-प्रज्ञा बनकर
‘प्रकाशाचा सण’ म्हणून ओळखल्या जाणार्या दिवाळीच्या सणात अंधकारावर प्रकाशाचा विजय, चांगुलपणावर वाईटाचा विजय याचा उल्लेख होतो. घरातली साफसफाई, विविध रंगांच्या रांगोळ्या, गोड पदार्थ आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकत्र येणे यामुळे दिवाळीला एक खास वैशिष्ठ्य लाभते. या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे फटाके.
फटाक्यांचा उगम कधी झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता लक्षात येते की पौराणिक आणि धार्मिक ग्रंथांमध्ये फटाक्यांचा उल्लेख आढळतो.
संत एकनाथ महाराजांच्या ‘रुक्मिणी स्वयंवर’ या ग्रंथात रुक्मिणी आणि कृष्णाच्या लग्नाचे वर्णन आहे. त्यामध्ये रॉकेट, फुलझडी, फटाक्यांचे सविस्तर वर्णन केलेले आढळते. भारतात फटाक्यांच्या वापरासंदर्भात इतिहासकार पी. के. गोडे यांच्या १९५० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘हिस्ट्री ऑफ फायरवर्क्स इन बिट्वीन १४०० ते १९००’ या पुस्तकात असं म्हटलंय की, भारतात दिवाळीच्या सणाला फटाक्यांचा वापर सामान्य असला तरी इ. स. १४ व्या शतकात फटाक्यांचा वापर करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.
कारण त्याचवेळी भारतीय युद्धांमध्ये दारू (बारूद) वापरण्यास सुरुवात झाली होती. १५ व्या शतकात फटाक्यांचा वापर झाल्याचा पुरावा मिळतो. बादशहा बाबराने जेव्हा भारतावर हल्ला केला तेव्हा शस्त्र म्हणून दारूगोळ्याचा वापर केला गेला होता. शहाजहाँचा दुसरा मुलगा शिकोहच्या विवाहाशी संबंधित १६३३ मधील एका पेंटिंगमध्ये फटाक्यांची आतषबाजी केल्याचे पाहायला मिळते.
चीनमध्ये सर्वप्रथम फटाक्यांतील दारूचा (गन पावडर) शोध लागला. तेव्हा त्याला ‘डेव्हिल्स डिस्टिलेट’ या नावाने ओळखले गेले. हा शोध सर्वांनाच धक्कादायक असला तरी त्यांना नव्या आविष्काराचा आनंदही होता. सुरुवातीला लष्करी वापरासाठी त्या फटाक्यांचा वापर करण्यात आला. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमांतूनही (पायरोटेक्निकल शो) त्याचा वापर वाढला. ही कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणारी गन पावडर चीन आणि अरब देशांतून भारत आणि युरोपमध्ये पहिल्यांदा पाठवण्यात आली. १३ व्या शतकानंतर फटाक्यांचा चीनबाहेर प्रसार होऊ लागला. युरोप आणि अरब देशांमध्ये दारूगोळ्याचा वापर हा शक्तिशाली शस्त्र म्हणून केला जाऊ लागला.
भारतात १४४३ मध्ये विजयनगरचा राजा दुसरा देवराया याच्या दरबारात महानवमी सणाच्या निमित्ताने फटाक्यांचा वापर करण्यात आला, असं अब्दर रज्जाक यांनी नमूद करून ठेवलं आहे. याच काळातील इटालियन प्रवासी लुडोव्हिको दी वर्थेमा यांनी विजयनगरमधील हत्तीसंदर्भात लिहून ठेवलं आहे की, हत्तींना फटाक्यांची भीती वाटते. फटाके वापरले गेले तर उधळलेल्या हत्तींना नियंत्रणात आणणं खूप अवघड होऊन जाई.
मध्ययुगीन भारतात सण-समारंभांमध्ये विशेषकरून लग्नांमध्ये आतषबाजी किंवा फटाक्यांच्या शोंचे आयोजन केले जात होते. तो मनोरंजनाचा प्रकार होता. आतषबाजीसाठी लागणारे मिश्रण किंवा फटाके तयार करण्याचे तंत्र ‘कौतुकचिंतामणी’ या ग्रंथामध्ये आढळते. ओरिसातील प्रतिष्ठित लेखक गजपती प्रताप रुद्रदेव यांनी म्हटलंय की, इ. स १४०० मध्ये चीनमधून पायकोटेक्निकचे सूत्र भारतात आणलं गेलं. इतिहासकार सतीश चंद्रा हे आपल्या ‘मध्ययुगीन भारत : मुघलांची सल्तनत’ या पुस्तकात अशी नोंद करतात की, इ. स. १६०९ मध्ये विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिल शहा याने आपल्या मुलीच्या लग्नात फटाक्यांसाठी ८० हजार रुपये खर्च केले होते.
थोडक्यात मुघलांनी भारतात फटाके आणले असले तरी ते वाजवण्याची प्रथा सुरू झाली हिंदूंच्या सर्वात मोठ्या सणाला म्हणजे दिवाळीला. फटाक्यांचा प्रकाश, त्यांच्या आवाजाचा जल्लोष आणि आकाशात उडणारे रंगीबेरंगी प्रकाश फटाके हे दिवाळी सणाचे वैशिष्ठ्य ठरत आहे. फटाके म्हणजेच दिवाळीचे अविभाज्य चिन्ह बनले आहे. फटाक्यांशिवाय दिवाळी ही संकल्पना अतिरेकी पर्यावरणस्नेही आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. फटाके बंद करणे म्हणजे दिवाळी सण कायमचाच बंद करणे.
ज्या सहजतेने पूर्णतः फटाके उडवणे बंद करण्याचे आवाहन केले जाते त्याच सहजतेने ईद, ख्रिसमसला असे आवाहन केले जाते का? हिंदू धर्मातील सणच का लक्ष्य ठरतात? खरंतर हिंदू धर्म हा बदलाचा पुजारी आहे. हा धर्म बदल चटकन आणि विचाराअंती स्वीकारतो. त्यामुळे फटाके उडवण्याची पद्धत बदलणे गरजेचे आहे. सरसकट फटाके उडवणे बंद करा असे म्हणण्याऐवजी मर्यादित प्रमाणात फटाके फोडा, असे सांगितले तर ते सहजपणे पटू शकते.
फटाक्यांचे आवाज, प्रकाश आणि रंग यामुळे हा सण अधिक रोमांचक वाटतो. फटाक्यांच्या जल्लोषात दिवाळीला उत्साह येतो आणि आकाशात रंगीबेरंगी प्रकाशाचे खेळ सुरू होतात, परंतु फटाक्यांचा आनंद साजरा करताना त्याचे दुष्परिणाम आणि हानीकडे दुर्लक्ष करणे उचित ठरत नाही. हिंदू धर्म बदल स्वीकारणारा धर्म आहे असे म्हणताना चांगले वाईट परिणाम जाणून घेणे हे आपले परम कर्तव्य ठरते.
फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने ध्वनी प्रदूषणाची समस्या गंभीर बनते. दिवाळीच्या काळात शहरी आणि ग्रामीण भागात फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनीचा स्तर सामान्यापेक्षा खूपच जास्त होतो. हे ध्वनी प्रदूषण लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि मानसिक विकार असलेल्या व्यक्तींवर गंभीर परिणाम घडवते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे झोपेचा त्रास, मानसिक ताणतणाव वाढतो. अनेकदा फटाक्यांच्या आवाजामुळे लहान मुले घाबरतात. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास होतो. वयोवृद्धांना फटाक्यांचा आवाज सहन करणे कठीण जाते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
ध्वनी प्रदूषणाचा एक मोठा सामाजिक परिणामदेखील आहे. फटाक्यांच्या ध्वनीमुळे लोकांमध्ये वाद होतात. कारण काही लोकांना हा आवाज त्रासदायक वाटतो. शहरी भागांमध्ये जिथे लोक जवळजवळ राहतात, तिथे फटाके फोडण्यामुळे अनेकदा तक्रारी आणि भांडणे होतात. त्यामुळे सामाजिक एकतेला धक्का बसतो. त्यामुळे फटाके फोडताना लोकांनी एकमेकांच्या भावनांचा आणि शारीरिक स्थितीचा विचार करणे आवश्यक आहे. फटाक्यांमुळे केवळ ध्वनी प्रदूषणच होत नाही तर वायू प्रदूषणदेखील वाढते.
फटाक्यांमध्ये अनेक प्रकारचे रासायनिक पदार्थ असतात, ज्यामुळे वातावरणात धूर, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स आणि इतर हानिकारक गॅसेस सोडले जातात. त्यामुळे वायू प्रदूषणाचा स्तर खूपच वाढतो. विशेषत: मोठ्या शहरांमध्ये याचा परिणाम थेट लोकांच्या आरोग्यावर होतो. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींना खूप त्रास होतो. अस्थमा, ब्रॉन्कायटिस आणि इतर श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना फटाक्यांच्या धुरामुळे श्वास घेणे कठीण होते.
वायू प्रदूषणाचा परिणाम केवळ मानवावरच होत नाही तर पर्यावरणावरही होतो. फटाक्यांमध्ये असलेले रासायनिक पदार्थ जमिनीवर पडतात आणि त्याचा परिणाम वनस्पतींवर, प्राण्यांवर होतो. झाडांवरील पानांवर फटाक्यांचा धूर बसतो. त्यामुळे त्यांच्या फोटोसिंथेसिस प्रक्रियेवर परिणाम होतो, शिवाय फटाक्यांमुळे जंगली प्राण्यांनादेखील त्रास होतो. पक्षी आणि इतर प्राणी फटाक्यांच्या आवाजाने घाबरतात आणि त्यांच्या नैसर्गिक वर्तणुकीत बदल होतो.
फटाक्यांच्या जलद आणि असुरक्षित वापरामुळे अनेकदा अपघात होतात. लहान मुलांमध्ये फटाके फोडताना जखमा होणे, अग्निदुर्घटना घडणे किंवा डोळ्यांना इजा होणे अशा समस्या वारंवार घडतात. फटाके फोडताना जर योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
फटाक्यांमुळे आग लागल्याच्या घटनादेखील सामान्य आहेत, ज्या मालमत्तेचे नुकसान घडवतात. अनेकदा लोक फटाके योग्य पद्धतीने साठवून ठेवत नाहीत, ज्यामुळे घरात आग लागण्याचा धोका वाढतो. फटाक्यांच्या अनियंत्रित वापरामुळे सार्वजनिक ठिकाणीदेखील अपघात घडतात, ज्यामुळे प्रशासनाला नुकसानभरपाई करावी लागते. त्यामुळे केवळ शारीरिकच नाही तर आर्थिक नुकसानदेखील होते.
फटाक्यांच्या वापरावर अनेक राज्यांनी कायदेशीर निर्बंध लागू केले आहेत. भारतातील काही शहरांमध्ये फटाक्यांच्या विक्रीसाठी लायसन्स आवश्यक असते. ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी नियम बनवले गेले आहेत. पर्यावरणीय संरक्षणासाठी सरकारने कठोर नियम लागू केले आहेत, परंतु अजूनही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होते आणि अवैध फटाके विकले जातात.
हे प्रदूषण आणि अपघातांचे प्रमुख कारण बनते. फटाक्यांच्या विक्रीवरील निर्बंध आणि त्यांचे पालन यावर सरकारने अधिक कडक उपाययोजना करणे आवश्यक आहे. लोकांमध्ये पर्यावरणपूरक फटाक्यांचा वापर करण्याची प्रवृत्ती वाढवणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये आणि समाजातील विविध संघटनांनी लोकांना फटाक्यांच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करणे गरजेचे आहे.
फटाक्यांचा वापर संपूर्णपणे बंद करणे अनेकांना अव्यवहार्य वाटू शकते, परंतु त्याचा संतुलित वापर आणि पर्यावरणपूरक फटाके हा चांगला पर्याय आहे. पर्यावरणपूरक फटाक्यांमध्ये कमी ध्वनी आणि वायू प्रदूषण करणारे घटक वापरले जातात. यामुळे वातावरणात कमी हानिकारक गॅसेस सोडले जातात आणि ध्वनीचा स्तरही कमी राहतो. पर्यावरणपूरक फटाक्यांचा वापर हे एक मोठे पाऊल असू शकते, ज्यामुळे सणाचा आनंददेखील टिकवता येईल आणि पर्यावरणाचे संरक्षणही करता येईल.
फटाक्यांचा मर्यादित वापर करून आणि पर्यावरणपूरक फटाके वापरून सणाचा आनंद घेतला जाऊ शकतो. समाजातील सर्व वयोगटातील लोकांना या सणाचा आनंद घेता यावा यासाठी फटाक्यांचा वापर सुरक्षित आणि विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. आपला सण आनंदाने साजरा करीत असताना पर्यावरणाचे आणि समाजाचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे हे सर्वांनीच लक्षात घ्यावे. दिवाळीच्या खूप सार्या शुभेच्छा!
-(लेखिका प्रशिक्षणार्थी पत्रकार आहेत.)