–अर्चना दीक्षित
आजकाल ना ऐकावं तेवढं नवलच आहे. जितकं तुम्ही लोकांशी गप्पा माराल आणि तितक्या काय काय नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. ते खरंच नवलच आहे. आणि त्या सगळ्याची फॅशन झालेली असते म्हणजे हे अजूनच नवीन वाटतं मला. आता हा पुढील फॅशनचा प्रकार ऐकून ऐकून तुम्हाला जर आश्चर्य वाटलं नाही तर बोला. ऐका तर मग या मैत्रिणींच्या गप्पा. अगो आजकाल इतका उन्हाळा आहे ना काय सांगू वैताग आलाय आता. आणि फॅनचं तर काही वारच लागत नाही बाई, काय त्रास आहे ना, काय करावं समजत नाही, बाहेर जायची इच्छा होत नाही, घरात नुसतं घाम घाम घाण काय करावं. बाकी सगळं सोड संध्याकाळी ना तेवढ्यासाठी वॉकला जायची पण इच्छा होत नाही बाई माझी. इतक्या गर्मीत कुठे जायचं बाई. मग काय मी आपलं मस्त स्प्लिट एसी घेऊन ठेवला घरात छान वाटतंय.
आणि त्या खोलीत जाऊन बसते. आजकाल तर ना मी एका बाईला स्वयंपाकाला लावलाय. मग काय स्वयंपाकघरात जायला नको, आणि जेवण बनवायला नको बाई. कुठे बाई मरणाच्या गर्मीत स्वयंपाक करायचा. मस्तपैकी एसीमध्ये बसून छान छान वेगवेगळ्या सिरीयल बघते बाई मी. पण काय बाईमध्येच लाईट गेली ना की मग माझी चिडचिड होते. कारण एसी बंद होतो ना. मग लागतं परत उकडायला. आपल्याकडे लोड शेडिंग किंवा लाईट जाणं हे तर इतकं कॉमन आहे ना. पण जाऊ दे जेवढा वेळ लाईट असतात ना मी आपली तेवढ्या वेळेत बसते ग बाई. मीना तू काय करतेस. तू पण घेतला असशील ना एसी किंवा स्प्लिट एसी. उन्हाळ्याचे कसे दिवस काढतेस तू? थोडं बिल जास्त येतं पण ठीक आहे गं, सोय झाल्याशी मतलब. नाही का गं मीना तुला काय वाटतं?
अगं ज्योती खरंय तुझं म्हणणं, एसी असली की सगळी सोय असते मान्य मला. आणि मलाही हे पटायचं खरंतर. पण ना माझी पोस्टींग अशा ठिकाणी झाली जिथे ना एसी न कसली सोय, मग मला त्रास व्हायला लागला. तुला सांगते तेव्हा ना मी एके ठिकाणी जाऊन, म्हणजे साउथला एका शहरात जाऊन ना एक कोर्स असतो अगं. म्हणजे सांगते सांगते तो कोर्स म्हणजे तुम्ही एसीशिवाय कसे राहू शकतात या विषयावर. तर तिथे ना तुम्हाला शिकवलं जातं, की एसी शिवाय नैसर्गिक वातावरणात तुम्ही कसे राहू शकता. निसर्गाच्या सानिध्यात राहून तुम्ही निसर्गाला कसं आत्मसात करू शकता. हा कोर्स इथे मी केला ग आणि तेव्हापासून खरं सांगू का, मला फरकच पडत नाही. घरात एसी असला काय किंवा नसला काय. मी राहू शकते बाई अशी. काही दिवसांचा कोर्स असतो हा. सुरुवातीला ऐकल्यावर मला जरा नवलच वाटलं. पण म्हटलं चला करून तर बघूयात.
म्हणतात ना केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. तुला खोटं वाटेल पण मी गेले त्या कोर्सला. एक-दोन दिवस वाटतं की आपल्याला नाही शक्य हे. पण मग काही नाही गं हळूहळू होते सवय त्याची. आता मला विचारशील ना, तर खरंच मला फरक नाही पडत एसी किंवा इव्हन फॅनचा देखील. मला वाटतं आपल्या मनावर ताबा असला ना, आपल्या मनावर कंट्रोल हो असला, नक्की सगळं सहज शक्य होतं असं माझं मत आहे हं. त्यामुळे लोड शेडिंग झालं काय किंवा लाईट गेले काय, मला नाही फरक पडत. मी तर म्हणते जमलं ना तर तू पण त्या कोर्सची माहिती काढून घेऊन नक्की हा कोर्स कर.
अगं त्या एसीत राहून राहून ना सगळी दुखणी आपण जवळ बोलवत असतो. आणि आजकाल हा कोर्स करण्याची फॅशन झालीय बरं का ग. ज्योती कसली आजकाल फॅशन होईल काही सांगता येत नाही बाई. काय आहे ना. पण जे काही आहे, मला तर याचा अनुभव चांगला आलाय. तर मग तू पण विचार कर असं मला वाटतं. आणि कर की फॅशन आत्मसात. नाहीतरी टीव्हीवर आजकाल अॅड असतात. इलेक्ट्रिसिटी वाचवा, ज्या खोलीतून बाहेर जाल, तिथली लाईट फॅन सगळं बंद करा. निसर्गाच्या सानिध्यात जा. अशा वेगवेगळ्या असतात. त्यापेक्षा हा कोर्स करून जर आपल्याला काही समाधान सुख मिळत असेल तर काय ग वावगं त्याच्यात.
अगं ज्योती, मीना तुमच्या गप्पा ऐकून ना गंमतदेखील वाटली. मजा पण आली. आणि पटल्यादेखील काही गोष्टी. पण मी सांगू माझ्या लग्नाला बावीस वर्षे झाली आहेत. पण मी अजूनही एसी वगैरे घेतला नाही बरं का. माझ्या पण पोस्टिंग अशा ठिकाणी झाल्या आहेत, की लोक म्हटले आता तर काय ही १०० टक्के एसी घेणार. पण नाही बाई मी नाही घेतला एसी. आजकाल तर माझे मिस्टर पण म्हणतात, बरं झालं तू एसीची सवय नाही लावून घेतली.
त्यामुळे अनेक उपक्रमात तू सहभागी होऊ शकतेस. घराला छान बाल्कनी आहे, तिथे जाऊन छान वाचन करू शकतेस, स्वयंपाक घरात जाऊन वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करू शकतेस, आणि बाहेरच्या जगात वावरून बाहेरच्या जगाचीदेखील छान माहिती घेऊ शकतेस. प्रत्येक गोष्ट छान एन्जॉय करू शकतेस. आणि तुझ्या या स्वभावामुळे आम्हालादेखील आता तीच सवय लागलीये. त्यामुळे आम्ही पण वेगवेगळ्या उपक्रमात आम्हाला बिझी ठेवायचा प्रयत्न करतो.
काय मग रसिक वाचकांनो. कशी वाटली ही नो एसीची फॅशन. करायची का आत्मसात? आणि हरकत काय आहे जर चांगली फॅशन असेल तर, करूयात की, हो आत्मसात. पण हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. प्रत्येकाला पटलंच पाहिजे असा काही माझा आग्रह नाही. कोणत्या फॅशनच्या किती आहारी जायचं, ते आपलं आपणच ठरवायचं.