घरफिचर्ससारांशशिक्षण संस्थांची झाली संस्थाने!

शिक्षण संस्थांची झाली संस्थाने!

Subscribe

आज शिक्षण संस्थांना स्पर्धेसाठी मुले तयार करायची आहेत म्हणून मूल्यांची पेरणी आणि मूल्यांचा विचारही महत्त्वाचा वाटेनासा झाला आहे. शिक्षण संस्था संस्थाने झाल्यासारख्या वाटू लागल्या आहेत. त्यामुळे त्या संस्थानांचा प्रभाव आपल्या समाज जीवनावरही दिसू लागला आहे. आपण आज सत्ता आणि संपत्तीत गुंतलो आहोत. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी स्वच्छ व निर्मळ शिक्षणाच्या दिशेचा प्रवास अधिक महत्त्वाचा आहे.

– संदीप वाकचौरे

शिक्षणाने प्रत्येक माणूस शहाणा व्हायला हवा म्हणून शिक्षणातून होणारी पेरणी शहाणपण उगवेल अशीच व्हायला हवी आहे. शिक्षण घेतलेली प्रत्येक व्यक्ती ही मानसिक भीतीबरोबर बाह्य भीतीपासून मुक्त असायला हवी. जे शिक्षण माणसाला मुक्त करीत नाही ते खरे शिक्षण नाही. आपल्याला मुक्त व्हायचे असेल तर कशापासून मुक्ती हवी हे ठरवायला हवे. शिक्षण जीवन सुखी, समाधानी आणि आनंदी करण्यासाठी आहे. त्यामुळे हे क्षण वाट्याला यावेत म्हणून यातील अडथळे दूर करण्याची गरज आहे. ते काम शिक्षणाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या ह्दयात मुक्ततेचा विचार रूजला तरच जीवनात यशाचे शिखर सहज पादाक्रांत करता येईल. शिक्षणाने जीवनातील समस्यांपासून मुक्ती देण्याची गरज आहे. शिक्षणाने मुक्ततेचा विचार रूजविल्याशिवाय परिवर्तनाची वाट सापडणार नाही.

- Advertisement -

आज आपल्या जीवनात आपण अधिक बंदिस्त होत चाललो आहोत. आपली आसक्ती उंचावत आहे. आपल्याला अनासक्त वृत्तीचे दर्शन घडायला हवे, मात्र अपेक्षेप्रमाणे शिक्षणाचा परिणाम समाजमनावर होताना दिसत नाही. शिक्षित माणूस आज अशिक्षित माणसांपेक्षा अधिक र्‍हासाच्या दिशेने प्रवास करीत आहे. आज जीवनाचा आनंद मिळविण्याऐवजी जीवन जगण्याची भीती वाटू लागली आहे. कधीकाळी लोकांना मरणाची भीती वाटत होती. आज माणसांना जगण्याची भीती वाटू लागली आहे. असे का घडावे याचा विचार करायला हवा. समाजातील होणार्‍या या बदलांकडे गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. शिक्षणाचा विचार शिक्षण संस्थांनी केल्याशिवाय आपल्याला नव्या वाटा सापडणार नाहीत.

शिक्षण संस्थांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचा विचार पेरायचा असतो. तो भाव मनामनात रूजायला हवा असतो, मात्र ते काहीच उगवले जात नाही. शिकलेल्या माणसांच्या मनात अधिक द्वेष, मत्सर, राग, लोभ, अहंकार भरलेला आहे. अधिक खोट्या मुलामी मुखवट्यात स्वत:ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपला भोवतालही तेच सांगत आहे. आज शिक्षण संस्थांना स्पर्धेसाठी मुले तयार करायची आहेत म्हणून मूल्यांची पेरणी आणि मूल्यांचा विचारही महत्त्वाचा वाटेनासा झाला आहे. शिक्षण संस्था संस्थानिक झाल्यासारख्या वाटू लागल्या आहेत. त्यामुळे त्या संस्थानांचा प्रभाव आपल्या समाज जीवनावरदेखील दिसू लागला आहे. आपण आज सत्ता आणि संपत्तीत गुंतलो आहोत. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्याचा विचार करावा लागणार आहे. त्यासाठी स्वच्छ व निर्मळ शिक्षणाच्या दिशेचा प्रवास अधिक महत्त्वाचा आहे.

- Advertisement -

आज शिक्षण संस्थांचा विस्तार अधिक झाला आहे. पदवीधरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षण घेऊन व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन होत नाही. शिक्षणाचा विचार केवळ पदवी आणि माहितीपुरता उरला आहे. जी माहिती मिळाली आहे तिचा जीवन उन्नतीकरिता उपयोग करावा वाटत नाही. माहिती परीक्षेपुरती मर्यादित आहे, मग ज्ञानाची भूक लागत नाही. जिज्ञासा आणि ज्ञानाची ओढ नसेल तर शिक्षण तरी कसे म्हणावे. शिक्षणाचा लाभ जीवन उन्नतीसाठी होत नाही, मग शिक्षण नेमके कशासाठी, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. शिक्षणाचा हेतू साध्य न होता त्याचा विपरीत परिणाम समोर येत आहे. त्यामुळे शिक्षणाकडे उन्नतीसाठी न पाहता त्यापलीकडे शिक्षणाचा विचार केला जाऊ लागला आहे. शिक्षण फक्त लाभापुरते ठरू लागले आहे. स्वहिताच्या पलीकडे शिक्षणाचा विचार होईनासा झाला आहे.

मुल्ला नसरुद्दीनच्या संदर्भाने शिक्षणाच्या झालेल्या परिणामाबाबत ओशोंनी अत्यंत सुंदर गोष्ट सांगितली आहे. त्या कथेतील मतितार्थ अगदी महत्त्वाचा आहे. मुल्ला नसरूद्दीन एका शाळेत शिकवण्यासाठी नियमित जात असे. शाळेत जाण्यासाठी वाहन म्हणून गाढवाचा उपयोग करीत होते. अनेक दिवस मुल्लांसोबत गाढवही शाळेत जात होते. कारण मुल्ला नसरूद्दीनला शाळेत पोहचविण्याची जबाबदारी गाढवावर होती. त्यामुळे गाढवही शाळेत नियमित जात होते. शाळेत मुल्ला नसरूद्दीन रोज जाऊन नेमके काय करतो असा विचार गाढव करीत होते. अखेर एक दिवस त्याने मुल्लाला प्रश्न विचारलाच. मुल्ला, रोज शाळेत जाऊन तुम्ही काय करता, प्रश्न मोठा कठीण होता,पण उत्तर देण्याची जबाबदारी मुल्ला नसरूद्दीनवर आली होती. खरंतर गाढव बोलत नाही, पण शाळेत येऊन गाढव बोलू लागले होते. अखेर मुल्लाने गाढवालाच विचारले, अरे मी तेथे जाऊन काय करतो हे समजावून घेऊन तू काय करणार आहेस? तेव्हा गाढव म्हणाले, पण तुम्ही नेमके काय करता हे जाणण्याची उत्सुकता आहे इतकंच.

तेव्हा मुल्ला म्हणाले, मी रोज येथे शिकवायला येतो, पण येथील मुले शिकून काय करणार आहेत, आता तर मोठी अडचण झाली होती. मुल्ला गाढवाला म्हणाले, अरे गाढवा, आपण शिकलो की अक्कल येते. गाढव म्हणाले, पण अक्कल आली तर काय घडेल? तेव्हा मुल्ला चिडून म्हणाले, अरे, मला अक्कल आली म्हणून तर मी तुझ्यावर स्वार होत आहे ना! हे ऐकल्यावर गाढव म्हणाले, मग मुल्लाजी मलाही द्या की थोडीशी अक्कल, मग मुल्ला विचारातच पडले, आता काय करायचे? तेव्हा मुल्ला गाढवाला म्हणाले, अरे मी तुला अक्कल दिली तरी तू माझ्यावर स्वार होशील. मी नाही देणार तुला अक्कल, पण का नाही देणार? अरे, गाढवा, शिक्षण घेतले की दुसर्‍यावर स्वार होता येते. किंबहुना ती वृत्ती शिक्षणातून निर्माण करता येते. माझ्यावर तू स्वार होणार असशील तर तुला शिक्षण का द्यायचे? हे जाणून घेतल्यावर आज शिक्षणाची अपेक्षित पेरणी होत नाही याचे कारण नेमके काय असावे, असा प्रश्न पडतो.

खरंतर सार्‍या शिक्षणातून आपण जे काही पेरतो आहोत, त्याचा अधिकाधिक उपयोग एकमेकांवर स्वार होण्यासाठीच केला जात असतो. शिक्षण घेतलेली माणसं आपणच कसे शहाणे आहोत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. शिकलेल्या माणसांना एकमेकांवर कुरघोडी करण्यात, एकमेकांची जिरविण्यात अधिक रस वाटतो. शिक्षणातून अहंकाराची पेरणी केली जात आहे का, तो अहंकार पोसण्यासाठी आपल्याला जे जे काही करावे लागेल ते सारे शिक्षणातून पेरले जात आहे. लोकांना आपले काम कमी करणे आणि इतरांवर लादण्यात अधिक रस आहे. शिक्षणाने माणसं कामचुकार झाली आहेत का, असे प्रश्न पडावेत असे चित्र आहे. श्रमापासून माणसं तुटत आहेत. श्रम आणि शिक्षण यांचे नाते नाही. त्याउलट कष्टकरी वर्गाबद्दल मनात अधिक द्वेषभावना निर्माण होत आहे.

श्रमप्रतिष्ठा हे केवळ मूल्य उरले आहे. मत्सर, द्वेष, राग, लोभ हे षढ्रिपू तर मनामनात घर करून आहेत. शिक्षणातून जी काही साक्षरता आली आहे तिचा आपल्यालाच अधिकाधिक फायदा व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्यातील संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असताना शिक्षणाचे प्रमाण वाढल्यानंतर संघर्षाचा आलेखच अधिक उंचावत आहे. शिकलेली माणसं संघर्षात जिंकतात. कारण शिक्षणाचे तर हे फलित आहे. शिकल्यानंतर ह्दय विशाल होण्याची गरज असताना ह्दये अधिक सकुंचित होत चालली आहेत. आपल्याकडे ज्या पदव्या आहेत त्या ज्ञानाच्या नाहीत तर केवळ माहितीच्या आहेत. आपण व्यवस्थेत लढा देण्यासाठी, परिवर्तनासाठी शिक्षणाचा उपयोग करीत नाही. आपण जो लढा उभारत आहोत तो केवळ स्वहितासाठी आहे.

विद्यालयातून दिले जाणारे शिक्षण म्हणजे हिंसेचा फैलाव आहे. माणसं अहिंसेच्या दिशेने जावीत म्हणून शिक्षणात साधुसंत, महापुरुष आणि धर्माचा विचार पेरला जात आहे, मात्र अहिंसा दिसत नाही. शिक्षित मंडळी अधिक कुशलतेने शोषण करीत आहेत. शिक्षण दुसर्‍याच्या जीवनात सुख मिळावे म्हणून असण्याची गरज असताना तसे काही पेरले जात नाही. शिकलेली माणसं कायदा मोडण्यात प्रतिष्ठा मानतात. त्यामुळे नियम, कायदे असतानादेखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर गुन्ह्याचा आलेखही उंचावत आहे. कायद्याचे पालन करण्याची गरज असताना आपल्याकडे कितीतरी मोठ्या प्रमाणावर कायदेभंग केले जात आहेत. भ्रष्टाचाराच्या आलेखात शिक्षित मंडळीच आघाडीवर आहेत. कायद्याने जे करू नये असेदेखील तुम्ही करण्याकडे कल वाढत आहे. सर्व शिक्षण हे बेईमानाचे शिक्षण आहे का, अशा प्रश्न विचारला जात आहे. वर्तमानातील शिक्षणातून कोणी ज्ञानी झाले की नाही, हा प्रश्न आहे. उलट शिक्षण घेऊनही अज्ञानच वाढत चालले आहे. त्यामुळे आपली विद्यालये आहेत की अविद्यालये आहेत, असा प्रश्न पडतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -