Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश अनिष्ट, रूढी, प्रथांचे पालन हे तर धर्मतत्वांचे विडंबन!

अनिष्ट, रूढी, प्रथांचे पालन हे तर धर्मतत्वांचे विडंबन!

आमच्या देशात तर विविध धर्म आहेत आणि त्या त्या धर्मातील बहुसंख्य अनुयायी हे त्या धर्मातील मानवतावादी तत्वं बाजूला सारून, धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव धुमधडाक्यात, गर्दी करून साजरे केले की, आपणच खरे धार्मिक आहोत, आता आपल्या खर्‍या धर्माचे आपण पालन केले, ते आपल्याकडून झाले, यातच त्यांना समाधान वाटते. कृतकृत्य झाल्यासारखे त्यांना वाटते. मात्र कोरोनासारखे जीवघेणे संकट केवळ प्रत्येकाच्या दारातच नव्हे तर, घराघरात घुसू पाहात आहे, याबाबतचे भान आपण अजूनही का बाळगत नाही?

Related Story

- Advertisement -

आजच्या विज्ञान युगातसुद्धा, निरोगी शारीरिक-मानसिक स्वास्थ्यासाठी, विविध संकटं किंवा समस्येतून स्वतःची, कुटुंबाची किंवा समूहाची सुटका करून घेण्यासाठी, विनासायास लाभ व्हावा म्हणून तसेच अपराधीपणाची भावना लपवण्यासाठी किंवा तत्सम फायद्यासाठी विविध प्रकारचे दैवी, अवैज्ञानिक, निषिद्ध,अनिष्ट, कालबाह्य अशी विविध कर्मकाडं केली जातात. त्यातील अनेक कर्मकांडे ही अघोरी असतात. मात्र तरीही ती सर्व करून घेण्याकडे अनेक धर्मियांचा मोठ्या प्रमाणावर कल असल्याचे दिसून येते .

यासाठी , विशेषतः धर्माचा आदेश, धर्मतत्वांचे पालन, रुढी, परंपरांचे जतन, नवस-सायासपूर्ती अशी विविध प्रकारची कारणं सांगितली जातात. वेगवेगळ्या नावाने रुढ असलेल्या अशा अनेक अनिष्ट, अघोरी, कालबाह्य रूढी-प्रथा, परंपरा आपल्याकडे अनेक धर्मांचे बांधव, सामूहिकपणे मोठ्या प्रमाणात पाळतात, जतन करतात, जोपासतात.

- Advertisement -

एखादी अंधश्रद्ध व्यक्ती, कुटुंब किंवा एखादा अंधश्रद्धेशी निगडित प्रसंग, एखादी घटना असेल तर वस्तुस्थिती पडताळून, संबंधितांशी आपुलकीने सुसंवाद करून, त्या मागील शास्त्रीय कारणमीमांसा स्पष्ट करून किंवा प्रसंगी कायद्याचे सहाय्य घेऊन, असा अनिष्ट प्रकार थांबविता येतो. अथवा त्याला कायमचा पायबंदही घालता येतो.

मात्र, जेव्हा अशा अंधश्रद्धायुक्त अनिष्ट प्रकारांना, त्या त्या मानवी समूहाची संघटित, सामूहिक शक्ती लाभते, त्यावेळी असे प्रकार अतिशय गंभीर, भयानक रूप धारण करतात. जनसमूहाची भक्कम पकड घेतलेल्या अशा अंधश्रद्धांविषयी बोलणेही मग फारंच अवघड ठरते. त्याविरूद्ध लढणे, प्रबोधन करणे, त्यात उचित बदल घडवून आणणे ह्या बाबी तर अशावेळी फारंच अवघड होऊन बसतात. जोखमीच्या ठरतात.

- Advertisement -

लक्षात असेही येते की, त्या त्या समाजसमूहाच्या पुढार्‍यांपासून तर सामान्य माणसांपर्यंत बहुतेक जण एकतर अशा घटनांना भीतीपोटी किंवा लाभापोटी, इच्छे-अनिच्छेने शरण जातात, त्यातील कर्मकांडे, प्रथा, परंपरांचे निमूटपणे पालन करतात. किंवा विरोध करण्याचे धाडस त्यांच्यात नसल्याने अशा प्रकारांपासून तटस्थ राहणे पसंत करतात. काही नेते अशा अनिष्टतेची भलावणही करतात, हे अतिशय वेदनादायी असते. मात्र अशा अनेक कालबाह्य, अनिष्ट, अघोरी रूढींप्रथांविरोधात महाराष्ट्र अंनिसने मागील एकतीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून, विवेकी विचारांच्या कार्यकर्त्यांचे संघटन करून, सनदशीर मार्गाने परंतु जिगरीने संघर्ष करून लढा दिला आहे. आजही तो महाराष्ट्रभर यशस्वीरित्या चालू ठेवलेला आहे. पुढेही हा लढा चालूच ठेवावा लागणार आहे. कारण ही पंचवार्षिक किंवा दशकांची लढाई नसून, शतकांची लढाई आहे, असे आपण ऐतिहासिक पुरव्यानिशी ठामपणे म्हणू शकतो.

दुसरी बाब म्हणजे अशा अंधश्रद्धायुक्त रूढींप्रथांना देव-धर्म पालनाच्या, परंपरा जतन करण्याच्या नावाखाली गोंजारले जाते. उत्सवाचे रुप दिले जाते. बेमालूमपणे, चलाखीने त्यांना लोकांच्या माथी मारून, त्या बळकट केल्या जातात. विशेषतः आर्थिक मदत कमी पडू नये म्हणून अनेकवेळा सरकारही अनेक धर्मियांच्या अशा बाबींना इमानेइतबारे भरघोस मदत करते. हे सर्व पुढे नेऊन, विस्तारण्यासाठी लोकांच्या धर्मश्रद्धेचा, देवभोळेपणाचा, लोकांच्या धर्मभावनेचा, प्रसंगी दहशतीचा वापर केला जातो. श्रद्धेच्या नावाखाली, अंधश्रद्वेचा काळाबाजार भरवून, प्रचंड प्रमाणात शोषण केले जाते. देवाधर्माच्या नावाने दहशत निर्माण केली जाते. अर्थातच तेथे मोठ्या प्रमाणावर समाजाचे विविध प्रकारचे शोषण होत राहते. मानसिक गुलामगिरीचे जोखड सतत समाजाच्या मानगुटीवर पुन्हा पुन्हा लादले जाते. आपल्या भारतीय समाजात हे सर्रासपणे घडत असते. अशा अंधश्रद्धयुक्त बाबींना लोकसमूहाची संघटित, भक्कम शक्ती लाभल्याने परिस्थितीचे गांभीर्य ठेवणे, कायदा पालनाचे भान बाळगणे अशा गोष्टी कुणाच्या ध्यानीमनीही रहात नाहीत. येतही नाहीत.

अगदी अलिकडच्या काळात महाराष्ट्रात घडलेली त्याची काही बोलकी उदाहरणे आता आपण पाहू या !!

महाराष्ट्रातील अनेक गावांगावांमधून, त्या त्या गावाच्या किंवा तेथील एखाद्या समाजसमूहाचे पूजनीय,श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवतांच्या जत्रा-यात्रा दरवर्षी भरतात. साधारणतः नोव्हेंबर ते मे महिना, या कालावधी दरम्यान अशा जत्रा- यात्रांचा हंगाम असतो. महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागात दरवर्षी भरणार्‍या या जत्रा -यात्रांची संख्या चार हजारांपेक्षा अधिक आहे. यातील बहुतेक जत्रा- यात्रांमध्ये देव, देवी, पीर यांना श्रद्धेपोटी (खरे तर अंधश्रद्धेपोटी) शारीरिक, मानसिक आजार बरा व्हावा म्हणून किंवा तत्सम लाभालोभासाठी केलेले विविध प्रकारचे नवससायास, मन्नत आणि त्यांची पूर्ती करण्यासाठी म्हणून, विशिष्ट दिवशी मोठ्या प्रमाणात पशुपक्ष्यांचा उघड्यावर बळी देणे, असे घडत असते.

नवसपूर्तीचा एक भाग म्हणून जत्रेत किंवा स्वतःच्या घरापासून मंदिरापर्यंत, दर्ग्यापर्यंत सार्वजनिक रस्त्यावरुन लोटांगण घालणे, गळ खेळणे, दंडवत घालणे, टोकदार लोखंडी सळ्या ओठातून किंवा दोन्ही गालातून तसेच कानाच्या पाळ्यांमधून आरपार घालणे असेही क्रूरपणे होत असते. यातील अनेक अनिष्ट प्रकार विशेषतः महिलांच्याच माथी मारलेले असतात. स्त्रीत्वाची ही विटंबना, जत्रा, उत्सवासाठी आलेला सर्व भाविक समाज उघड्या डोळ्यांनी पाहात असतो.

कोरोनाच्या भीतीपोटी म्हणा किंवा शासनाच्या कडक आदेशामुळे म्हणा, दरवर्षी लाखोच्या संख्येने बळी दिली जाणारी मेंढरे, बकरे, रेडे, कोंबडे हे सर्व ह्यावर्षी तरी वाचले बिचारे !! कोरोनाचीच कृपा म्हणायची, दुसरे काय ? तरीही काही देवस्थानांच्या ठिकाणी, देवदेवतेचा कोप होऊ नये म्हणून, नवसपूर्ती म्हणून किंवा मानाच्या बोकडबळीच्या परंपरेत खंड पडू नये म्हणून चोरून, लपून पशूबळी दिल्याच्या घटना घडल्या आहेत. मानवतेला लांच्छनास्पद असलेल्या अशा अघोरी प्रथा-परंपरांचे आचरण केल्याने, त्या जोपासल्याने, पुन्हा पुन्हा त्या जतन केल्याने, माणसाच्या दैववादीपणात वाढ होते आणि त्याचा प्रयत्नवाद पंगू होत जातो.

नवसपूर्ती म्हणून विशेषतः पुरुषांनी बगाड खेळणे, ही एक क्रूर आणि अतिशय घातक अंधश्रद्धा! काळजाचा ठोका चुकवणारा असा प्रकार!! मात्र भाविकभक्तांचा मोठा समुदाय, मोठ्या उत्साहात, बगाडाचा हा, जीवनमरणाचा चाललेला खेळ प्रत्यक्ष पाहात असतो. बेधुंदपणे ओरडत असतो. कोरोनाच्या जीवघेण्या संकटकाळातही सातारा जिल्ह्यातील एका गावात ही अघोरी प्रथा नुकतीच मोठ्या समाजसमूहाच्या साक्षीने संपन्न झाली. पाळली गेली. त्यानंतर पुढील दोन तीन दिवसातच, ह्या उत्सवातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ती थोपविण्यासाठी तेथे कर्तव्य बजावणार्‍या काही पोलीसांसह अनेक भाविकांना कोरोनाने ग्रासल्याच्या बातम्यांही आल्या. मग प्रश्न निर्माण होतो की, ही माणसं अशी का वागतात ?

याचे कारण वेळेत मूहूर्तावर नवसपूर्ती झाली नाही, प्रथा, परंपरा जोपासली नाही तर देवदेवतांचा कोप होईल,अरिष्ट ओढवेल अशा प्रकारची मोठी मानसिक भीती त्यांना वाटत असते. हा मुहूर्त त्यांना कुणी ठरवून दिला? नवसपूर्तीचे पालन त्याचदिवशी, त्याचवेळी झाले पाहिजे, केले पाहिजे ही चुकीची मानसिकता लोकसमूहाच्या मनात कुणी घट्ट केली? अंधश्रद्धायुक्त अशी चुकीची लोकपरंपरा जोपासण्याचा, जतन करण्याचा अट्टाहास किंवा धर्मपालनाचा पिढीजात आदेश, हीच त्याची उत्तरं आहेत.

भारतात ठराविक ठिकाणी भरणार्‍या कुंभमेळ्यात, शुभमुहूर्तावर नदीत शाही स्नान, पवित्र स्नान उरकण्याच्या नादात( कि नशेत) सर्व कायदे कानून, आदेश, बंधनं, सामाजिक नीतिसंकेत झुगारून, पवित्र स्नानासाठी भाविक, साधूमहंतांची प्रचंड चढाओढ होताना नेहमीच दिसते. त्यामुळे साहजिकच चेंगराचेंगरी, रोगराईचा मोठ्या प्रमाणात फैलाव, प्रचंड प्रमाणात पाणी प्रदूषण अशा जीवघेण्या बाबी अशा तीर्थस्थळी नित्यनेमाने घडत असतात.

दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकला भरतो. ह्या काळात तेथेही मोठ्या प्रमाणात रोगराई नेहमीच पसरते. ती पुढील वर्षभर नाशिकच्या नागरिकांच्या आरोग्याला छळत असते. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत हरिद्वारच्या कुंभमेळ्यातही असेच चित्र पाहावयास मिळाले. या पवित्र पर्वात गंगा नदीत पवित्र स्नान केल्याने,जन्मोजन्मीची पापं नष्ट होतात,(मग पुढची पापं करायला मोकळे ?) अशी तथाकथित आध्यात्मिक, पारंपरिक शिकवण अध्यात्माच्या नावाखाली पोथीपुरणांतून, कथा-प्रवचनातून समाजाच्या तळागाळापर्यंत सतत पोहचवलेली असते. माणूस मुळात उत्सवप्रिय प्राणी !! त्यात त्याला मिळालेला असा तथाकथित अध्यात्माचा, धर्माचा आदेश, मग काय? प्रचंड गर्दी होणारचं की हो!! त्यांना कोण अडवू शकणार ? थोपवू शकणार? परिणामी ह्या कुंभमेळ्यात सहभागी झालेले अनेक भाविक, साधूमहंत हजाराच्या संख्येने कोरोनाचे बळी ठरत आहेत. त्यातील काहींना मृत्यूने कवेत घेतले आहे. ही बाब अतिशय दुःखद व वेदनादायी आहे.

मुस्लीम बांधवांनी नुकतीच बुलढाणा जिल्ह्यात संदलची धार्मिक मिरवणूक काढली. त्या मिरवणुकीतही कोरोनाबाबतचे सर्व नियम, शिस्त धुडकावले गेले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना कोरोना होणार नाही, झालाच तर त्यांचे निधन होणार नाही, याची जबाबदारी सदर धार्मिक मिरवणूक काढण्यास प्रोत्साहन देणारे, पुढाकार घेणारे, नियोजन करणारे, त्या धर्माचे तथाकथित मुल्लामौलवी, नेते, पुढारी घेतील काय? शीख समुदायानेही नांदेडमध्ये धार्मिक कार्यक्रम व मिरवणूक आयोजित केल्याची सचित्र बातमी ह्याच काळात वाहिन्यांवरून पाहावयास मिळाली. तेथेही कोरोनाबाबत पाळवयाची शिस्त, नियम कसोशीने पाळले जाणे अत्यंत आवश्यक होते. मात्र पोलीस बांधवांवरच समूदायाकडून दगडफेक केली गेली, असे दिसले.

लग्न समारंभ, अंत्यविधी वा इतर धार्मिकविधी, सांस्कृतिक कार्यक्रम मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत साजरे करण्याचे, समाजहिताचे सरकारी आदेश असतानाही आपण ते का पाळत नाही ? धर्म, रुढीपरंपरा यांचा जबरदस्त पगडा, ढामढौल, प्रतिष्ठा मिरवण्याची अनाठाई हौस, हाडीमासी खिळलेली धार्मिक कट्टरता अशा अनेक अविवेकी गोष्टी यामागे असतात, एवढेमात्र नक्की. अनेक धर्मांच्या, धर्मिक उत्सवांना, मिरवणुकींना सामुदायिक कर्मकांडांना आजही उधान आलेले आहे. तेथे कशाचेच भान बाळगले जात नाही. जो याविरोधात बोलतो,तो त्या समुदायाच्या धर्माचा किंवा त्यांच्या धर्माचाही शत्रू, काफीर, पाखंडी, धर्मद्रोही समजला जातो.

आमच्या देशात तर विविध धर्म आहेत आणि त्या त्या धर्मातील बहुसंख्य अनुयायी हे त्या धर्मातील मानवतावादी तत्वं (खरं तर ती, ती तत्वं, त्या त्या धर्म अनुयायांना ठाऊक असतात की नाही, याची जबरदस्त शंका वारंवार मनात येते.) बाजूला सारून, असे धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव धुमधडाक्यात, गर्दी करून साजरे केले की, आपणच खरे धार्मिक आहोत, आता आपल्या खर्‍या धर्माचे आपण पालन केले, ते आपल्याकडून झाले, यातच त्यांना समाधान वाटते. कृतकृत्य झाल्यासारखे त्यांना वाटते. मात्र कोरोनासारखे जीवघेणे संकट केवळ प्रत्येकाच्या दारातच नव्हे तर, घराघरात घुसू पाहात आहे, याबाबतचे भान आपण अजूनही का बाळगत नाही? धर्मपालन, रूढींपरंपरांच्या नावाखाली, स्वतःसह इतरांचा जीव आपण का धोक्यात घालत आहोत ? मात्र, तरीही एकूणच मानवतेला लांच्छनास्पद असलेल्या अशा अनेक घातक, क्रूर, अघोरी अंधश्रद्धायुक्त परंपरा, प्रथा, रुढी ह्या उपाय, उपचार, धार्मिक परंपरांच्या नावाने, धर्मपालनाचा भाग म्हणून जपल्या जातात, पाळल्या जातात आणि जोपासल्या जातात. त्यांची कालसुसंगत चिकित्सा न करताच, त्यांचे जसेच्या तसे किंवा आणखी विक्रृतपणे अनुसरण करणे हे, कोणत्याही धर्माच्या धर्मपालनाचा भाग होऊ शकत नाही. कारण तेथे संभाव्य परिणामांचा विवेकी विचार केलेलाच नसतो.

– डॉ. ठकसेन गोराणे

- Advertisement -