मासिक पाळीचा उत्सव…

मुलीला मासिक पाळी सुरू झाली की, कुटुंबात मग तिच्याशी शिवाशिवीचा जीवघेणा खेळ सुरु होतो. याला हात लावायचा नाही, त्याला पाय लावायचं नाही, तिथं प्रवेश करायचं नाही, हे करायचं नाही ते करायचं नाही. अशी अनेक धार्मिक, कौटुंबिक बंधनं तिच्यावर लादली जातात. तीही ते सर्व निमूटपणे सहन करत जाते. कारण, हे असंच असतं, असं तिला त्याच वेळी सांगितलं जातं. अनेक जाती-जमातींमध्ये मुली जन्माला आल्या की उत्सव साजरा केला जातो. तसाच उत्सव मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचाही केला जातो. खरं तर सर्वच जाती-धर्माच्या मुलींच्या बाबतीत असा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला गेला तर स्रियांबाबत असलेले समाजमनातील दुय्यमत्त्व हळूहळू गळून पडेल.अंधश्रद्धाही बोथट होत जातील.

आदिवासी भागातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या युवतीला मासिक पाळी आली म्हणून वृक्षारोपण करण्यास तिच्या शिक्षकांनीच तिला मज्जाव केला, अशी घटना घडल्याचे स्वतः त्या मुलीने प्रसारमाध्यमांपुढे कथन केले. याचा परिणाम म्हणून महिलांच्या अंधश्रद्धांबाबत विशेषतः मासिक पाळीच्या अनुषंगाने असलेल्या अंधश्रद्धांबाबत समाजात चर्चा सुरू झाली. सदर घटनेची कायदेशीर चौकशी केली जाईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे संबंधित विभागाने जाहीर केले. चौकशीतून जे निष्पन्न होईल ,तेही समाजमनाला कळायला हवं.

मात्र या घटनेने पुन्हा मासिक पाळी व तिच्या अनुषंगाने, केवळ आदिवासी- ग्रामीण भागातच नव्हे तर, शहरी भागातही पाळल्या जाणार्‍या अंधश्रद्धा कोणकोणत्या आणि त्या का पाळल्या जातात, त्याचबरोबर किमान शिक्षण क्षेत्रात तरी अशा अंधश्रद्धांना हद्दपार करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याचा ओझरता आढावा आपण घेऊ शकतो. साधारणतः मुलीला तेराव्या, चौदाव्या वर्षी मासिक पाळी येते. त्यानंतर तिची चार-पाच वर्षात शारीरिक वाढ पूर्ण होते. मात्र अगदी पहिली मासिक पाळी येते तेव्हा तिच्या मनात एक प्रकारची भीतीयुक्त आणि आश्चर्यकारक अवस्था निर्माण झालेली असते. आपल्या शरीरात जे घडलं, त्याबद्दल कुणाला सांगावं, हे तिला लवकर सुचत नाही.

मग ती, तिची जवळची मैत्रीण असलेली तिची आई, तिला सांगते किंवा बर्‍याच वेळा कुणालाच सांगत नाही. त्या काळात ती सतत दडपणाखालीच वावरते. जेव्हा-केव्हा आईला माहीत पडते की, तिच्या मुलीला मासिक पाळी आलेली आहे. अशावेळी आईला आनंदापेक्षाही काळजीच अधिक वाटायला लागते. त्यामुळे ती कुटुंबातील इतर सदस्यांनाही हे गुपित सांगण्याचे टाळते. खरं तर, पहिली मासिक पाळी म्हणजे त्या मुलीच्या जन्मातला निसर्गाने तिला बहाल केलेला एक विलोभनीय आविष्कारच असतो. तो थोडा त्रासदायक जाणवत असला तरी आनंदाचा क्षण असतो. मात्र, आपल्या येथील कुटुंब व्यवस्था, धर्म व्यवस्था आणि समाज व्यवस्था यांच्यामुळे या आनंदाच्या क्षणाला पहिल्या दिवसापासूनच अंधश्रद्धेचे ग्रहण लागते. जोपर्यंत तिच्या आयुष्यात हे मासिक पाळीचे चक्र चालू राहते, तोपर्यंत हे ग्रहण सुटत नाही. फार तर ते तिच्या नंतरच्या आयुष्यात थोडे थोडे शिथिल होत जाते एवढेच !!

कुटुंबात मग तिच्यासाठी शिवाशिवीचा जीवघेणा खेळ सुरु होतो. याला हात लावायचा नाही, त्याला पाय लावायचं नाही, तिथं प्रवेश करायचं नाही, हे करायचं नाही ते करायचं नाही. अशी अनेक धार्मिक, कौटुंबिक बंधनं तिच्यावर लादली जातात. तीही ते सर्व निमूटपणे सहन करत जाते. कारण, हे असंच असतं, असं तिला त्याच वेळी सांगितलं जातं. अनेक जाती-जमातींमध्ये मुली जन्माला आल्या की उत्सव साजरा केला जातो. तसाच उत्सव मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचाही केला जातो. खरं तर सर्वच जाती-धर्माच्या मुलींच्या बाबतीत असा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला गेला तर स्रियांबाबत असलेले समाजमनातील दुय्यमत्त्व हळूहळू गळून पडेल.अंधश्रद्धाही बोथट होत जातील.

स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण बरे असले तरी अजून बराच टप्पा गाठायचा आहे. शिक्षणाचा उपयोग केवळ व्यवहारापुरता मर्यादित न ठेवता, सर्वार्थाने स्वावलंबनाकडे स्रीयांनी स्वतःच वाटचाल केली पाहिजे. धाडसी आणि कणखर झाले पाहिजे. मग मासिक पाळीबाबतच काय, कोणत्याही बाबतीत स्त्रियांना कुणीही कमी लेखू शकणार नाही. आदिवासी आणि ग्रामीण भागात अजूनही स्त्रियांना या बंधनात राहावंच लागतं. खरंतर, या काळात स्त्रीला शारीरिक- मानसिक विश्रांतीची नितांत गरज असते. मात्र घरातल्या कामांना हात लावायची बंदी असली तरी बाहेरची अति श्रमाची, ताकदीची काम मात्र त्यांना करावीच लागतात. तेथे हात, पाय लावल्याने मात्र काही अपवित्र, अशुद्ध होत नाही. असा समज समाजाने स्वार्थापोटी स्वीकारलेला आहे. समाज दुटप्पीपणाने वागतो, त्याचे हे एक लहानसे उदाहरण आहे.

धावपळीच्या आणि धकाधकीच्या शहरी जीवनामध्ये मासिक पाळीच्या काळात महिला आणि मुलींना जरी कुटुंबाबाहेर बरीच बंधनं पाळावी लागत नसली तरी, कुटुंबात मात्र त्यांना विशेषतः धार्मिक बंधनं काटेकोरपणे पाळावी लागतात, असे चित्र बर्‍याच वेळा पाहायला मिळते.

समाजाच्या धार्मिक बाबींमध्ये स्त्रियांच्या मासिक पाळीच्या बाबतीत तर अंधश्रद्धांचा कळसच गाठला जातो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जवळपास प्रत्येक धर्माच्या, धार्मिक स्थळाच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या वरती किंवा भिंतीवर ठळक अक्षरात सूचनाफलक लिहिलेला असतो तो असा की, महिलांना आत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. महिलांना मासिक पाळी येते त्यामुळे त्या अपवित्र, अशुद्ध असतात. त्यामुळे त्या धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग पावते, असाच स्पष्ट संकेत या सूचना फलकाद्वारे दिलेला असतो. त्याबाबत सहसा कोणीही आवाज उठवत नाही. कारण तो त्या, त्या धर्माच्या ठेकेदारांचा खासगी मामला समजला जातो. केवळ मासिक पाळी येते म्हणून सर्वच महिलांना धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशास बंदी, असा कोणता धर्म सांगतो? मात्र अनेक धार्मिक स्थळांवर आजही असे फलक ठळकपणे झळकताना दिसतात. अशा सर्व कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक वातावरणातून आणि वर्तनातून स्त्रिया अगतिक होणार नाहीत तर नवलच !! मात्र अत्यंत खेदाची गोष्ट ती ही की, समाजपरिवर्तनाच्या प्रमुख साधनांपैकी एक प्रमुख साधन म्हणून मानल्या गेलेल्या शिक्षण क्षेत्रात मासिक पाळीला अपवित्र, अशुद्ध व अंधश्रद्धा मानून, वर्तन व व्यवहार होत असेल तर ती अतिशय चिंताजनक आणि निषेधार्ह बाब आहे. ती वेळीच दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे.

भारतीय घटनेत प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून त्याने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा, त्याचा प्रचार, प्रसार करावा असे नमूद केलेले आहे. विशेष म्हणजे हाच वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रीय शिक्षणाचा गाभा घटक असून, मूल्य शिक्षणातही त्याचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे. शिक्षण व्यवस्थेत कार्यरत असणार्‍या मानवी घटकांनी जाणीवपूर्वक त्याचे आकलन करून, आचरण केले तर, समाजातील अनेक अनिष्ट, अघोरी, कालबाह्य रूढी, प्रथा, परंपरा संपुष्टात येण्यास वेळ लागणार नाही. भारतीय घटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला उपासना, विश्वास, विचार ,श्रद्धा, अभिव्यक्ती यांचे स्वातंत्र्य जरूर बहाल केलेले आहे.

तथापि त्यावर काही बंधनं आणि मर्यादाही घटनेने घातलेल्या आहेत. त्याही शिक्षण क्षेत्रातील कार्यरत असलेल्या सर्वांनीच काटेकोरपणे पाळायला हव्यात. मात्र आज खेदाने म्हणावेसे वाटते की, शिक्षणक्षेत्रात अनेक ठिकाणी कार्यरत असलेले मानवी घटक हे कोणत्यातरी धर्माच्या, धार्मिक कर्मकांडाच्या, गुरुमहाराजांच्या, बाबांच्या , प्रेषितांच्या, पोपच्या संदेश आणि वचनांच्या संपूर्णपणे आहारी गेल्याने त्यांच्या विचारात आणि आचारातही तेच ते ठासून भरलेले असते. विशेष म्हणजे काही धार्मिक ठेकेदारांनी शिक्षण संस्थाचा ताबा घेतल्याचेही चित्र आहे.त्यांच्या मर्जीप्रमाणे आणि आदेशानुसार तेथे काम चालते. असे जरी असले तरी, शिक्षण क्षेत्रात कार्यरत मानवी घटकांनी जर ठरवले तर ते, त्यांच्यासमोर असलेला विद्यार्थी वर्ग निकोप वृत्तीचा, विवेकी सहृदयी तसेच सहिष्णू घडवण्यासाठी, त्यांच्या स्वतःमध्ये अशा वृत्ती आणि विचार अंगीकारू शकतात, हा विश्वास अजूनही बाळगायला हरकत नाही.

–डॉ. आसावरी गोराणे-कर्णावर