घरफिचर्ससारांशअभ्यासोनी व्यक्त व्हावे ...

अभ्यासोनी व्यक्त व्हावे …

Subscribe

माहिती तंत्रज्ञानाच्या या सुलभ काळात, सध्या सर्वांनाच व्यक्त होण्याची घाई असते. आजच्या समाजमाध्यमांनीही संधी आणि अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ सर्वांनाच दिले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा तर आपला मूलभूत अधिकारच, पण या व्यक्त होण्याच्या घाईत माणसे आपला संयम, सद्सद्विवेक हरवून बसतानाही प्रत्यही दिसते. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्या पारखून माहितीचे विश्लेषण, खातरजमा करून व्यक्त झाले तर प्रश्न नाही. परंतु विविध माध्यमात व्यक्त होणारी माणसे मुद्यावरून लगेच गुद्यावर येतात. एखाद्या घटनेबाबत, कलाकृतीबाबत वरवरची शेरेबाजीकरून संभ्रम वाढवतात. त्यातून व्यक्तिगत नात्यासंबंधामध्येही कटुता निर्माण होते. त्यामुळे समाजमाध्यमांची विधायकता लक्षात घेऊन त्यावर व्यक्त झाले तर ही माध्यमे समाजोपयोगी ठरू शकतात.

आपल्याकडे खंडन-मंडनाची प्रदीर्घ परंपरा आहे. प्राचीन काळापासून अनेक मतमतांतरे घडली आहेत. थेट वेदवाङ्मयापासून ते शंकराचार्याच्या तत्वज्ञानापर्यंत. संत साहित्यापासून ते आजच्या प्रचलित देशीवादापर्यंत व्यक्त होणे ही माणसाची स्वाभाविक गरज असली तरी त्या व्यक्ततेला काही मर्यादा हव्यात. परंतु आजच्या माध्यमात व्यक्त होणारी माणसे बेमालूमपणे व्यक्त होतात. विविध मिम्स, कोट्या, माध्यमावरील विविध पोस्ट यातून अशा मनोविकृत, बोचर्‍या क्रिया-प्रतिक्रियांची रेलचेल दिसते. यातून जी जातीय, वंशीय, धार्मिक, भावनिक तेढ निर्माण होतेय त्यातून सामजिक असहिष्णुता वाढण्याची शक्यता वाढते. हे या माध्यमावरील प्रतिक्रियावादीना कोणी सांगावे? म्हणूनच द्वेष, मत्सर, असूया, मनातील विकार विकृती, स्टंटबाजी यासारखी अविवेकाची काजळी झटकून या माध्यमात व्यक्त होण्याची काळजी घेतली तरच सत्याचा, ज्ञानाचा उजेडात ही माध्यमे लखलखीत होतील.

अलीकडच्या काळात अनेक महनीय व्यक्तींबद्दल या माध्यमातून ज्या मिम्स, विचार, प्रतिक्रिया प्रकट झाल्या त्या खेदजनकच होत्या. समाजमाध्यमात सवंगतेने व्यक्त होणे म्हणजे समाजमन कलुषित करणे. म्हणूनच माध्यमावर व्यक्त होताना आपली सुसंस्कृतपणाची, शालिनतेची पातळी सुटायला नको. या व्यक्त होणार्‍यांमध्ये टोकाचे कर्मठ, प्रतिगामी आणि टोकाचे प्रोगेसिव्ह यांच्यातील द्वंद्व तर आजच्या माध्यमात धुमाकूळ घालताना दिसतेय. यात समन्वयवादी आणि मानवता मूल्याला प्राधान्य देणारी माणसे मात्र हा संघर्ष पाहून व्याकुळ होतात. पण काळाची आणि माध्यमांची गती इतकी तीव्र आहे की याला आवर तरी कसा घालणार आणि कोण? याला कोणतेही सेन्सॉर नाहीय. व्यक्तीची विवेकशीलता हाच निकोप लोकमानसाच्या सुदृढतेचा पाया असतो. तो खचला तर समाजमन गढूळ बनते. याची जाणीव ठेवायलाच हवी.

- Advertisement -

मध्यंतरी आमच्या शहरात एका प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग झाला. त्याला अनेक मान्यवरांनी गौरवलेले. हे नाटक पहायला आमचे एक प्राध्यापक मित्र गेले. त्यांनी हा प्रयोग पाहिला आणि तात्काळ फेसबुकवर पोस्ट केली. यातील नायिकेची भूमिका, तिचे संवाद, आणि तिचे कर्कश रूप हे जाणीवपूर्वक जातीय अभिनिवेशातून चित्रित केल्याचे जहाल मत त्यांनी मांडले होते. त्यांची ती टीका विखारी होती. तिच्यात जातीय अभिनिवेश होता. त्या नाटकातील कलाकार, त्यांची आडनावे पाहून त्यांनी ती केलेली स्पष्ट जाणवत होती. योगायोग असा की दुसर्‍याच दिवशी ज्यांनी हे नाटक आयोजित केले होते त्यांचा या नाटकाबद्दलचा प्रदीर्घ लेख एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. या लेखात प्रस्तुत नाटककाराचा , भूमिपुत्र म्हणून गौरव केलेला. या परिसरातील एक तरूण असे दर्जेदार नाटक लिहितो ही बाब खचितच अभिनंदनीय होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनही अध्यक्षीय भाषणात अरुणा ढेरे यांनीही त्याची मौलिकता स्पष्ट केली होती. परंतु असा कोणताही या नाटकाचा, नाटककाराचा अभ्यास न करता त्या मित्राने ही पोस्ट केलेली. नंतर सदर लेख वाचून त्याने फेसबुकवरील ती पोस्ट डिलीट केली. एका दिवसात त्याचे झालेले हे वैचारिक, मानसिक परिवर्तन अनाकलनीय होते. माहिती घेऊन, सत्य-असत्याची ग्वाही करून ते व्यक्त झाले असते तर..? पण तसे झाले नाही. बुद्धिजीवी समजल्या जाणार्‍या वर्गाकडून असे घडत असेल तर इतरांचे काय ? असे अनेक अनुभव आपण घेत असतो. कीर्तनकारांपासून ते राजकारण्यापर्यंत असे अनेकांचे दाखले देता देतील. यात अनेक व्यक्तिगत अनुषंगही असतात. राजकीय प्रवक्त्यांना जसे रेटून बोलावे लागते तसे सर्वच क्षेत्रात बोलून चालत नाही.

- Advertisement -

एखाद्या विचारांचे अनुयायी झाले म्हणजे आपल्या विरोधी विचारांना ते मांडणार्‍या व्यक्तींचा कसा प्रतिवाद करायचा यालाही काही मर्यादा असतात. वैचारिक क्षेत्रात विचाराने त्याचा प्रतिवाद करता येतो, परंतु आता प्रतिवाद करण्याची भाषा आणि पातळी दिवसेंदिवस खालावत चाललीय. यात दोष कुणाचा? अति सर्वत्र वर्ज्ययेत असे नेहमीच म्हटले जाते. त्याप्रमाणेच आता आपल्या हाती असलेल्या समाज-माध्यमांवरील भडक, विसंवादी, सवंग विघातक विचार पाहिले म्हणजे अशा व्यक्त होणार्‍या लोकांची कीव येते. आपण सर्वज्ञ आहोत अशा थाटात ही माणसे व्यक्त होत असतात. कोणत्याही व्यक्तीची महात्मता एका दिवसात सिद्ध होत नसते. त्यासाठी आयुष्य पणाला लावावे लागते. असे संपूर्ण जीवन एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन ज्या लोकांनी महनीय कार्य केले, त्यांच्याबद्दल व्यक्त होताना तरी काही मर्यादा पाळायला हाव्यात. त्यात माफक सभ्यता असावी. परंतु तात्काळ प्रतिक्रिया देण्याच्या घाईत हे भान सुटते. आपल्या काही वैचारिक, सामाजिक निष्ठा असतात,त्या जोपासताना, विरोधी मतालाही, विचारानेच अभ्यासपूर्वक प्रतिउत्तर दिले पाहिजे. तसे घडत नाही. याचे उदाहरण म्हणजे मधल्या काळात समाजमाध्यमावर काही महनीय व्यक्तीबद्दल जे मिम्स, अशोभनीय वक्तव्य, विचार प्रसिद्ध झाले ते महाराष्ट्राच्या सहिष्णू परंपरेला छेद देणारेच होते.

महाराष्ट्रात अनेक भक्तीसंप्रदाय,विविध तत्वज्ञाने उदयास आली. त्यांच्यातही टोकाचे वाद होते. पण तरी महाराष्ट्राची एकात्मता बाधित झाली नाही. उलट यातून जे वैचारिक, सामाजिक, भक्ती विषयक अभिसरण झाले त्यातूनच महाराष्ट्राची वेगळी ओळ्ख निर्माण झाली. ही ओळख जपायला हवी. अनुभवमंडपांसारखे वाद-प्रतिवादाचे, खंडन-मंडनाचे व्यासपीठ लिंगायत धर्माने आपणास दिले. वारकरी पंथाच्या साहित्याने मानवतेची आणि समतेची शिकवण दिली. त्याला वैचारिक अधिष्ठान होते. माणसांना जोडण्याची,लोककल्याणाची तळमळ त्यात होती. म्हणून तर ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे ज्ञानदेव म्हणाले. आपल्या व्यक्त होण्यातून जोडण्यापेक्षा तोडण्याचीच कृती अधिक होत असेल तर? याने समाज कसा सांधला जाणार? त्यामुळेच व्यक्ततेच्या कृतीतून विधायक, दृष्टिकोन आणि माणूसपणाची जाणीव व्यक्त व्हायला हवी. आपल्या निव्वळ व्यक्ततेला अभिव्यक्तीच्या पातळीवर न्यायचे असेल तर त्याला अभ्यासाची, सत्य-असत्याच्या निवडीची, साक्षेपाची जोड हवी. म्हणूनच म्हणावेसे वाटते ‘अभ्यासोनी प्रकटावे . नाही तरी झाकोनी असावे

— अशोक लिंबेकर 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -