प्रसिद्ध ठिकाणांचा आनंद!

आता स्थिती पूर्वीसारखी राहिली नाही. भारतात पर्यटन क्षेत्र हे अतिशय जोमाने वाढत चालले आहे. दुर्गम भागातील लोकसुद्धा पर्यटन क्षेत्रातून आपला उदरनिर्वाह करू लागली आहे. ऍग्रो टुरिसम, फार्म स्टे, हॉर्टिकल्चर पार्क्स व ट्रेकिंग कंपन्या गावागावात स्थापन झाल्या आहेत. सामान्यापासून लक्सरीपर्यंतची ही शरियत. आपण शॉपिंग साईट्सवर ऑफर्स पाहून जसे सामान निवडतो तशीच संधी आता पर्यटन क्षेत्रातही निर्माण झाली आहे. त्यामुळे, नावाजलेली ठिकाणे टाळण्यातच शहाणपण आहे. मी टाळणे म्हणालो, वगळणे नाही. विख्यात ठिकाणांचा आनंद सामान्य माणसाने का नाही घ्यायचा. हे योग्य नियोजनाने शक्य आहे.

Enjoy famous places!
प्रसिद्ध ठिकाणांचा आनंद!

पाचूच्या रानात, झिम्माड पाऊस, उनाड अल्लड वारा,
नारळी पोफळी, शिरल्या आभाळी, वाळूत चांदणचुरा

गुरु ठाकूरची ही कविता ऐकताना नारळाच्या किशीचा धूर कोकणातील एखाद्या कौलारू घराच्या छतावर, माडांच्या बागेत मिसळतानाचा चित्रपट बंद डोळ्यांना देखील दिसेल. माझ्यासारख्या गावची ओढ असणार्‍या कोकणी माणसाला तरी नॉस्टॅल्जिक वाटणे साहजिक आहे. एखाद्या स्मार्ट फोन वापरणार्‍या वयोवृद्धाला, त्याने शाळेत लिहिलेले प्रेमपत्र आठवल्यावर जी फीलिंग येते, तीच ही! लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत वडील-धार्‍यांसोबत गावी प्रवास करताना कधी हा अनुभव आला नव्हता, परंतु 2011 साली, माझ्या आणखी 2 मित्रांसह ठाण्याच्या आंबा महोत्सवात जेव्हा कोकण कलिडोस्कोप नावाचे प्रदर्शन भरवले. तेव्हा खर्‍या अर्थाने हा चित्रपट दिसू लागला. एखाद्या जागेविषयीचे प्रेम व आपुलकी वयासोबतच वाढत असावी. म्हणूनच आजही आजोबांची स्कूटर घेऊन वेंगुर्ल्याच्या समुद्रावर ये जा करण्याची मजा एका अंशानेसुद्धा कमी झालेली नाही. हल्ली गणपतीत चाकरमान्यासारखे जरी जाणे येणे झाले तरी वर्षभर त्याच कौलारू घरात पुन्हा जायच्या आशेचा घडा नेहमीच काठोकाठ भरलेला असतो.

जागेच्या सौंदर्यापेक्षा तिची ओढ जास्त महत्वाची, नाही का? आपल्यासारख्या शहरात राहणार्‍या माणसाला नक्की काय आवडेल? गोव्याच्या समुद्र किनारीचे पर्यटकांनी भरलेले शॅक्स की आपल्या प्रियजनांसोबत वनभोजन? एखाद्या शहरातील पंचतारांकित हॉटेल, की एखादे निसर्गरम्य रेस्ट हाऊस? ट्राफिकचा आवाज, की पक्षी-पाखरांची किलबिल? तुम्ही प्रत्येकवेळी दुसरा पर्यायच निवडाल. याचे कारण अगदी साहजिक आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात शांतता कुठे तरी हरवली आहे. इतक्या धावपळीत कसली निर्माण होते ओढ आणि कसला दिसतोय तो चित्रपट? लॉकडाउनचेच उदाहरण घ्या ना! घरबसल्या लोकांनी जवळपास 30-35 कोटी वेळा नॉस्टॅल्जियाचा प्रयोग सोशल मीडियावर केला. तात्पर्य: कुठेतरी, आपण नेहमीच शांतता आणि एकांततेचा शोध करतोय. हल्लीच एक नवरात्रीचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. काही (पर्यटक?) मित्र मैत्रिणी अभयारण्यात टेप लावून व मद्यपान करून दांडिया खेळताना दिसत होते. मी अगदीच स्टिरिओटीपीकल बोलतोय ह्याची मला जाणीव आहे. या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा राग किंवा द्वेष ही नाही, पण ते दृश्य बघून मनात एक विचार आला. जी गोष्ट शहरात करता येण्यासारखी आहे ती इतक्या लांब प्रवास करून करणे पर्यटन आहे का? म्हणूनच पर्यटन या विषयावर लिहावसं वाटतंय. रांगडं पर्यटन. शांतीने सजलेलं आणि निसर्ग सौंदर्याने नटलेलं पर्यटन. माझ्यासारख्याच सर्वसामान्य माणसाला आपल्या कुटुंबासहित प्रवास करता येणारं आणि खिश्याची चिंता न करता सहज अनुभवता येणारं पर्यटन.

मी पर्यटन विशेषज्ञ किंवा कोणत्या टुरिझम क्षेत्रात नोकरी करणारा चाकर नाही. हे केवळ भारतातील वन्यजीवन पाहण्यासाठी केलेल्या असंख्य यात्रेंच्या अनुभवातून उद्भभवतय. मी माझ्या लेखातून वाचकांसोबत नेहमीच पारदर्शकता बाळगत आलो आहे. त्यामुळे हा माझा प्रामाणिक सल्ला समजावा. सर्वप्रथम इतिहासातील एका घटनेपासून सुरुवात करूया. 1741 मध्ये मराठ्यांनी बंगालवर मोर्चा लढला होता जो बोरगी हल्ला म्हणून खूप प्रसिद्ध आहे. बंगालच्या नवाब अलीवर्दी खानाने यावर अंगाई देखील लिहिली, ज्यात लहान बालकांना मराठ्यांच्या नावाने घाबरवले जाई. टागोरांनी सुद्धा याचा संदर्भ घेतला आहे. डाकू, गुंड व दरोडेखोरांची भीती लहान बालकांमध्ये रुजवली गेली. नकळत, आपल्यातील कित्येक अशाच स्वरूपाच्या भीतीने अज्ञात ठिकाणी जायचे टाळतही असावेत. खरंतर, आता स्थिती पूर्वी सारखी राहिली नाही. भारतात पर्यटन क्षेत्र हे अतिशय जोमाने वाढत चालले आहे. दुर्गम भागातील लोक सुद्धा पर्यटन क्षेत्रातून आपला उदरनिर्वाह करू लागली आहे. ऍग्रो टुरिसम, फार्म स्टे, हॉर्टिकल्चर पार्क्स व ट्रेकिंग कंपन्या गावागावात स्थापन झाल्या आहेत. सामान्यापासून लक्सरीपर्यंतची ही शरियत. आपण शॉपिंग साईट्सवर ऑफर्स पाहून जसे सामान निवडतो तशीच संधी आता पर्यटन क्षेत्रातही निर्माण झाली आहे. त्यामुळे, नावाजलेली ठिकाणे टाळण्यातच शहाणपण आहे. मी टाळणे म्हणालो, वगळणे नाही. विख्यात ठिकाणांचा आनंद सामान्य माणसाने का नाही घ्यायचा. हे योग्य नियोजनाने शक्य आहे.

मग नक्की कुठे जावे? कधी जावे? आणि काय पाहावे?

पश्चिम महाराष्ट्र

मुंबई व पुणेकरांच्या सर्वात जवळचे आणि ओळखीचे ठिकाण म्हणजे लोणावळा. बंगले, क्लब व हॉटेलांनी गजबजलेल्या या ठिकाणात गडकिल्लेही ठळकपने उठून दिसतात. लोह, विसापूर, तुंग, तिकोना व कोरीगड सारखे अद्भुत किल्ले इथे आहेत. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये इतिहासाची ओढ असणार्‍यांची नक्की या किल्ल्यांना भेट द्यावी. या महिन्यात पाऊस ही कमी व हिरवळी मुबलक. विसापूर सारख्या भक्कम तटबंदीचे दृश्य फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. शांतताप्रिय कुटुंबासाठी नारायणी धाम मंदिर एक प्रमुख ठिकाण.

माळशेज घाटातील मढच्या पट्ट्यात कित्येक राहण्याच्या सोयीसुविधा आहेत. घरातील वयस्करांसाठी ही अगदी सहजसुलभ सहल होऊ शकते. तसेच वडिलधार्‍यांसाठी नाशकातील त्र्यंबकेश्वरचे देवदर्शन व लहान मुलांना निसर्गात रमण्यासाठी अंजनेरी. गिधाडांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील ही एक विख्यात संरक्षित जागा आहे. जैवविविधतेची जाणीव पुढील पिढीमध्ये रुजवणे महत्वाचे आहे. असेच एक ठिकाण म्हणजे भीमाशंकर जवळील कोंढवळ.

अलिबाग- पर्यटकांच्या गर्दीआड, कोर्लई सारखे ठिकाण सर्वांनाच आवडण्यासारखे आहे. अलिबाग हे फक्त रेवदंडा, अक्षी व काशीद इतकेच मर्यादित नाही. स्वतःचे गाडी असता कधीतरी कुटुंबासहित फणसाडला नक्की भेट द्यावी.
कोकण- समुद्री दुर्ग हे प्रवासाच्या दृष्टीने सर्वांसाठीच सुलभ आहेत.पांढर्‍याशुभ्र वाळूने नटलेले किनारपट्टे कोणाला नाही आवडणार? तारकर्लीची गर्दी टाळून यशवंतगड-रेडी, सागरेश्वर-वेंगुर्ला, निवती, भोगवे सारखे किनारपट्टे कोणीही सहज अनुभवू शकेल. आंबोलीसारख्या ठिकाणी मुक्काम नक्की करावा.

गोवा – परदेशी पर्यटकांचे हे भारतातील आवडतीचा स्थान. इथले फ्री कल्चर सर्वांनाच प्रिय आहे व इथल्या किनार्‍यांची माहिती वेगळी द्यायला नको. तरीही त्यातल्या त्यात इथला शांत किनारा म्हणजे तालपॉन व गलगीबाग. गोवा एक निसर्गरम्य राज्य आहे. बॉन्डला, नेत्रावली, भगवान महावीर, मादेही व कोटींगव सारखी सुंदर वने इथे आहेत. प्रत्येक जागेनाजीक वन विभागाचे रेस्ट होऊस स्वस्त दरात उपलब्ध आहेत. इथल्या जेवणाची सभ्यता काही औरच. कुटुंबासहित प्रवास करण्यासाठी या अत्यंत सुंदर जागा आहेत. रिवोना, अरवलें व खांडेपार सारख्या बौद्ध कालीन गुहा इथे अजूनही उतकृष्ट राखल्या आहेत.

कर्नाटक – विख्यात ठिकाणांपैकी गोकर्ण, म्हैसूर व हंपी ही स्थळे कायम गजबजलेली असतात. इतर महागड्या ठिकाणांपेक्षा होनावर, कूर्ग व साथोडी अतिशय निसर्गरम्य व शांत ठिकाणे आहेत. कुळगी व दांडेली ही निसर्गप्रेमींसाठी सुंदर ठिकाणे आहेत. जोग फॉल्स हा शरावती नदीपासून निर्माण झालेला कर्नाटकातील सर्वात मोठा धबधबा पाहण्यासारखा आहे.

देवभूमी उत्तराखंड – चारधाम ही हिंदू माणसाच्या उत्तरार्धातील ठरलेली यात्रा आहे. यात्रेदरम्यान रस्त्यात लागणारी काही ठिकाणे आकर्षित करतात. गंगोत्री कडे प्रवास करताना बारसू गाव अतिशय सुंदर आहे, तसेच यमुनोत्रीकडे प्रवास करताना बडकोटचा परिसर पाहण्यासारखा आहे. गढवाल मंडळ विकास निगम द्वारे स्वस्त दरात राहण्याची उत्तम सोय इथे केली आहे. कुटुंबासह मुक्काम करण्यासाठी याचा इतकी सुंदर जागा फार कमी ठिकाणी मिळेल. उत्तरकाशीतून बेबरा हे गाव केवळ 12 कि मी अंतरावर आहे. एक दडलेला धबधबा व एकांत या जागेचे वैशिष्ट्य. गणपती बाप्पाच्या जन्मस्थळी जाणार्‍या मार्गावर हा पहिला मुक्काम. जितकी सुंदर देवभूमी, तितकीच प्रेमळ माणसे.

हिमाचल प्रदेश व लडाख – साहसी छंद असणार्‍या व्यक्तीचे हे दोन आवडते प्रदेश. डोंगर रंगांने गच्च भरलेली ही दोनीही राज्य भारताचा माथा आहेत. उंच बर्फ़ाळ शिखरे, हिमनद्या व उजाड़ परिसर या प्रदेशाचे वर्णन. या भागात अत्यंत सुंदर ठिकाणे आहेत. फक्त मनाली ते लेह चा प्रवास स्वतःच एक वेगळा अनुभव आहे. इथल्या मोनास्टरी पाहण्यासारख्या आहेत. कुटुंबियांसह मनू मंदिर, हिडिंबा मंदिर व लेह नजीकच्या लामायुरू, शांती स्तूप, पँगॉन्ग, दिस्कीत व हुन्दर सारखी काही नावाजलेली स्थळे करणे योग्य असेल. तरीही सुलभतेचा विचार करता हेमिस राष्ट्रीय उद्यानामागील चोकदो हे एक सुंदर ठिकाण आहे. इथले वातावरण थोडे राकट असल्यामुळे इतर ठिकाणांचा सल्ला देणे चुकीचे असेल. तरुणांने गट बनवून व इंटरनेटवर माहिती काढून ट्रेक केलेलं जास्त फायदेशीर आहे. डोंगराळ भागात ट्रेक सहसा 3-4 पेक्षा अधिक लोकांनी एकत्रित केलेला कधीही उत्तम. दमा व इतर श्वासाच्या आजार असलेल्या व्यक्तीने शक्यतो एकट्याने फिरणे टाळावे. मे, ऑगस्ट व सप्टेंबर हे इथे व उत्तर पूर्व भारतात प्रवास करण्यासाठी योग्य महिने आहेत.

या माझ्या नॉस्टॅल्जियावाल्या जागा. पुढील लेखांमध्ये उर्वरित राज्यांच्या ठिकाणांची माहिती येईलच. आशा करतो येत्या काळात आपण आपल्या व्यस्त जीवनातून स्वतःसाठी वेळ काढाल.