Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeफिचर्ससारांशJealousy : भवतालातील ‘ताल’ चुकलेले लोक!

Jealousy : भवतालातील ‘ताल’ चुकलेले लोक!

Subscribe

मत्सर ही एक असामान्य भावना आहे, कारण ती स्वत: अस्तित्वात नसते. परंतु जेव्हा आपण स्वत:ची तुलना आपल्यासारख्याच इतरांशी करतो तेव्हा उद्भवते. इतरांकडे काहीतरी आहे जे आपल्याकडे नाही आणि ते कधीही साध्य, प्राप्य होणार नाही हे जाणून व्यक्तीत असूया व मत्सर निर्माण होतो. मत्सरामुळे संशय, शंका आणि अविश्वास निर्माण होतो, ज्याचे रूपांतर तीव्र भावना आणि वर्तनात होऊ शकते. त्यामुळे आपल्या भवतालात ताल चुकलेले बरेच लोक दिसतात.

-डॉ. प्रतिभा जाधव

मागील आठवड्यात एका कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून गेले होते. समोर मोठा श्रोतावर्ग होता. सवय व स्वभावामुळे मी चर्यानिरीक्षण सुरु केले. हसतमुख चेहरे, निर्विकार चेहरे, वैतागलेले चेहरे, सतत शून्यात हरवलेले चेहरे, भुवया आक्रसून, शरीर आकसून बसलेले, मनं उसवलेले, रितेपण दाखवणारे, अलिप्त-लिप्त चेहरे, प्रसन्न-विषण्ण-खिन्न चेहरे, अनुभवी-नवखे, संभ्रमित-विभ्रमित चेहरे, गर्विष्ठ-शिष्ट-विशिष्ट चेहरे, हसणारे-रडके-उतरलेले-बिथरलेले, भोळे-भाबडे तेवढेच बनचुके चेहरे, बोलके-चमकणारे-म्लान-अम्लान चेहरे! चेहरेच चेहरे!!

बापरे किती हे वैविध्य. सार्‍याच चेहर्‍यामागे एक व्यक्त-अव्यक्त कहाणी. त्या गर्दीत एक प्रसन्न चेहर्‍याची स्त्री हसतमुखपणे इतरांची फार आपुलकीने विचारपूस करत होती, बहुदा त्या सर्व एकाच कॉलनीत राहणार्‍या शिक्षित महिला होत्या.

ही प्रसन्न महिला छान तयार झालेली, तिच्या वावरण्यात आत्मविश्वास होता तशीच विनम्रताही. मी मंचावरून संवाद साधतानाही तिच्या चेहर्‍यावरची रेष अन रेष जणू माझ्याशी संवाद साधत असावी अशा देहबोलीत ती ऐकत होती. मी मध्येच काही प्रश्न विचारून श्रोत्यांना बोलतं करी तेव्हा ती उत्साहाने प्रतिक्रिया देऊन संदर्भांनुरूप काही पुस्तके, लेखक व त्यातील अवतरणे सांगत होती.

माझे लक्ष तिच्या एकूण व्यवहारामुळे तिच्याकडे वारंवार जाई. नाहीतरी वक्त्याला असाच श्रोता भावतो. व्याख्यानादरम्यान आमचं एक अदृश्य नातं तयार झालं तशी इतरांच्या चेहर्‍यावर जरा नाराजी, नापसंती दिसू लागली. पण कार्यक्रम संपत आला तशी ती एका बाजूला आणि बाकीच्या दुसर्‍या बाजूला तिच्याबद्दल निंदा-टीका, कुजबुज करणार्‍या उभ्या राहिल्या तरीही ही त्यांना प्रेमाने नंतर चहासाठी बोलवत राहिली.

मीही त्यांच्याबरोबर चहा घेत असताना मला जाणवत गेला इतरांना तिच्या सुस्वभावी, नीटनेटके, अभ्यासू, प्रसन्न, संवादी असण्याबद्दलचा मत्सर. करुणा वाटली इतर संकुचित स्त्रियांबद्दल. हा संकुचितपणा पुरूषांमध्येही असतोच, इथे प्रसंगानुरूप स्त्रिया आहेत एवढेच. आपले वैगुण्य, उणिवा, बधीरता, निष्क्रियता लपविण्यासाठी लोक मत्सर-द्वेषाला जवळ करता तेव्हा त्यांचा स्तर कळतो. अर्थात त्या महिलांशी बोलायला मला पुन्हा एकदा जावे लागणार आहे.

त्यानंतर परतीच्या प्रवासात माझे विचारचक्र सुरु झाले. ‘लोग बेवजह तुमसे नफरत कर रहे है, तो समझ लो तुम कुछ सही कर रहे हो!’ भवताल, मानसशास्त्र, समाजनिरीक्षण, वृत्ती-प्रवृत्ती दर्शन, अनुभूती इ. सर्व कसोट्यांवर पडताळून पाहिले तर आपल्या असे लक्षात येते की, हे मानवी चेहर्‍यांमागील विद्रूप विकृतीदर्शक सत्यच आहे. ‘बेशुमार दुश्मन है उसके, वह जरूर बहुत अच्छा इन्सान होगा!’ असं उगाच म्हणत नसावेत. इतरांच्या यश, उत्कर्षाने कुढणारे लोक स्वत:ची प्रगती कधीही साधू शकत नाहीत, कारण ते इतरांकडून प्रेरणा घेत नाहीत.

त्यांच्यात गुणग्राहकता, स्वयंसिद्धी नसते. अनुकरण नसते की अनुसरण नसते. इतरांशी नाहक तुलना करत ते आपली झोप उडवून घेतात. मनावर मणाचं ओझं बाळगतात. स्वत: अस्वस्थ होत इतरांनाही अस्वस्थ करतात. इतरांचा उत्कर्ष यश सहन न होणे, त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींची इच्छा करणे, त्यांच्या आनंदाचा हेवा वाटणे या भावनेला ‘मत्सर’ म्हणतात. मत्सर ही एक जटिल भावना आहे. यात संशयापासून ते क्रोधापर्यंत, भीतीपासून ते अपमानापर्यंतच्या भावनांचा समावेश असतो.

मत्सराचेही काही अर्थ असतात. जसे की, द्वेष, जळावू वृत्ती, दुसर्‍याची भरभराट, प्रगती सहन न होणे, एखाद्याचा आनंद किंवा क्षमता पाहण्यास सक्षम नसणे इत्यादी. ज्याला इतरांचे सुख पाहून मत्सर होतो. या मत्सराचे परिणाम भीषण असतात, पण हाच स्वभाव असणार्‍या जीवांना ते उमगत नसते कारण हा कैफच असतो असा जहरी!

मत्सर मनाचा सारा ताबा घेते तेव्हा व्यक्तीच्या देहबोलीपासून आंतरिक भाव आणि दृश्यभावही असे काही विकृत विद्रूप होतात की, आपल्या एकूण वावरावरून हे जीव हजारोंत उठून दिसतात. त्यांच्या या स्वभावामुळे स्वत:त चिंता, कमकुवत आत्मविश्वास, स्वप्रतिमा प्रेम, भावनिक आत्मतोड, नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम दिसून येतात.

या भावनेसोबतच राग, शत्रुत्व, अपुरेपणा आणि कटुता येत असते. प्रत्येकाला कधी ना कधी मत्सराचा अनुभव येतो. पार्क्स हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो की, मानवाच्या उत्क्रांतीसह मत्सर हा ‘उरलेला’ घटक असू शकतो. मत्सर काहीतरी गमावण्याच्या भीतीतून वाढतो. मत्सर ही एक असामान्य भावना आहे, कारण ती स्वत: अस्तित्वात नसते, परंतु जेव्हा आपण स्वत:ची तुलना आपल्यासारख्याच इतरांशी करतो तेव्हा उद्भवते.

इतरांकडे काहीतरी आहे जे आपल्याकडे नाही आणि ते कधीही साध्य, प्राप्य होणार नाही हे जाणून व्यक्तीत असूया व मत्सर निर्माण होतो. मत्सरामुळे संशय, शंका आणि अविश्वास निर्माण होतो, ज्याचे रूपांतर तीव्र भावना आणि वर्तनात होऊ शकते. मत्सर म्हणजे द्वेष, इर्षा, जळाऊवृत्ती, दुसर्‍याची भरभराट, प्रगती सहन न होणे. एखाद्याचा आनंद किंवा क्षमता पाहण्यास सक्षम नसणे.

तुमचा मत्सर इतरांना वाटण्यामागे मानसशास्त्रात पुढील कारणे सांगितली आहेत. तुम्ही जेव्हा आत्मविश्वासू,स्वावलंबी, स्वयंसिद्ध असता त्यामुळे तुम्हाला इतरांची गरज लागत नाही, मग इतर असुरक्षित होतात व तुमचा द्वेष मत्सर करू लागतात. तुम्ही निर्भय होत स्पष्टवक्तेपणाने लोकांचे खरे रूप उघड करता तेव्हा लोकांना तुमची अडचण होऊन मत्सर वाटतो.

ते कधीही तुमचे कौतुक करत नाहीत वा तुम्हाला स्वीकारत नाहीत, कारण त्यांना तुमच्यासारखे व्हायचे असते, पण त्यांची तेवढी कुवत नसते. सुमार बुद्धीचे लोकच यशस्वीतांचा बेसुमार द्वेष करत असतात. कारण तुमच्यासम होणे हे त्यांना अप्राप्य असते. भवतालात असे जगण्याचा ताल चुकलेले अनेक लोक आपणास भेटत असतीलच!