धास्ती

Subscribe

उदयोन्मुख राजकारणपटूंनी हा निर्णय घेतला आणि ‘शुभस्य शीघ्रम’ म्हणत पहिल्या दिवसापासून तो अंमलात आणायला सुरुवात केली. ते उदयोन्मुख असले म्हणून काय झालं, राजकारणाच्या आखाड्यात ते आता भल्याभल्यांना भिडणार होते ना!

‘झोप कमी असणार्‍यांना, झोप उशिरा लागणार्‍यांना म्हणे पहाटे पहाटे झोप लागते. पहाटे पहाटे शपथविधी घेणार्‍यांना म्हणे पूर्ण रात्र झोप लागत नाही आणि नंतर वामकुक्षीही घ्यावीशी वाटत नाही. पण अशी माणसं दिवसभर अगदी ताजीतवानी असतात.’

एका उदयोन्मुख राजकारणपटूंनी हे कुठेतरी ऐकलं आणि त्यांनी आपल्या झोपेवर पाळत ठेवायचं ठरवलं. आता पाळत ठेवायची म्हटलं की ती जागेपणी ठेवावी लागणार. त्यासाठी पाळत ठेवणार्‍याला जागं राहावं लागणार हे ओघाने आलंच. त्यात ही स्वत:च्याच झोपेवर पाळत ठेवण्याची बला. पण राजकारणाच्या क्षितिजावर नव्याने उगवलेला तारा होता तो. त्याने ठरवलं, राजकारणात पुढे येण्यासाठी आपल्याला ज्या ज्या युक्त्या-प्रयुक्त्या कराव्या लागतील त्या करून पहायला काय हरकत आहे!

- Advertisement -

उदयोन्मुख राजकारणपटूंनी हा निर्णय घेतला आणि ‘शुभस्य शीघ्रम’ म्हणत पहिल्या दिवसापासून तो अंमलात आणायला सुरुवात केली. ते उदयोन्मुख असले म्हणून काय झालं, राजकारणाच्या आखाड्यात ते आता भल्याभल्यांना भिडणार होते ना!

आता त्यांनी नामांकित ग्रंथसंग्रहालयातून मोठमोठी ग्रंथसंपदा आणायला सुरुवात केली. अख्खं आयुष्य हस्तिदंती मनोर्‍यात काढलेल्या मोठमोठ्या सव्यसाची, साक्षेपी संपादकांचे ग्रंथच्या ग्रंथ वाचायला सुरुवात केली. त्यातले न कळलेले विद्वज्जड शब्द आत्मसात करायला सुरुवात केली. तो निर्णय घेतल्याच्या पहिल्या रात्रीपासून त्यांच्या ह्या सगळ्या दिव्य कर्माला सुरुवात झाली.

- Advertisement -

आता त्यांच्या पाठीराख्यांनाही ते जगाच्या कल्याणासाठी रात्री जागतात ते बघता बघता कळलं. साहजिकच, त्यांचा दरबार आता दिवसापेक्षा रात्री तुडुंब भरू लागला. आता सताड उघड्या डोळ्यांची, तारवटलेल्या डोळ्यांची, काळ्यानिळ्या डोळ्यांची, पेंगुळलेल्या डोळ्यांची, खोल गेलेल्या डोळ्यांची अशा सगळ्या प्रकारच्या डोळ्यांची माणसं त्यांच्या दरबारात दिसू लागली.

त्यात त्यांच्या एका अध्यात्मिक बुवांनी त्यांना जागे सो पाया, सोये सो खोया असा कानमंत्र दिला. तो त्यांना त्यांच्या अखंड जागं रहाण्याच्या व्रताचा बूस्टर डोस ठरला. जागं राहिलं तरच कशाचा तरी लाभ होतो, झोपून राहिलो तर काही ना काही गमावलं जातं हा त्यांच्या बुवांचा सिध्दांत त्यांच्या मनात इतका ठसला की त्यांची झोप कुठल्या कुठे पळाली, आता रात्रीचा चहाही त्यांनी बाद केला!

आता रात्रभर जागूनही त्यांचा दरबार भल्या सकाळी त्याच मिनिटाला, त्याच सेकंदाला सुरू होऊ लागला. जनकल्याणाच्या ध्यासाने हे उदयोन्मुख राजकारणपटू इतके झपाटले आहेत की रात्रभर त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही ही बातमी आता तर शहराची सीमा उल्लंघून सातासमुद्रापार जाण्याच्या तयारीत होती.

सर्वसामान्यांचा खराखुरा जागल्या, अशा शीर्षकाचे एव्हाना ह्या उदयोन्मुख राजकारण्याबद्दलचे लेख प्रसिध्द होऊ लागले. लोकांचा एखाद्या गोष्टीने जगण्याबद्दलचा हुरूप वाढतो, ह्याचा जागण्याबद्दलचा हुरूप वाढू लागला. रात्र वैर्‍याची असो की नसो, तो असाही जागा राहू लागला. राजाला कसली दिवाळी अशी एक म्हण आहे. ह्या उदयोन्मुख राजकारण्याच्या बाबतीत ‘ह्याला कसली कोजागिरी’ असं लोक म्हणू लागले.

कुणीतरी आपल्यासाठी इतका टक्क डोळ्यांनी जागतो आहे हे पाहून लोक मात्र गाढ झोपू लागले. निद्रानाशाचा विकार असलेल्यांनीही आता झोपेच्या गोळ्या घेणं बंद केलं. त्यांनाही बिछान्याला टेकल्या टेकल्या झोप येऊ लागली. उदयोन्मुख राजकारणपटूचं संपूर्ण शहर निद्रानाशमुक्त होण्याच्या दिशेने घोडदौड करू लागलं.

राजकीय सभेत, लोकसभा-विधानसभेत बसल्या बसल्या झोपणार्‍या कित्येक राजकारण्यांच्या प्रतिमा व्हायरल होताना लोकांनी उठताबसता पाहिल्या होत्या. काहीजण सभागृहात झोपले आणि झोपेतून उठले तेव्हा त्यांची सत्ता गेल्याचं त्यांना कळलं ह्याचीही माहिती लोकांकडे होती. पण निरांजनातल्या वातीसारखा रात्रभर तेवत राहणारा हा नेतादीप पंचक्रोशीतल्या आबालवृध्दांसाठी अभिमानाचं लेणं ठरला होता.

परवा मात्र वेगळंच घडलं. अहर्निश तेवत राहणार्‍या ह्या राजकारणपटूंच्या भेटीसाठी मागच्या दाराने एक डॉक्टर आले. डॉक्टरसुध्दा इतके हुशार की ते आपला स्टेथास्कोप दिसेल म्हणून दिवसाढवळ्या न येता उत्तररात्री आले. ‘तुमचा डोळा जराही लागत नाही का?’ डॉक्टरांनी त्यांना शोभेल अशा त्यांच्या व्यावसायिक मृदू आवाजात राजकारणपटूला विचारलं.
‘नाही हो…जराही लागत नाही…आमचं समाजकारणाचं, राजकारणाचं व्रतच तितकं कडक आहे,’ राजकारणपटू बाणेदारपणे म्हणाले.

‘नाही…मला नाही तसं वाटत…तुमचं डोळ्याला डोळा न लागण्याचं कारण वेगळं आहे,’ डॉक्टर थंडपणाने म्हणाले आणि आजाराचं निदान झाल्यासारखा त्यांनी स्टेथास्कोप साफ गुंडाळून बॅगेत ठेवला.

‘म्हणजे…?’ राजकारणपटू डोळे विस्फारून डॉक्टरांकडे पहात बसले.

‘आपण झोपलो तर सरकार पडल्याचं आपल्याला कळणार नाही ह्याची धास्ती तुम्हाला वाटतेय…’ डॉक्टर म्हणाले.
आता तर राजकारणपटूला झोप लागणं शक्यच नव्हतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -