उत्पादक कंपन्यांच्या गतीला राजकारणाचा खोडा

शेतमालाचा व्यवसाय नफ्याच्या दिशेने जाऊ लागला की, त्या कंपनीचा म्होरक्या कंपनीचे सगळे व्यवहार त्याच्या एकट्याच्या ताब्यात घेतो. तो कोणत्याच बाबतीत इतरांना विचारेनासा होतो. तो जर राजकीय पक्षात असेल तर तो सगळे पक्षीय डावपेच तो आपल्या सहकार्‍यांशीच खेळतो. कंपनीचे उत्पन्न तो व्यक्तिगत व्यवसायांमध्येही वापरतो. हिशोबाची विचारणा करणार्‍यांना कंपनीत एकटे पाडले जाईल अशा खेळी खेळतो. कंपनीतील पारदर्शकता हरवून जाते. कंपनीची वाटचाल सामूहिक नेतृत्वाकडून व्यक्तिकेंद्रित नेतृत्वाकडे होते.

प्रश्नांचा खूप गदारोळ आहे भोवती. उत्तराच्या आशेने सकाळी उठावं तर नवा दिवस पुन्हा प्रश्नांचाच गुंता घेऊन समोर येतो. उत्तरे शोधण्याचा आटापिटा करताना प्रश्न संपता संपत नाहीत…

शेतीमधल्या प्रश्नांबाबत भरपूर बोललं गेलंय. भरपूर लिहीलं गेलंय. अनेकांनी बरंच काही सांगून झाल्यावर शेवटी शेतकर्‍यांनी ‘एक’ झाल्याशिवाय पर्याय नाही या थांब्यावर अनेक विचारवंतांनी हताशपणे हात टेकले आहेत. शरद जोशींच्या चळवळीने पिढ्यानपिढ्यांच्या दुखत्या नसांवर बोट ठेवत ‘शेतकरी तितुका एकएक‘ करण्याचा प्रयत्न केला. पण ते फार काळ चाललं नाही. बदलत्या काळाला धरुन बदला असे त्यांनी सांगितले पण तेही कुणी ऐकलं नाही. अनुयायांनी चळवळीचे तुकडे केले अन प्रत्येक जण आपापल्या तुकड्याचे सुभेदार झाले. त्यातच त्यांनी धन्यता मानली आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुरुवातीला सहकारी चळवळीने शेतकर्‍यांना पत दिली. यात सहकारातील पहिल्या पिढीने तो तळागाळात रुजवला. या सहकाराचा नंतरच्या काळात स्वाहाकार झाला. या स्वाहाकारामुळे ‘एकवेळ रोग चालेल पण वैद्य नको‘ अशी वेळ शेतकर्‍यांवर आली. तो काळ आता मागे सरला असून शेतकरी उत्पादक कंपन्यांचा काळ आला आहे.

सहकाराचे नवे मॉडेल
मागील काळातील सहकारातील त्रुटी दूर करुन पुन्हा चांगलं काही करण्याचा प्रयत्न करुन पाहू या असे काही बांधावरचे लोक बोलू लागले. सहकाराची दिशा आणि त्याला व्यावसायिकतेचा कार्पोरेट दृष्टिकोनाची जोड असं नवं शेतकरी उत्पादक कंपनीचं मॉडेल पुन्हा तरुण शेतकर्‍यांना खुणावू लागलं. यातून काहींना खरोखर दिशा सापडली. स्वत:चे प्रश्न स्वत:च सोडवू असे म्हणत काही ध्येयनिष्ठ तरुण शेतकर्‍यांनी शिवारात मोठे काम उभे केले. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांतून शिवाराचे चित्र बदलायला सुरवात केली. मात्र अशी उदाहरणेही अगदी बोटावर मोजता येतील इतकी कमी राहिली.

चळवळ भरकटतेय
बहुतांश शेतकर्‍यांचे गट दिशाहिन भोवंडत राहिले. ज्या शेतकर्‍यांसाठी आपण एकत्र आलो आहोत तो उद्देशच अनेकांचा भरकटला. गावगाड्यातील राजकारण, परस्पर हेवेदावे, अप्रामाणिकपणा या रोगांची लागण या शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही झाली. ध्येय, व्हिजन, मिशन, बिझनेस प्लॅन, मूल्यसाखळी, टीमवर्क, ब्रॅण्डिंग हे शब्दांपुरतेच अन फक्त बोलण्यापुरतेच झाले. बहुतेक कंपन्या या ठराविक कोंडाळ्यांच्या तसेच कुटुंबाच्या खासगी कंपन्या बनल्या. सरकारी अनुदानाच्या गाजराच्या अपेक्षांनी भरकटत राहिल्या. यातूनही जे मिळालं त्या लाभाला त्यांनी भलेमोठे कुंपन घातले. अशा कंपन्यांच्या फलकावर ‘शेतकर्‍यांचे, शेतकर्‍यांनी आणि शेतकर्‍यांसाठी‘ असं बरंच काही दिसतं, पण जेव्हा आपण उत्सुकतेने अजून आत शिरतो तेव्हा वरचे आवेष्टन आणि आतले उत्पादन यात आपल्याला मोठी तफावत दिसून येते.

समुहाकडून व्यक्तीकेंद्रिततेकडे
सामूहिक नेतृत्वातून एक कंपनी सुरू होते. शेतकर्‍यांची सगळी पोरं सगळे मिळून भाग भांडवल उभारतात. शेतमालाच्या विक्रीच्या व्यवसायात उतरतात. त्यात त्यांना कुणीतरी व्यापारी मध्यस्थ घेतल्याशिवाय पर्यायच नसतो. त्यात त्यांना तोटा येतो तेव्हा सगळे तोटाही वाटून घेतात. इथपर्यंत त्यांच्यात चांगली एकवाक्यता, एकसूर असतो. मात्र नंतर जेव्हा शेतमालाचा व्यवसाय नफ्याच्या दिशेने जाऊ लागतात. तेव्हापासून त्या कंपनीचा म्होरक्या कंपनीचे सगळे व्यवहार त्याच्या एकट्याच्या ताब्यात घेतो. तो कोणत्याच बाबतीत इतरांना विचारेनासा होतो. तो जर राजकीय पक्षात असेल तर तो सगळे पक्षीय डावपेच तो आपल्या सहकार्‍यांशीच खेळतो. कंपनीचे उत्पन्न तो व्यक्तिगत व्यवसायांमध्येही वापरतो. हिशोबाची विचारणा करणार्‍यांना कंपनीत एकटे पाडले जाईल अशा खेळी खेळतो. कंपनीतील पारदर्शकता हरवून जाते. कंपनीची वाटचाल सामूहिक नेतृत्वाकडून व्यक्तिकेंद्रित नेतृत्वाकडे होते. बर्‍याचदा याच्या उलटही होते. कंपनी तोट्यात जात असतानाही अनेकजण जबाबदारीपासून पळ काढतात. कंपनीत असा परस्परांबद्दलचा विश्वास कमी होत जातो. तेव्हा कंपनीचे आणि त्या कंपनीशी जोडलेल्या शेतकर्‍यांचे भवितव्य अंधारात सापडते.

चळवळीतील सडके कांदे
ज्या स्वाहाकारातील त्रुटी दूर करण्याची भाषा होत होती. या नव्या शेतकरी उत्पादक कंपन्या पुन्हा त्याच स्वाहाकाराच्या बळी ठरत असतील तर यातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये हताशा दाटते. हे असे अनेक ठिकाणी होताना आज ठळकपणे दिसत आहे. एकत्र येताना समान उद्दीष्टं आणि प्रामाणिक उद्देश असलेल्यांनीच एकत्र यायला हवे. कांद्याच्या चाळीतील एखादा सडका कांदा ज्याप्रमाणे संपूर्ण चाळीचे नुकसान करतो त्याप्रमाणे एकत्र येताना असे सडके कांदे, त्यांचा नीट पूर्वेतिहास नीट समजून घेऊनच नीट पारखून घेतले पाहिजे. सर्वात पहिले प्रामाणिक उद्देश हा निकष ठेवला पाहिजे. पक्षीय राजकारणातील बरेच लोक राजकीय शिडी म्हणून वापर करण्यासाठी अशा चळवळीत येतात. ते आतील वातावरण कायम गढूळ राहील या दिशेने धडपडत राहतात. अशा लोकांना कटाक्षाने दूर ठेवता आले पाहिजे.

आजचे आपले शेतीतील प्रश्न सोडविण्यासाठी ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ सारखा दुसरा सक्षम पर्याय आजतरी उपलब्ध नाही. त्यासाठी पुढाकार घेताना प्रामाणिकता आणि पारदर्शकता ही सर्वात महत्वाची आहे. अन्यथा समाधानाच्याऐवजी पश्चाताप पदरी पडतो. त्यासाठी आधीपासूनच खबरदारी घेणे आणि पुढे अखंड सावध राहणे हाच एक उपाय महत्वाचा ठरतो.