– प्रा. किरणकुमार जोहरे
‘बायोट्रोनिक्स’ म्हणजे मानवी शरीराचे इलेक्ट्रॉनिक्स अद्भुत आहे. अविश्वसनीय वाटावे अशा करामती मानवी शरीरात वाहणारी विद्युतधारा म्हणजे सूक्ष्म करंट घडविते. याच शरीरातील विद्युत प्रवाहाला हवेतसे बदल करीत मानवी मेंदूवर बाहेरून म्हणजे ‘रिमोट कंट्रोल’ आता शक्य झाले आहे. भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे रजोगुणी व तपोगुणी मानवी शरीराच्या अनेक मर्यादा आहेत. इलेक्ट्रॉनिक्स ‘ब्रेन चिप’ टेक्नोलॉजी हे ‘सत्वगुणी ह्युमनाइड कोबोट (कोलॅबरेटिव्ह रोबोट)’ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)द्वारे मानवाची जागा घेण्याच्या धोक्याबद्दल निर्माण होणारी चिंता कमी करण्यास हे मदत करते.
डिमांडप्रमाणे हवी तशी फिचर्स व कॅरेक्टर्स असलेली कस्टमायझेशन स्मार्ट मुले कदाचित नजीकच्या काळात लॅबमध्ये फॅब्रिकेट होत तुमच्या घरापर्यंत ऑनलाईन ऑर्डर देत सप्लाय होतील. आज वैद्यकीय कारणांसाठी मिळालेली मानवी मेंदूवरील ‘ब्रेन चिप रोपण प्रयोग’ परवानगी उद्या कोणती दिशा घेईल व कोणते रंग उधळत तिची दशा काय होईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे. ह्युमन एआय सिम्बायोसिस तसेच ‘इलेक्ट्रॉनिक्स ब्रेन चिप टेक्नोलॉजी’मुळे अमरत्वाच्या दिशेने मानवी सभ्यतेचा प्रवास हा ‘मरावे परी डाऊनलोड रूपी उरावे!’ असाच असणार आहे, हे मात्र निश्चित!
येत्या काळात ‘सांग सांग भोलानाथ भारतातही मेंदूत चिप बसेल का? मंगळावरती जायला प्राध्यापक-शिक्षकांनादेखील कायमचीच सुट्टी मिळेल का?’ अशी गाणी तुम्हाला ऐकायला आवडेल का? शाळा-महाविद्यालयात ज्ञानार्जनासाठी जाण्याची गरजच उरणार नाही, कारण इलेक्ट्रॉनिक्स ‘ब्रेन चिप’ टेक्नोलॉजी हे नजीकचे वास्तव घराघरात पोहचणार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
‘इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम’च्या पुढे…
‘बायोट्रोनिक्स’ म्हणजे मानवी शरीराचे इलेक्ट्रॉनिक्स अद्भुत आहे. मेंदूच्या पेशी विद्युत आवेगांद्वारे संवाद साधतात आणि झोपेत असतानाही त्या नेहमी सक्रिय असतात. ‘ब्रेन चिप’ च्या उगमाची सुरुवात फार जुनी आहे. आजपासून ९९ वर्षांपूर्वी जर्मन मानसोपचारतज्ज्ञ हॅन्स बर्गर यांनी त्यांच्या वयाच्या ५१ व्या वर्षी म्हणजे सन १९२४ मध्ये सर्वप्रथम मानवी ईईजीवर नोंदी घेत मेंदूचा अभ्यास केला. ईईजी म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम ही मेंदूची माहिती घेण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी एक चाचणी आहे. ईईजी मेंदूच्या विद्युत सिग्नलची नोंद घेते. अपस्मार आणि झोपेच्या विकारांचे निदान करण्यात मदत करण्यासाठी डॉक्टर ईईजी वापरतात. ईईजीमध्ये साधारणतः ६४ किंवा अधिक इलेक्ट्रोडचा वापर केला जातो, मात्र इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम’च्यापुढे वाटचाल करीत थेट मेंदूलाच इलेक्ट्रॉनिक्सच्या तालावर नाचविले जाणार आहे, नव्हे जात आहे, अशी ‘ब्रेन चिप’ बनली आहे.
…अशी आहे इलेक्ट्रॉनिक्स ‘ब्रेन चिप’!
ट्विटर, स्पेसएक्स, टेस्ला आणि असंख्य कंपन्यांचा मालक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ख्याती असलेल्या एलॉन मस्कची अजून एक कंपनी आहे ‘न्यूरोलिंक’! या न्यूरोलिंकची स्थापना २०१६ मध्ये झाली, मात्र त्याआधीपासून सुरू असलेले इलेक्ट्रॉनिक्स ब्रेन चिप बनविण्याचे असंख्य प्रयोग अयशस्वी झालेत, मात्र एकामागून एक अपयशानंतर आणि असंख्य उंदीर, मेंढ्या, माकडं, डुकरं हे ‘गिनीपिग’ प्रयोगातून यमसदनी गेल्यावर आता ‘ब्रेन चिप’ प्रयोग यशस्वी झाले. ब्लूटुथ टेक्नोलॉजीने २०२१ माकडावर प्रयोग केला गेला आणि ही ‘ब्रेन चिप’ मिळाल्यानंतर ९ वर्षांचे माकड अक्षरशः व्हिडीओ गेम खेळू लागले. जर माकडाला प्रयोग यशस्वी होऊ शकतो तर माणसांवरदेखील ते शक्य आहे, पण अडचण होती अशा प्रयोगाच्या परवानगीची आणि आता तो मार्गही मोकळा झाला आहे.
मे २०२३ मध्ये अमेरिकेतील सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी जबाबदार असलेल्या फूड अॅन्ड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (एफडीआय)ने ह्यूमन क्लिनिकल स्टडी ट्रायलला परवानगी दिली आहे. म्हणजे आता थेट मानहानीचा ‘गिनीपिग’ बनवत माणसांवर प्रयोगशाळेत ‘ब्रेन चिप’ बसविली जाणार! मानवी मेंदूत सिलिकॉनची इलेक्ट्रॉनिक्स ‘ब्रेन चिप’ म्हणजे आयसी (इंटिग्रेटेड सर्किट) बसविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्पर्धा ‘ब्रेन चिप’ची!
एलॉन मस्क हे एकटेच ‘इलेक्ट्रॉनिक्स ब्रेन चिप टेक्नोलॉजी’ बनवित नाहीत, तर त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हेदेखील आहेत. त्यांनीदेखील ‘सिंक्रोन’ या मेलबर्न, ऑस्ट्रेलियामध्ये मुख्यालय असलेल्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. यापूर्वीच ‘सिंक्रोन’ या कंपनीने मेंदू-संगणक इंटरफेसची (बीसीआय) चाचणी मानवांमध्ये केली आहे.
वैद्यकीय क्षेत्रात फायदे!
वैद्यकीय क्षेत्रात या ‘ब्रेन चिप’ची किमया हा मोठा फायदा होणार आहे. ब्रेन डिसऑर्डर, अर्धांगवायू, मणक्याचे आजार, मूक, कर्णबधिर, अंधव्यक्तींनाही पाहता येण्यासाठी रुग्णांना ‘इलेक्ट्रॉनिक्स ब्रेन चिप टेक्नोलॉजी’चा माऊस, मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या डिजिटल उपकरणांचा वापर करीत सहाय्यभूत उपयोग होणार आहे.
