भुरळ!

Subscribe

विवाह संस्था जीवनातील सुरक्षेसाठी उदयाला आली आहे. लग्न करण्यामागे आणि मगच शारीरिक संबंध ठेवण्यामागे जे काही वैचारिक, सामाजिक बंधन आहे ते आपणच झुगारून द्यायचे, आपणच स्वतःच्या खुशीने, मर्जीने समोरच्याला परवानगी द्यायची आणि मग संबंधित पुरुषाने लग्न करतो असे आमिष दाखवून बलात्कार केला म्हणून त्याला बरबाद करायचे? सुख उपभोगताना, त्याचा अनुभव घेताना जर विवाहापूर्वी तुम्ही स्त्री असून मर्यादा ओलांडल्या, एकत्र आलात, पुरुषाला तुम्ही स्वतः संधी दिली, वेळीच नकार दिला नाही, तर एकटा पुरुष बलात्कारी कसा ठरू शकतो? समुपदेशनाच्या अनेक प्रकरणांमधून असेही समोर येते की काही महिला समाजात नावलौकिक असलेल्या पुरुषांना स्वतःच्या प्रेमात ओढून, त्याची सहानुभूती मिळवतात. त्याच्याशी सर्व प्रकारे जवळीक साधून त्याच्या पैशाचा उपभोग घेतात. पुढे मागण्या वाढू लागतात. तसे न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देतात.

व्यक्तीच्या संमतीशिवाय किंवा बळजबरीने लैंगिक संबंध प्रस्थापित करणे म्हणजे बलात्कार होय. यात पीडित व्यक्ती ही पुरुष किंवा बहुतांशी स्त्री असते. हा एक लैंगिक अत्याचार व कायदेशीर गुन्हा आहे. जर बलात्कार एकापेक्षा जास्त व्यक्तींनी केला तर मग त्याला ‘सामूहिक बलात्कार’ म्हणतात. बलात्कार हीन अपराधांच्या श्रेणीत येतो ज्याची शिक्षा आयुष्यभर किंवा मृत्यूपर्यंत होण्याची शक्यता आहे. बलात्काराचे न्यायालयीन अहवाल, सुनावणी आणि दंड वेगळे आहेत. बलात्कार गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. बलात्कार स्त्रियांवरच होऊ शकतो. शारीरिक रचनेमुळे बलात्कारितेला भयंकर अशा शारीरिक, मानसिक यातनांना तोंड द्यावे लागते. भारतात बलात्कार हा दखलपात्र गुन्हा आहे. सर्वसाधारणपणे हे झाले बलात्कार संबंधित कायदेशीर विश्लेषण.

आजपर्यंत चित्रपट, कथा, नाटक इत्यादीसारख्या करमणुकीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बलात्काराचे प्रसंग चित्रीकरण केलेले पाहिलेले आहेत. एखादी स्त्री तीव्र प्रतिकार करीत असताना आरडाओरडा करीत असताना, जीवाच्या आकांताने ओरडत असताना, मदतीची याचना करीत असताना, एका किंवा अनेक पुरुषांनी तिच्याशी झटापट करुन, बळजबरी करुन, तिला शारीरिक दृष्टीने इजा करुन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा एकतर्फी प्रयत्न करणे म्हणजे बलात्कार असेच या चित्रीकरणांमधून सर्वसाधारणपणे पहायला मिळालेले आहे. वर नमूद केलेल्या सविस्तर माहितीनुसार कायद्यानेदेखील बलात्काराची व्याख्या, संबंधित आरोपी आणि फिर्यादी व्यक्तीमधील सर्व घटनाक्रम, प्रसंग, त्यावेळची परिस्थिती, पुरावे, साक्षीदार आणि न्यायालयात चाललेला युक्तिवाद यानुसार बलात्कार या घटनेकडे विविध दृष्टिकोनातून विविध उदाहरणे अभ्यासून कालानुरूप बदल केलेले आहेत.

- Advertisement -

चित्रपटातील दृश्य अतिशयोक्ती, अतिरंजित असतात हे जरी खरे असले तरी आपण प्रत्यक्षात समाजात घडलेल्या बलात्काराच्या केसेसमधून सर्वसाधारण हेच पाहतो आणि ऐकतो की स्त्रीशी जबरदस्तीने संभोग करण्याचा प्रयत्न म्हणजे बलात्कार! त्यामुळेच या गुन्ह्या संदर्भातील कायदे अतिशय कडक होऊन त्यावर ताबडतोब अंमलबजावणी होणे, आरोपीला कठोर शासन होणे यासाठी आपण सर्वजण, आपला समाज आग्रही असतो. या संदर्भातील कलम, कायदे यावर अनेक मतमतांतरे असून त्यात सातत्याने सुधारणा केली जात असते. प्रत्येक पीडित स्त्रीच्या चारित्र्य, आत्मसमान, प्रतिमा, प्रतिष्ठा, इज्जत आणि पूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा असा हा संवेदनशील विषय आहे. त्यामुळे या परिस्थितीमधून जाणार्‍या प्रत्येक पीडित मुलीला, महिलेला न्याय मिळणे तिचा हक्क आणि अधिकार आहे.

परंतु समुपदेशनाला आलेल्या काही प्रकरणांमध्ये असे जाणवते की अनेक महिलांना बलात्काराची केस एक हत्यार वाटते. अतिशय सहजासहजी एखाद्या पुरुषाला बदनाम करण्यासाठी बलात्कार हा शब्दप्रयोग महिला करताना दिसतात. एखाद्या पुरुषावर बलात्काराची तक्रार करणे, त्यातून त्याला शिक्षा होण्याची इच्छा ठेवणे, त्याचे कुटुंब बरबाद करणे आणि त्याचा बदला घेणे, त्याला उद्ध्वस्त करणे हेच जणू अशा महिलांचे ध्येय असते आणि का तर महिलांच्या बाजूने कायदे आहेत! अशा केसमध्ये महिलेला सहानुभूती मिळेल, तिला लढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य, पाठिंबा मिळेल अशी तिची धारणा असते.

- Advertisement -

पुरुषाकडून त्याच्या घरी हे संबंध लक्षात आले म्हणून, त्याचे मन भरले म्हणून, अथवा दुसरी मैत्रीण भेटली म्हणून अथवा अन्य कोणत्याही विषयावरून दोघात काही कारणास्तव वाद झाले म्हणून हे संबंध संपवण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या महिलेशी असे तात्कालिक, गंमत म्हणून, चेंज म्हणून अथवा गरजेपोटी निर्माण केलेले संबंध पुरुषांना संपुष्टात आणायचे असतात, त्यावेळेस पुरुष तिला टाळणे, तिला इमोशनल करुन त्याची मजबुरी सांगणे, तिला प्रेमात करण्याच्या त्यागाच्या मोठमोठ्या कहाण्या सांगून तिचं मन, मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो. कालांतराने तिच्याशी अबोला धरणे, स्वतःची वर्तवणूक बदलणे, तिच्या फोन मेसेजला उत्तर न देणे हे सर्व उपाय पुरुष करुन पाहतात. प्रकरण गळ्याशी येऊ शकते, समोरील महिला आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाऊ शकते या भीतीने पुरुष बचावाचा पवित्रा घेतात.

सुजाता (काल्पनिक नाव ) अविवाहित उच्चशिक्षित नोकरी करणारी मुलगी. संजय (काल्पनिक नाव ) विवाहित असलेल्या दोन मुलं असलेल्या माणसासोबत चार वर्ष संबंध ठेऊन आहे. दोघांनी मंदिरात जाऊन एकमेकांना माळा घातल्या असून ते फोटो तसेच त्यांच्यातील संभाषण, चॅटिंगचे पुरावे सुजाताकडे आहेत. सुजाता जेव्हा भेटायला आली तेव्हा ती खूप डिस्टर्ब होती आणि तीच एकच म्हणणं होत आता संजयला मी नको आहे, त्याने मागील सहा महिन्यापासून मला भेटणं, बोलण बंद केला आहे, माझा फोनदेखील तो घेत नाही. त्याला मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो तयार नाही. संजय माझ्या भावनांशी खेळला, माझं त्याच्यावर खरं प्रेम आहे. त्याने पण माझ्यावर खूप प्रचंड प्रेम केलं आहे, मग आता अचानक तो का बदलला? आणि आता तो जर ऐकणारच नसेल तर मला त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा आहे आणि त्याला दाखवून द्यायचे आहे की माझ्या भावनांशी खेळणं त्याला किती महागात पडणार आहे.

संजयचा कायदेशीर घटस्फोट नसल्याने हे विवाहबाह्य संबंध नैतिकतेमध्ये बसवून आयुष्यभर नवरा बायको म्हणून राहणे देखील शक्य नाही. संजयची बायको त्याला कधीही फारकत देणार नाही हे देखील सुजाताला पहिल्यापासून माहिती होते. अशा वेळी सुजातासारख्या पीडित महिलेला समोरून मिळालेला धोका, विश्वासघात अथवा ब्रेकअप पचविणे अवघड होते. आपला वापर केला गेला, आपण मनापासून समोरच्यावर खरं प्रेम केलं, विश्वास ठेवला, त्याला आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि त्याने अर्ध्या रस्त्यात त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, कारणासाठी आपल्याला सोडले हे सुजाताच्या सहनशीलतेच्या बाहेर होते. अशा प्रसंगातून उद्विग्न आणि मानसिक खच्चीकरण झालेली महिला मग काहीही करुन समोरच्याचा सूड घेण्याच्या भावनेने पेटून उठते आणि तिला मिळालेल्या चुकीच्या सल्ल्यानुसार इतक्या वर्षात परस्पर संमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना जबरदस्ती, बलात्कार असे रुप देऊन माझ्यावर कसा अन्याय झाला म्हणून न्याय मिळवायचे प्रयत्न सुरू करते.

अशी प्रकरणे खरंच बलात्कार असू शकतात काय? पुरुषांना अशा केसची धमकी देऊन ब्लॅकमेल करणं खरंच योग्य आहे काय? वर्षानुवर्षे एखाद्यासोबत स्वखुशीने आपण संबंध ठेवत असू तर अचानक त्या घटनांना बलात्कार संबोधने कितपत नैतिकतेला धरून आहे. सुजाताला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिचीसुद्धा या प्रकरणात बदनामी होईल, पुढे लग्न होणे कठीण होईल हेसुद्धा समजावण्याचा प्रयत्न केला गेला. संजयला त्याच्या पत्नीला भेटून चर्चा करण्यात आली. संजयचे म्हणणे होते की, माझी चूक झाली. मी तिच्या नादी लागलो, माझ्या पत्नीसोबत या प्रकरणावरून माझी भांडण पण झालीत. आता मला यातून बाहेर पडायचं आहे, सुजाताने इकडे तिकडे फोन करुन माझ्यावर दबाव आणणे थांबवले पाहिजे, ती माझ्याविरुद्व पुरावे जमवून सगळ्यांना दाखवत सुटली आहे.

ती मला आत्महत्या करण्याच्या धमक्या देते, सुजाताने लग्न करुन तिच्या मार्गाला लागावं ती मला याच्या त्याच्या करवी फोन करुन प्रचंड त्रास देणे तिने थांबवले पाहिजे. संजयची बायको सुजाताविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याचा विचार करीत होती. कारण उद्या सुजाताने आत्महत्या वगैरेचा प्रयत्न केला किंवा तिला काही झालं तर संजयचं आयुष्य पणाला लागेल, त्यांचा संसार उध्वस्त होईल. याठिकाणी कोणीही दोष सुजातालाच देईल की विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवताना तिने विचार करायला हवा होता. पण संजयने देखील पत्नी असताना असे संबंध जोडणे आणि मनात येईल तेव्हा ते तोडून टाकणे कितपत योग्य आहे.

दुसरा एक विषय कायम समोर येतो की लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले गेले आणि नंतर लग्नाला पुरुषाने नकार दिला म्हणून त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल व्हावा. वास्तविक या ठिकाणी महिलांची, मुलींचीदेखील चूक आहे. आपल्या सामाजिक नीती मूल्यांनुसार, चालीरीती नुसार, परंपरेनुसार जर पाहिले तर, कोणीही असो कायदेशीर अथवा वैदिक पद्धतीने लग्न करुन त्यानंतरच शारीरिक संबंध ठेवणे आणि वैवाहिक आयुष्य सुरु करणे हेच समाजरचनेला धरून आहे. दोघांनी लग्न करायचं ठरलेच आहे तर तोपर्यंत महिला स्वतःची मर्यादा का पाळत नाही? अशा मनोवृत्तीच्या महिलांमुळे प्रत्येक महिलेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन दूषित होतो आहे आणि जी खरंच पीडित महिला आहे तिच्यावर विश्वास ठेऊन तिला न्याय मिळवून देण्यासाठीसुद्धा कोणी लवकर पुढे येत नाही.

वर्षानुवर्षे एखाद्या ठिकाणी नेऊन, बोलावून कोणाला सांगितले तर बदनामीची जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन अथवा तरुण मुलींशी एका किंवा अनेक पुरुषांनी अतिप्रसंग करण्याच्या घटनादेखील सातत्याने ऐकायला येतात. अशा प्रसंगांना मुलींनी धाडसाने तोंड देणे आवश्यक आहे. वर्षानुवर्षे असा अत्याचार सहन करीत राहणे म्हणजे स्वतःला प्रचंड त्रास, मनस्ताप करुन घेणे आहे. पहिल्यांदाच जेव्हा कोणाचा असा कोणताही अनुभव येतो तेव्हाच कोणत्याही धमकीला न घाबरता आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अजान मुलींवर, मुलांवर जर कोणी अशा स्वरूपाची जबरदस्ती करीत असेल तर त्याला पोक्सो (लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम ) यानुसार तक्रार करता येते. त्यामुळे बलात्कार या गुन्ह्यासाठी असलेल्या कायद्यांचा महिलांनी विनाकारण गैरवापर न करता सर्वांनी खरंच जिथे महिला पिडीत आहे, तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -