Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश ब्रॅण्डींग मुळेच बदलेल शेतीचे अर्थकारण!

ब्रॅण्डींग मुळेच बदलेल शेतीचे अर्थकारण!

ए.व्ही. ब्रॉयलर्स या देशातील अग्रगण्य पोल्ट्री उद्योगाचे अध्यक्ष श्रीकृष्ण गांगुर्डे यांचे एक भाषण ऐकण्याचा नुकताच योग आला. त्यात ते म्हणाले की ‘शेतकरी हा बाजारातून खरेदी करतांना ‘ब्रॅण्ड’ची खरेदी करतो व स्वत:चा माल बाजारात विकतांना तो ‘कमोडीटी’ म्हणून विकतो. तो ज्या दिवशी ‘कमोडीटी’ म्हणून खरेदी करेल व स्वत:चा शेतमाल ‘ब्रॅण्ड’ म्हणून विकेल. त्या दिवशी त्याचे अर्थकारण बदलल्याशिवाय राहणार नाही. हा मुद्दा नीट लक्षात ठेवला पाहिजे. शेतकरी म्हणून आपण आपले उत्पादन बाजरी, ज्वारी, गहू, दुध, द्राक्षे, वांगी, मिरची अशी विक्री करतो मात्र कुठलेही उत्पादन हे त्या ब्रॅण्डच्या नावाने खरेदी करतो. आपल्या उत्पादनाला ब्रॅण्ड बनवता येणे शक्य आहे का? त्यासाठी ‘ब्रॅण्ड’ कसा बनतो? या बाबी समजून घ्याव्या लागतील. अमूल, सह्याद्री या कंपन्यांचा प्रवास जाणून घ्वावा लागेल. जगभरातील अन्य प्रगत देशातील शेतकर्‍यांनी हे केले आहे. जगभरातील एकेका पिकांभोवती केंद्रीत झालेल्या कंपन्यांविषयी आणि त्यांच्या उलाढालीविषयी आपण मागील लेखात माहिती घेतलीच आहे.

Related Story

- Advertisement -

‘जो दुसर्‍यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला’ हे समर्थ रामदासांचे वचन प्रसिध्द आहे आणि ते आपल्याला चांगले माहिती आहे. शेतीच्या बाबतीत तेच घडत आले आहे. आपण प्रत्येक पिकाच्या उत्पादनाबाबत उत्तम काम केले आहे. तांदूळ, गहू, आंबा, केळी, डाळिंब, आले, हळद, मसाला पिके, औषधी पिके, दूध, मासेअशा कितीतरी शेती उत्पादनांच्या बाबतीत आपण भारत देश म्हणून जगात पहिल्या किंवा दुसर्‍या क्रमांकावर आहोत. उत्पादन झाल्यानंतरचे काढणी पश्चात व्यवस्थापन आणि बाजार या बाबतीत मात्र आपण नेहमीच उदासिन राहिलो आहोत. काही पिकांच्या बाबतीत सहकारी पातळीवर तसेच एकत्र येऊन मार्केटींगचा प्रयत्न झालेत. मात्र हे सारे प्रयत्न विखूरलेल्या स्वरुपात आणि अपुरे असेच राहिले आहेत.

‘अमूल’ने ज्या पध्दतीने दुधाची मूल्यसाखळी उभी केली. गुजरातमधील सामान्य म्हणता येईल अशा 30 लाख शेतकर्‍यांचे दूध देशात आणि जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविले. त्यासाठी प्रत्येक साखळी जोडीत काम केले. पुरवठा, गुणवत्ता या बाबतीत सातत्य ठेवले व त्यातून अत्यंत विश्वासार्ह असा ब्रॅण्ड तयार झाला. त्यातून 40 हजार कोटीचा उद्योग उभा राहिला. महाराष्ट्रात नाशिक भागात ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ द्राक्षे, टोमॅटो व भाजीपाला पिकांच्या बाबतीत सक्षम अशी मूल्यसाखळी उभारण्याचे काम करीत आहे. द्राक्षासहीत विविध पिकांचे 8 हजाराहून अधिक शेतकरी एकत्र येऊन त्यांच्या प्रश्नांवर मात करीत आहेत. देशासह जगाच्या बाजारात आपले स्थान निर्माण करीत आहे.

- Advertisement -

अगोदरच्या काळात यशस्वी झालेला ‘अमूल’ असो की अलीकडच्या काळातील ‘सह्याद्री’ असो. या शेतकर्‍यांच्या कंपन्यांनी पहिल्यांदा केवळ उत्पादनाच्या पलीकडे जाऊन बाजाराचे नवे अवकाश शोधण्याचा आजच्या भाषेत कम्फर्ट झोन तोडण्याचा प्रयत्न केला आहे. संकटांनाही घाबरुन न जाता या शेतकरी कंपन्यांनी त्यातून मार्ग काढला आहे. जर्मनी, फ्रान्सच्या बाजारातील सुपर मार्केट मधील खरेदीदार असेल की नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील एखाद्या गावातील द्राक्ष उत्पादक असेल या दोघांशीही अत्यंत सचोटीने व्यवहार करुन स्वत:ची विश्वासार्हता वाढवली आहे. महाराष्ट्रातील इतर पिकांनी या मार्गाने जाण्याची गरज आहे.

राज्यात अनेक पिकांचे संघ आणि महासंघ तयार झालेले आहेत. या संघांच्या प्रयत्नांनीच या पिकांची उत्पादकता, गुणवत्ता, दर्जा वाढविण्याचे सरस काम केले आहे. मात्र यातील बहुतांश संघांनी मार्केटींगकडे दुर्लक्षच केले आहे. ज्यांनी त्यासाठी प्रयत्न केले, त्यांनाही पूर्ण साखळी जोडण्यात व अंतिमत: त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळवून देण्यात अपयशच आले आहे. आपल्याकडील सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून तयार झालेल्या मूल्यसाखळीने ग्रामीण भागात किती मोठ्या प्रमाणात परिवर्तन केले हे आपणाला माहितच आहे. मात्र नंतर त्यात राजकारण घुसत गेले व त्यातील व्यावसायिकता लोप पावत गेले. परिणामी एक चांगल्या हेतूने सुरु झालेली चळवळ लयाला गेली हे आपण सर्वांनी पाहिले आहे. या सगळ्यांचा आता नव्याने विचार करण्याची गरज आहे.

- Advertisement -

आता केवळ उत्पादनावर लक्ष केंद्रित करुन चालणार नाही तर उत्पादन बाजार ते ग्राहक अशी साखळी मजबूत करण्यावर लक्ष द्यावे लागेल. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला ‘बाजार’ हा विषय आता केंद्रस्थानी आणावा लागेल. नुस्ते उत्पादन घ्यायचे. ते गाडीत भरायचे आणि ते तालुक्याच्या बाजारसमितीत घेऊन जायचे आणि लिलावात ज्या भावाला जाईल त्या भावाला विकायचे. या पारंपारिक बाजार पध्दतीला फाटा द्यावा लागणार आहे. उत्पादनाबरोबरच बाजाराची यंत्रणाही तयार करावी लागेल. त्यासाठी पारंपारिक मार्ग टाळून नवे मार्ग चोखाळावे लागतील.

1980 मध्ये शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनाने ‘शेतीमालाला भाव हवा’, भीक नको हवे घामाचे दाम’ म्हणत शेती उत्पादनाला अपेक्षित असणार्‍या रास्त भावाच्या मागणीकडे लक्ष वेधले होते. त्याकाळी बाजार व्यवस्थेवर ही बहुतांशी सरकारचे नियंत्रण होते. त्यावेळी ती मागणी साहजिकच होती. मात्र आता 30 वर्षांपुर्वीची स्थिती राहिलेली नाही. जागतिकीकरणाने बर्‍यापैकी सरकारी बंधने कमी झाली आहेत. या स्थितीत इतर उद्योग व सेवा क्षेत्रांप्रमाणेच आपलं मार्केट ओळखण्यासाठी आणि ते ताब्यात घेण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे येण्याची गरज आहे.

शेतीमालाचा बाजार हे शेतीचे सर्वात मोठे दुखणे आहे. याला अनेक घटक जसे जबाबदार आहेत. त्यापेक्षा स्वत: उत्पादकही त्याला जबाबदार आहे. सगळेच बेभरवशाचे असतांना उत्पादकाने मात्र या बाबतीत सर्वाधिक जागरुक असायला हवे. नेमके हेच होतांना दिसत नाही. आपण घेत असलेल्या पिकांविषयी साकल्याने विचार करण्याची आणि त्यावर योग्य दिशेने कृती करण्याची आता खरी गरज आहे. आपल्या शिवारात आपल्या पिकाची इंडस्ट्री आपण करु शकतो. त्यासाठी शेतकर्‍यांमधूनच ध्येयवादी अभ्यासू तरुण नेतृत्व पुढे येणे आवश्यक आहे.

आपल्या शेतीच्या बांधाबाहेर शेतीच्या आणि शेतकर्‍यांच्या नावाने बराच गदारोळ सुरु आहे. तो सुरुच राहील. त्यातून शेतकर्‍यांच्या पदरात काय पडेल हे पाहणे खरे औत्सुक्याचे ठरेल. मात्र शेतीच्या बाजाराचा मुद्दा याबाबत तरुण शेतकर्‍यांनी तरी पुरेसे गंभीर होवून प्रयत्न करण्याची गरज आहे. हे एकट्या दुकट्याने शक्य होणारे काम नाही. समान पिक असणार्‍या शेतकर्‍यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संस्था स्थापन करुन त्या आधारे उत्पादन ते ग्राहक अशी साखळी जोडणे हा उद्देश ठेवावा. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे प्रयत्न सुरु झाले आहेत. या प्रयत्नांना सरकार व समाजाच्या सर्व घटकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

- Advertisement -