न्यूरोलिंक १
‘न्यूरोलिंक १’ हा मानवी मेंदूत ‘ब्रेन चिप’ इम्प्लांट करण्याचा प्रोजेक्ट आहे. सर्जिकल रोबोट चार वापर करीत केसांच्या आकाराचे छिद्र मानवी कवटीला पाडून मानवी मेंदूत प्रत्यक्षात अनेक इलेक्ट्रॉनिक्स ‘ब्रेन चिप्स’ बसविल्या जातील. ‘ब्रेन चिप’मध्ये लहान आणि लवचिक इलेक्ट्रोड ‘थ्रेड्स’ म्हणजे धाग्यांची रांग म्हणजे अॅरे वापरलेले आहेत. मानवी मेंदूतील ‘न्यूरॉन्स’शी संलग्न होत या इलेक्ट्रॉनिक्स चिपमधील धागे संदेशवहन करतील. ‘न्यूरोलिंक १’ मध्ये ९६ थ्रेड्समध्ये ३०७२ इलेक्ट्रोडचा वापर असलेली ‘ब्रेन चिप’ ही थेट मेंदूबरोबर संदेश वहन व संवाद करीत मेंदू व शरीरातील अवयव वापरासाठी करता येणार आहे.
एक वायरलेस बॅटरी या सर्वांना ‘पावर’ देणार आहे. मोठ्या नाण्याच्या आकाराच्या उपकरणामध्ये हवाबंद इलेक्ट्रॉनिक्स सर्किटचा समावेश असेल. न्यूरोलिंकच्या फर्स्ट जनरेशन टेक्नोलॉजीतील ‘ब्रेन चिप’ मध्ये १०२४ इलेक्ट्रोड होते, मात्र आता नवीन ‘एडव्हान्स्ड व्हर्जन’ मध्ये इलेक्ट्रोडची संख्या १६ हजारांपेक्षा जास्त असणार आहे, जे एक क्रांतिकारी पाऊल असेल. न्यूरालिंकचे पहिले उत्पादन ‘लिंक’ हे घराघरातील लोकांना त्यांच्या मनात विचार येताक्षणी संगणक किंवा मोबाईल डिव्हाईस नियंत्रित करता येईल या हेतूने बनविले जात आहे.
एवढा खटाटोप कशासाठी?
‘स्पेसएक्स’ या खासगी अंतराळ कंपनीतर्फे रियुजेबल रॉकेट निर्मिती सुरू केली. ‘स्टारलिंक’ तर्फे अल्प दरात, वेगवान व कमी विलंबाने कम्युनिकेशन करणारी जागतिक सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू केली आहे. टेस्ला मानवरहीत वाहन निर्मिती करीत आहे. ओपन एआयतर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या माध्यमातून जगभरातील ज्ञानसाठा आणि मानवी संवाद वर्तणूक जाणून घेण्यासाठी ‘ट्विटर’ अशा एलॉन मस्कच्या विविध कंपन्यांचा एकत्र विचार केला, तर स्पष्टपणे लक्षात येते की, हा सर्व खटाटोप पृथ्वीवरून परग्रहावर स्वारी करीत मानवी वस्ती स्थापित करण्यासाठी आहे.
मंगलमय दूरदृष्टीतील ‘मंगळ’!
पृथ्वीवरील लोकसंख्या ८ अब्जाच्या पलीकडे गेली आहे आणि एक तृतीयांश लोकसंख्येपेक्षा जास्त लोक हे रोज अन्नधान्याच्या व शुद्ध पेयजलाच्या अभावी उपाशीपोटी तडफडत आहेत. या प्राथमिक गरजांवर तातडीने जागतिक एकत्रित स्तरावर उपाययोजना करीत अन्नसुरक्षा व पेयजल उपलब्ध न केल्यास पृथ्वीवर माजणारी अराजकता ही लवकरच नियंत्रणाबाहेर असेल. अशावेळी पृथ्वीवरून ‘ग्रहांतरा’साठी मंगलकारी ग्रह कोणता? तर मंगलमय दूरदृष्टीतील मंगळ हाच होय!
मानवी मर्यादांवर मात!
मंगळावरील वातावरणात ९६ टक्के कार्बनडायऑक्साईड आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी नासा या अमेरिकन संशोधन संस्थेने मंगळावर पाठविलेल्या ‘मॉक्सी १८’ म्हणजे ‘मार्स ऑक्सिजन इन सितू रिसोर्स युटिलायझेशन एक्सपेरिमेंट ’ ही एखाद्या टोस्टरसारखी लहान यंत्रणा पाठविली. ‘मॉक्सी १८’ या उपकरणात एका फ्यूएल सेलमधून विद्युतप्रवाह ७९८.९ अंश सेल्सिअसला प्रवाहित करीत कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजनच्या अणूंना वेगळे करण्यात यश मिळविले आहे. ताशी १०.४ ग्रॅम म्हणजे एक लहान झाड दीड वर्षात जेवढा प्राणवायू निर्माण करते इतका ऑक्सिजन ‘मॉक्सी १८’ देते आहे.
धूळ, मातीमध्ये सेंद्रिय कार्बन व उपयुक्त सूक्ष्मजीवांचा अभाव असलेला ग्रह म्हणजे मंगळ! मात्र याच मंगळावरील खारट पाणी हे समुद्री जीवाणूंच्या मदतीने शुद्ध करणे शक्य आहे. तसेच मंगळावरील ज्वालामुखीच्या कणखर व कमी पोष्टिकता असलेल्या जमिनीवर एल्फाल्फा, शलगम, मुळा आणि सलाडची पाने उगवत शेतीने अन्ननिर्मितीसाठीदेखील नासाने योजना बनविली आहे.
मात्र अन्न, प्राणवायू उपलब्ध झाले तरी भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे रजोगुणी व तपोगुणी मानवी शरीराच्या अनेक मर्यादा आहेत. अपूर्ण इंद्रिये, मोह व लोभाच्या आहारी जात फसविण्याची वृत्ती, चंगळवादी मनोवृत्ती, काम, क्रोध व मद म्हणजे धुंद होणे यामुळे भ्रमित होणे तसेच चुका करणे अशा या मर्यादांवर मात करण्यासाठी सुयोग्य उपाययोजना आवश्यक आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि स्केलेबल हाय-बँडविड्थ ब्रेन मशीन इंटरफेस (बीएमआय) सिस्टमच्या दिशेने ‘न्यूरालिंक’चे पहिले पाऊल हा यावर उपाय आहे, जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
मंगळावर पाठविलेल्या मनुष्य प्राण्याला तेथील वातावरणात समस्यांशी मुकाबला करण्यासाठी सामर्थ्य प्रदान करीत पृथ्वीवरून मंगळावरील मानवाचे थेट मेंदू नियंत्रण करण्यासाठी ‘न्यूरालिंक’ ही कंपनी काम करीत आहे. ‘न्यूरालिंक’चा उद्देशच मुळी मानवी मेंदूला संगणकाशी थेट वायरलेस व दूरसंवाद साधण्यास सक्षम करणे असा आहे. मंगळ ग्रहावर लोकवस्ती करीत असताना तेथे पाठविलेल्या माणसांना थेट ‘टेलिपॅथी’ने कंट्रोल करीत त्यांच्या अडचणी सोडविणे यामुळे अगदी सहज शक्य होणार आहे.
चेतना
पृथ्वीवर सजीवसृष्टी ही परग्रहवासीयांनी निर्माण केलेली नाही, असे गृहीत धरून मानवी सभ्यता ही संवेदनशील किंवा चेतनामय बनली तर प्रयोगशाळेतदेखील चेतना निर्माण करता येईल. त्यासाठी कुठल्याही एलियनची गरज नाही, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मुळे हे अगदी सहजपणे शक्य आहे.
मानवी शरीरात चेतना किंवा पंचप्राण म्हणजे प्राण, अपान, व्यान, उदान और समान हे नेमके कुठल्या बिंदूवर व कसे सुरू होतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेकदा पडणार्या या प्रश्नाचे उत्तर जवळपास आता सापडले आहे. क्वांटम म्हणजे कण आणि लहरी म्हणजे वेव्ह यांच्या अभ्यासातून चेतना कोठून सुरू होते हे आता कळले आहे. आपण एका पेशीपासून सुमारे ३५ ट्रिलियन (लाख कोटी म्हणजे एकावर बारा शून्य) पेशींपर्यंत प्रगती करीत शरीर धारण करताना यांचे उत्तर मिळाले आहे. जर स्टँडर्ड कॉम्प्युटर मॉडेल बरोबर असेल, तर क्वार्क आणि लेप्टॉन्स सुरुवातीपासून सुमारे १३८ लाख वर्षांनंतर जागरूकता निर्माण होत मानवी शरीर चेतना धारण करते. याचमुळे अन्नसुरक्षेचा धोका आणि वाढलेल्या लोकसंख्येवर उपाय शोधताना ‘मंगळा’सारख्या ग्रहावर ‘ग्रहांतर’ ही अपरिहार्य अत्यावश्यक गरज बनलेली असतानाच ‘एआय’चा सुयोग्य वापर गरजेचा आहे. तसेच पृथ्वीवरील उपद्रवी मेंदूंचा सोशल मीडियाच्या माध्यमातून शोध घेत ‘मेंदू नियंत्रण’ हे पाऊलदेखील आवश्यक आहे.
‘एआय’ची दुधारी तलवार!
मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे स्वतः चेतनामय बनले, तर मानवजातच नष्ट होण्याचा धोकाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेच ‘चेतना’मय झाले, तर होणार्या धोक्यांबद्दल काय करायचे? म्हणूनच हा धोका कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सिस्टिमला मर्यादित स्वातंत्र्य देत लगाम घालणेदेखील गरजेचे आहे, हा विचार आता जगभर सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक्स ‘ब्रेन चिप’ टेक्नोलॉजी हे ‘सत्वगुणी ह्युमनाइड कोबोट’ आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)द्वारे मानवाची जागा घेण्याच्या धोक्याबद्दल निर्माण होणारी चिंता कमी करण्यास हे मदत करते.
मरावे परी डाऊनलोड रूपी उरावे!
भारतात बंगलोर येथे ४०० पेक्षा जास्त मेंदू ‘न्यूरोपॅथॉलॉजी ब्रेन म्युझियम-निम्हान्स’ येथे जतनासाठी ठेवले आहेत. भविष्यात मनुष्य जिवंत होईल या आशेवर ‘क्रायोनिक्स’ प्रकल्पांतर्गत ऑस्ट्रेलियातील ‘सदर्न क्रायोजनिक्स’ ही कंपनी कार्यरत आहे. सध्या ही कंपनी द्रवरूप नायट्रोजनच्या स्टिल चेंबूरमध्ये ऊणे २०० अंश सेल्सिअस तापमानात १ कोटी रुपये आकारत ६०० मृतदेहांच्या ‘ममी’ त्यांच्या मेंदूसह जतन करण्यासाठी गोदाम बांधत आहे.
आता ज्ञान व अनुभव तसेच मानवी संवेदनादेखील डाऊनलोड करून ठेवत मनुष्य अमरत्व प्राप्त करू शकेल. इतकेच नव्हे तर तुमचे शरीर मृत झाल्यानंतरदेखील ‘चेतना’ म्हणजे ‘कॉन्शियसनेस’ तुमच्या नातलगांशी गप्पा मारत त्यांना मार्गदर्शन करू शकेल. आज वैद्यकीय कारणांसाठी मिळालेली मानवी मेंदूवरील ‘ब्रेन चिप रोपण प्रयोग’ परवानगी उद्या कोणती दिशा घेईल व कोणते रंग उधळून तिची दशा काय होईल, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. ह्युमन एआय सिम्बायोसिस तसेच ‘इलेक्ट्रॉनिक्स ब्रेन चिप टेक्नोलॉजी’मुळे अमरत्वाच्या दिशेने मानवी सभ्यतेचा प्रवास हा ‘मरावे परी डाऊनलोड रूपी उरावे!’ असाच असणार आहे, हे मात्र निश्चित!