घरफिचर्ससारांशलहरी ‘राजा’, हतबल ‘प्रजा’

लहरी ‘राजा’, हतबल ‘प्रजा’

Subscribe

बदलत्या काळाप्रमाणे कोकणातील शेतकर्‍यांनी आता पावले उचलायला हवीत. उत्पादनाबरोबर विक्रीचे गणित समजून घ्यायला हवे. आंबा आपण पिकवायचा आणि भाव व्यापारी ठरवणार असे यापुढे होऊ देऊ नका. सहकाराची कास धरताना जिल्हा पातळीवर एकत्र येऊन आपला भाव आपणच ठरवायचा आहे. सर्व शेतकरी एकत्र आले तर व्यापार्‍यांना नमते घ्यावे लागेल. शिवाय व्यापार्‍यांना आधी पैसे द्यायला भाग पाडायला हवे. मार्केटमध्ये जाऊन रुमालाखाली हात घालून बोटे हलवून भाव ठरवायचे ही बाबा आझमच्या काळातील पद्धत अजून किती वर्षे हापूस उत्पादकांना चुना लावणार याचा विचार करायची वेळ आली आहे.

– संजय परब


आंबा या फळाला बहुगुणी म्हणणे योग्य ठरेल. कारण कोणताही राजा हा बहुगुणीच असतो. भारताचे राष्ट्रीय फळ आणि फळांचा राजा असलेला आंबा देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये होतो. संपूर्ण देशात 25 लाख हेक्टर क्षेत्रावर या फळाची लागवड झालेली असून त्यामधून 18 दशलक्ष टन एवढे उत्पादन मिळते. महाराष्ट्राचा कोकण विभाग हा हापूस या आंब्याच्या जातीसाठी जगप्रसिद्ध आहे. संपूर्ण कोकणात 1 लाख 82 हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा बागायती असून त्यापैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त लागवड ही एकट्या हापूस जातीची आहे. हापूसचा मनमोहक रंग, सुंदर आकार आणि अप्रतिम स्वाद यामुळेच देश विदेशातील बाजारपेठेत याची भरपूर मागणी आहे. हापूसची उत्पादकता फकत 2 ते 3 टन प्रती हेक्टर एवढीच असून देशाच्या उत्पादकतेच्या तुलनेत 7.2 टन एवढेच असून ते खूपच कमी आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील विशिष्ट हवामान आणि जमिनीतील गुणधर्मामुळे हापूस आंब्याला एक खास चव मिळालीय. म्हणूनच आंबा हा राजा असला तर हापूस हा महाराजा आहे.

- Advertisement -

हापूसला फार मागणी असूनदेखील कोकणातील उत्पादकता खूप कमी आहे आणि त्याला अनेक कारणे आहेत. उत्पादक शेतकरी हे वर्षानुवर्षें एका साचेबद्ध पद्धतीने हे पीक घेत असल्याने त्यांना खूप मर्यादा आहे. मुळात पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राप्रमाणे व्यावसायिक पद्धतीने आंबा शेती केली पाहिजे, हे बहुसंख्य शेतकर्‍यांच्या गावीच नाही. बदलते हवामान, जमिनीचा कस, खतांची योग्य मात्रा, फवारणी, झाडांची उंची याचे एक गणित असते. त्याची सांगड घालणे गरजेचे असताना पारंपारिक पद्धतीने आणि काही वेळा कल्टारसारख्या खताची अती मात्रा देऊन हापूसचे गणितच बिघडवून टाकले आहे. हापूस हा राजा आहे आणि काहीवेळा लहरी असतो. पण गेल्या काही वर्षात त्याचा लहरीपणा इतका वाढलाय की आता त्याची शेतकरी प्रजा हतबल झाली आहे.

‘फायदा नको, पण हापूसला आवरा…’ असं म्हणत तो आता काजू आणि बांबूकडे वळत असून कमी असले तरी हुकमी उत्पादन बळीराजाच्या गाठीशी जमा होत आहे. एखाद्या नटीपेक्षाही हापूसचे लाड झालेत. कोकणात अजूनही सामाजिक नाटकात काम करण्यासाठी गोवा आणि मुंबईवरून नट्या आणल्या जातात. या नटीचे इतके नखरे असतात की ‘झक मारला आणि याका मुंबयसून बोलायला. आमच्या सगळ्या नाटकाचो खर्च नसात इतक्या ह्याका पैसे दिया आणि वर माका या व्हया, ता व्हया. त्यापेक्षा सावंत वाड्याच्या सुसल्याक उभ्या केल्या असता तर बरा झाला असता’, असे नाटकाचा डायरेक्टर लवू वेंगुर्लेकर सांगतो, तसेच आंब्याचे झाले आहे.

- Advertisement -

दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाकडून या आतबट्ट्याच्या आंबा उत्पादनाची शास्त्रीय कारणे शोधून काढण्याचे काम केले आहे. या अभ्यासानुसार कोकण विभागात जवळपास 1,82,000 हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड झाली आहे. पण, यापैकी अंदाजे 40 टक्के बागांमधील झाडे उंच वाढली असून त्याची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. या बागांवर फवारणी, काढणी यासारखी आंतरमशागतीची कामे करणे अत्यंत कठीण व त्रासदायक झाले आहे. ‘जुन्या आंबा बागायतीचे पुनरुज्जीवन’ यानुसार विद्यापीठाने यावर चांगले संशोधन केले असून याची माहिती शेतकर्‍यांना उपलब्ध आहे. हापूस कमी प्रमाणात होत असल्याने याचे भाव गगनाला भिडलेले असून गरीब सोडाच मध्यमवर्गसुद्धा हापूस खाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे. शेतकर्‍यांना मिळणारे दर, एमपीएसतील व्यापार्‍यांचे दर आणि शेवटी प्रत्यक्ष ग्राहकांना द्यावा लागणारा भाव यात खूप मोठी दरी आहे.

शेतकर्‍यांना योग्य भाव मिळावा आणि ग्राहकांना तो परवडणारा असावा म्हणून 2001 पासून आम्ही शेतकर्‍यांनी स्वतःचा आंबा थेट आंबा महोत्सव आयोजित करून लोकांपर्यंत आणला. यासाठी मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे, धुळे आणि जळगाव या ठिकाणी महोत्सव आयोजित केले. काही शेतकर्‍यांना याचा चांगला फायदा झाला. विशेष म्हणजे ग्राहकांना चांगला नैसर्गिक पिकवलेला आंबा खायला मिळाला. आता तर या आंब्याच्या नावाखाली सध्या एक फार मोठी मार्केंटिंग यंत्रणा उभी राहिली असून डिजिटल मार्केटिंग आणि फाईव्ह स्टार इव्हेंट घेऊन आंब्याची विक्री केली जात आहे, असे चित्र रंगवले जात आहे. त्याचा एक भाग म्हणून एका उद्योजकाने 5 डझन आंब्याची पेटी 1 लाखात विकत घेतली, हे दाखवले गेले. जगातील सर्वात महागडी आंब्याची पेटी म्हणून तो एक शेतकरी, उद्योजक, मार्केटिंगवाले यांनी टीव्ही, पेपरमध्ये आपले ढोल वाजवून घेतले. जे आतापर्यंत कोणाला जमले नाही ते या मार्केटिंग आयोजकांनी करून दाखवले. खरेतर आता सर्व शेतकर्‍यांनी आपला आंबा या लोकांना विकायला हवा. किती छान… कोकणात घरोघरी करोडपती तयार होतील. पण, वास्तव हे आहे की हा सारा बनाव आहे. तो वेळीच ओळखायला हवा.

बदलत्या काळाप्रमाणे शेतकर्‍यांनी आता पावले उचलायला हवीत. उत्पादनाबरोबर विक्रीचे गणित समजून घ्यायला हवे. आंबा आपण पिकवायचा आणि भाव व्यापारी ठरवणार असे यापुढे होऊ देऊ नका. सहकाराची कास धरताना जिल्हा पातळीवर एकत्र येऊन आपला भाव आपणच ठरवायचा आहे. सर्व शेतकरी एकत्र आले तर व्यापार्‍यांना नमते घ्यावे लागेल. शिवाय व्यापार्‍यांना आधी पैसे द्यायला भाग पाडायला हवे. मार्केटमध्ये जाऊन रुमालाखाली हात घालून बोटे हलवून भाव ठरवायचे ही बाबा आझमच्या काळातील पद्धत अजून किती वर्षे हापूस उत्पादकांना चुना लावणार याचा विचार करायची वेळ आली आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे सहकाराचे महत्व कोकणाला कळत नाही तोवर फसवणूक ठरलेली आहे. आता तरारून शेतकर्‍यांनी स्वतःसुद्धा ऑनलाईन मार्केटिंगची पद्धत शिकून घ्यायला हवी. शिवाय आंबा उत्पादन वाढले तर त्यावर प्रोसेसिंग कसे करता येईल, त्याचा विचार झाला पाहिजे. मुख्य म्हणजे प्रोसेसिंग युनिटशिवाय कोल्ड स्टोरेज तसेच भारतभर विक्रीचे नियोजन यासाठी भर द्यायला हवा. कोकणातील लोकप्रतिनिधींनी यासाठी शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. अन्यथा लहरी ‘राजा’, हतबल ‘प्रजा’ अशी कालसारखी हालत उद्या सुद्धा राहील…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -