर आणि नारायणाला जवळ राहण्याचे वरदान दिले होते. गुप्तकाशी येथे गुप्त होऊन हिमालयीन रेड्याचे रूप धारण करून पांडवांच्या अपार श्रद्धा, नि:स्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन धरतीमधून प्रगट होऊन पाठीच्या रूपात त्रिकोणी शिवलिंग धारण करून पांडवांना दर्शन दिले.
त्याभोवतीच उखळ पद्धतीने एकसमान शिळा वापरून मजबूत मंदिर बांधले आहे. आद्य शंकराचार्यांनी देखभाल व पूजा कर्नाटकच्या लोकांकडे सोपवले होते. आजतागायत तसेच सुरू आहे. कन्नड भाषेत मंत्र उच्चारण होते. दरवाजे अक्षय तृतीयेला उघडून भाऊबीजेस ६ महिन्यांसाठी बंद होतात. मूर्ती मिरवणूक काढून ओखीमठ ‘येथे नेऊन पूजा करतात. येथे तेवत असलेला दीपक ६ महिने चालूच असतो. ६ महिन्यांनी कपाट उघडल्यावर सर्वत्र स्वच्छ आणि आताच पूजा केल्यासारखे प्रसन्न वाटते. फुले टवटवीत असतात. तेथूनच ५०० मीटरवर शिवाचा सेनापती वीरभद्र.. भैरवनाथाचे मंदिर आहे. क्षेत्रपाल म्हणून घाटीच्या संरक्षणाची जबाबदारी यांचीच असते. पाठीमागे आदी शंकाराचार्यांचे समाधीस्थळ आहे. भीमशिळाही आहे.
सारा इतिहास आठवत मंदिरासमोर आलो, तर भलीमोठी दर्शनरांग होती. आमचे सोबत असलेले मित्र श्री व सौ. दिवाकर यांच्या ओळखीतील मुख्य सायं पुजारी ‘औसेकर गुरुजी’ ( बार्शी ) यांच्या निवासस्थानी आम्ही चौघे गेलो. प्रसाद म्हणून दिलेला चहा थंडीमध्ये अमृतासमान भासला. त्यांनी आम्हाला ‘केदारनाथ महादेवाचे’ दर्शन त्वरित घडवले. चौकोनी चांदीच्या चौरंगात त्रिकोणी पाठीच्या आकारातील शिवलिंग बघून त्यापुढे नतमस्तक होऊन आम्ही धन्य.. धन्य झालो. तेथील स्पंदनांमुळे आमचा थकवा.. शीण कोठल्या कोठे पळाला. नंतरही त्यांच्या घरी नेऊन आम्हांस तेथील उदी आणि प्रसाद दिला. ज्या महंतांमुळे इतक्या गर्दीतही चटकन दर्शन झाले त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांना यथायोग्य दक्षिणा देऊन तंबूकडे निघालो.
सामान बांधून सॅक पाठीला लावल्या. अन.. उतराई सुरू केली. आता होत असलेली बर्फवृष्टी अधिक सुखावह वाटत होती. कारण दर्शनामुळे झालेली तृप्तता सोबत होती. रस्त्यात बर्फ फोडून बाजूला करण्याचे काम सुरूच होते. साडेतीन चार तासातच गौरीकुंड येथे पोहोचून गरम पाण्यात डुबक्या मारल्या. दोन तास टॅक्सीसाठी रांगेत उभे राहिलो. तेथून सोनप्रयागला आलो. तीन किलोमीटर चालत आमची गाडी असलेल्या ‘सीतापूर’ पार्किंगला गेलो. खूप मोठे पार्किंग असल्याने बर्याच चालीनंतर गाडी मिळाली. मग आम्ही गुप्तकाशी येथील आमच्या लॉजवर आलो. दोन घास खाल्ले. मनात विचार आला.. आमचे पाय आज किती चालले असतील बरे? भगवंताने त्याच्या कृपेचा वरदहस्त आमच्यावर ठेवून इतकी अवघड चढाई आमच्याकडून करून घेतली. कर्ता.. करविता परमेश्वर असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.