Homeफिचर्ससारांशOnline Rummy : जावे कल्पनेच्या गावा

Online Rummy : जावे कल्पनेच्या गावा

Subscribe

भारत क्रिकेटमध्ये हरला किंवा जिंकला तरी नवलकरांना भारतीय संघाने फिक्सिंग केल्याची पक्की खबर असते. अहो, ह्यावेळी नवा रेकॅार्ड झाला. मी म्हणालो, तो रोहितचा ना! तर ते म्हणाले, अहो बॅटींगचा नाही, बेटींगचा! पंचावन्न लाख करोडचं बेटींग झालं मॅचसाठी. आपल्याकडे बेटींगला बंदी घालतात, डॅम फूलस् ! सरकारला किती टॅक्स मिळाला असता, कल्पना करा.

-अरविंद खानोलकर

जे न देखे रवि, ते देखे कवी. ही आपली जुनी समजूत. कवीची कल्पनाशक्ती खूप भरार्‍या घेते, स्त्रीचा चेहरा त्याला कधी चंद्रासारखा तर कधी कमळासारखा दिसतो, म्हणून कवीला आपण ही म्हण बहाल केली. आजमितीला एकविसाव्या शतकात सर्वांचीच कल्पनाशक्ती अतिशय तरल झालेली आहे.

- Advertisement -

आमच्या शेजारच्या नवलकरांचा नातू, वय वर्षे ३, मला विचारत होता, काका, तुमच्याबरोबर ते शेटजी काल चालले होते, त्यांना बाळ होणार आहे कां हो! मला आमच्या प्रेमजी शेठची ढेरी आठवून हंसू आले. मी त्याला म्हणालो, हो रे! तू त्यांनाच विचार. तो म्हणाला, म्हणजे मार खायला मी आणि हंसणार तुम्ही! पुरूषाला बाळ होतं नाही, एवढं समजतं बरं मला! तर नवलकर (वय वर्षे ६१, बटाट्याच्या चाळींतील सोकाजी त्रिलोकेकरांच्या मुलीचे नातू) मला काल म्हणाले, सुनीता विल्यम्सला हे लोक काही अंतराळातून परत आणणार नाहीत. मी म्हटलं, असं का करतील ते?

नवलकर म्हणाले, आतापर्यंत एवढी ‘सिक्रेट्स’ तिच्याकडे जमा झाली असतील की ती जर अमेरिका सोडून भारतात आली तर भारत अमेरिकेवर राज्य करेल. नवलकरांचा अमेरिकेवर राग आहे कारण त्यांना गेल्या वर्षी व्हीजा मिळाला नाही. मी म्हणालो, त्यांची इच्छा नसेल तर पृथ्वीवर आणूनही तिला ते भारतात येऊ देणार नाहीत. त्यासाठी तिकडे अवकाशात कशाला अडकवतील? त्यांचं एक अवकाशयान नाही कां अडकून पडणार? मी माझी कल्पनाशक्ती पाजळली.

- Advertisement -

नवलकर म्हणाले, एक अवकाशयान म्हणजे काहीच नाही हो त्यांना. पोरांची खेळणी घरभर पसरावी तशी अवकाशयाने त्यांनी आकाशभर पसरली आहेत. प्रत्येक देशागणिक एक अवकाशयान फिरतंय त्यांचं स्पेसमध्ये. रशिया आणि चीनवर लक्ष ठेवायला चांगली दहा अवकाशयाने फिरताहेत. ही अद्ययावत माहिती नवलकरांना कुठे मिळाली. गुगलवर? छे! नवलकरांच्या सुपीक मेंदूतच ह्या कल्पना निर्माण होतात.

भारत क्रिकेटमध्ये हरला किंवा जिंकला तरी नवलकरांना भारतीय संघाने फिक्सिंग केल्याची पक्की खबर असते. अहो, ह्यावेळी नवा रेकॅार्ड झाला. मी म्हणालो, तो रोहितचा ना! तर ते म्हणाले, अहो बॅटींगचा नाही, बेटींगचा! पंचावन्न लाख करोडचं बेटींग झालं मॅचसाठी. आपल्याकडे बेटींगला बंदी घालतात, डॅम फूलस् ! सरकारला किती टॅक्स मिळाला असता, कल्पना करा. मी म्हणालो, मला ५५ लाख कोटी म्हणजे किती तेच समजले नाही. किती शून्य पाचावर. नवलकर म्हणाले, शून्य किती ते कशाला मोजायचे? मोठ्ठी अमाउंट आहे की नाही? मी मान डोलावली, मोजता येत नाही तर ती आपल्यासाठी मोठीच!

नवलकरांना पत्ते खेळायला आवडतं, पण ते लॅडीस, पाच, तीन, दोन, झब्बू, पैसे न लावता फक्त चहा द्यायच्या अटीवर खेळलेली रमी, असे सगळे खेळ त्यांना आवडतात. आमच्या सोसायटीत रमी खेळणारे दोन तरी ग्रुप आहेत. एक पैसा ‘पॅाईंट’ हा त्यांचा दर. नवलकर कधी चुकून सुध्दा त्यांच्यात खेळायला जात नाहीत. आयुष्यात पत्ते खेळून वाया गेलेले लोक त्यांनी पाहिले आहेत. ऑनलाईन रमीच्या जाहिराती यायला लागल्या आणि नवलकरांना झोप येईना. लोक कर्जबाजारी होतील ना असे खेळून! ही त्यांची चिंता. मी म्हटलं, तुम्ही तर खेळत नाही ना! मग कशाला चिंता करता? नवलकरांना ते पटलं नाही.

त्या ऑनलाईन रमीची जाहिरात टीव्हीवर सतत दिसू लागली. मोठमोठे कलाकार जाहिरात करू लागले. नवलकरांचा संताप उफाळून आला. हे कलाकार जनतेच्या जीवावर मोठे होतात. भरपूर पैसा कमावतात आणि लोकांना भिकेचा रस्ता दाखवतात. लोक कफल्लक झाले किंवा कर्जबाजारी झाले तर हे एका दमडीची तरी मदत करणार आहेत का? मी म्हणालो, त्यांनी मिळणारा पैसा का नाकारावा? जाहिरात करणं हा त्यांचा धंदा आहे. नवलकर आणखीच भडकले, म्हणून कशाचीही जाहिरात करणार का? मग दारूच्या जाहिरातींना बंदी का घालता?

मी नवलकरांना म्हटले की दारू पिणे ही वाईट गोष्ट आहे, त्याचे परिणाम फार वाईट होतात. होय कां? मग सरसकट दारूबंदीच कां नाही? जुगारावर बंदी आहे ना! मी होकार दिला. तसे नवलकर म्हणाले, मग ह्या रमीवर का बंदी नाही टाकत? मी म्हणालो, रमी हा जुगार नाही, असा हायकोर्टाने फार पूर्वीच निर्णय दिला आहे. मनोरंजनासाठी खेळ आहे. नवलकर म्हणाले, न्यायाधीशांना काय माहिती? क्लबमधली रमीसुध्दा हाय स्टेकने खेळली तर ती माणसांतून उठवते.

माझ्या ऑफिसातले दोघे तिघे क्लबमध्ये रमी खेळून सर्वनाश करून बसलेले पाहिलेत मी. एकाने तर जीव दिला आणि म्हणे रमी हा जुगार नाही. मी म्हटलं, नवलकर, पण ते सांगतात ना की जबाबदारीने खेळा. नवलकर भडकून म्हणाले, ती दु:खावर डागणी आहे, खूप पैसे घालवलेत तर तुम्ही जबाबदारीने खेळला नाहीत, असा त्याचा अर्थ घ्यायचा. म्हणजे त्यालाच मूर्ख ठरवतात.

मध्यंतरी पेपर घेऊन ते तावातावाने मला बातमी दाखवायला आले. बघा! त्या रमी कंपनीला किती फायदा झालाय बघा. जाहिरातींचा प्रचंड खर्च, कलाकारांचं मानधन, रमी चालवायला येणारा खर्च सर्व वजा करून ह्या कंपनीला एवढा नफा मिळतो, तो कोणाच्या खिशातून? आता तरी पटले का? माझ्याकडे काही उत्तरच नव्हतं. मी फक्त हम्म केलं. आजकाल हो आणि नाही ह्यांच्या मध्ये हे ‘हम्म’ आलंय. नरो वा कुंजरो वा चा सध्याचा अवतार.

नंतर बरेच दिवस नवलकर रमीबद्दल काहीच बोलले नाहीत. मीच त्यांना डिवचलं, तुमचा ऑनलाईन रमीवरचा राग गेला वाटतं? ते हताश स्वरांत म्हणाले, रमी तर बुडवतेयच लोकांना पण आता तिच्या जोडीला बिट कॅाईन्स की स्वीट कॅाईन्स पण आलेत सामान्य लोकांना बुडवायला आणि ते पुरे नाहीत म्हणून की काय एकदाच २६,००० भरा आणि करोडपती व्हा, अशा स्कीम्स पण आल्यात. सायबर चोर तुमची कष्टाची कमाई लुटायला टपलेले आहेत. कशाकशांत सावधान रहायचे सामान्य माणसाने!

नवलकरांचे प्रश्न मला काही मला चुकीचे वाटले नाहीत. युट्यूबवर काही पहायला जा की टीव्ही पहा. सगळीकडे प्रथम अशा प्रकारच्या जाहिराती निमूटपणे ऐकायला लागतात. काही गरीब व्यक्ती रमी खेळून श्रीमंत झालेले दाखवतात. एकविसाव्या शतकातलं पंचवीसावं वर्षं आहे हे. पूर्वी वाटसरूंना लुटणारे भारतातील ठग जगप्रसिध्द झाले होते. आता तर हे जागतिक सायबर ठग आहेत. आपलं महानगरच्या वाचकांनो, शक्य ती सर्व काळजी घ्या आणि २०२५ मध्ये ह्या सर्वांपासून स्वत:ला वाचवून सुखी आणि समृध्द व्हा.

-(लेखक साहित्यिक आणि मनुष्यबळ विकास सल्लागार आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -