घरफिचर्ससारांशआम्ही वितळून जायचो ढगात

आम्ही वितळून जायचो ढगात

Subscribe

आभाळ भरून आलं की आम्हाला दूरवरच्या गावात असलेल्या शाळेतून सुट्टी मिळायची. मग बेफाम होऊन पावसाशी स्पर्धा करत आम्ही घर गाठायचो. दप्तर म्हणून वापरल्या जाणार्‍या बियाण्याच्या पिशवीतील पुस्तकं ओली व्हायची आणि पुस्तकाच्या पानापानाना बियांचा गंध लागायचा. लालसर मऊ अंगावर गादी असलेला किडा आम्ही आगपेटीत ठेवायचो आणि शेतातल्या बांधावर नेऊन सोडायचो. आमच्या शेतात आलेल्या या नव्या पाहुण्याचं आम्हाला कौतुक वाटायचं. मृगाच्या सरी बरसल्या की आम्ही दुसर्‍या दिवशी सकाळी उठून लगोलग कपाशीचं बी लावायला जायचो. पावसाच्या येण्यानं गाव शिवार सुखावून जायचा आणि आम्हाला तर नवीन श्वास मिळाल्यासारखं वाटायचं.

आम्ही चिंब भिजायचं
वावर भिजल्या गत
आणि धारांची दोरी धरून
जाऊन बसायचो आभाळाच्या देशात

पाऊस कोसळायचा बिंधास तेव्हा घर गळायला लागायचं आणि आम्ही सारी भावंडे प्रत्येक थेंबा खाली मिळेल ते भांडं ठेवायचो. आई म्हणायची ‘घर आपलं असं की पाऊस शिवारावर असला तरी गळायला लागतं’ अगदी इंदिराबाई संतांच्या
चंद्रमौळी घरासारखं.

- Advertisement -

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली
( इंदिरा संत)

सृष्टीच्या अस्तित्वाचा पाऊस हा संजीवक घटक होऊन जातो. त्याचं येणं ही निव्वळ एकघटना असत नाही तर सबंध चराचराला जगण्याची पालवी फुटते. भुईत पेरलेलं बी जसं पावसाच्या स्पर्शानं एका अंकुरात रूपांतरित होतं, तसा पाऊस सर्जकालाही प्रेरित करतो. खोल नेणिवेत रुतून बसलेल्या भावभावनांना पावसाळी दिवस वाट मोकळी करून देतात. प्रत्येकाचं पावसाशी असं खास नातं असतं ते कधी प्रेमाचं तर कधी रागाचं पण असतं.

- Advertisement -

पावसाच्या येण्याबद्दल गृहीतकं नसतात. कोणत्याही आधुनिक भाकीतांना खोटं ठरवण्याची ताकद तो स्वतःकडे शाबूत ठेवतो. त्याच्या येण्याची निश्चित वेळ नसते, ती कुणाला ठरवता येत नाही. त्याची खूप वाट पाहिल्यावर येईलच असं नाही तर तो कधी इतका न कळत येतो की आपल्या लक्षातही येत नाही, तो येऊन गेल्याचं आणि म्हणून पावसाबद्दल न बोललेलंच बरं असं कवीला ठाम वाटतं.

बोलू नये पावसाबद्दल
गोष्टी करू नयेत पावसापाण्याच्या
निमूट झेलीत राहावे त्याचे अनावर होणे
किंवा डोळे वटारुन बसणे, मूकपणे
सहन करावे.
मग तो प्रसन्न होतो, ओंजळभर जुईच्या
फुलांसारखा अंगणात टपटपतो, झिम्मा घालतो
टिपूर चांदण्यासारखा लपेटुन घेतो,
काळ्या शेतांच्या आनंदाचा अश्रू बनून
डोळाभर होतो
(प्रभा गणोरकर)

पावसाची येण्याची पद्धत ही एखाद्या व्यक्ती विषेशासारखी असते. प्रत्येक वेळेस भिन्न प्रदेशानुसार स्वभाव वैशिष्ठ्य धारण करून तो येतो. त्याचं वागणं प्रत्येक नक्षत्रात बदलतं. पावसाच्या स्पर्शाने सजीवच काय पण निर्जीव वस्तूही चैतन्याची अनुभूती घेतात.

पाखरांच्या पंखावर बसून
पाऊस झाडाच्या शेंड्यावर येतो
पानांमधली धूळ झटकून
शाकारलेल्या खपरेलावर
हळूच पाय ठेवतो
अन पन्हाळीतून रिकाम्या बादलीत अलगत उतरतो
(प्रकाश किनगावकर)

बारोमास दुष्काळाच्या झळा सोसून वैशाखी वनव्याने तापलेली भूमी गर्भारपणाचं स्वप्न पाहते. तिची भुकेजली लेकरं डोळ्यात प्राण आणून मीरगात शिवार ओलचिंब होण्याची करुणा भाकतात. त्यांना आभाळभर पसरलेल्या ढगांचे भास होतात ते दयाघनाजवळ आर्ततेने प्रार्थना करतात.

वाजू दे मृगाची पावलं
आमच्या ओसाड भूमीवर
मिटू दे
थोडीशी रखरख
जन्मापासूनच तू सोबत दिलेली
या बिनमोल जगण्याला
आणि येऊ दे
रानावनाचा पावसापाण्याचा
टाके घालून
पुन्हा पुन्हा शिवलेल्या
जुन्या लुगड्याचा वास
माझ्याही विरत चाललेल्या आयुष्याला
(अनुराधा पाटील)

पाऊस जसा आनंदाला कारण असतो तसाच तो दुःखालाही कारण होतो. त्याचं अवेळी येणं किंवा अहोरात्र बरसणं मनात भीती उत्पन्न करतं. कमजोर भिंतींना त्याची दहशत बसते. परंपरेच्या संस्कृती संचिताची परिभाषा ही थिटी वाटू लागते आणि पावसाची बेबंदशाही संपवण्यासाठी विस्तव टाकून त्याला थांबवणेही महत्त्वाचे वाटू लागते.

येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
जा रे जा रे पावसा
तुला देतो पैसा
वादळी सामुद्रिकात शरणावत झोपड्यांची करवंदी कलेवर
पावसाला पोळवा पावसाला भाजवा
विस्तव आणा विस्तव पाडा
(नामदेव ढसाळ)

पावसाच्या या तीव्र अनुभूती नेणिवेचा भाग होऊन जातात कवीच्या अंतर्मनात त्या पावसाची त्याला घेऊन येणार्‍या वार्‍याची छबी त्याच्या अस्तित्वाचाच भाग होऊन जाते.

तिरका चंदेरी पाऊस विणणारा
वारा बिलंदर
धारातून खैरातत उधळत गगनगंध
ही सगळी लपताय माझ्या आरस्यात
त्यांच्या खुबीदार जागा सांड्तायत्
माझ्या अंगोपांगातून
(मनोहर ओक)

पाऊस ज्याचं रूपांतर पाण्यात होतं. त्याची वाटणी होते. त्याच्यावर हक्क सांगितला जातो. त्यातून विभाजनाची भाषा होते. एकसंध व्यवहाराला तडे जातात. स्वार्थाचं विष पेरलं जातं आणि सबंध माणूसपणाची व्यवस्था धोक्यात येते. निसर्गाने बहाल केलेले हे वैभवही भेदांच्या सीमारेषांमधे अडकवले जाते.

पाणी कोसळतं धुवाँधार
अक्षांश-रेखांशांवर
पाण्यानं तडकतात
नकाशातल्या सीमारेषा
भडकतात तंटे
भिन्न भाषिक देशांत
पाणी आणि दुभंगवतं
धर्म आणि जात
पाणीच करतं
मर्मावर आघात
(चंद्रकांत पाटील)

पाऊस येतो आणि जातो पण त्या दरम्यान असंख्य गोष्टी घडतात. पेरलेले बी उगवण्याची शक्यता वाटू लागते. डोंगर माथ्याची पाठ हिरवी होते, ज्यावर गुराढोरांना चरण्याचे संकेत मिळतात. तुंबलेल्या पाण्यात गाई-म्हशींना डुंबायचं असतं की ज्यांच्या अंगावर बसणार असतो एक बगळा निश्चिंत होऊन. पाऊस शक्यता घेऊन येतो मुलीचे हात पिवळे होण्याची. म्हातारीच्या थकलेल्या बुबूळाला कसदार कणसं दिसण्याची किंवा शहराच्या एकलकोंड्या खोलीत तग धरून असलेल्या तरुण मुलांसाठी पाऊस पुरवतो रसद, एक इंद्रधनुष्य घेऊन येतो खिडकीतून दिसणारा कायमचा.

पाखरांच्या पंखांवर
जेव्हा पिकांची नक्षी दिसायची
तेव्हा आम्ही हिरवे व्हायचो
धमण्यात संच करायचं रक्त
नदी-नाले एक झाल्यागत
पुसून जायच्या वाटा
हरवून जायच्या गाई-म्हशी डोंगरदर्‍यात
आम्ही वितळून जायचो ढगांत
ढेकळाची माती झाल्यागत

— रवी कोरडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -