Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश अंध:कारातून आत्मसन्मानाकडे

अंध:कारातून आत्मसन्मानाकडे

Subscribe

‘ब्युटीफुल विमेन : जर्नीज फ्रॉम डीसपेअर टू डिग्निटी’ हे सलील चतुर्वेदी यांनी लिहिलेलं पुस्तक गोव्यातली स्वयंसेवी संस्था ‘अर्ज’ने (अन्यायरहित जिंदगी) २०१७ मध्ये प्रकाशित केलं. या स्वयंसेवी संस्थेचे संचालक अरुणेन्द्रकुमार पांडे यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली असून गोव्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या सुमन यांनी पुस्तकाविषयीचा अभिप्राय लिहिलाय. गोव्यातल्या वास्को शहराच्या समुद्र किनार्‍यालगतची वस्ती-बायणा. एकेकाळी ही वेश्यावस्ती म्हणून ओळखली जायची. या वस्तीतल्या पूर्वी देहविक्रय करणार्‍या १० स्त्रियांच्या खर्‍याखुर्‍या आत्मकहाण्या या पुस्तकात आहेत.

–प्रवीण घोडेस्वार

देहविक्रयाच्या व्यवसायातल्या बायणा येथील बायका-मुलींचे अनुभव कोणाही संवेदनशील व्यक्तीला हादरवून टाकणारे आहेत, मात्र या आत्मकहाण्यांचं एक वैशिष्ठ्य आहे. या फक्त वेदना-दु:ख-कारुण्याच्या कथा नाहीत तर त्या संघर्षाच्या, जिद्दीच्या नि बंडखोरीच्याही कहाण्या आहेत. यातल्या दहाही स्त्रियांनी प्रयत्नपूर्वक पर्यायी उदरनिर्वाहाचा मार्ग शोधून काढला. मग त्या निर्धाराने देहविक्रयाच्या व्यवसायातून बाहेर पडल्या. ही सारी वाटचाल अर्थातच सहजसाध्य नव्हती. या महिला दलदलीतच खितपत पडून राहाव्यात यासाठी अनेक सामजिक, आर्थिक, धार्मिक घटक सक्रिय होते. या बायकांच्या लढ्याला ‘अन्यायरहित जिंदगी’ या स्वयंसेवी संस्थेचे भरभक्कम पाठबळ मिळालं. संस्थेने देहविक्रयाच्या व्यवसायातून बाहेर पडायला तयार असणार्‍या स्त्रियांसाठी ‘स्विफ्ट वॉश’ नावाची यांत्रिक लॉन्ड्री सुरू केली. रोजगाराच्या या पर्यायी व्यवस्थेमुळे अनेक मुली-स्त्रियांच्या जीवनात परिवर्तन घडून आलं. या परिवर्तनाच्या कथा म्हणजे हे पुस्तक.

- Advertisement -

मुंबईच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून व्यावसायिक सामाजिक कार्याचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी मित्रांनी १९९७ मध्ये ‘अर्ज’ या संस्थेची स्थापना केली. तत्पूर्वी १९९४ ते १९९७ या कालावधीत वेश्या व्यवसायावरील राष्ट्रीय स्तरावरच्या संशोधन प्रकल्पात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. या अभ्यास प्रकल्पाच्या अखेरीस २ ऑक्टोबर १९९८ रोजी गोव्यातल्या बायणा वेश्यावस्तीत त्यांनी काम करायला सुरुवात केली. ही एक सुसंघटित म्हणता येईल अशी वस्ती होती. इथल्या कुंटणखान्याच्या प्रमुख, पोलीस आणि स्थानिक राजकारणी यांचे घनिष्ठ संबंध होते.

जवळच्याच काटे बायणा या झोपडपट्टीतून आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून मुलींची तस्करी करून त्यांना या व्यवसायात आणलं जायचं. बहुतांश मुली अल्पवयीन असायच्या. जून २००४ मध्ये गोवा सरकारने ही वस्ती पाडली, पण या लोकांचं कोणतंही आर्थिक पुनर्वसन केलं नाही. तसेच कुंटणखाना चालवणार्‍या स्त्रिया आणि त्यांचे दलाल यांच्यावर कारवाई केली नाही. परिणामी मुलींना इतरत्र नेऊन वेश्या व्यवसाय केला जाऊ लागला. सप्टेंबर २००६ मध्ये ‘अर्ज’ने देहविक्रय करणार्‍या महिलांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी संपूर्णतः यांत्रिक पद्धतीची लॉन्ड्री सुरू केली. यामुळे देहविक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडलेल्या महिलांना, कुंटणखाना प्रमुख, दलालांना रोजगार आणि सामाजिक सुरक्षा मिळाली.

- Advertisement -

आपल्या प्रस्तावनेत अरुणेन्द्रकुमार पांडे यांनी म्हटलंय की, ‘हे वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रियांच्या आयुष्यावरले पहिले पुस्तक नाही आणि शेवटचेही नाही, पण हे पुस्तक वेगळे आहे. कारण हे पुस्तक बोलते. स्वत:च्या शब्दांत स्वत:चे अनुभव, स्वत:ची परिस्थिती इथे वेश्या व्यवसायाला बळी पडलेल्या स्त्रिया स्वत: कथन करतात.’ याचा प्रत्यय पुस्तक वाचताना येतो. बाजारू लैंगिक शोषण झालेल्या स्त्रियांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी सुरू केलेली ‘स्विफ्ट वॉश लॉन्ड्री’, तिचा प्रवास व संघर्षही यात वर्णिला आहे. या व्यवसायातल्या प्रौढ स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या प्रश्नावर चर्चा घडून येत नाही. यातल्या प्रौढ स्त्रियांचे दोन गट आढळतात. एक म्हणजे अपरिहार्यता स्वीकारून यातून बाहेर पडण्याची मानसिकता नसलेला आणि दुसरा म्हणजे परिस्थितीचा स्वीकार न केलेला आणि यातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारा गट.

बहुतांश बायका या त्यांना हा व्यवसाय आवडतो म्हणून राहत नसून त्यांना अर्थार्जनाची पर्यायी सोय नसल्यामुळे राहतात. यातल्या बायकांना रोजगाराचं योग्य साधन उपलब्ध करून देण्याऐवजी हा व्यवसाय कायदेशीर करावा की नाही यावर चर्चा होतात, हे चुकीचे असल्याचं पांडे सांगतात. यातून सुटका झालेल्या मुली पुन्हा या व्यवसायाकडेच वळतात. याचंही कारण उपजीविकेसाठी पर्याय नसणे आणि सहाय्यभूत सुविधांचा अभाव हेच आहे. या स्त्रियांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देताना तो स्वेच्छेने स्वीकारार्ह असला पाहिजे. त्यांचं पुनर्वसन करताना त्यांचाही सहभाग असायला हवा. निवासी पुनर्वसन केंद्रांऐवजी अनिवासी केंद्रे सुरू करायला हवीत, असंही पांडेंनी नोंदवलंय.

‘स्विफ्ट वॉश लॉन्ड्री’ प्रत्यक्षात येण्यासाठी संस्थेला ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स, इंटरनॅशनल सेंटर गोवा, एच. क्यू. हॉटेल, साळगावकर मेडिकल आणि रिसर्च सेंटर, इंडको फार्मा, ब्ल्यू क्रॉस फार्मा, इंडी फार्मा, वॉलेस फार्मा, युथ होस्टेल पणजी, करितास हॉलीडे होम, गोवा शिपयार्ड यांसारख्या अनेक व्यावसायिकांनी सहकार्य केलंय. तसेच फ्रान्स इथली ‘अ‍ॅक्टिंग फॉर लाईफ’ या संस्थेने आर्थिक आणि तांत्रिक मदत केली. शोषण झालेल्या या मुली-महिलांना बोलतं करून त्यांचं अनुभवविश्व नि भावविश्व शब्दांत साकारणं सोपं नव्हतं. त्यासाठी लेखकाकडे संवेदनशील मन असायला हवं. पीडित-शोषित स्त्रिया आणि लेखक यांच्यात विश्वासाचा सेतू निर्माण होणं गरजेचं होतं. यात लेखक सलील चतुर्वेदी यशस्वी झाले आहेत हे जाणवतं. या स्त्रियांचा १५-२० वर्षांचा जीवनानुभव चार-पाच पानांमध्ये मांडणं तसं अवघडच होतं, मात्र हे आव्हान पेलण्यात लेखक सफल झाले आहेत. प्रथम पुरुषी निवेदनाच्या या कहाण्या वाचकांना एका वेगळ्या नि विलक्षण विश्वाची सफर घडवून आणतात.

या स्त्रियांशी संवाद प्रस्थापित करण्यासाठी लेखकाला लाभलेलं अभिनंदिता माथुर यांचं सहकार्य खूप मोलाचं होतं. २००७ ते २०१७ या दशकात ‘अर्ज’ने ३५८ स्त्रिया, ६९ कुंटणखाना प्रमुख व दलाल आणि ७९ कौटुंबिक सदस्य यांचं आर्थिक-सामाजिक-मानसिक पुनर्वसन केलं आहे. यापैकी फक्त १५ स्त्रियांनी देहविक्रीचा व्यवसाय पुन्हा स्वीकारला. यातल्या काही विवाहबद्ध झाल्या. काहींनी स्वत:च्या नातेसंबंधात समता प्रस्थापित करण्यासाठी नात्यांची पुनर्बांधणी केली. काहींना इतरत्र नोकरी मिळाली, तर काहींनी अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं. या यशस्वी प्रयोगातून अनेक गैरसमज दूर झाले आहेत.

उदाहरणार्थ देहविक्रीच्या व्यवसायातून या स्त्रिया बाहेर यायला राजी नसतात, वेश्या आपल्या सवयी कधीच बदलू शकत नाहीत, त्यांना पैशांची हाव असते, या स्त्रिया कष्टाचे काम करू शकत नाहीत इत्यादी. ‘अर्ज’ या संस्थेच्या कामाला आता राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळालेली आहे. संस्थेला २०१५ मध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने देण्यात येणारा ‘स्त्री-शक्ती पुरस्कार’ भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. ‘अर्ज’चे सर्वेसर्वा अरुणेन्द्रकुमार पांडे आणि त्यांचे सहकारी यांचं हे समाजकार्य दीपस्तंभासारखं प्रेरणादायी आहे.

- Advertisment -