घरफिचर्ससारांशपडद्यावरचे गांधी...

पडद्यावरचे गांधी…

Subscribe

गांधीविचारांना सार्वकालिक असल्याचे सांगून ही गांधी नावाची नैतिक मूल्ये सदा समकालीन आहेत, असे राजकुमार हिरानीने ‘लगे रहो’ मुन्नाभाईमध्ये दाखवले. रस्त्यावरच्या मुन्नाभाईला शिकवण्यासाठी अंतर्मनातील गांधी विचार म्हणून दिलीप प्रभावळकरांनी गांधी साकारले. प्रत्यक्ष गांधी नाही तर गांधीविचार व्यावसायिक पडद्यावरून पहिल्यांदा समोर आणला गेला. प्रेक्षकांनी हा चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी केला. अटनबरोने ‘गांधी’ चित्रपटात साकारलेले गांधी, कमल हासनच्या ‘हे राम’ मधील गांधी, ‘भगतसिंह’ चित्रपटतील गांधी, ‘वीर सावरकर’ चित्रपटातील गांधी. गाधींजींची अशी विविध रुपे पडद्यावर येत राहिली आणि पुढेही येत राहणार आहेत.

जानेवारी 1948 वर्षातली 30 तारीख हा दिवस जगाच्या इतिहासात काळा दिवस ठरला. पण गांधी मरत नसतो. हातात काठी घेतलेला हा म्हातारा अजूनही जगातील फॅसिझम, मानवता आणि लोकशाही विरोधकांना आव्हान देतच असतो. गांधींच्या विचारांमध्ये कालातीत मूल्य असतात, त्यामुळे जगातील साहित्य, सिनेमांना गांधीजींची भुरळ पडतेच. रिचर्ड अटनबरोच्या गांधी सिनेमात बेन किंग्जलेने गांधी साकारला. गांधीजींच्या उतारवयात त्यांच्या पुढील दंतपक्तींमधील काही एकदोन साथीदारांनी त्यांची साथ सोडली होती. बेननेही चित्रपटाच्या व्यक्तीरेखेसाठी आपले पुढचे दात कायमचे काढून टाकले. सिनेमाचे पडदे आणि नाटकांचे मंच व्यापूनही गांधी उरतातच, गांधींना संपवून इतर कुणी मागे उरलेले नसते. गांधींना संपवणे म्हणजे माणूस म्हणून स्वतःला संपवणे असते.

भानू अथय्यांना गांधींसाठी एकमेव ऑस्कर मिळाला. गांधींचा पंचा, त्यांचे धोतर, चष्मा, त्यातील काच अशा बारीक सारीक गोष्टींचा तपशील अथ्थयांनी मिळवला होताच. हे होमवर्क होतं. कस्तुरबा, गांधींसोबतच बॅरिस्टर जिना, वल्लभभाई, मौलाना अबूल कलाम आझाद असं सगळंच पडद्यावर साकारणं रिचर्डसाठी आव्हान होतं. ‘गांधी’च्या सेटवर लेखक, इतिहासकार, अभ्यासक, इतर युनिट, अथय्या आणि रिचर्ड यांच्यात गांधींच्या पेहरावावरून चर्चा झडल्या आणि गांधी सिनेमा पडद्यावर आला. अथय्या यांनीच जब्बार पटेलांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रपटासाठीही अथय्या यांनी डॉ. आंबेडकर आणि गांधी तसेच इतर व्यक्तीरेखेतील पेहरावांची जबाबदारी घेतली होती. त्यासाठी होमवर्क आवश्यक होतं. त्यासाठी साहित्यिक, लेखिका आयदानकार उर्मिला पवारांच्या मदतीने हे होमवर्क पूर्ण झालं. रिचर्डच्या गांधीमध्ये मुख्य व्यक्तीरेखा असल्याने त्यात पुणे करारातील आंबेडकर विरुद्ध गांधी हा संघर्ष गाळण्यात आला होता. त्यावर समीक्षकांकडून टीका झाली. मात्र, डॉ. आंबेडकरांच्या मनाच्या एका हळव्या कोपर्‍यात गांधींबद्दल असलेली आत्मियता डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटात जब्बार पटेलांनी पडद्यावर कायम ठेवली, तर त्यावरही टीका झाली. गांधी हे नाव टीका, आत्मियता, विचार, मानवी मूल्य, मुत्सद्दी, राजकीय धोरणातील यश-अपयशाच्या कसोटीवर कायमच उतरवले जाते. त्यामुळे साहित्य, नाट्य आणि सिनेमा अशा क्षेत्रातही गांधी कायमच आव्हान ठरतात.

- Advertisement -

शहीद भगतसिंह यांच्यावर कथानक असलेल्या सिनेमांची दशकभरापूर्वी लाट आली होती. यातील राजकुमार संतोषींचा ‘द लिजंड ऑफ भगतसिंह’ सिनेमा संशोधनातून साकारल्याचा दावा केला गेला. यात सुरेंद्र राजन यांनी महात्मा गांधी साकारले जी व्यक्तीरेखा खलनायकी रंगात साकारली गेल्यावर त्यावर गांधीवाद्यांकडून कठोर टीका झाली. असाच प्रकार सुधीर फडके यांच्या महत्वाकांक्षी ‘वीर सावरकर’ या चित्रपटातही असल्याने त्यावरही टीका झाली. इथं एक गोष्ट महत्वाची ठरते, स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक वैचारिक प्रवाह होतेच. मात्र, त्यातही बहुतेक वैचारिक प्रवाहांचा गांधी विचारविरोध हा एक महत्वाचा जोडणारा दुवा होता. मात्र, गांधी हत्येचे समर्थन यात नव्हते. ही दिशाभूल करणारी भयानक पोकळी प्रदीप दळवींच्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाने गांधीहत्येचे समर्थन करून भरून काढली. या नाटकावरही कठोर शब्दात टीका झाली आणि त्या प्रयोगावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली. खरंतर या नाटकाला उत्तर देणार्‍या गांधीविचारांवर आधारीत नाटकाची गरज या निमित्ताने निर्माण झाली होती. पण रंगभूमीवर ही कसोटी पेलवणारी मोजकीच मंडळी होती. नाट्य लेखक प्रेमानंद गज्वी हे त्यात आघाडीवर होते. ‘गांधी आणि आंबेडकर’ हे नाटक त्यांनी लिहिले. मात्र, गांधींना विचार म्हणून समोर आणले आणि डॉ. आंबेडकरांशी असलेला वैचारिक संघर्ष त्यांनी मंचावर मांडला.

श्याम बेनेगल यांनी भारतीय संविधानांची रचना कशी झाली. देशातल्या सर्वाधिक मोठ्या लोकशाही राष्ट्राचे सर्वात मोठे लिखित संविधान कसे आकारले, साकारले गेले यावर दहा एपिसोड्स दूरदर्शनच्या निर्मितीखाली बनवले. त्यात सचिन खेडेकरने डॉ. आंबेडकर साकारले तर नीरज काबी यांनी महात्मा गांधी. या दहा भागांतील पहिल्या आणि दुसर्‍या भागात महात्मा गांधी यांनी संविधानाचे उद्दिष्ट काय असावे, याचे केलेले विश्लेषण दिशादर्शक आहेच, शिवाय गांधींजींबद्दल असलेले गैरसमज दूर करणारेही आहे. मी नथुराम गोडसे किंवा तत्सम नाटकांत महात्मा गांधींना भारताच्या फाळणीचे समर्थक आणि कारण ठरवून खलनायकी रंगातून समोर आणले गेले. फाळणीची खरी कारणे आणि तत्कालीन काँग्रेसची, समकालीनांची भूमिका, पाकिस्तानच्या निर्मितीबाबत जिनांचा हट्ट आणि सामाजिक तसेच धार्मिक विद्वेषाचे राजकीय परिणाम म्हणून फाळणीचा कार्यकाल समोर आणणारा दस्ताऐवज म्हणून संविधानचे एपिसोड्स महत्वाचे ठरतात.

- Advertisement -

अनुपम खेर यांची निर्मिती असलेला ‘मैने गांधी को नही मारा’ हा चित्रपट दीड दशकांपूर्वी जहानू बरुआ यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आला. गांधीजींच्या हत्येनंतर विशिष्ट समुदायातील अपराधीपणाची भावना आणि त्यातून आलेली निराशा याचे मानसिक परिणाम या चित्रपटातून पुढे आले. तर कमल हसनच्या २००० साली आलेल्या ‘हे राम’मध्ये गांधीहत्येनंतर अपराधीपणाची आणि पश्चातापाची भावना चित्रपटातून समोर आली. गांधी हत्येनंतर निर्माण झालेल्या सांप्रदायिक दंगलीत हिंदू आणि मुसलमान या दोन टोकांमधला दुवा म्हणजेच गांधी हे या चित्रपटाने दाखवण्याचा प्रयत्न केला. गांधीविचारांना सार्वकालिक असल्याचे सांगून ही गांधी नावाची नैतिक मूल्ये सदा समकालीन आहेत, असे राजकुमार हिरानीने ‘लगे रहो’ मुन्नाभाईमध्ये दाखवले. रस्त्यावरच्या मुन्नाभाईला शिकवण्यासाठी अंतर्मनातील गांधी विचार म्हणून दिलीप प्रभावळकरांनी गांधी साकारले. प्रत्यक्ष गांधी नाही तर गांधीविचार व्यावसायिक पडद्यावरून पहिल्यांदा समोर आणला गेला. प्रेक्षकांनी हा चित्रपट तिकीटबारीवर यशस्वी केला.

गांधी हे नाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पर्वाचे नाव आहे. गांधींना खोटे ठरवणे, त्यांना खलनायक ठरवणे, त्यांची नकारात्मक मांडणी करण्याची मुभा गांधी विचार स्वतः देतो. गांधी हे नाव अभिव्यक्तीचे असते. या देशात तुम्ही गांधींजींना राष्ट्रपिता म्हणू शकता आणि राष्ट्रपित्यावर यथेच्छ टीकाही करू शकता. कारण गांधींच्या पंचात काळाचे पावले ओळखणार्‍या घड्याळ्याशिवाय बंदुका, गोळी असलं काहीही आढळत नाही. गांधी माणसांना मारत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून कधीही कुठलाही धोका माणसांना नसतो. मात्र, हा धोका राजकीय व्यवस्थेला असू शकतो, फॅसिझम, नाझीझम, माओ किंवा बंदुकीच्या बळावर कल्याणकारी राज्यांची स्थापना करण्याचा बनाव करणार्‍यांना हा धोका कायम असतो. त्यामुळेच गांधी एकाच वेळेस नायकही असतात आणि खलनायकही असतात…मात्र, या दोन्हीकडे या म्हातार्‍याच्या आतील सार्वकालिक माणूस दोन्हीकडे कायम असतो, त्याला संपवणे कुठल्याही काळाला कधीही शक्य नसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -