एकादशीचा फराळ…

आषाढी एकादशीच्या दिवशी आमच्या घरी कधी हरिपाठ, कधी भजन असा कार्यक्रम असायचा. आलेल्या मंडळींना बटाट्याचा चिवडा, शेंगदाणा लाडू आणि जायफळ, वेलदोडा लावलेली दाट दुधाची मसालेदार कॉफी किंवा दूध देत असत. कधीकधी एकादशीच्या रात्री हरिपाठ किंवा विष्णू सहस्त्रनाम पठणासाठी बाबांच्या मारवाडी मित्रांकडूनही बोलावणे येई. तसे बोलावणे आले की माझा आनंद गगनात मावत नसे, कारण तिथे तुपात निथळणारा आणि सुका मेवा घातलेला बदामाचा शिरा, तळलेले काजू, कोथिंबिरीचे देठ घातलेली हिरवट साबूदाण्याची खिचडी करत... सगळे पदार्थ आठवून आताही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.

आमच्या लहानपणी आजी आणि आजीसदृश समवयस्क मंडळी प्रत्येकच एकादशी करायचे. एकादशीचा उपवास फक्त बायका करत असतील तर त्या एखादाच पण चविष्ट असा फराळाचा पदार्थ करायच्या. अर्थातच त्यांच्या फराळावर डोळा ठेवून असलेल्या नातवंडांनाही त्यातला वाटा चाखायला मिळत असेच. ते फराळाचे पदार्थ म्हणजे सायीच्या दह्यातली आले, मिरची लावलेली पेरु किंवा केळीची कोशिंबीर, दूध गुळात कुस्करलेले उकडलेले रताळे, दुधात भिजलेले राजगिर्‍याचे लाडू, हाळीव-खारकेची खीर, ताकातला साबुदाणा, भिजवलेल्या साबूदाण्यात शेंगदाणा कूट, मिरची, मीठ, साखर आणि दही घालून केलेली कच्ची खिचडी… फार तर भगर, दही भेंडी, तांबड्या भोपळ्याचे रायते (उपासाला चालत असल्यास) असे पदार्थ असायचे.

घरातली पुरूष मंडळीही उपासात सामील असली तरच साबुदाणा खिचडी, भगर आणि शेंगदाण्याची आमटी, उपासाच्या भाजणीची थालीपीठे, बटाट्याचा शिरा, रताळ्याच्या काचर्‍या… असे जरा वैशिष्ठ्यपूर्ण पदार्थ बनवले जात.

पण आषाढी एकादशीसारख्या महाएकादशा म्हणजे घरातल्या सर्वांचाच उपवास. त्या उपासाची तयारी चांगली आठवडाभर अगोदरपासूनच सुरू होई. नागपूर जवळच्या मनसरला उपासाला चालणारे मलईचे अफलातून चवीचे लाडू मिळतात. तसे लाडू आमची आत्या करत असे. ती जर कोल्हापूरला असली तर ‘ते मलईचे लाडू’ हे आमच्या बरोबर आमच्या दोस्त असलेल्या सुहृदांचेही आकर्षण असायचे. त्यासाठी आठवड्याभरापासूनच ती साय जमवून ठेवायची. तेव्हा फ्रीज नव्हते. सायीत भरपूर पीठीसाखर घालायची आणि मंद विस्तवावर घोटून ठेवायची. त्या सायीच्या भांड्याला गार पाण्यात भिजवलेले फडके बांधावे लागे. सगळ्यांचा त्या लाडवावर भारी डोळा! मला मात्र साय आवडत नसल्यामुळे मी तिकडे पहातही नसे.

त्याबरोबर बटाटे, साबुदाण्याचा चिवडा, बटाटे, केळी, फणस, सुरण यांचे वेफर्स, बटाट्याचे पापड… उपवासाचे तळण काढून ठेवले जाई. राजगिर्‍याचे, हाळीवाचे, काजू-बदाम आणि शेंगदाण्याचे लाडू बनवत. नारळाच्या कोरड्या आणि मऊ वड्या तयार होत. मऊ वाड्यांमध्ये केळी, पपई, अननस, आंबे आदी फळे घालत किंवा गोव्यात बनतात तशा शेंगदाणे, ओले खोबरे आणि गुळाच्या वड्या तयार करून ठेवत. साबुदाणा, शिंगाडा, राजगिरा यांची पिठे आणि उपवासाची भाजणी विकत आणत किंवा घरीही बनवत. त्याचबरोबर शेंगदाण्याचे भरपूर कूट आणि नारळ खोवून ठेवत.

मला उपासाच्या सर्व भाज्या आवडत. अजूनही आवडतात. तूप जिर्‍याच्या फोडणीत आले मिरची घातलेल्या आणि अजिबात मसाला नसलेल्या भाज्या अगदी सात्विक चवीच्या असतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी उपवासाला बटाटा, सुरण, रताळी, भेंडी, दूधी, काकडी कच्ची केळी, अडकुड्या, तांबडा भोपळा, कोथिंबीर…अशा सर्व भाज्या चालतात. आषाढीच्या आदल्या दिवशी उपासाच्या भाज्याही आणून ठेवत. असे सगळे आणले की उपवासाच्या बेगमीची तयारी पूर्ण होई.

आषाढीच्या दिवशी, दिवसभराचा उपास बाधू नये म्हणून प्रथम सूंठ, तूप आणि गूळ/ पीठीसाखर घातलेल्या गोळ्या खाव्या लागत. मग चहा, दूध किंवा कॉफी बिस्किटांशिवायच प्यावी लागे. किंवा त्याही काळात काही भारी घरातल्या हौशी बायका वरी, राजगिरा आणि साबुदाण्यात काजू वगैरे घालून घरगुती बिस्किटे नामक कडकडीत भाकरीच्या तुकड्यासारखी लागणारी भयंकर बिस्किटे करून ठेवत. (नशिबाने आमच्या आईला तसली काही आवड नव्हती) त्या दिवशी नाश्त्यासाठी साबुदाणा खिचडी, बटाट्याचा तळलेला किस, साबुदाणा चिवडा आणि राजगिर्‍याचा लाडू मिळत असे. जेवणाच्या वेळच्या फराळाच्या पदार्थांनी मात्र ताट भरलेले असे. त्या अगोदर जय जय रामकृष्ण हरी हा जप करावा लागे.

पोटात कावळे ओरडताना जप बहुधा पांडूरंगाकडे थेट पोचत असे कारण जप संपेपर्यंत ताटे मांडलेली असत. त्या दिवशी दुपारच्या फराळासाठी ओल्या नारळाची किंवा कवठाची चटणी, खमंग काकडी, भेंडी आणि मिरची घातलेला वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाटा किंवा कच्च्या पपईची भाजी, उपासाचे तळण (कुरड्या/ बटाट्याचे पापड) दुधीची साबुदाणा घातलेली खीर, करवंदाचा मुरंबा/बटाट्याचा/शिंगाड्याचा/ राजगिर्‍याचा शिरा/ फ्रूट सॅलड, बटाट्याची, सूरणाची/कच्च्या केळ्याची भजी किंवा काप, सोलकढी/ शेंगदाण्याची आमटी आणि राजगिर्‍याच्या पुर्‍या किंवा भाजणीचे वडे, बटाट्याचे, साबुदाण्याचे पापड, त्याबरोबर ताजे दही किंवा ताक… एवढे पदार्थ खाऊनही थोड्या वेळातच भूक लागे. त्यासाठी केळी, पेरु ही फळे, खजूर, राजगिर्‍याचे लाडू आणि वेफर्स, चिवडे, वड्या यांचे डबे भरून ठेवलेले असत. दुपारच्या चहाबरोबर साबुदाणा चिवडा मिळेच आणि रात्री साबुदाणा वडे आणि मलईची खीर (भरपूर साय असलेली कच्ची बासुंदी) किंवा आरारूटच्या जिलब्या असत. एवढे सगळे खाऊनही ‘आपण आज उपास केला, जेवलो नाही..या विचाराने मन भरून येई आणि फार अभिमान वाटत असे.

आमच्या शेजार्‍यांच्या घरी रताळ्याचा किंवा कच्च्या पपईचा शेंगदाणा कूट आणि मिरच्या घालून तिखट तिखट कीस करत. तोही मला आवडे. एक शेजारी पंढरपूरचे होते. त्यांच्याकडे उपासासाठी वरीची खुसखुशीत भाकरी आणि दही भेंडी किंवा भरपूर शेंगदाण्याचे कूट घातलेली तुपातली भेंडीची भाजी किंवा शेंगदाण्याच्या कूटाचे पिठले करत. माझ्या एका गोव्याच्या मैत्रिणीकडे उपासाच्या दिवशी तळलेले फणसाचे पापड आणि फणसांच्या गर्‍यांच्या खोबरे घातलेल्या गोड वड्या आणि त्याबरोबर नीरफणसाचे आणि बटाट्याचे काप करत. आमच्या घरच्या फराळाचे खाऊन परत मी त्या मैत्रिणीच्या घरीही फराळाला जात असे.

आषाढी एकादशीच्या दिवशी आमच्या घरी कधी हरिपाठ, कधी भजन असा कार्यक्रम असायचा. आलेल्या मंडळींना बटाट्याचा चिवडा, शेंगदाणा लाडू आणि जायफळ, वेलदोडा लावलेली दाट दुधाची मसालेदार कॉफी किंवा दूध देत असत. कधीकधी एकादशीच्या रात्री हरिपाठ किंवा विष्णू सहस्त्रनाम पठणासाठी बाबांच्या मारवाडी मित्रांकडूनही बोलावणे येई. तसे बोलावणे आले की माझा आनंद गगनात मावत नसे, कारण तिथे तुपात निथळणारा आणि सुका मेवा घातलेला बदामाचा शिरा, तळलेले काजू, कोथिंबिरीचे देठ घातलेली हिरवट साबूदाण्याची खिचडी करत… सगळे पदार्थ आठवून आताही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे.

उपासाच्या दिवशीच्या एवढा गडगंज फराळ खाऊन थकल्यामुळे घरातली मंडळी त्या दिवशी बाजार.. वगैरे असली कामे करत नसत. मात्र तसे कुठे बाहेर जायची वेळ आलीच तर शॉपिंग करून दमल्यामुळे दूध कोल्ड्रिंक किंवा काजू किंवा बदाम मिल्क शेक प्यावाच लागे. असो… हे झाले आमच्या लहानपणीचे.

आताच्या काळात सर्वच गोष्टींना उत्सवी स्वरूप आलेले आहे, उपवासही त्याला अपवाद नाही. नाविन्यपूर्ण चवींची आणि अर्थातच पदार्थांची आत्यंतिक हौस निर्माण झाल्यामुळे यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅप असल्या सोशल मीडियावर उपासाच्या अभिनव पाककृतींची नुसती रेलचेल असते. वरी, राजगिरा आणि साबुदाण्याचे ढोकळे, आप्पे, इडल्या, डोसे, उपासाचे पातोळे, कसल्या कसल्या प्रकारचे वडे, ‘चटपटीत बटाटे’ म्हणजे अर्धवट उकडलेल्या बटाट्याच्या गोल गोल बोटभर लांबीच्या पट्ट्या कापून त्या तळायच्या. त्यावर तिखट आणि काळे मीठ घालून फारच भारी लागते.(वाईट कशाला लागेल!) त्याला ‘उपासाचे स्प्रिंग रोल’ म्हणतात. (ते तर वयोवृद्धांनाही आवडतात), त्याचबरोबर उकडलेले बटाटे आणि साबूदाण्याच्या आवरणात मिरची आणि जिरे लावलेल्या ओल्या खोबर्‍याचे सारण भरून केलेले पॅटिस, बटाटे, भोपळा, काकडी, शेंगदाणा कटलेट, मलई पेढे असे नानाविध पदार्थ..हल्लीच्या नवगृहिणी बनवतात किंवा विकत आणतात. आता तर काय…‘उपास आईस्क्रीम, उपवास फ्रूट पंच’ असलेही पदार्थ सर्वत्र मिळतात.

‘आरोग्य जागरूक’ लोकही उपवासासाठी गूळ साखर न घालता केलेले खजूराचे लाडू, सुक्या मेव्याच्या वड्या, अधून मधून तोंडात टाकण्यासाठी तुपात तळलेल्या मनुका, काजू, बदाम, अक्रोड आणि वेगवेगळ्या बिया खारवून ठेवतात. वास्तविक या उपासाच्या फराळाची गंमत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सीमेवरच्याच प्रदेशात आहे. जसजसे उत्तरेकडे जाऊ तसे उपवासाला काहीच खात नाहीत आणि जसजसे दक्षिणेकडे जाऊ तसतसे भात सोडून उपवासासाठी पोहे, उप्पीट, चपात्या इत्यादी सर्व काही चालते.

खरे तर उपास म्हणजे साधे, हलके, सहज पचणारे पिष्टमय पदार्थ (कंदमुळे/झाडांची खोडे) )खाऊन पोटालाही विश्रांती द्यावी आणि भगवत् चिंतनात दिवस घालवावा, असे असते. परंतु त्याऐवजी आता कोणता नवीन पदार्थ करू किंवा कोणता नवीन पदार्थ खायला मिळणार आहे…याचेच दिवसभर चिंतन होते. मग उपास लागतो, पित्त होते… उपास लागू नये म्हणून लिंबू, आवळा सरबते, पित्त होऊ नये म्हणून शहाळ्याचे पाणी..हेही पोटात रिचवले जातात….

हरकत नाही… जोपर्यंत पचते तोपर्यंत खाऊन घ्यावं… जेव्हा शरीर घंटा वाजवेल तेव्हा पाहू…आणखी काय!

–मंजुषा देशपांडे