घरफिचर्ससारांशशेतीतल्या नवदुर्गा

शेतीतल्या नवदुर्गा

Subscribe

चूल आणि मूल इथपर्यंतच कधी काळी ओळख असलेल्या महिलांचं अवकाश आता अधिक विस्तृत होतंय. कॉर्पोेरेट क्षेत्रापासून प्रशासकीय सेवेपर्यंत आणि खासगी व्यवसायापासून वाहन चालकांपर्यंत महिलांनी गगन भरारी घेतली आहे. या सर्वच क्षेत्रांवर प्रत्येक नवरात्रोत्सवात चर्चा होते. पण शेतीतील नवदुर्गांकडे मात्र काहीसे दुर्लक्ष होते. चूल आणि मूल सांभाळतानाच शेतीतही राबणार्‍या या नवदुर्गांनी सह्याद्री फार्मस या प्रोड्युसर कंपनीच्या उभारणीतही महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

कष्ट, मेहनत, प्रयोगशीलता, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन ही काही गुणवैशिष्ठ्ये इथल्या महिला शेतकहर्‍यांची आवर्जून सांगता येतील. त्या करीत असलेल्या कामांमध्ये अगदी निंदणी खुरपणीपासून ते ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत, फवारणी ही कामेही त्या लिलया करीत आहेत. हे सगळे अर्थात आधी कुटुंबाचे व्यवस्थापन नीट सांभाळून पाहत आहेत. घराचा प्रमुख हा पुरुषच असतो हा समज आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र सह्याद्री फार्म्सच्या परिवारातील अनेक महिला आपल्या पतीच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी पाहत आहेत. या सर्व व्यवहारांतील त्यांचा सहभाग हा थक्क करणारा आहे. गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन आणि दर्जेदार उत्पादन यात महिला शेतकरी अग्रेसर आहेत.

निर्यातक्षम उत्पादन घेण्यातही या महिला शेतकर्‍यांचा हातखंडा आहे. या महिला शेतकर्‍यांना इतर शेतकर्‍यांप्रमाणेच उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’कडून दिले जाते. या प्रशिक्षणातून त्यांच्यातील कौशल्ये वाढविण्यावर भर दिला जातो. नाशिक मोहाडी या गावालगत ‘सह्याद्री’ वसली आहे. येथील शंभर एकर जागेत द्राक्षे, डाळिंब, केळी या सारख्या फळांपासून ते विविध प्रकारच्या भाज्यांची हाताळणी केली जाते. या शिवाय प्रक्रिया शीतगृहे आदी अनेक उपक्रम राबविले जातात.

- Advertisement -

सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात करणारी कंपनी आहे. त्यामुळे ही कंपनी द्राक्ष शेती व तिचे व्यवस्थापन याच्याशी थेट जोडलेली कंपनी आहे. महाराष्ट्रातील द्राक्षशेतीत विशेषत: नाशिक जिल्ह्यातील द्राक्षशेतीत महिलांचा सहभाग हा उल्लेखनीय असतो. द्राक्ष असो की इतर कुठल्याही फळांची किंवा भाजीपाल्याची शेती असो. शेतकर्‍यांना अनेक संकटांना वेळोवेळी सामोरे जावे लागते. वादळी पाऊस, गारपिटीच्या आपत्तीने उभे पीक जमीनदोस्त होवून जाते. वर्षभराचे पीक हातातून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल होतो. अशा आपत्तीच्या क्षणी घरातील स्त्री घराच्या आणि घरातील कर्त्या पुरुषाच्या पाठीशी उभी राहते. याचे अनुभव अनेकदा येतात.

केवळ पीक उत्पादन घेणार्‍या महिला शेतकरीच नव्हे तर विविध शेतीपूरक व्यवसाय करणार्‍या तसेच स्वयंरोजगारात असलेल्या महिलांच्या सशक्तीकरणावरही ‘रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन’ या विभागाकडून भर दिला जातो. ग्रामविकासात अर्थातच महिला सबलीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानुसार कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा व्यवसायांचे प्रशिक्षण देणे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे उपक्रम प्राधान्याने चालविले जात आहेत. त्यासाठी सर्वतोपरी वैद्यकीय मदत पुरवली जाते.

- Advertisement -

‘दिसणार्‍या महिला आणि न दिसणारे काम’ असे बर्‍याचदा शेतकरी महिलांसदर्भात बोलले जाते आणि ते खरेही आहे. बहुतांश वेळा पुरुषांच्या तुलनेत महिला ही घरासाठी, कुटुंबासाठी जास्त कष्ट करीत असते. मात्र त्या प्रमाणात महिलांच्या कामाची दखल घेतली जात नाही. प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग तितकासा विचारात घेतला जात नाही. आजच्या स्थितीत महिलांच्या स्वातंत्र्याच्या कक्षा बर्‍याच प्रमाणात रुंदावल्या आहेत. तरीही आपल्या कुटुंबव्यवस्थेत अजूनही स्त्रीला अपेक्षित स्थान मिळत नाही हेही वास्तव नाकारता येणार नाही. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी महिला शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवून नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे भव्य महिला शेतकरी अधिवेशन बोलावले होते. 25 वर्षांपूर्वी त्या अधिवेशनाला महाराष्ट्रातून 3 लाख महिला उपस्थित झाल्या होत्या. महिला शेतकर्‍यांच्या प्रश्नाला या अधिवेशनाने वाचा फोडली होती.

शेत जमीन आणि मालमत्तेवर मालकीहक्क म्हणून घरातील कर्त्या पुरुषांचेच नाव लावण्याचा प्रघात आहे. शरद जोशी यांनी पुरुषांच्या जोडीनेच कर्त्या स्त्रीचेही नाव मालमत्तेच्या कागदपत्रावर आले पाहिजे असा आग्रह धरला होता. बरीच दशके उलटून गेली आहेत. त्यावर फारसे काम झाले नाही. खरे तर राबणार्‍या प्रत्येक महिलेला तिच्या श्रमाचा रास्त मोबदला सन्मानपूर्वक मिळाला पाहिजे. स्त्री पुरुष समानतेच्या आताच्या काळात स्त्रीला संधी आणि अधिकारही समान मिळाले पाहिजेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -