झाडं जगवाच !

भारत देश जागतिक महासत्ता असलेल्या देशांच्या खांद्याला-खांदा लावून काम करण्याची महत्वाकांक्षा ठेवतो तशी देशाची वाटचालही चालू आहे. त्या देशांप्रमाणे आपलीही वन वृक्ष संपदा वाढवण्याची गरज आहे. या देशांमध्ये प्रतिव्यक्ती वृक्षांची संख्या आहे तशी आपल्या भारतामध्ये असायला हवी. पर्यावरण समतोल ठेवण्यासाठी नवे-आधुनिक पर्यावरण धोरण लवकरात लवकर जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे. जगात सगळ्यात कमी दरडोई झाडे असलेल्या देशांमध्ये आपण येतो. त्यामुळे आपल्याला केवळ झाडे लावून जमणार नाही तर ती जगवावी लागतील, वाढवावी लागतील.

नुकताच युनायटेड नेशनचा फॉरेस्ट रिपोर्ट 2021 ‘ट्रीज पर हेड’ अर्थात देशांतर्गत एका व्यक्तीच्या वाट्याला किती झाडे येतात हा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यामधून अंत्यत धक्कादायक असे चित्र पुढे आले. भारतात प्रतिव्यक्ती 28 इतकीच झाडे येतात. हा अहवाल 2011 च्या जनगणनेवर आधारलेला आहे. जनगणनेनुसार 121 कोटी लोकसंख्या आणि सध्याची जी वृक्षांची संख्या आहे याचे गणित करून प्रतिव्यक्ती 28 झाडे प्रति व्यक्तीच्या वाट्याला येतात. 2021 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या आता जाहीर होईलच. लोकसंख्या किती प्रमाणात वाढलीय आणि तेव्हाची स्थिती काय असणार आहे हे तर सर्वश्रुत आहेच. तेव्हाचा जो आकडा समोर येईल आणि तेव्हा जर झाडांचे आणि लोकसंख्येचे गणित केले तर प्रतिव्यक्ती 28 पेक्षाही कमी संख्या येऊ शकते ही चिंताजनक बाब आहे.

जगात कॅनडामध्ये प्रतिव्यक्ती वाट्याला 8 हजार 953 वृक्ष येतात. जगात सर्वात जास्त प्रमाण आहे. त्यापाठोपाठ रशिया -4461, अमेरिका – 71६, चीन-102 असे या देशांमध्ये प्रतिव्यक्ती वृक्ष वाट्याला येतात. भारत देश या जागतिक महासत्ता असलेल्या देशांच्या खांद्याला-खांदा लावून काम करण्याची महत्वाकांक्षा ठेवतो तशी देशाची वाटचालही चालू आहे. त्या देशांप्रमाणे जर आपली ही वन वृक्ष संपदा वाढवण्याची गरज आहे, पण या देशांमध्ये प्रतिव्यक्ती वृक्षांची जी संख्या आहे तसे जर आपल्या भारतामध्ये पर्यावरण समतोल ठेवण्यासाठी नवे-आधुनिक पर्यावरण धोरण लवकरात लवकर जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे. या अहवालानुसार जगात सगळ्यात कमी दरडोई झाडे असलेल्या देशांमध्ये आपण येतो.

ही परिस्थिती असल्यामुळे दर पाच वर्षाने 1 डिग्री सेलपर्यंतची तापमान वाढ होतेय. सध्या आधीच आपले तापमान 45 डिग्री सेलच्या आसपास जाऊन पोहोचले आहे. नुकत्याच वन क्षेत्रबाबत एका अभ्यास करण्यात आला. 2021 मध्ये जगात 2,53,000 चौ. की. इतके जंगल नष्ट झाले. हे क्षेत्रफळ उत्तर प्रदेश एवढे आहे. म्हणजे जगातून उत्तर प्रदेशच्या क्षेत्रफळाएवढे जंगले नष्ट झालेली आहेत. यात उष्णकटिबंधीय जंगलाच्या कत्तलीमुळे जगात कार्बनडायऑक्साइड उत्सर्जनात तब्बल 7 टक्के वाढ झालेली आहे. याच्यामुळे पृथ्वीवरील इको-सिस्टीम बदलत आहे. वातावरण बदलत आहे.

ऋतू चक्र बिघडते आहे. तापमान आपले सर्वोच्च पातळीवर जाण्याचे विक्रम करत आहे. जागतिक फॉरेस्ट रिपोर्टनुसार आपल्याला देशाची स्थिती कळली पण भारतात सर्वच राज्ये भौगोलिकदृष्ठ्या सुजलाम-सुफलाम नाहीत. आत्ताच जानेवारीमध्ये प्रसिद्ध झालेला ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ या अहवालातून भारतातील सर्व राज्यातील वृक्षचा आढावा घेतला आहे. राज्यात वन-वृक्ष संख्या किती आहे? राज्यातील सध्याची वृक्ष व मागील अहवालाची तुलना त्यानुसार वन-वृक्ष संख्या वाढलीय की घटली आहे, किती प्रमाणात वृक्ष तोड झाली. कुठे वृक्षारोपण झाले. हे सर्व या अहवालातून समजते. भारतात अजूनही 1988 चेच वन धोरण आहे. या धोरणावर आधारितच वन संरक्षण, उपाय-योजना, लक्ष्य राबविण्यात येतात.

1988 च्या धोरणानुसार भारताच्या क्षेत्रफळाच्या 33 टक्के वनक्षेत्र असणे हे प्रमाण आहे. तेव्हा आपला पर्यावरण समतोल राहू शकेल. पण या अहवालातून वस्तुस्थिती समोर येते ती वेगळीच भारतात क्षेत्रफळाच्या फक्त 24.62 टक्के इतकेच प्रमाण वन-वृक्षांचे आहे. हा अहवाल दर दोन वर्षांनी प्रसिद्ध होतो. पूर्वीचा अहवाल 2019 मध्ये प्रसिद्ध झाला होता. मागील अहवालाची तुलना करता 2261 चौ.की. म्हणजेच 0.28 टक्के इतकी वन-वृक्षाची वाढ झालेली आहे. ही बाब दिलासादायक आहेच, पण ज्या गतीने भारतात प्रदूषण वाढतंय ते कमी करण्यासाठी इतकी ठोस पावले उचलली जात नाहीयेत हे यावरून लक्षात येते.

क्षेत्राफळानुसार मध्य प्रदेश राज्यात वन-वृक्षाची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ अरुणाचल प्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा आणि महाराष्ट्र हे वन व वृक्षांच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच ज्या राज्यांमध्ये वन-वृक्षाची घट झालीय त्यात अरुणाचल प्रदेश प्रथम त्यापाठोपाठ मणिपूर, नागालँड, मिझोरम, मेघालय अशी राज्ये आहेत. ही सर्व ईशान्येकडील राज्ये आहेत. या राज्यांमध्ये वन वृक्षांची घट होण्याचे कारणे पाहिली तर प्रामुख्याने झूम कल्टिवेशनमुळे तिथे जंगलाची घट होताना दिसते. झूम कल्टिवेशनमध्ये जंगलतोड होते. वृक्षांनी वेढलेली जागा पूर्ण स्वच्छ करून ती जागा शेतीयोग्य बनवतात. तिथेच उपजीविकेपुरते उत्पादन घेतात. ती जमीन नापीक झाली की ती जागा सोडायची व पुन्हा दुसरीकडे जंगलतोड करून पुन्हा शेती असे सतत चालू असते.

यामुळेच ईशान्येकडे वनांची संख्या घटत आहे ही मोठी चिंतेची बाब आहे. यावर तोडगा काढणे आवश्यक आहे नाहीतर ही घट सतत चालू राहील व याचे परिणाम सर्वाना भोगावे लागतील. वनांची संख्या जशी घटत आहे तसेच काही राज्यांमध्ये वनांची संख्या वाढतही आहे. आंध्र प्रदेश या दक्षिणेतकडील राज्याचा वन-वृक्षाची संख्या वाढीमध्ये प्रथम क्रमांक येतो. 647 चौ. की. इतके क्षेत्रामध्ये वन-वृक्षाची वाढ झाली. त्यापाठोपाठ तेलंगणा, ओडिशा, कर्नाटक, झारखंड असा राज्याचा क्रम लागतो. आंध्र प्रदेश मध्ये जे प्रमाण वाढले ते तेथील स्थानिक पातळीवर जे कार्यक्रम राबवले त्यात सरकारने केलेली धोरणे व दिलेलं प्रोत्साहन या गोष्टीमुळे शक्य झाले. तेथील भौगोलिक स्थिती अनुकूल आहेच. महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने वन क्षेत्र 2019 च्या अहवालाच्या तुलनेत 0.04% वनक्षेत्र हे वाढलेलं आहे. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने 16.51 टक्के वन- वृक्षांनी व्यापलेले आहे.

या अहवालात भविष्यात कुठे तापमान वाढ(हॉट स्पॉट) होणार आहे ती स्थळही दर्शवली आहेत. यात 2030,2050,व 2085, सालापर्यंत लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये सर्वात जास्त तापमान वाढ होणार आहे, असे सांगण्यात आले. जी थंड हवेची ठिकाणे आहेत तिथेच असे विपरीत परिणाम भोगावे लागणार आहेत. या अहवालानंतर एफएसआयचे मुख्य त्याची मुलाखत घेण्यात आली होती त्या मुलाखतीत त्यांनी सर्वात मोठं काळजीच कारण स्पष्ट केलं की, ईशान्येकडील राज्यामधील जे वनक्षेत्र घटतंय यामुळे जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होतील. झाडे लावली गेली पाहिजे आपल्यासाठी,आपल्या येणार्‍या पिढीसाठी नाहीतर मानवाने केलेले जंगल तोड, कार्बन उत्सर्जन, झाडे न लावणे याचे परिणाम सध्या आपण तर भोगतोच आहोत, पण आपल्या येणार्‍या पिढीला अजून जास्त गंभीर परिणाम भोगावे लागतील.

झाडे लावून, फोटो काढून, स्टेटसला ठेवून आपले काम संपत नाही ते लावलेलं झाड आहे ते आपल्या मुलांप्रमाणे जपावं. त्याची काळजी घ्यावी, झाडाला जगवावं पुढे तेच झाड आपल्याला तर प्राणवायू देईलच, पण आपली आठवण म्हणूनही सदैव अबाधित राहील. आपण लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीत हक्काप्रमाणेच कर्तव्य करणेही गरजेचे आहे. झाडे लावून त्याचे संवर्धन करणे त्याला जगवणे हे गरजेचे आहे. भारतात प्रतिव्यक्ती ‘28’ झाडे येत आहेत. हे प्रमाण पुढच्या अहवालात वाढवणे ही जबाबदारी जशी सरकारची आहे तसेच ते आपलेही कर्तव्य आहे. सरकार त्याचे ध्येय धोरण राबवतीलच पण त्याला आपली साथ व हातभार हवा. प्रति व्यक्ती 5 झाडे लावून त्याचे व्यवस्थित संगोपन केले तर प्रतिव्यक्ती हे प्रमाण नक्की वाढेल. हे सर्व एक दिवसात होणार नाही पण एक दिवस नक्की होईल हा विश्वास आहे. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा फक्त व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि फोटोसाठी नव्हे तर मोकळा श्वास घेण्यासाठी.

–ऋतिक गणकवार