Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeफिचर्ससारांशBombay Restaurant : कराडचे खाद्यजीवन

Bombay Restaurant : कराडचे खाद्यजीवन

Subscribe

कराडच्या मुख्य चौकात म्हणजे चावडी चौकात बॉम्बे रेस्टॉरंट आहे. तिथे आंबोळी आणि दहीवडा एक नंबरचे मिळतात. कराड हे गाव कोकण आणि घाटाला जोडणारे असल्याने तिथे कोकणात मिळणारी आंबोळी मिळते. बाकी कोकणातही आता आंबोळी फारशी मिळत नाही तिथे घावन मिळतात. बॉम्बेतली आंबोळी म्हणजे ज्वारी, तांदूळ आणि रवा यांपासून बनवलेली असते. हळद घातलेली आंबोळी पातळ आणि खरपूस अशी असली तरी आतून मऊ असते.

– डॉ. मंजूषा देशपांडे

कराड हे विद्यार्थ्यांचे गाव आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, सायन्स कॉलेज, पॉलीटेक्निक आणि मेडिकल कॉलेज एवढी सगळी कॉलेजेस त्या चिमुकल्या गावात एकवटलेली आहेत. त्यापैकी मेडिकल कॉलेज सोडले तर बाकी कॉलेजेस्मधले विद्यार्थी ऐंशीच्या दशकात तर खुद्द कराड गावातच राहायचे. बहुतेक सर्व विद्यार्थी एकमेकांना पाहून तरी ओळखायचे याचे कारण म्हणजे रोज संध्याकाळी ही मंडळी कृष्णा कोयनेच्या प्रितीसंगमावर म्हणजे घाटावर भेटायची. तो घाट म्हणजे कराडची खाऊगल्लीच आहे. तिथली व्यंकटेशची भेळ, स्वागतची पावभाजी, लंकेश वडापाव ही सर्व मुलांची आवडती ठिकाणे. खरंतर इतर शहरांमध्ये मिळते तशीच कराडची भेळ आणि पावभाजी पण विद्यार्थ्यांना ती अगदी अमृततुल्य वाटते.

कराडच्या मुख्य चौकात म्हणजे चावडी चौकात बॉम्बे रेस्टॉरंट आहे. तिथे आंबोळी आणि दहीवडा एक नंबरचे मिळतात. कराड हे गाव कोकण आणि घाटाला जोडणारे असल्याने तिथे कोकणात मिळणारी आंबोळी मिळते. बाकी कोकणातही आता आंबोळी फारशी मिळत नाही तिथे घावन मिळतात. बॉम्बेतली आंबोळी म्हणजे ज्वारी, तांदूळ आणि रवा यांपासून बनवलेली असते. हळद घातलेली आंबोळी पातळ आणि खरपूस अशी असली तरी आतून मऊ असते. त्याबरोबर ओली चटणी आणि लसूण घातलेली फुटाण्याची कोरडी चटणी देतात. बॉम्बेवाल्यांनी त्या चटणीचे पेटंट घ्यायला हवे असे आम्ही म्हणायचो. कराडच्या कॉलेजच्या मुलांची वेलकम आणि सेंडॉफ फंक्शन्स बॉम्बे रेस्टॉरंटमध्येच पार पडतात. त्याशिवाय नव्याने लग्न जमलेल्या जोडप्यांनी त्यांच्या नव्या नात्याचे शिक्कामोर्तब बॉम्बे रेस्टॉरंटमध्येच करायचे असा तिथला अलिखित नियम आहे. कराडमधले पेन्शनर्स ही संध्याकाळी फिरून येताना अनेकदा आंबोळी खाऊनच घरी परततात. कराडच्या सोमवार आणि शुक्रवार पेठेतील अनेक जण पोरांचे वाढदिवस तसेच लग्नदिवस बॉम्बेची आंबोळी खाऊनच साजरा करतात.

चावडी चौकातच एक पोटभरीचे जेवण मिळणारे वैजयंता भोजनालय आहे. कराडमध्ये कधी कामासाठी गेले तर वैजयंता भोजनालयातले जेवण अगदी गरमागरम आणि ताकाच्या वाटीसह घरच्यासारखे मिळते. तिथेच एक के एस बेकरी आहे. तिथे बेकरी पदार्थ चांगले मिळतात, पण सोमवार पेठेतल्या दिवेकरांच्या बेकरीला तोड नाही. तिथला बटाटेवडा म्हणजे एकदमच भारी. कॉलेजमधून दुपारी आल्यावर भूक लागलेली असते. त्यामुळे येताना दिवेकरांकडचे गरमागरम भलेमोठे वडे आणायचे, म्हणजे एकदम पोटच भरते. दिवेकर त्या वड्यात कोथिंबिरीबरोबर मेथीही घालतात. त्यामुळे त्या वड्यांची चव वेगळी आणि मस्त लागते. त्याबरोबर दिवेकरांचा ताजा ब्रेड म्हणजे काय म्हणतात ते… फारच भारी असते.

पूर्वी कराडमध्ये एक अनुग्रह नावाचे बारके हॉटेल होते. त्या हॉटेलसमोरून जाताना पोहे आणि उप्पीटाचा फार सुरेख वास यायचा, पण तिथे मुली कधीच जायच्या नाहीत. मी आणि माझी मैत्रीण तिथे एकदा गेलो तर तिथल्या वेटर्सनासुद्धा इतिहास घडवल्यासारखे वाटले होते, पण खरे सांगायचे तर बाहेरून जेवढा खमंग वास यायचा त्यापेक्षा काकणभर अधिक चव त्या पोह्यांना आणि उप्पीटाला होती.

तिथून पुढे कन्याशाळेसमोर आले की तिथे हरि ओम्मध्ये दाबेली मिळते. ती दाबेली खायला संध्याकाळी पोरांची नुसती झुंबड उडते. कराडच्या मेन रोडवर दत्त चौकात गजानन रेस्टॉरंट आहे. तिथली मिसळ अगदी प्रसिद्ध आहे. तिथे एका डिशमध्ये उकडलेली मोडाची मटकी, कच्चा पोह्याचा चिवडा, तिखट बुंदी, फरसाण, शेव, भज्यांचे आणि चकल्यांचे तुकडे, चिरलेले गाजर, कोबी आणि कांदे असा एक ढीग लावतात. त्याच्या बरोबर हवा तेवढा कट देतात. (तिथे त्याला सॅम्पल म्हणतात.) हा कट कोल्हापूरच्या मानाने तसा मिळमिळीत असला तरी चव छान असते. त्याबरोबर अतिशय लुसलुशीत असे ब्रेडचे दोन स्लाईस मिळतात. ते एकदमच खास लागतात.

भरपेट मिसळ खाल्ल्यावर तिथे केशर आणि वेलची पूड घातलेले लिंबाचे सरबत मिळते. त्याची चव म्हणजे अगदीच राजेशाही असते. मिसळ आणि सरबत हे कॉम्बिनेशन म्हणून काही शोभत नाही, पण त्या लिंबू सरबताचा अख्ख्या कराडलाच अभिमान आहे. त्यानंतर कराडची ओळख असणारा साईनाथचा वडापाव खायलाच हवा. तिथला पाव गोल असतो आणि एकदम खास चवीची बटाट्याची भाजी असलेला पातळ आवरणाचा वडा असतो. पावामध्ये वडा घालून देताना वड्यांवर चटणी आणि कांदाही घालून देतात. त्यामुळे तो वडापाव एकदमच छान चवीचा असतो.

गंमत म्हणजे एका आजीने घरगुती स्तरावर सुरू केलेला वडापाव आता साईनाथ हॉटेलमध्ये रूपांतरित झाला आहे. ते हॉटेल आता सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला आजींचा नातू चालवतो. कराडच्या स्टॅन्डवर एक अभिरुची नावाचे हॉटेल आहे. तिथे 110/- गुजराथी, महाराष्ट्रीयन आणि पंजाबी पदार्थ असलेली अस्सल थाळी मिळते. तिथल्या भाज्यांबरोबर गरम पुर्‍या किंवा गरमागरम फुलके खाताना किती खाल्ल्या याचा पत्ता लागत नाही. आमच्यासारखे कराडप्रेमी पुण्याला जाताना मुद्दाम वाट वाकडी करून अभिरुचीची थाळी खायला जातात. अगदी अलीकडेच प्रसिद्धीला आलेला कराडचा शिवराय धाबा म्हणजे अख्खा मसूर आणि चुरचुरीत बटर रोटीसाठी फारच प्रसिद्ध झालेला आहे. त्या धाब्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे तिथे छत्रपती शिवरायांचा जेवण करतानाचा अतिशय देखणा पुतळा आहे.

शिवराय जेवण घेण्याच्या अगोदर आंघोळ करीत असत. तो पुतळादेखील ताजातवाना नुकताच आंघोळ केल्यासारखा आहे. बाकी खाशा लोकांसाठी कराड हाय वेवर असलेले संगम हे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आणि थाळीसाठी प्रसिद्ध आहे. तिथून थोडे पुढे गेल्यावर येणारे पंकज हॉटेल तिथे साऊथ इंडियन आणि चौपाटी स्नॅक्स चांगले मिळतात, पण ती दोन्हीही हॉटेल्स आणि त्यासारखी अजून काही हॉटेल्स ही कराड संस्कृतीचा भाग नाहीत. कराडच्या विद्यानगरीतील फार्मसी आणि इंजिनिअरिंग कॉलेज कॅन्टीन्समधले क्रीम रोल्स, फक्कड चहा, पोहे आणि कांदा भजी विद्यार्थ्यांची आवडती असतात. कराड हे विद्यार्थ्यांचे गाव असल्याचे अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे कराडच्या कितीतरी घरातून मुलांसाठी मेस चालवल्या जातात. त्या प्रत्येक मेसची आपापली खासियत असतेच. कुठे चवळीची उसळ तर कुठे वांग्याची भाजी, तर कुठे बटाट्याचा रस्सा, तर कुठे पातळ भाकरी… प्रत्येक मेसचे अलग तरी नाना रंग असतात.

ओगलेवाडी हे कराडचे रेल्वे स्टेशन. आम्ही कॉलेजमध्ये असताना त्या रस्त्यावर एका टपरीवर कांद्याची आणि मिरचीची भजी मिळत असत. ती भजी खायला आम्ही विद्यार्थी सायकल पिदडवत जायचो. अलीकडे बरेच दिवसांत त्या टपरीची काही वार्ता नाही. कराडच्या आठवडी बाजारातही भजी, शेव चिवडा, गूळ शेंगदाणे आणि चुरमुर्‍याचे लाडू मिळतात. अरे हो, अजून एक म्हणजे कराडचे चुरमुरे विशेषत: कढीपत्ता घालून केलेले, भट्टीतून काढलेले हिरवे गरमागरम चुरमुरे आणि तसेच फुटाणे आणि शेंगदाणे खायला फारच मजा येते. चुरमुर्‍यांबरोबरच कराडमध्ये पोहेही चांगले मिळतात. खरे सांगायचे तर असली कराडकरांना हॉटेल आणि बाहेरचे खाणेच मान्य नाही. कराडमध्ये येऊन हॉटेलात जाणारे ते

कराडबाहेरचे लोक असतात. आता हळूहळू हे चित्र बदलत आहे. कराडजवळच्या गोट्याची भरली वांगी घरोघरी करतात. ती वांगी एकदा खाल्ली की परत कुठलीही वांगी खाताना त्या वांग्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तशी भाजीची चव अजून बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये मिळत नाही.