-आशिष निनगुरकर
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. दिवाळीला नवीन कपडे आणि नटूनथटून सण साजरा केला जातो. घराची सजावट, रोशणाई आणि फराळाचा उत्साह या दिवशी न्याराच असतो. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक जण दिवाळीचा सण तितक्याच उत्साहाने साजरा करतो. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घरी दिवाळी साजरी होणार याचा एक निराळा आनंद असतो. अशावेळी ‘आली माझ्या घरी दिवाळी’ हे गाणं तुमच्या मनाला अधिकच प्रसन्न करू शकते. ‘अष्टविनायक’ या मराठी चित्रपटातील गाणं दिवाळीत प्रत्येक कार्यक्रमात अथवा घरोघरी ऐकलं जातं.
‘अष्टविनायक’ हा चित्रपट राजदत्त यांनी दिग्दर्शित केला होता. यातील ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ हे गाणं अभिनेता सचिन पिळगांवकर आणि वंदना पंडित यांच्यावर चित्रीत करण्यात आलं होतं. ‘आई पाहिजे’ या आशा काळे यांच्या चित्रपटातही एक दिवाळीचे गाणे आहे. या चित्रपटात आशा काळे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती, ज्यामध्ये भूतकाळाची आठवण येताना दिवाळीवर आधारित एक गाणे दाखवण्यात आले होते. ‘आली दिवाळी आली दिवाळी’ या गाण्यातून घरोघरी साजरी होणार्या दिवाळीच्या सणाचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे. यातील सुंदर बोल ऐकून घरातील दिवाळीचे वातावरण अधिकच प्रसन्न होऊ शकते.
दिवाळीच्या दिवसांमध्ये बहिणीला सर्वात जास्त ओढ असते ती म्हणजे भाऊबीजेची. कारण त्यानिमित्ताने भाऊराया खास बहिणीच्या घरी ओवाळणीसाठी येतो. या दिवशी भावाकडून छानसं गिफ्ट उकळण्यात एक मजा असते. त्यामुळे अशा सुंदर क्षणासाठी ‘भाऊबीज’ या चित्रपटातील ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळिते भाऊराया’ हे गाणं नक्कीच छान वाटेल. मराठी चित्रपटातील पहिले दिवाळी गीत प्रभात फिल्म कंपनीच्या माणूस (१९३९) या चित्रपटात होते. दिग्दर्शक आणि संकलक चित्रपती व्ही. शांताराम यांच्या या चित्रपटात ‘दिवाळी दिवाळी आली’ हे गाणे आहे. हे गाणे अनंत काणेकर यांनी लिहिले असून संगीत मास्टर कृष्णराव यांचे आहे.
चित्रपटाच्या नावातच दिवाळी सांगायची तर १९५५ साली वैभव चित्रचा ‘भाऊबीज’ (कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट) हा सामाजिक चित्रपट आला. या चित्रपटाची पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन राजन कुमार यांचे आहे, तर कथा, संवाद आणि गीते कवी संजीव यांची आहेत. या चित्रपटात सुलोचनादीदी, चंद्रकांत, सूर्यकांत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळिते भाऊराया… हे या चित्रपटातील गाणे सर्वकालीन लोकप्रिय आहे आणि तेच तर महत्त्वाचे आहे. त्यानंतर अनेक वर्षांनंतर २००३ साली अभिजित चित्रचा ‘भाऊबीज’ हा रंगीत सामाजिक चित्रपट पडद्यावर आला.
प्रमोद शिंदे निर्मित या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन अरविंद पोवार यांचे आहे, तर या चित्रपटात प्रमोद शिंदे, अलका आठल्ये, मधू कांबिकर, अशोक शिंदे, निशीगंधा वाड, कुलदीप पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर १९७५ साली दत्ता केशव दिग्दर्शित ‘ओवाळिते भाऊराया’ हा कौटुंबिक चित्रपट पडद्यावर आला. यात रमेश देव, सीमा देव, रविराज, रुही, वत्सला देशमुख, विवेक, राजा नेने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गीते जगदिश खेबूडकर आणि दत्ता केशव यांची असून संगीत प्रभाकर जोग यांचे आहे. हाही चित्रपट कृष्ण धवल आहे. कालांतराने २००७ साली सुभाष फडके दिग्दर्शित ‘ओवाळिते भाऊराया’ हा रंगीत सामाजिक चित्रपट पडद्यावर आला. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नीता देवकर यांचे आहेत. गीते प्रवीण दवणेंची, तर संगीत नंदू होनप यांचे आहे. या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर, मोहन जोशी, प्रिया बेर्डे, स्मिता तळवळकर, तृप्ती भोईर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गॅगरी अल्मेडा हे या चित्रपटाचे निर्माते होते.
हिंदी चित्रपटातील दिवाळी गाणी हा खूप अगोदरपासूनचा फंडा आहे. सर्वप्रथम १९४० साली दिग्दर्शक जयेश देसाई यांचा ‘दीवाली’ हा चित्रपट आला. चित्रपटाच्या नाव आणि थीममध्ये ही पहिली दिवाळी, तर बॉम्बे टॉकीज निर्मित आणि ग्यान मुखर्जी दिग्दर्शित ‘किस्मत’ (१९४३) घर घर मे दीवाली मेरे घर मे अंधेरा क्यू हे गाणे आहे. दिग्दर्शक एम. सादिक यांच्या ‘रतन’ (१९४४) या चित्रपटात ‘आयी दीवाली आयी दीवाली’ हे गाणे आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक सोहराब मोदी यांच्या दिवाळीवरचे मजेशीर गाणे सांगायचे तर एम. एस. वासन दिग्दर्शित ‘पैगाम’ (१९५९) या चित्रपटातील जॉनी वॉकरने साकारलेले ‘कैसी दीवाली मनाए लाला अपना तो बारह मैने दीवाला’ हे आहे.
यात सामाजिक आशयही आहे, तर ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटातील ‘लाखो तारे आसमाँ पर एक’ या गाण्यात भावपूर्णताही आहे. युद्धपटातही दिवाळी गीताला पटकथेत स्थान मिळाले आहे. चेतन आनंद दिग्दर्शित ‘हकीकत’मध्ये आयी अब के साल दीवाली हे गाणे आहे. येथपर्यंत कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट सिनेमातील दिवाळी पाहायला मिळाली. त्या काळातील सबसे बडा रुपय्या (१९५५), पैसा (१९५७), खजांची (१९५८) या चित्रपटांतही दिवाळी गाणे आहे. विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’ (१९६७) मध्ये पिया तो से नैना लागे रे या एकाच गाण्यात अनेक सण आहेत आणि वहिदा रहेमानने अतिशय क्लासिक नृत्यातून ते साकारलेत. त्यात दिवाळीही आहेच.
प्रमोद चक्रवर्ती निर्मित आणि दिग्दर्शित ‘जुगनू’ (१९७३) या चित्रपटातील धर्मेंद्र आणि लहान मुलांवरचे ‘दीप दीवाली के झूठे’ (गीत आनंद बक्षी, संगीत सचिन देव बर्मन) हे गाणे लोकप्रिय झाले होते. काळ पुढे सरकला तरी चित्रपटातील ‘दिवाळी सण’ कायमच राहिला. या दशकाच्या सुरुवातीलाच बिग बजेट चकाचक मनोरंजक चित्रपटाची निर्मिती वाढली. त्यातही मल्टीप्लेक्सच्या भव्य पडद्यावर दिवाळी सण दणक्यात साजरा होऊ लागला. करण जोहर दिग्दर्शित ‘कभी खुशी कभी ग़म’ चित्रपटात ‘कभी खुशी कभी गम’ असे दिवाळ सण गाणे आहे.
अमिताभ बच्चन, जया बच्चन, राणी मुखर्जी इत्यादींवर श्रीमंती रूपावर ते आहे. या गाण्यात दिवाळी पूजा, लखलखाट, भलंमोठं घर असे बरेच काही आहे. चित्रपटातील दिवाळीचे रंग कधी वेगळेही. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘देवदास’ (२००१) या चित्रपटातील सिलसिला यह चाहत का हे गाणे पूर्णपणे वेगळ्या पठडीतील आहे. दिग्दर्शक प्रकाश मेहरांच्या ‘जंजीर’ (१९७३) च्या सूडकथेत दिवाळी सणाचा नाट्यपूर्ण वापर केला आहे. पटकथा संवाद लेखक सलीम जावेद यांनी विजय (अमिताभ बच्चन) लहान असताना दिवाळीच्या दिवशीच तेजा (अजित) विजयच्या आई पित्याची निर्घृण हत्या करतो.
बिल्डिंग परिसरात फुटत असलेल्या फटाक्यांच्या आवाजात हे पिस्तुलाच्या गोळीचे आवाज मिक्स होतात. कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘आई पाहिजे’ (१९८८) मध्ये आशा काळे यांच्यावर ‘लक्षदीप उजळलं घरी’ असे दिवाळी गाणे आहे. १९६४ मध्ये मणिभाई व्यास यांचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट यातील एका गाण्यामुळे प्रचंड चर्चेत राहिला. रसाळ कवी भरत व्यास यांच्या या गाण्याला लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीने अत्यंत सुंदर चाल बांधली. मुकेश आणि लता या दोघांनीही हे गाणे गायले आहे. ‘ज्योत से ज्योत जगाके चलो, प्रेम की गंगा बहाते चलो’, यातील ही प्रेमाची ज्योत खूप महत्त्वाची आहे. एक पणती लाखो पणत्या पेटवू शकते. भगवान गौतम बुद्ध तर स्पष्टच म्हणतात- स्वत:च्या अंत:करणातील ज्ञानाचा दीप पेटवला की अज्ञानाचा अंधकार नाहीसा होईल. वर्तमान झाकाळू द्यायचा नसेल आणि दिवाळी जर प्रकाशाचे पर्व आहे असे आपण मानत असू तर मनातला अंधकार या प्रकाशाने नाहीसा व्हायला हवा. सर्वांना दिवाळीच्या आभाळभर शुभेच्छा!
-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)