घरफिचर्ससारांशदसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा !

दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा !

Subscribe

कोकणात किंवा ग्रामीण भागात कोणताही सण असो त्याचा थेट संबंध हा शेतीशी जोडला गेला आहे. म्हणजे दसर्‍याच्या दिवसात नवीन भाताचे पीक घरात येते म्हणून दाराला भाताच्या केसराचे तोरण लावतात तेच गुढीपाडव्याला मात्र आंब्याचा टाळ बांधतात. दसरा हा सण म्हणजे अनिष्ट गोष्टींचा नाश करून त्यातून नवीन चांगलं कार्य करण्याचा त्यासाठी सीमा ओलांडून जाण्याचा दिवस. अनेक गावात त्यादिवशी गावाची सीमा ओलांडून तेथून गावच्या बाजूला असणारे शिमधडे (ज्या गावच्या सीमा एकमेकांना लागून आहेत, त्या सीमेच्या दुसर्‍या गावातील मानकरी व्यक्ती ) एकत्र येऊन पंचक्रोशीतर्फे गावच्या चव्हाट्यावर गार्‍हाणे घातले जाते. त्यात ह्या पंचसिमा एकत्र नांदून नव्याने काही बांधिलकी जपण्याचा प्रयत्न असतो. दसरा ह्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, त्याच्या साजरीकरणाच्या पद्धतीत जरी फरक असला तरी त्याच्या तळाशी अनेक परंपरा जपल्या गेल्या आहेत.

सध्या ऑक्टोबर हिट सुरु झाली आहे, पण ह्या गरमीत कुठे तरी परतीच्या पावसाला सुरुवात झाली आणि ह्या पावसाने लोकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. कोकणात सध्या भात कापणीला जोर आहे पण हा परतीचा पाऊस धिंगाणा घालून भात कापणीसाठी अडथळा झाला आहे. भाताच्या ओल्या लोंबी घरात येऊन पडतात. त्या सुकवायच्या कशा या चिंतेत असतानाच घटस्थापनेचा दिवस येतो. जिकडे तिकडे रंगाचा खेळ सुरु झालेला असतो ….अशातच

…..परवा दसरो हा….. परवा दसरो हा घोष घराघरात सुरु होतो. परतीच्या पावसाने असा धुमाकूळ घातला आहे, की एकदा हा पाऊस ओसरला की, दसर्‍याचा थोडा विचार करता येईल …..आता हा पाऊस राहू दे किंवा जाऊ दे…गावात दसरा होणार. कोकणातल्या प्रत्येक गावात राशीघर – गावातल्या देवाधर्माच्या कार्याला सुरुवात होते ते घर-आता ढोल ताश्यांनी निनादत असेल, गावचे मानकरी. मतकरी, घाडी-गुरव सर्व देवीला माळ घालण्याच्या तयारीत असतील. प्रत्येक जिल्हानुसार नव्हे तर गाव तालुक्यानुसार त्या त्या गावाची परंपरा वेगळी. ही परंपरा कशाशी जोडली गेली आहे तर गावात नांदणार्‍या एकोप्याशी, तिथल्या ग्रामसंस्कृतीशी आणि तिथल्या कृषीसंस्कृतीशी.कोकणातला दसरा हा तिथल्या कृषीसंस्कृतीशी खूप जवळचे नाते सांगतो. हा काळ तसं पाहिलं तर नाविन्याचा काळ, कारण भाताचं नवीन पीक घरात येतं, एकूणच दसर्‍याच्या काळात धान्याच्या राशी घरात लक्ष्मीची पावलं घेऊन येतात. दसर्‍याच्या दिवशी मात्र सकाळी लोक शेतात पोटी फुटेपर्यंत काम करत असतात. दसर्‍याच्या या वार्षिकाला मुळात सुरुवात होते ती संध्याकाळी.कोकणात देखील आपट्याची पानं लुटण्याची परंपरा आहे. ह्या बाबत जी दंतकथा सांगितली जाते, ती जरी पुराणकाळाशी जोडली गेली असली तरी तिचा सहसंबंध आजच्या काळाशी कसा लावता येईल का याचा विचार करता
असताना आपल्याला त्या कथेच्या मुळाशी गेलं पाहिजे.

- Advertisement -

आजच्या ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेच्या काळात जेव्हा शाळा ही घरात आली आहे असं जरी असलं तरी आजही दूरस्थ शिक्षण किंवा बाहेरच्या प्रदेशात जाऊन शिक्षण घेण्याची परंपरा आजही चालू आहे ,त्यामुळे आजच्या शिक्षण पद्धतीशी जरी तिचा सरळ संबंध नसला तरी गुरु शिष्य परंपरेला ही कथा पूरक आहे.असे म्हटले जाते की, वरतंतू नावाचे एक ऋषी आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. अर्थात तो काळ गुरुकुल व्यवस्थेचा आहे. त्यांच्याकडे बराचसा शिष्य समुदाय होता. त्या शिष्यात एक कौत्य म्हणून एक शिष्य होता. त्याने ज्ञानार्जनानंतर ह्या वरतंतू ऋषींना आम्ही शिष्यांनी आपणास गुरुदक्षिणा म्हणून काय द्यावे असा प्रश्न केला. त्यावर वरतंतूनी देखील ज्ञानाचे महत्व सांगून आपणास कोणतीच दक्षिणा नको म्हणून सांगितले तरी कौत्य काही केल्या ऐकेना, त्यावर वरतंतूनी ज्या अर्थी मी तुला चौदा विद्या शिकवल्या त्याअर्थी तू मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे असे सांगितले.

कौत्याला ही गोष्ट सहज शक्य आहे असे वाटले, त्याने रघुराजाकडे ह्या सुवर्णमुद्रांची मागणी केली, परंतु त्याक्षणी रघु राजा त्याची ती मागणी पुरवू शकला नाही. पण आलेल्या याचकाला रिक्तहस्ते पाठवू नये म्हणून रघुराजाने त्याला आजपासून तिसर्‍या दिवशी यायला सांगितले ….. ह्या चौदा कोटी सुवर्णमुद्रा देणारा एकच इसम म्हणजे कुबेर…त्यावर कौत्याची ती मागणी स्वर्गावर स्वारी केल्यास पूर्ण करता येऊ शकेल म्हणून, रघु राजाने स्वारी करण्याची तयारी केली. ही गोष्ट जेव्हा कुबेराला कळली तेव्हा कुबेराने अयोध्येत सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला …..त्यावर रघु राजाने कौत्याला ह्या सुवर्णमुद्रा घेऊन जाण्यास सांगितले त्यावर त्यातील आपणास हव्या असलेल्या चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौत्याने घेतल्या व उरलेल्या सुवर्णमुद्रा ह्या प्रजाजनात वाटून टाकल्या ….तो दिवस म्हणजे अश्विन शुद्ध दशमी होता आणि ज्या वृक्षावर हा सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला ते झाड हे

- Advertisement -

आपट्याचे होते म्हणून दसर्‍याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची परंपरा आहे, या कथेत फक्त आपट्याच्या पानांचे महत्व नाही तर गुरु शिष्य परंपरेचा एक मोठा आशावाद आहे, ह्याचा संबंध कुठल्याही क्षेत्रात गुरूच्या शब्दाला शिष्याच्या मनात किती आदर असावा हा एक सांस्कृतिक आणि सामाजिक भाव नक्कीच उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे दसर्‍याच्या आधी नऊ दिवस चालणारा नवरात्रीच्या उत्सवात सरस्वतीचे किती महत्व आहे याचा एक विचार होऊ शकतो.
दसर्‍याच्या साजरा करण्याबाबत जरी पौराणिक दाखले दिले जात असले तरी आजच्या काळात आपट्याच्या पानाचा
संबंध हा आरोग्यशास्त्राशी जोडता येतो. एकूण आजच्या काळात दसर्‍याचा साजरीकरणाशी अनेक दाखले जोडले जाऊ
शकतात. त्यामुळे सर्वत्र आपट्याची पाने देऊन दसरा साजरा करण्याचा प्रघात आहे.

गावच्या राशीघरातून देव वाजत गाजत देवळात आणले जातात. काही ठिकाणी देवांची पालखी गावच्या सीमेवर नेऊन पुन्हा मागे नेण्याची पद्धत आहे. गावच्या सीमेवर पालखी आणल्यावर तिथे गावाचा घाडी किंवा गुरव तिथल्या देवांना गार्‍हाणे घालतो आणि पुन्हा वाजत गाजत पालखी देवळात नेली जाते, तिथे नव्याने पिकलेल्या भाताची लोंबी
आणली जाते, त्याचे तांदूळ काढून त्या तांदळाची खीर बनवून प्रसाद म्हणून देण्याची काही गावात प्रथा आहे. शेवटी ही
पालखी आपट्याच्या झाडाजवळ आणून गावचे मानकरी पहिले सोने लुटतात, पण गाववाले त्या सोन्याची पूजा करून
एकमेकांना वाटतात.

सृजनाचा हा सोहळा म्हणून नव्याने आलेल्या भाताच्या केसराची गुंडी घराच्या दाराला लावून ह्या नाविन्य सोहळ्याला गाववाले सुरुवात करतात. दसरा हा सण एक दिवसाचा असला तरी घटस्थापनेपासून ह्या सणाला
लौकिकार्थाने सुरुवात झालेली असते, ह्या सृजनकाळाची नांदी गावच्या शाळेत होणार्‍या सरस्वतीपूजनाने होते. आजच्याकाळात देखील पाटीवर किंवा वहीत सरस्वतीची प्रतिमा काढून तिची पूजा करून सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची प्रथा गावात आहे …..हा कार्यक्रम केवळ गावातल्या विद्यार्थांपुरता मर्यादित राहिला नसून गावातले सुजाण नागरिक ह्या सोहळ्यात भाग घेतात.

आपट्याच्या पानांचा सोहळा हा घरोघरी जाऊन आनंद वाटण्याचा आहे… ह्या सामाजिक जाणिवेबरोबर त्यातील
सास्कृतिक महत्व तेवढेच अधोरेखित होते. कोकणात किंवा ग्रामीण भागत कोणताही सण असो त्याचा थेट संबंध हा
शेतीशी जोडला गेला आहे. म्हणजे दसर्‍याच्या दिवसात नवीन भाताचे पीक घरात येते म्हणून दाराला भाताच्या केसराचे
तोरण लावतात तेच गुढीपाडव्याला मात्र आंब्याचा टाळ बांधतात.
दसरा हा सण म्हणजे अनिष्ट गोष्टींचा नाश करून त्यातून नवीन चांगलं कार्य करण्याचा त्यासाठी सीमा ओलांडून
जाण्याचा दिवस. अनेक गावात त्यादिवशी गावाची सीमा ओलांडून तेथून गावच्या बाजूला असणारे शिमधडे (ज्या
गावच्या सीमा एकमेकांना लागून आहेत, त्या सीमेच्या दुसर्‍या गावातील मानकरी व्यक्ती ) एकत्र येऊन पंचक्रोशीतर्फे
गावच्या चव्हाट्यावर गार्‍हाणे घातले जाते, त्यात ह्या पंचसिमा एकत्र नांदून नव्याने काही बांधिलकी जपण्याचा प्रयत्न
असतो.

दसरा ह्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, त्याच्या साजरीकरणाच्या पद्धतीत जरी फरक
असला तरी त्याच्या तळाशी अनेक परंपरा जपल्या गेल्या आहेत. चार पाच वर्षापूर्वी मी अमरावतीला सासुरवाडीला गेलो
तेव्हा रुक्मिणीच्या मंदिरात मला सासरची मंडळी घेऊन गेली. तिथल्या काही व्यक्तींनी मला एक अजब माहिती दिली, तिथल्या देवळात अनेक घंटा बांधल्या होत्या. त्या अनेक घंटा बघून मी विचारले की, एवढ्या घंटा इथे का बांधल्या
आहेत…..घंटा तरी किती विविध ! …अनेक छोट्या मोठ्या घंटा. त्यावर कळले की, इथे दसर्‍याला घाट किंवा घंटा
बांधायची पद्धत आहे.

इथला दसरा साधारणपणे कोकणातल्या चालीरीतीशी समांतर, कोकणात जशी देवळातून पालखी काढत आपट्याच्या
झाडापर्यंत नेतात तशी इथे देखील पद्धत आहे… पण इथल्या मातीशी नाते सांगण्याची इथल्या लोकांची एक वेगळी पद्धत. इथल्या लोकांनी मला अजब माहिती दिली ती म्हणजे …दसर्‍याच्या दिवशी सर्वत्र रावण जाळण्याची प्रथा आहे
मात्र. इथून जवळ असलेल्या अकोल्यात सांगोळा गावात मात्र रावणाची पूजा केली जाते. अर्थात हा प्रकार नक्की काय हे
जाणून घेण्यासाठी मी तिथे बसलेल्या एका वृद्ध माणसाला तो प्रश्न केला तेव्हा त्यावर त्यांनी जी माहिती सांगितली
त्यानुसार अकोल्यापासून काही अंतरावर असणार्‍या या गावात कोणी एका महात्म्याने तपश्चर्या केली, तिथल्याच एका
कलाकाराने त्या महात्म्याची मूर्ती घडवण्याचा प्रयत्न केला ….पण ती मूर्ती घडताना घडली ती रावणाची दहा तोंडे
आणि वीस डोळे असलेली…. त्यामुळे इथे ती मूर्ती स्थित होऊन लोक तिथे पूजा करू लागले.
रावण जशी अहंकारी होता, प्रवृत्तीने दृष्ट होता तरी तो ज्ञानी होता, ज्ञानी म्हणून तिथले लोक त्याची पूजा करतात.
आजही समाजात असा अहंकार किंवा मतपणा जपणारे कितीतरी शिक्षणमहर्षी म्हणून मिरवतात की, आजच्या
सामाजिक जीवनात ह्या दृष्टीने पाहू गेल्यास रावण ही व्यक्ती नसून ती प्रवृत्ती होती, रावणाला लोक जाळतात किंवा दहन
करतात ती दृष्टप्रवृत्ती म्हणून. रावणाला दहा तोंडे नाहीतर दहा प्रकारचे अभिमान होते. त्यामुळे इथला दसरा किती
वेगळा आहे हेदेखील आपल्या लक्षात येते.

दहा बारा वर्षापूर्वी सातारा फिरताना दसर्‍याच्या आधीचे काही दिवस अनुभवायला मिळाले. तिथला थाट काही
वेगळा …एकतर कोल्हापूर किंवा सातारा ह्या संस्थानिक परंपरा लाभलेल्या शहरात आणि आजूबाजूंच्या गावात सण
सोहळे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. तिथला राजेशाही थाट सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. आम्ही ज्या दिवशी
सातार्‍याच्या म्हसवडमध्ये पोचलो तो दिवस बहुतेक अष्टमीचा होता. गावच्या प्राथमिक शाळेत कसला कार्यक्रम होता
म्हणून तिथे गावकरी उभे होते ….आम्ही देखील तिथेच उभे राहिलो. बघतो तर भोंडला सुरु होता.
शाळेला मोठ्ठ पटांगण होतं. त्याच्या मध्यभागी स्टूल ठेवलं होतं त्यावर छान हत्तीचं चित्र काढून सर्व मुलं गाणी म्हणत
होती. लोकसंस्कृती ही अशी विस्तारत जाते. त्या गाण्याच्या सुरात अचानक पायांनी ठेका धरला …गेल्या कित्येक वर्षात ही गाणी ऐकली नव्हती. लहानपणी आपणावर हे लोकसंस्कृतीचे संस्कार कळत नकळत होत असतात, पण पुढे ह्या संस्कृतीची आपणाला लाज वाटते. ह्या संस्कारक्षम वयात ही मुलं छान गाणी म्हणत होती.

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
गोदावरी काठच्या उमाजी नायका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
किंवा
नणंदा भावजयी दोघी जणी
घरात नव्हते तिसरे कोणी
शिक्यावरच लोणी खाल्लं कोणी

मी नाही खाल्लं वहिनीने खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी

अशी नातेसंबंध रूढ करणारी कितीतरी गाणी चालू होती. कोणी त्याला भोंडला म्हणत तर कोणी त्याला हादगा म्हणत.
हत्तीच्या रुपकाशी जोडून घेणारा हा सण किंवा सोहळा त्यादिवशी इतका मनात भरून राहिला की, त्याची सय काही
उतरेना. सातार्‍यातला दसरा तसा राजेशाही या दिवशी जल मंदिरातील भवानी तलवारीचे पूजन करण्यात येते, हा
सोहळा बघण्यासाठी सातारकर अलोट गर्दी करतात. पूजन झाल्यावर ही तलवार लाकडी पालखीत ठेवण्यात येते. आणि
मग मिरवणूक सुरु होते. ह्या पालखीच्या पुढे राजघराण्यातील मानकरी, त्यात सर्व स्त्रिया नऊवारी साडी परिधान
केलेल्या असतात. त्याच्या पुढे सनई चौघडा आणि त्याबरोबर शिंग आणि तुतारी सतत वाजत असते. एकदा इथे शस्त्रपूजा झाली की, मग नागरिक एकमेकांना सोनं देऊन ह्या दसर्‍याचा आनंद लुटतात.

गेली कित्येक वर्षे ही परंपरा ह्या ठिकाणी तहहयात चालू आहे. काळ आणि तंत्रज्ञान इतके पुढे गेलं तरी ह्या परंपरा
सातारकरांनी आजही जपल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार मराठवाड्यातील थोर संत जनाबाई यांच्या जन्मभूमीत
तिरुपती तिरुमला बालाजीचे उपपीठ आहे तिथे मराठवाड्यातील मोठा दसरा संपन्न होतो. जवळपास पन्नास फुट उंच
रथ सजवला जाऊन त्यात बालाजीची मूर्ती ठेऊन त्यावर भाविक बत्तासे उडवतात. गावभर हा रथ फिरून आणून शेवटी
पुन्हा मंदिरात आणतात.

एकंदरीत हे सगळे बघता संपूर्ण महाराष्ट्रदेशी दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याला काही परंपरा
आहेत, काही रूढी आहेत, त्याला काही ऐतिहासिक दाखले आहेत, पण ह्या सगळ्याच्या मागे कुठली तरी एक अनाम शक्ती आहे. ही शक्ती कुठली दैवीयोग नाही तर त्यामागे काही ठोस परंपरा आहेत. लोकांना परंपरा फार जवळच्या वाटतात. हे साहजिक आहे. सण सोहाळे हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे, जगण्याला हुरूप देणारे एक माध्यम आहे.

या माध्यमामुळे आपपरभाव गळून पडून पुन्हा एकदा जगण्याला उभारी येते. मागील कित्येक दिवसाची मरगळ निघून
जाते. आज महाराष्ट्राचा शेतकरी ऑक्टोबर महिन्यातल्या उन्हाच्या झळा सोसून शेतात राबतो आहे …ही त्याच्या
सृजनाच्या निर्मितीत ..त्याच्या कृषीप्रधान संस्कृतीत हा दसरा मोठा भाग आहे. इथल्या मातीतल्या शेतकर्‍याने ह्या
सोहळ्याला त्याच्या कृषीसंस्कृतीशी जोडून घेतले. ह्या सणाला आपल्या जगण्याचा भाग करून घेतले.
महाराष्ट्रातल्या काही भागात दसर्‍याच्या दिवशी गोठ्यातल्या गायी म्हशींना ओवाळतात कारण गायी -म्हशी ह्या त्या
शेतकर्‍याच्या जगण्याचा एक भाग आहे. शिंगाना रंग लावून त्यादिवशी त्यांना सजवून त्यांना गोडधोड करण्याची पध्दत
ही मानवी संस्कृती नाही का ? मला वाटतं देशातल्या वेगवेगळ्या भागात ही संस्कृती कमी अधिक फरकाने जाणवते
कारण ह्या कृषीप्रधान देशात सणाच्या दिवशी जो मान पोरांचा तोच मान गुराढोरांना दिला जातो.
स्त्रीच्या वेगवेगळ्या रूपांचे पूजन ह्या नऊ दिवसात केले जाते तरी ही पुजकता एका विशिष्ठ प्रवृत्तीत जाणवते पण बाकी
आजही हुंडाबळी, बलात्कार, स्त्री शिक्षण ह्या बाबत काही लोक उदासीन आहेत, आजची एकविसाव्या शतकात स्त्रीभ्रूणहत्या हा प्रश्न आजही तेवढाच ज्वलंत आहे. मला वाटतं दसरा हा सण हा सगळ्या समस्यांना वेगळ्या दृष्टीने बघायला शिकवतो. दसरा हा केवळ सण नाहीतर तो शिकवण देणारा सोहळा आहे. त्यात आबालवृद्ध आपले संकल्प सोडतात.

ज्या परंपरेला आम्ही जपतो. त्या परंपरेचा एक सन्मान म्हणजे दसरा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दसर्‍याचा
सोहळा म्हटलं की, डोळ्यासमोर आजही गावातल्या घरासमोरचे तुळशीवृंदावन दिसते. तिथे आई किंवा काकी रांगोळी
घालताना दिसते. चुलते भाताची केसरं आणून ती दाराला बांधताना दिसतात. मोठ्या घरात भवानीला प्रत्येक दिवशी माळा पडतात. पावणादेवीच्या देवळात असलेल्या खांबांना रंगवून त्यांची पूजा करून त्यांची कुळाशी गाठ घालून दिली जाते.
नारळ पुढच्या सदरेवर फुटले जातात आणि रवळनाथाच्या समोर उभा असलेला मी गुरवाने घातलेलं गार्‍हाणे ऐकतो
आहे

बा देवा रवळनाथा !
तू चातुर्सिमेचो अधिकारी
लिंगा, जैना, ब्राम्हणा
तू पाच पुरी बारा आकार
आज तुझा लेकरू तुझ्या भेटिक इला हा
आज दसर्‍याच्या निमतान
हातभेटीचो नारळ ठेयल्यान हा
तो मान्य करून घी
त्याका नोकरी धंद्यात यश दी
बायको पोरांका सुकी ठेय
काय चुकला माकला असात तर
पायाबुडी घाल
नी बरा कर म्हाराजा !

गुरावाचं कडकडीत गार्‍हाणे झालं की, घरी येताना भाताची पेंडकं घेऊन घराकडे जाणारी अनेक माणसं भेटायची, विचारायची काय रे बाबू ….देवळात जावन इल? मी होय उत्तर दिलं की, एकदा ही पेंडका घराक टाकलाव की
आमी पण जावन येव देवळात …… .मला माहीत असत ही माणसं आता काही देवळात जाणार नाहीत…सणाला ही एक
कारुण्याची किनार आहे ..ह्यांच्या मागचे कष्ट संपत नाहीत. ह्यांचासाठी त्यांची जमीन हेच देऊळ आणि त्यात पिकलेलं
धान्य म्हणजे आशीर्वाद …..
दसर्‍याचा काय कोणत्याही सणाला हे असंच असतं, तरी आपल्यासाठी दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा ….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -