– अरविंद खानोलकर
संक्रांत दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला येते. सूर्य दक्षिणेचा प्रवास संपवून उत्तरेला मार्गस्थ होतो आणि उत्तरायण सुरू होते. महाभारतापासून बाकी काही नाही शिकलो तरी दक्षिणायन आणि उत्तरायण मात्र कळलं. भीष्मांना इच्छामरण होतं म्हणे. ते सूर्य उत्तरायणाकडे येण्याची वाट पहात बाणांच्या शय्येवर थांबले, पण थांबा. नवलकर नातवासह इकडेच येत आहेत. या, नवलकर शंभर वर्षे आयुष्य! हा शाप समजू की शुभेच्छा! नवलकरनी हसत विचारले. मी पुढे विचारले, नवलकर, बाबलीबाईंचे हळदीकुंकू समारंभ संपले की नाही अजून? नवलकर म्हणाले, ते रथसप्तमीपर्यंत असतात. या वर्षी ४ फेब्रुवारीला संपले. म्हणजे संक्रांत एकाच तारखेला आली तरी रथसप्तमी वेगवेगळ्या तारखेला येते! गेल्या वर्षी 14 फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेला रथसप्तमी होती. मी म्हणालो, साहजिक आहे, आपले सण चंद्र पंचांगाप्रमाणे येतात त्यामुळे ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे ते वेगवेगळ्या तारखांना येतात. गरगरायला लागले या ग्रेगोरियन शब्दावर! नवलकर म्हणाले आणि त्यांच्या विनोदावर नातू आणि ते हसले. नातवाने तर त्यांच्या विनोदावरच आणखी एक मजला वाढवला, पृथ्वी गरागरा फिरते, ते आपण या कॅलेंडरने मोजतो म्हणून ग्रेगोरियन.
मी विचारले, नवलकर, विनोद राहू द्या. आपल्या कॅलेंडरला ग्रेगोरियन का म्हणतात? नवलकर पुन्हा हसत म्हणाले, हे मला माहिती असेल, असं तुम्हाला कसं वाटलं? आमच्या फादरनी आमच्याकडून बारा महिन्यांची मराठी आणि इंग्रजी नावं पाठ करून घेतली होती, पण हे कधी नाही सांगितले. मी विचारलं, नवलकर, कॅलेंडर बदललंत ना! नवलकर चावटपणा करत म्हणाले, भिंतीवरचे कॅलेंडर बदलले. घरात नवीन आणले नाही. पूर्वी बर्याच जणांकडे दरवर्षी पाळणा हलत असे. चेष्टेत मुलांनाच कॅलेंडर म्हणत. मी हसलो आणि म्हणालो, मग चला आपण आपल्या प्राध्यापक हवालदारांना विचारूया.
प्राध्यापकांना आमची ज्ञानपिपासा आवडायची आणि आपली ‘ज्ञानपिपाणी’ न वाजवता ते आम्हाला समजावून सांगायचे. आम्ही दोघांनी ग्रेगोरियन कॅलेंडरबद्दल विचारताच ते म्हणाले, माणसाची प्रगती झाली. तो दिवस मोजायला शिकला. दरवर्षी होणारे बदल त्याला जाणवले. त्यातून वर्षाची कल्पना आली. जो तो आपलं वर्ष पाळू लागला. ग्रीक आणि रोमन हे एकमेकांचे शत्रू. म्हणजे आपल्या सोसायटीतील मोरे आणि माने. नवलकर मध्येच बोलले. मी सभ्यतेचा आव आणत म्हणालो, आपण कशाला कुणाची नावं घ्यायची? प्राध्यापक म्हणाले, रोमन लोकांचं एक कॅलेंडर होतं. इसवी सनापूर्वी सातशे वर्षांपर्यंत त्याला दहा महिनेच होते. सुरुवातीला जानेवारी आणि फेब्रुवारी महिने नव्हतेच. शेवटचा हिवाळी महिना चांगला तीन महिन्यांचा होता. ज्युलियस सिझरने इ.स. 26 मध्ये दोन महिने वाढवले. सगळे महिने साधारण सारखे करण्यासाठी. ज्युलियस सिझरवरून त्याला ज्युलियन कॅलेंडर नाव पडले. जानेवारी आणि फेब्रुवारी हे शेवटचे दोन महिने होते. फेब्रुवारी शेवटचा म्हणून तोकडा महिना होता. पृथ्वीची सूर्याभोवतीची एक फेरी म्हणजे वर्ष होतं. ते कॅलेंडरशी जुळविण्यासाठी तोकडा महिना बरं कां? तसंच त्याआधी जानेवारी महिनाही 29 दिवसांचा होता.
मग फेब्रुवारी दुसरा कधी झाला? मी विचारले. मार्चपासून रोमन लोकांचं नवं वर्ष सुरू होत असे. त्याचं कारण असं होतं की त्यांची लोकसभा त्या दिवशी सुरू होत असे. रोमन लोकांच्या अंतर्गत युध्दात इ. स. 153 च्या सुमारास लोकसभा १ जानेवारीपासून सुरू होऊ लागली. मग तेव्हापासून जानेवारी पहिला आणि फेब्रुवारी दुसरा महिना झाला. जानेवारीला ३१ दिवस झाले आणि फेब्रुवारीला २८. प्राध्यापक म्हणाले. नवलकर म्हणाले, माणसाने कितीही हिशोब केले तरी त्याचे ज्ञान सृष्टीपुढे तोकडेच पडते. प्राध्यापक म्हणाले, खरं आहे पण माणूस त्यातून मार्ग काढतोच. पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला 365.25 दिवस लागतात असं मानून आणि लीप वर्षाला म्हणजे दर ४ वर्षांनी फेब्रुवारीला वाढीव दिवस देऊन बनवलेलं कॅलेंडर खर्यापेक्षा मागे राहू लागलं. दरवर्षी मागे जाऊन बराच फरक पडल्यावर ‘पोप ग्रेगरी 18वा’ याने इसवी सन 1582 मध्ये हे नवीन कॅलेंडर तयार केले. दर शंभर वर्षांनी येणारे लीप वर्ष हे लीप न मानता सामान्य केले, पण ४०० वर्षांनी येणारे लीप वर्ष हे मात्र लीप मानून थोडाही फरक राहू दिला नाही. हे ग्रेगोरियन कॅलेंडर सर्व युरोपीय राष्ट्रे मानू लागली.
नवलकर म्हणाले, पण ग्रीसने मानले का? प्राध्यापक म्हणाले, युरोपमधलं ग्रेगोरियन कॅलेंडर मान्य करणारं सर्वात शेवटचं राष्ट्र ग्रीस. त्यापूर्वी त्यांची शहरे ल्युनीसोलर कॅलेंडर वापरत. इ.स.1923 मध्ये ग्रीसच्या सरकारने ग्रेगोरियनला मान्यता दिली. तरी त्यांच्या सनातनी चर्चने अजूनही मान्यता दिली नाही. इ.स. 2100 पर्यंत ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे 25 डिसेंबरला येणारा ख्रिस्तमस सनातनी ग्रीक चर्चच्या कॅलेंडरमध्ये ७ जानेवारीला येईल. म्हणजे दिवस तोच असेल, पण सनातनी चर्चसाठी तारीख वेगळी असेल.
मी म्हणालो, मी ऐकलंय की आपली संक्रांत यावर्षी कशी येणार ते पण आपल्या पंचांगात लिहिलेलं असतं. तिचं वाहन आणि उपवाहन पण असतं! नवलकर म्हणाले, फेरारी आणि मर्सिडिजच्या जमान्यात संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा, यावर कोण विश्वास ठेवणार? प्राध्यापक म्हणाले, पूर्वी शेतीभातीसाठी त्यावरून अंदाज करण्यात येत असत. आता हवामानाबद्दल त्याहून बरीच अधिक माहिती मिळते. आता संक्रांत संपताच सर्व व्हॅलेंटाईन डेच्या तयारीला लागतात. नवलकरांचा नातू म्हणाला, काका, फक्त डे नाही, आख्खा एक वीक असतो व्हॅलेंटाईनचा. नवलकर कौतुकाने त्याला हलकी चापटी मारत म्हणाले, अरे लब्बाडा, अजून चड्डी सावरता येत नाही आणि व्हॅलेंटाईन डेज पाठ आहेत का? प्राध्यापक म्हणाले, संक्रांतीला आपण सर्वांनाच सांगतो, तिळगूळ घ्या गोड बोला.
नवलकर म्हणाले, खरं तर! वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळा संदेश द्यायला पाहिजे. प्राध्यापकांनी विचारले, तो कसा? नवलकर मिश्किल हसत म्हणाले, म्हणजे आमच्या बाबलीबाईला, तिळगूळ घ्या आणि गोड बोला, हे सांगणे ठीक आहे पण त्या बडबड्या बाजीरावला ‘तिळगूळ घ्या आणि कमी बोला’ असं सांगायला हवं. मी त्याला दुजोरा देत म्हणालो, आणि त्या बंडलबाज मन्याला ‘तिळगूळ घ्या आणि खरं बोला’ असं सांगायला हवं. प्राध्यापक म्हणाले, तुम्ही दोघे एवढ्या मोठ्याने बोलता की तुम्हाला ‘तिळगूळ घ्या आणि जरा हळू बोला’ म्हणायला पाहिजे. आम्ही दोघेही मनापासून हसलो. नवलकर, व्हॅलेंटाईन डेचं मूळसुध्दा रोमनांच्या फेब्रुवारीतल्या एका सणात आहे. तुम्ही व्हॅलेंटाईन डेसाठी बाबलीबाईंना काही भेट दिलीत की नाही? प्राध्यापकांनी हळूच चिमटा काढला. नवलकरांनी मात्र तो आपला सण नाही म्हणत प्रश्नाला बगल दिली. त्यांच्या नातवाने विचारले, ग्रँडपा, आजीसाठी तिला आवडणारा मोगर्याचा गजरा तुम्ही मागच्या आठवड्यात तीन दिवस आणलात तो!