घरफिचर्ससारांशफॅशनेबल दिवाळी

फॅशनेबल दिवाळी

Subscribe

दिवाळीत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ गोष्टी कशा निर्माण करता येतील आणि त्या तितक्याच आकर्षक कशा वाटतील हे शिकवण्यासाठी आपले घरातील ज्येष्ठ नागरिक प्रयत्न करत असतात, जेणेकरून घरच्याच काही टाकाऊ गोष्टींपासून आकर्षक अशी एखादी सुंदर वस्तू आपण बनवू शकतो, हे ते आपल्या नातवंडांना पटवून देत असतात आणि हीच फॅशन पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे बरं का. काळानुरूप त्या आकाश कंदिलाचं तसं स्वरूप बदलत असतं, पण त्यामागची संकल्पना एकच की आपण आपल्या हाताने एखादी चांगली कलाकृती घडवू शकतो, हा एक संदेशच दिला जातो असं म्हणा ना.

-अर्चना दीक्षित

फॅशनेबल दिवाळी, शीर्षक वाचून जरा आश्चर्य वाटलं असेल ना? वाटलं असेल ना, काय हरकत नाहीये, पण आजकाल प्रत्येक गोष्टीची फॅशनच झाली आहे. सण अगदी मोठ्या प्रमाणात साजरे करायचे. आपल्याकडे अनेक सण आहेत आणि अनेक सण उत्साहाने आपण साजरे करत असतो. तसंच दिवाळी हा खूप मोठा सण आपल्याकडे मानला जातो आणि तो तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला पाहिजे असा आपल्या सगळ्यांचा आग्रह असतो आणि मग तो का नसावा? कारण दिवाळी साजरी करण्यामागचं कारणही तितकच मोठं आहे. जे ऐतिहासिक कारण आहे ते तर सगळ्यांना माहिती आहेच, असं मी गृहीत धरते हं. बरं ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी जरा परत एकदा सांगते थोडक्यात. की जेव्हा भगवान श्रीराम १४ वर्षांचा वनवास भोगून आले आणि त्याशिवाय रावणाचा वध करून आयोध्याला परत आले तो उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून ही दिवाळी दरवर्षी आपण साजरी करतो. अनेक ठिकाणी फराळाचे बनते.

- Advertisement -

म्हणजे चिवडा, लाडू, करंजी, चकल्या, अनारसे असे एक काय अनेक पदार्थ बनवले जातात घराघरांमध्ये. शिवाय संध्याकाळच्या वेळात सगळीकडे दिवे लावले जातात. पणत्या लावल्या जातात. मग अजून थोडासा उत्साह वाढण्यासाठी अनेक ठिकाणी फटाकेदेखील फोडले जातात. अनेक ठिकाणी काय मी तर म्हणते प्रत्येक घराघरांमध्ये फटाक्यांची आतषबाजी होत असते. यात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत किंवा आपण म्हणूयात वयोवृद्धांपर्यंत सगळी घरातील मंडळी अगदी उत्साहाने सहभागी होत असतात. आपलं त्याला ऐतिहासिक कारणही असंच आहे ना. ही ऐतिहासिक कथादेखील परंपरेनुसार प्रत्येक घराघरांमध्ये सांगितली जाते. त्यामुळे तो उत्साह तसाच कायम टिकून राहावा हा त्यामागचा उद्देश.

पिढ्यान्पिढ्या यांचे पालन करावे हीच एक सगळ्यांना इच्छा असते. पूर्वीच्या काळी बाजारात जाऊन सहज शक्य नाही व्हायचं हो, नवीन नवीन कपडे घ्यायला, गोडधोड घरात करायला किंवा रोज उठून लोकांना बोलवून काही छान छान पदार्थ खाऊ घालणं हे त्यावेळेस सहज शक्य नव्हतं, तर दिवाळी किंवा असे सण त्यानिमित्तानेही साजरे केले जातात. जेणेकरून चार लोकांना बोलावून हा उत्साह द्विगुणीत करावा हा त्यामागचा उद्देश. ही परंपरा उत्साहाने तशीच चालत राहावी यासाठी घरातील प्रत्येक जण झटत असतो. प्रत्येक जण उत्साहाने नवीन नवीन काहीतरी कल्पना रचत असतो. जसे आपल्याकडे बनवलेले पणत्यांचे दिवे घराघरात बघायला मिळतात तसेच घरातील वयस्कर मंडळी नातवंडांना घेऊन आकाश कंदीलदेखील तितक्याच उत्साहाने बनवत असतात.

- Advertisement -

बर्‍याचदा हा आकाश कंदील टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ गोष्टी कशा निर्माण करता येतील आणि त्या तितक्याच आकर्षक कशा वाटतील हे शिकवण्यासाठी आपले घरातील ज्येष्ठ नागरिक प्रयत्न करत असतात, जेणेकरून घरच्याच काही टाकाऊ गोष्टींपासून आकर्षक अशी एखादी सुंदर वस्तू आपण बनवू शकतो, हे ते आपल्या नातवंडांना पटवून देत असतात. हीच फॅशन पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे बरं का. काळानुरूप त्या आकाश कंदिलाचं तसं स्वरूप बदलत असतं, पण त्यामागची संकल्पना एकच की आपण आपल्या हाताने एखादी चांगली कलाकृती घडू शकतो, हा एक संदेशच दिला जातो असं म्हणा ना. खरोखरंच एक आदर्श घेणारी गोष्ट आहे. यामागचे उद्दिष्ट लक्षात घेतलं तर खरोखर वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे.

याशिवाय आजकाल बाजारातही सगळ्या गोष्टी मिळतात. हो गोडधोड खाण्याच्या किंवा विविध नमकीन किंवा मिठाईची दुकानं असतात, पण घरी करण्यामागचा उद्देश एकच, एकतर घरचं अन्न खाल्लं जातं. घरच्यांची किंमत राहते आणि त्यामागे लागणारे कष्ट किंवा त्याची गोडी ही वेगळीच असते हे पटवून देण्याचा त्यामागचा उद्देश. याच्या व्यतिरिक्त आपण बघतो की घराघरांमध्ये विविध प्रकारचे फटाके किंवा आतषबाजीच्या गोष्टीदेखील विकत घेतल्या जातात. काही काही लोक म्हणतात की, इको फ्रेंडली असावं. पर्यावरणाचा किंवा निसर्गाचा र्‍हास होऊ नये याची काळजी घेतली जावी, पण दिवाळी वर्षातून एकदाच येते. मग का नाही हो फटाके उडवायचे? का नाही आपण ती आतषबाजी करायची? आपला उत्साह मोठ्या प्रमाणात का नाही साजरा करायचा? तर तो केलाच पाहिजे.

फटाक्यांना माझा मुळीच विरोध नाही. हा त्याचे प्रमाण कसे असावे, किती असावे हे व्यक्तीसापेक्ष. आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला फटाके उडवतो. एखादी क्रिकेटची मॅच जिंकलो तर फटाके उडवतो. कोणी निवडून आलं तर फटाके उडवतो. इतर अनेक गोष्टींसाठी फटाके उडवतो. आपण गाड्या चालवत असतो. थोडंसं जरी अंतर जायचं असेल तर आपण चालत नाही तर गाड्या वापरतो. तेव्हा नाही का हो प्रदूषण होत? होतच की. जर वर्षभर या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर दिवाळीच्या आतषबाजीला आपण बिलकुल विरोध करणार नाही.

म्हणून मला वाटतं प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न उडवणे हा काही एकमेव पर्याय नाही. आपण जर वर्षभर काळजी घेतली तर या सगळ्या प्रदूषणाची वेळच येणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे हे म्हणायची फॅशन टाळा बाबा की दिवाळीत फटाके उडवायचे नाही. दिवाळीत फटाके उडवले तर प्रदूषण होतं. वर्षातून एकदा ती येणारी दिवाळी. त्यातले दोन किंवा जास्तीत जास्त तीन दिवस फटाके वाजवले जातात, पण वर्षभर गाड्यांचा धूर, कंपन्यांचा धूर, शिवाय इतर वेळी केलेली आतषबाजी या सगळ्यांचं प्रमाण कमी केलं ना तर आपण एकुलत्या एका दिवाळीत अगदी उत्साह साजरा करू शकतो बरं का. बघा पटतंय का आणि मला नक्कीच कळवा. आवडतील तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मला.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -